जोसेफाईनचे डिश वॉशर

भांडी घासणं कुणाला आवडतं? पण हीच रोजची कटकट कमी करण्यासाठी एका महिलेने चक्क एक भन्नाट मशीन तयार केलं! एका फुटलेल्या प्लेटपासून सुरू झालेली जोसेफाईन कोकरान यांची कल्पना कशी जगातील पहिल्या ऑटोमॅटिक डिश वॉशरपर्यंत पोहोचली, चला जाणून घेऊया ही मजेदार शोधकथा.
जोसेफाईनचे डिश वॉशर
जोसेफाईनचे डिश वॉशर'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

भांडी घासणं कुणाला आवडतं? पण हीच रोजची कटकट कमी करण्यासाठी एका महिलेने चक्क एक भन्नाट मशीन तयार केलं! एका फुटलेल्या प्लेटपासून सुरू झालेली जोसेफाईन कोकरान यांची कल्पना कशी जगातील पहिल्या ऑटोमॅटिक डिश वॉशरपर्यंत पोहोचली, चला जाणून घेऊया ही मजेदार शोधकथा.

आपलं ताट, वाटी, पेला जेव्हा घासून ठेवायला घरातील मंडळी सांगतात तेव्हा मोठं जीवावर येतं नाही का? मग विचार करा की कामवाल्या मावशी किंवा मंडळी घरातील मोठी मंडळी ही भलीमोठी टोपलाभर भांडी कशी घासत असतील? केवढे कष्ट पडत असतील त्यांना? अशावेळी भांडी घासायचं मशीनच निघायला हवं असं वाटायला लागतं!! ही भावना आताची नाही तर पार अठराव्या शतकापासून सगळ्यांच्या मनात आहे आणि मंडळी, म्हणून तर डिश वॉशरचा शोध लागला ना? कसा?

अमेरिकेतल्या टेनसी राज्यातल्या शेलबिविल या तुलनेने छोट्या शहरात जोसेफाईन कोकरान नावाची एक सधन महिला आपल्या नवऱ्यासोबत सुखाने राहत होती. या पती-पत्नीला लोकांना खाऊ पिऊ घालायची मोठी हौस! त्यामुळे त्यांच्याकडे पार्टीज खूप व्हायच्या. त्यामुळे जोसेफाईनने तिच्या मदतीसाठी बरेच नोकर-चाकरही ठेवले होते. स्वच्छ काचेच्या प्लेट्समध्ये रुचकर स्वयंपाक वाढायची जोसेफाईनला मोठी आवड होती. तिच्या मदतनीस अतिशय काळजीपूर्वक या काचेच्या प्लेट्स धुवायच्या देखील! पण एक दिवस जोसेफाईनच्या लक्षात आलं की, आपण कितीही निगुतीने या प्लेट्स धुतल्या तरी यातील काही प्लेट्स मदतनीसांच्या हातून फुटायच्या याचं तिला अतिशय वाईट वाटलं. त्या तिच्या आवडीच्या प्लेट्स होत्या! मग तिने ठरवलं की आता आपण स्वतःच या प्लेट्स धुवायच्या. काही दिवस तिने हा सोपस्कार केला देखील, पण सगळीच कामं स्वतः केल्याने ती पार थकून गेली. मग तिने ठरवलं की, आता आपण एक ऑटोमॅटिक डिश वॉशर तयार करायचा.

साधारण अठराव्या शतकाचा हा काळ! तिने याआधी शोध घेतला तेव्हा तिला कळलं की १७९० सालापासून लोकं डिश वॉशर तयार करण्याचा प्रयत्न करताहेत, पण तो फार यशस्वी झाला नाही. जे मशीन होतं ते ऑटोमॅटिक नव्हतं आणि फार सोयीचं पण नव्हतं. मग तिने स्वतःच एक डिझाइन तयार केलं. कॉपर बॉयलरमध्ये तिने बश्यांचा आकार आणि संख्या मोजून वायर्सचे खाचे तयार केले. यात मोटार आणि व्हीलच्या सहाय्याने साबणाचे पाणी नळामधून स्प्रे केलं की, बशा स्वच्छ होतील असं पाहिलं. सुरुवातीला तिला असं डिझाइन तयार करून देणारा मेकॅनिकच मिळेना, मग बराच शोध घेतल्यावर जॉर्ज बटर नावाचा एक चांगला मेकॅनिक मिळाला आणि त्यांनी जगातील पहिलं व्यावसायिक ऑटोमॅटिक डिश वॉशर तयार केलं. १८८६ साली जोसेफाईनने त्याचं पेटंट घेतलं.

१८९३ साली शिकागोला जागतिक व्यापार मेळ्यात तिने हे विकायला ठेवलं. तिला वाटलं होतं जगातील समस्त महिला वर्ग प्रचंड खुश होईल, कारण अखेरीस एका महिलेनेच महिलांच्या बशा धुण्याच्या मेहनतीच्या कामावर उपाय शोधला होता! पण मशीनची किंमत महिलांना जास्त वाटली आणि हॉटेल व्यावसायिकच या मशीनवर जास्त खुश झाले. पण जोसेफाईनने हार पत्करली नाही. बऱ्याच वर्षांनंतर का होईना पण किचन एड नावाच्या कंपनीसोबत तिचा करार झाला आणि जगभरातल्या महिलांना बशा धुण्याच्या कामातून मुक्तीच मिळाली म्हणा ना! एका महिलेनेच महिलांना खूप मोठा दिलासा दिला होता आणि तोही अगदी सहजपणे. एक बशी फुटण्याचं निमित्त झालं आणि डिश वॉशरची निर्मिती झाली. जोसेफाईनने ऑटोमॅटिक डिश वॉशरची निर्मिती करून क्रांती केली. आहे ना थक्क करून सोडणारी कहाणी?

पर्यावरण शिक्षक,प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in