

प्रकाश सावंत
गडगंज पैसा, मोठे घर, उच्च पद, प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य यांसारख्या भौतिक सुखाच्या अमर्याद धावपळीत नेमके काय हवे याचाच माणसाला कधी कधी विसर पडतो. बाह्य जग जिंकण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याचेही भान त्याला उरत नाही. मात्र, मनःशांतीचे सुख हे संपत्तीच्या मोजमापात नाही, तर मनाच्या निर्मळतेत, विचारांच्या सकारात्मकतेत आणि नात्यांतील जिव्हाळ्यात दडलेले आहे. दया, क्षमा, कृतज्ञता, परोपकार या मूल्यांची जोपासना केली, तर मनःशांतीची शोधयात्रा होते सुफळ.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष, मतभेद, संकटे आणि जबाबदाऱ्या यांचा सामना करतानाही मनाचा समतोल टिकवणे म्हणजे मनःशांती. त्यात विवेक आहे, सद्भाव आहे, सहिष्णुता आहे आणि परिस्थिती समजून घेण्याची प्रगल्भताही आहे. मनःशांती हे दुर्बलतेचे लक्षण नाही, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे सामर्थ्य आहे. रागाच्या क्षणी संयम राखणे, अपमान झाल्यावरही विवेक न सोडणे आणि मतभेद असतानाही दुसऱ्याचा आदर करणे, हीच शांत मनाची ओळख. संतसज्जनांच्या मनन चिंतनात आहे, मनःशांती, ती शोधली की सापडते.
मनःशांती आणि अशांती यातील फरक समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सकारात्मकतेत मनःशांती, तर नकारात्मकतेत मनभेद आहेत. शांतता, प्रेम, विश्वास सहजीवनाला बळ देते, तर अशांती संशय, द्वेष आणि संघर्ष वाढवते. अशांत मन माणसाला भावनांच्या आहारी नेते. रागातून चुकीचे निर्णय घेतले जातात, अहंकारातून नाती तुटतात आणि मत्सरातून मानसिक समाधान हरपते. याउलट, शांत मन परिस्थितीचा विचारपूर्वक स्वीकार करते. शांतता म्हणजे अन्याय सहन करणे नव्हे, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवतानाही हिंसा, द्वेष आणि विवेकहीनता टाळणे होय. सत्य आणि अहिंसेच्या विधायक मार्गाने संघर्ष करण्याचे बळही असते मनःशांतीत.
आज समाजात जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रांत यांच्या नावावर निर्माण होणारे वाद मानवी सहजीवनासमोर खडतर आव्हान उभे करीत आहेत. वेगवेगळे विचार असणे स्वाभाविक आहे. तथापि, मतभेदांचे रूपांतर मनभेदात, वैमनस्यात, सूड वा द्वेषभावनेत होणे ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याचे मत आपल्यापेक्षा वेगळे असले तरी त्याचा आदर करणे, सर्वधर्मसमभाव जपणे आणि माणुसकीला कोणत्याही भेदापेक्षा मोठे मानणे आवश्यक आहे. अशांतता समाजात अविश्वास आणि अराजकता निर्माण करते, तर शांतता परस्परांतील विश्वास दृढ करून मानवतेच्या व लोकशाही मूल्यांना बळ देते. त्यामुळे शांतता ही केवळ वैयक्तिक गरज नाही, तर सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचा मूलाधार आहे.
आधुनिक जीवनशैलीने माणसाचे जगणे अधिक गतिमान केले आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत कामाचे नियोजन, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि भविष्याची चिंता यात त्याचा दिवस संपतो. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, माहिती मिळवणे सोपे झाले आणि संवादाची साधने वेगवान झाली. तथापि, या सगळ्या सोयींच्या गर्दीत माणूस ‘आपुलाचि संवाद आपणासी’ साधण्याचेच विसरत चालला आहे. समाजमाध्यमांवर हजारो लोकांशी संपर्क असतानाही मन मोकळे करण्यासाठी विश्वासाचे नाते मिळेलच असे नाही. आभासी जगातील वाढता संपर्क आणि प्रत्यक्ष आयुष्यातील भावनिक दुरावा ही आधुनिक काळातील मोठी विसंगती आहे. सततच्या स्पर्धेमुळे निर्माण होणारा ताण, अपेक्षांचे ओझे आणि इतरांशी तुलना करण्याची सवय मनाची अस्वस्थता वाढवत आहे.
मनःशांतीचा संबंध संपत्तीच्या प्रमाणाशी नसून संपत्तीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाशी आहे. पैसा गरज आहे, सर्वस्व नाही. आर्थिक सुरक्षिततेमुळे स्वावलंबन मिळते, कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येतात आणि संकटांचा सामना करण्याचे नैतिक बळ मिळते. मात्र, पैसा हे साधन असताना तोच जीवनाचा अंतिम उद्देश बनला की असमाधानाची सुरुवात होते. गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि हव्यासापोटी सुरू असलेली धावपळ यात फरक आहे. गरजा मर्यादित असतात; हव्यासाला मात्र सीमा नसते. त्यामुळे किती मिळवले यापेक्षा मिळालेल्या गोष्टींतून किती आनंद अनुभवला, हा विचार अधिक महत्त्वाचा ठरतो.
समाधान ही मनःशांतीची महत्त्वाची पायरी आहे. समाधान म्हणजे प्रगतीची इच्छा सोडणे किंवा परिस्थितीपुढे हार मानणे नव्हे. आपल्या वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून अधिक चांगले जीवन घडवण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याच वेळी आजच्या जगण्यातला आनंद स्वीकारणे म्हणजे समाधान. याच भावनेला कृतज्ञतेची जोड मिळाली की जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा काय आहे, याची जाणीव ठेवणे अधिक गरजेचे आहे. प्रेम करणारे कुटुंब, विश्वासू मित्र, नातेवाईक, आरोग्य, निवारा आणि प्रामाणिकपणे काम करण्याची संधी या गोष्टींचे मोल अनेकदा आपण विसरतो आणि इथेच चुकतो.
मनःशांती टिकवण्यासाठी नातेसंबंधांतील जिव्हाळा आणि संवादही तितकाच आवश्यक आहे. माणसाला आर्थिक सुरक्षिततेइतकीच भावनिक आधाराची गरज असते. कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळा संवाद, एकमेकांच्या अडचणी समजून घेण्याची तयारी आणि नात्यांमध्ये परस्पर आदर या गोष्टी आत्मिक आनंद देतात. प्रत्येक मतभेद हा संघर्षाचा विषय नसतो. काही वेळा समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, आपली चूक मान्य करणे, माफ करणे किंवा क्षमा मागणे एवढ्यानेही नात्यांतील तणाव कमी होऊ शकतो. अहंकारापेक्षा नात्यांना महत्त्व देण्याची वृत्ती मनःशांतीचा मार्ग अधिक सुकर करते.
दया, करुणा आणि परोपकार यांनाही या जीवन प्रवासात विशेष स्थान आहे. दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव होणे आणि ते कमी करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणे ही माणुसकीची खरी कसोटी आहे. मदत नेहमी पैशातूनच करावी लागते असे नाही. एखाद्या गरजवंताला मदत करणे, संकटात आधार देणे किंवा निराश व्यक्तीला धीर देणे, हेही परोपकाराचेच शांतीस्वरूप आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणे आणि दुःखात त्याच्या पाठीशी उभे राहणे यामुळे माणसातील स्वार्थ आणि अहंकार गळून पडतो.
निसर्गाशी असलेले नाते मनाला प्रसन्नता देते. पहाटेची पक्ष्यांची किलबिल, सागर लाटांची गाज आणि पावसाच्या पहिल्या सरीनंतरचा मृद्गंध यासारख्या साध्या अनुभवांतही शांतिपूर्ण आनंद दडलेला असतो; परंतु, धकाधकीच्या जीवनात या अनुभवांसाठी आपण वेळ काढत नाही. काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात घालवणे, आवडीचे छंद जोपासणे आणि स्वतःसाठी वेळ राखून ठेवणे यामुळे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामुळे भविष्यातील जीवन अधिक गतिमान होणार आहे. या बदलांचा स्वीकार करताना तंत्रज्ञानाला साधन म्हणून वापरणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान कामे सुलभ करू शकते; परंतु प्रेम, आपुलकी, करुणा आणि मानवी संवेदनशीलतेची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे विकासाचे मोजमाप केवळ आर्थिक प्रगती किंवा तांत्रिक क्षमतेवर न करता माणसाचे जीवन किती शांततामय, आनंदी, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण झाले, यावरही व्हायला हवे.
मनःशांतीची शोधयात्रा ही एकदाच पूर्ण होणारी प्रक्रिया नाही. ती दररोज स्वतःच्या विचारांचे परीक्षण करण्याची, चुका स्वीकारण्याची आणि अधिक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करण्याची निरंतर वाटचाल आहे. जीवनाचे मूल्यमापन संपत्ती मिळवली किंवा किती मोठी पदे भूषवली यावर ठरत नाही, तर आपण किती माणसे जोडली, किती नाती जपली, किती दुःखी चेहऱ्यांवर हास्य फुलवले आणि किती समाधानाने जगलो यावर ठरते. मन शांत असेल, तर साध्या क्षणांतही आनंद सापडतो. मन समाधानी असेल, तर मर्यादित साधनांतही समृद्धी अनुभवता येते आणि मनात माणुसकी असेल, तर जगण्याला गुणात्मक अर्थ प्राप्त होतो. आयुष्य किती वर्षे जगलो यापेक्षा ते किती प्रेमाने, विवेकाने, शांततेने आणि समाधानाने जगलो, हेच आपल्या जीवनाचे मर्म आहे. मनःशांतीत आहे परिपूर्ण जीवनाची शोधयात्रा, ज्याला ती पायवाट गवसली तो सुखिया झाला.
prakashrsawant@gmail.com