

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
आंबोलीच्या पायथ्याशी वसलेलं सांगेली गाव पावसात अक्षरशः हिरव्या स्वर्गात बदलून जातं. याच निसर्गाच्या कुशीत भातलावणी, वनशेती आणि दुर्मीळ वालय भाताची ओळख करून देणारी ही अविस्मरणीय भटकंती.
पावसाळा सुरू झाला की, भातलावणीची लगबग सर्वत्र सुरू होते. दरवर्षी पावसाळी भटकंती करताना मी एखादं गाव गाठते आणि तिथल्या भात लावणीत सहभागी होते. भात लावणी म्हणजे एक उत्सवच असतो. दोन वर्षांपूर्वी भात लावणीचा अनुभव घेण्यासाठी मी सावंतवाडी जवळच्या सांगेली गावात गेले होते. हे सांगेली गाव आंबोलीच्या पायथ्याशी आहे. तेरेखोल नदी गावातून जोरदार वाहते. गावात थांबलं की, जबरदस्त पाऊस झेलणारी आंबोली, पाटगाव, मठगावची डोंगररांग दिसते. सांगेलीमध्येही पाऊस लागला की, जोरदार लागतो. कोकणातला पाऊस तो.. बेभान होऊन बरसतो, तर अशा या निसर्गसंपन्न सांगेली गावात भात लावणी करायला आणि वनशेती बघायला मी गेले होते. गावातल्या एका छोट्या टेकडीवर असणाऱ्या शेतातल्या मांगरात मुक्कामी होते. ‘सर्वोदय फार्म’ असं त्याचं नाव. संध्याकाळी मी तिथे पोहोचले, तेव्हा पावसाने स्वागत केलं. घराच्या भवताली जंगलातील वृक्षांची दाटी होती, त्यात ते कौलारू शेतघर बांधलं होतं. घराच्या समोर सेंद्रीय पद्धतीने हळद लावली होती. सारा परिसर पाऊस झेलत होता.
सकाळी जेव्हा मी उठले तेव्हाही पाऊस अगदी मुसळधार कोसळत होता. थांबण्याचं नावच घेत नव्हता. घराच्या आजुबाजूला असणाऱ्या मोगऱ्याच्या, जास्वंदीच्या फुलांना हा मारा सहन होत नव्हता, पण त्यांची पानं मात्र अगदी उल्हासाने पाऊस झेलत होती. पाऊस थांबेपर्यंत घराची, शेताची काळजी घेणाऱ्या तिथल्या दादा-वहिनीने मला भाताची पेज आणून दिली, सोबत खोबऱ्याचा तुकडाही दिला आणि सांगितलं की, ‘हा भात इथल्या शेतातलाच आहे.’ अगदी टपोरा, लाल वर्णाचा तो भात होता. हा दुर्मीळ होत चाललेला वालय. कोकणाचं हे वाण. दाण्यावर तपकिरी रंगाची एक सुंदर छटा असते. शेतातली कामं असो वा कोणी आजारी असो, या भाताची पेज पिली की, माणसाला तरतरी येणारच. त्यामुळे घराघरात याची पेज केली जाते. त्याचीच लावणी इथल्या शेतात दुपारी सुरू होणार होती.
बहुगुणी भाताची गरम गरम पेज आणि खोबऱ्याचा तुकडा खाऊन खरंच तरतरी आली. मग दादांना सोबत घेऊन इथली शेती बघायचं ठरवलं. निघताना वहिनीने सांगितलं की, येताना रानभाजी घेऊन या. दुपारी जेवायला तेच करूयात. मग एका हातात छत्री आणि एका हातात बुट्टी घेऊन आम्ही शेताकडे गेलो. असं वाटत होतं की, आम्ही जंगलातूनच फिरतोय. कुठेही एकसुरी माड लावला नव्हता की सुपारी, अननस नव्हता. जंगल जपत, एकसुरी पीक न घेता ही शेती केली आहे. अशी ही इथली वनशेती. पाहताना खरंच समजत नव्हतं की जंगल कुठे संपतं आणि शेती कुठे सुरू होते!! एकमेकांना पूरक ठरत ही शेती केली होती. मसाल्याची झाडं, माड, केळी तर होतीच, शिवाय बांबूचं बनही होतं, फळझाडं होती, देशी फुलांची झाडं लावली होती. एका बाजूला ४ ते ५ छोटे टप्पे असणारी उतरणी होती. त्यातल्या दोन टप्प्यांवर लावणीसाठी तयार झालेले वालय भाताचे तरवे होते. हे दुर्मीळ होत चाललेले भाताचे वाण जपण्यासाठी ती शेती केली होती. शेती बघत फिरताना पाण्याचे ओहोळ मध्ये मध्ये लागत होते. शेतातून आमचा फेरफटका अगदी आनंदात सुरू होता. वाटेत आम्हाला बदामाच्या आकाराची एकपानी नावाची रानभाजी दिसली. शब्दशः एक पान असलेली ही भाजी. मुतखडा, पित्ताचा खडा होऊ नये, तसंच हिमोग्लोबिन वाढावं म्हणून ही भाजी खाल्ली जाते, असं समजलं. ती भाजी अजून आजूबाजूला वाढायची होती. त्यामुळे ती खुडली नाही. वाटेत कृमिनाशक टाकळा, कुडाच्या शेंगा दिसल्या. त्या खुडून आम्ही घराकडे परतलो.
शेताकडून आता बांगड्यांची किणकिण ऐकू येऊ लागली. आम्ही दुसरीकडे शेतात फिरत असताना काही स्त्रिया दाढ काढायला म्हणजे लावणीसाठी तरवे काढून पेंडी बांधायला खाली गेल्या होत्या.
आम्हीही लगेच तिकडे गेलो. पेंढ्या बांधून लावणीसाठी तयार होत्या. टिलरने चिखल घुसळून काढला जात होता. आम्ही पेंडी घेऊन चिखलात उतरलो. चांगला गुडघाभर चिखल तयार झाला होता. मऊ मऊ चिखलात पाय रुतले होते. वाकून पेंडीतील तरवे चिखलात लावत, मागे मागे सरकत आमची भातलावणी सुरू होती. मध्येच जोरदार पाऊस यायचा, तरीही स्त्रिया इरल्याच्या आधाराने आणि मी अंगावरच्या रेनकोटच्या आधाराने भात लावणी करत होतो. काही वेळात आमचे ते भाताचे कोपरे लावून झाले. तेवढ्यात दादा हाताच्या बंद ओंजळीतून उत्साहाने काहीतरी घेऊन आले. ओंजळ दाखवत ते म्हणाले, “ताई आता तुम्ही लावला ना तोच हा तांदूळ. लाल रंगाच्या भात प्रकारात येतो. उत्पन्न कमी आहे म्हणा यातलं, पण एकदम पौष्टिक आहे. याचं फक्त असं वरचं तूस काढलं जातं. आतलं लाल आवरण म्हणजे ब्रान म्हणता ना ते तसंच ठेवतो. या आवरणात भरपूर मायक्रोफायबर असतं. त्याने आपलं पचन सुधारतं. सोबतच व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, झिंक, आयर्न, पोटॅशियमही भरपूर आहे यात. ग्लायसेमीक इंडेक्सही कमी आहे यातला. असा हा आमचा वालय. आहे की नाही बहुगुणी!!” त्यावेळी मला जाणवलं दादांच्या हातात केवळ भात नव्हता तर आरोग्यासाठी गुणकारी असणारं सोनच होतं.
आम्ही भात लावणी करून अगदी तृप्त मनाने घराकडे परतलो. वहिनीने टाकळ्याची भाजी करायला घेतली. नंतर कुडाच्या शेंगा बारीक बारीक चिरल्या आणि उकडून घेण्यासाठी पातेल्यात ठेवल्या.
थोड्याच वेळात ताईने केळीच्या पानावर जेवण वाढलं. जेवणाला वालय भात, तांदळाची भाकरी, कांदा-खोबरं टाकून केलेली टाकळ्याची भाजी, कुडाच्या शेंगाची भाजी, चवळीचं सामारं (आमटी) असा बेत होता. मी कुतुहलाने कुडाच्या शेंगाची भाजी खाल्ली. बापरे!! इतकी कडवट होती ती चवीला!! वहिनी हसून म्हणाली, ताई वर्षातून एकदा तरी खायची ही भाजी. पोटात कृमी वगैरे काही होत नाहीत. आम्ही मुलांना काळे वाटाणे घालून ही भाजी देतो.. मी खरच ती भाजी औषध म्हणून खाल्ली. बाकी जेवणावर मात्र मस्त ताव मारला. भात लावणी, रानभाज्या यांची ओळख करवून देणारी ही भटकंती उत्तम दर्जाच्या अन्नाची ओळख करवून देणारी ठरली.
जवळचे रेल्वे स्टेशन - सावंतवाडी रोड
जवळचे बस स्थानक - सावंतवाडी
आंबोली मार्गे उतरल्यावर सावंतवाडीच्या बरेच अलीकडे एक रस्ता सांगेली गावाकडे जातो. सर्वोदय फार्मचा सावंतवाडीत चराथे गावात इको होमस्टे आहे. तिथे राहूनही एक दिवसाची सांगेलीत जाऊन शेताकडे भटकंती करता येते.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com