ज्याचा त्याचा विठ्ठल, विठ्ठलभक्तीची तुरटी हवी

मानवी मनाच्या गाभाऱ्यात अनेक अंधाऱ्या जागा असतात. त्या उजळायच्या तर ज्याचा त्याचा विठ्ठल प्रत्येकाला लाभावा लागतो. त्यासाठी प्रत्येकाने आपला विठ्ठल शोधावा म्हणजे स्वतःकडेच नव्याने पाहणे शक्य होते, हे सांगणारा विलक्षण अनुभव 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हे नाटक देते. त्या प्रवासाविषयी अभिनेत्री मुधुराणी प्रभुलकर.
ज्याचा त्याचा विठ्ठल, विठ्ठलभक्तीची तुरटी हवी
Published on

विविधरंग

पूजा सामंत

मानवी मनाच्या गाभाऱ्यात अनेक अंधाऱ्या जागा असतात. त्या उजळायच्या तर ज्याचा त्याचा विठ्ठल प्रत्येकाला लाभावा लागतो. त्यासाठी प्रत्येकाने आपला विठ्ठल शोधावा म्हणजे स्वतःकडेच नव्याने पाहणे शक्य होते, हे सांगणारा विलक्षण अनुभव 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हे नाटक देते. त्या प्रवासाविषयी अभिनेत्री मुधुराणी प्रभुलकर.

आपल्या देशात अनेक लाडकी आराध्य दैवतं आहेत. पण सावळ्या वर्णाच्या विठुरायाच्या प्रीतीची-भक्तीची कहाणी काही आगळीवेगळीच... दरवर्षी आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने वारकरी त्यांच्या लाडक्या विठू माऊलीला भेटण्यासाठी विठुनामाचा गजर करत पंढरपूरला जायला निघतात त्यावेळेस त्यांना जळी-स्थळी-काष्ठी फक्त त्यांची विठू माऊलीच दिसत असते. मिळेल तो भाकरतुकडा खाऊन अनवाणी चालणारे, भक्तिरसात तुडुंब भिजलेले अनेक वारकरी भक्त पाहिले की जाणवतं, हीच ती खरीखुरी भक्ती.. विठ्ठलाच्या चरणी लीन होणारी.. वारीच्या दिवसांमध्ये देहभान विसरलेला विठू भक्त म्हणजे भक्तीचा कळस !

याच कालावधीत विठ्ठलाला साद घालणारे, माऊलीला आळवणारे अनेक भक्तिमय कार्यक्रम मोठ्या संख्येने राज्यात ठिकठिकाणी सादर होतात आणि त्यांना चांगलाच लोकाश्रय लाभतो. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सादर करत असलेला असाच एक खणखणीत नाट्यानुभव म्हणजे 'ज्याचा त्याचा विठ्ठल'.

रूपक निर्मित 'ज्याचा त्याचा विठ्ठल' या कलाकृतीत एक सखोल आशय आहे आणि त्यातील विचारमंथन एका उत्तम नाट्यनिर्मितीचा अनुभव देतं. 'ज्याचा त्याचा विठ्ठल' ही एक वेगळा आणि गहिरा अनुभव देणारी कलाकृती ठरावी. 'प्रिय भाई एक कविता हवी आहे!' आणि 'कवी जातो तेव्हा' मध्ये जसा साहित्याचा सुगंध दरवळत होता तसा 'ज्याचा त्याचा विठ्ठल' मध्ये भक्तिरसाचा शांत प्रवाह आहे. प्रत्येकाच्या मनात दडलेल्या एका अनोख्या प्रवासाची ही कथा आहे. डॉ. समीर कुलकर्णी लिखित, अमित वझे दिग्दर्शित ही कलाकृती, विठ्ठलभक्तीच्या पलीकडे जाऊन, मानवी मनाच्या खोल गूढतेत प्रवेश करते.

ही कलाकृती म्हणजे केवळ संतपरंपरेची गाथा नाही, तर आपण स्वतःला आरशात पाहायला घाबरतो अशा क्षणांचा वेध घेणारी आध्यात्मिक यात्रा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक असा कोपरा असतो, जिथे भीती, क्रोध, अहंकार, दुःख आणि बीभत्सतेचं वास्तव्य असतं. या नाटकात नेमक्या त्याच कोपऱ्याचा शोध घेतला जातो आणि अशा अंधाऱ्या जागेतही 'ज्याचा त्याचा विठ्ठल' प्रत्येकाला त्याचा प्रकाश कसा मिळवून देतो, हे सूचित करणारं हे नाटक आहे. म्हटलं तर 'ज्याचा त्याचा विठ्ठल' हे आजच्या काळातील एक रूपक ठरावं, म्हटलं तर आजच्या समाजातील बहुसंख्येचं हे वास्तव ठरावं.

इथे कथा सौदामिनीची आहे, पण प्रत्यक्षात ती प्रत्येकाचीच आहे !

मधुराणी सांगते, “मी मान्य करते की हा कार्यक्रम नाही, ही एक संहिता आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी लिखित कथेचं हे नाट्यरूपांतर आहे. ही कथा सौदामिनी नावाच्या पात्राभोवती फिरते. ही सौदामिनीची व्यक्तिरेखा मी साकारली आहे. सौदामिनी विदेशात टेक्सास इथे राहत असते. तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडते, ज्यामुळे ती सुन्न होऊन जाते. तिचं आयुष्यच थांबून जातं. तिच्या मनात एकच विचार उरतो, स्वतःला संपवायचं किंवा 'त्या'ला संपवायचं. हे सगळं ती तिच्या भारतातील मित्राला सांगते. तो मित्र म्हणजेच डॉ. समीर सौदामिनीला भारतात येण्याचा सल्ला देतात. भारतात आल्यावर तिला ते वारीत घेऊन जातात, जिथे तिची एका बाबांशी भेट होते. हे बाबाच सौदामिनीचे मार्गदर्शक ठरतात.

सौदामिनीचं उदास मन व खोचक प्रश्न आणि तिच्या त्या प्रश्नांना बाबांनी दिलेली तितकीच सकारात्मक आणि सखोल उत्तरं, असा विलक्षण प्रवास पुढे सुरू होतो. प्रत्येकाला स्वतःच्या अनंत रूपांशी, स्वतःच्या भावनांशी जोडून देणारी ही कथा आहे. त्यामुळेच हे नाटक पाहताना एक वेगळी अनुभूती मिळते, जी काहींना स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देते, तर काहींना आपल्या आतल्या संघर्षाची जाणीव करून देते.

या नाट्यानुभवातला गाभा असा आहे की, प्रत्येकाला आपला विठ्ठल शोधता येतो, पण त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा आपल्याला आपला विठ्ठल भेटतोच ! विठ्ठल सापडला म्हणजे आयुष्याचा मार्ग आपसूकच सुकर होऊ लागतो. त्यापुढे मार्गात अडथळे येत नाहीत का? तर येतात ना ! पण त्या संकटांकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन विठ्ठलच आपल्याला देत असतो. चुकीचे निर्णय न घेता योग्य मार्गाने पुढ्यात उभ्या ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद विठ्ठलच आपल्याला देतो आणि अलगद आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो. आजच्या धकाधकीच्या, प्रचंड वेगाने धावणाऱ्या जगाच्या गतीपुढे स्पर्धा, पैसा, द्वेष, नकारात्मकता अशा अनेक भावनांना तोंड देत कमी-जास्त प्रमाणात आपण लढत असतो. अनेकदा अशा विविध पातळ्यांवर लढत असताना मन आणि शरीर दोहोंचं खच्चीकरण होतं. अशा पराभूत व्यक्तीच्या सान्निध्यात राहायला बाहेरचे काय, पण जवळचे देखील तयार नसतात. हल्लीच्या काळात 'चढाओढ' हा शब्द ऐकायला बरा वाटतो, पण चढाओढीने जगणं अतिशय जिकिरीचं झालं आहे. सोशल मीडिया खूप मित्र-मैत्रिणी जोडून देतो, पण हजारोंच्या संख्येने असलेले हे 'आभासी' विश्वातील मित्र-मैत्रिणी आपले असतात का? आपलं नैतिक पाठबळ, मनोधैर्य आभासी विश्वातील फ्रेंड सर्कलमुळे उंचावते का? प्रत्येकाला एकटेपणा आला आहे. पण एकटेपणाच्या मुस्कटदाबीपुढे वाचा फुटत नाही. एकटेपणा घोर अंधार, नैराश्य घेऊन येतो, त्याने निर्माण होतात मनोविकार ! खूपदा आर्थिक सुबत्ता असलेले दुःखी असतात, तर आर्थिक बाजू बेताची असलेले सुखी असतात. तात्पर्य, हेच की अफाट पैसा असला तरी जगातील सगळी सुखं विकत घेता येत नाहीत. अशा वेळेस विठू माऊली तुमचं सर्वस्व, तुमचा सखा-सोबती होते. "विठू माऊली तू माऊली जगाची.. माऊलीच मोठी विठ्ठलाची..." हे आपण ऐकत आलोय. सध्याच्या सामाजिक वातावरणाशी हा नाट्यानुभव समर्पक आहे.

विठ्ठलासमोर कुणी गरीब-श्रीमंत नाही. 'सोयरे सकल' हे त्याचे तत्त्व आहे. मोबाईलशी कनेक्टेड असलेली आजची पिढी देवाशी, स्वतःच्या आतल्या आवाजाशी मात्र डिस्कनेक्टेड आहे. विठ्ठलाच्या भक्तीतून स्वतःशी असलेलं हे कनेक्शन कसं सापडतं, हे या नाट्यानुभवातून सादर केलं जातं.

मधुराणी प्रभुलकर सांगतात, "मी हे नाटक स्वीकारलं, कारण मला संहिता आवडली. मला हे नाटक करावंसं वाटलं हे खरं. या नाट्यानुभवाच्या प्रयोगानंतर मला एका मैत्रिणीने 'वारीला येतेस का?' असं विचारलं. आधी मी 'नाही' म्हटलं, पण नंतर मला मैत्रिणीसोबत विठू माऊलीचं दर्शन घ्यावंसं वाटलं. मी आणि मैत्रिणीने विठू माऊलीचं दर्शन घेतलं. त्यावेळी मला एक वेगळा, आत्मिक आनंद वाटला. गाभाऱ्यात बसून मला विठ्ठलाचं दर्शन झालं. माझी अशी भावना आहे की, विठ्ठलाची भक्ती म्हणजे माणसाला आतून शांत करणारी, त्याला हळूहळू बदलायला भाग पाडणारी आहे. आध्यात्मिक किंवा दैविक भक्ती म्हणजे तुरटी.. विठ्ठलाच्या भक्तीची तुरटी अशी मनावर फिरली की सगळ्या नकारात्मक भावनांचा गाळ खाली बसतो आणि अवघं जग स्वच्छ दिसायला लागतं. आता एक गंमत पहा, मी एक फिल्म करतेय. या फिल्मचा क्लायमॅक्स चक्क विठ्ठलाच्या देवळात होणार आहे. म्हणजेच विठू माऊली मला पुन्हा-पुन्हा त्यांच्या दर्शनाला बोलावून घेताहेत. यापेक्षा विठू माऊलीचा मोठा दृष्टांत कोणता असेल?"

अखेरीस 'ज्याचा त्याचा विठ्ठल' वेगळा असेल, पण प्रत्येकाने तो शोधला पाहिजे, हेच खरं.

ज्येष्ठ सिने पत्रकार

logo
marathi.freepressjournal.in