

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
कबीराची कविता अध्यात्मिक अनुभवाशी जोडली असली तरी तिची भाषा लोककल्याणार्थ रोखठोक, श्रोत्यांशी जवळची आणि समाजातील विसंगतींवर तीव्र भाष्य करणारी आहे.
आध्यात्मिक अनुभव हे कबीराच्या काव्याचं केंद्र असलं तरी त्याच्या उपदेशकाच्या भूमिकेमुळे त्याची भाषा लोककल्याणार्थ रोखठोक होते. अवतीभवतीच्या समाजाचं निरीक्षण तो करतो आणि त्या समाजात उत्पन्न झालेल्या विकृतींवर , विसंगतींवर तीव्र उपरोधाच्या भाषेत हल्ला चढवतो. ठामपणा हा कबीराच्या शैलीचा अविभाज्य भाग आहे. त्याच्या काव्याची प्रकृती न्याहाळताना त्यात विचारानुभवाचं प्राबल्य असल्याचं जाणवतं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी कबीराच्या दोह्यांचा जो भावांनुवाद केलेला आहे त्यामध्ये औपरोधिक मराठी भाषेचा चपखल उपयोग करण्यात आलेला आहे.
गाय वांझ अन् बैल वीतसे
तिन्ही सांज वासरू दुभतसे
मांजर नौका चालवी मूषक
साप रक्षितो निद्रित बेडुक !
ही कबीराची एक गाजलेली उलटबांसी रचना आहे. वाटेत भेटणारे नाले, तळी, डबकी आपल्यात सामावून घेत नदीचा प्रवाह पुढे जात राहावा तसा कबीराच्या भाषेचा प्रवाह आहे. ज्या ज्या वेळी जे जे मनात येईल ते आवेशानं बोलून टाकणं हा त्याच्या कवितेचा स्वभाव. संगती, विसंगती, भूमिकेचं सातत्य या गोष्टींचा आपल्या त्या क्षणीच्या उत्कट अनुभूतीवर तो वरचष्मा होऊ देत नाही. त्या क्षणी जे त्याला तीव्रतेनं सांगायचं असतं ते समोर जमलेल्या लोकांना सांगता यावं हीच कबीराची भाषेकडे पाहण्याची दृष्टी आहे. ही रोखठोक व्यावहारिक भाषा लोकांना पटकन भिडते. आपला आशय सांगताना कबीर कधी कधी स्पष्टीकरण आणि उदाहरणं देत असतो. कधी तो आपला आशय साधेपणाने सांगतो, तर कधी दणकावून ठणकावून सांगतो. आता हीच एक रचना पहा ना :
जे तू बाॅंभन बॅंभनी जाया
तौ ऑंन बाट व्है काहे न आया
जे तू तुरक तुरकनी जाया
तौ भितरी खतना क्यूं न कराया
अर्थ: ब्राह्मण काय, हिंदू काय, मुसलमान काय किंवा आणखी कोणी काय, सगळी माणसंच-- एकाच वाटेनं जन्माला येतात. ब्राह्मणाचा जन्म काय याहून वेगळ्या वाटेनं होतो काय? मुसलमान म्हणून जर ईश्वरांनं जन्माला घातलं असतं तर माणूस गर्भात असतानाच त्याची सुंता करून ईश्वरानं त्याला जगात पाठवलं नसतं काय? असा, थोबाडात ठेवून दिल्यासारखा प्रश्न कबीर रोखठोक भाषेत विचारतो.
कहै कबीर चेतहु रे भोंदू
बोलनहारा तुरक न हिंदू
अशी सुभाषितं झालेली कबीराची विधानं कालांतरानं भाषेच्या वहिवाटीत इतकी भिनून जातात की ती वापरणाऱ्या माणसांना या ओळी मुळात कोणाच्या आहेत हेही अनेकदा ठाऊक नसतं.
अनेक लोकसमूहात कबीर फिरला वावरला असल्यामुळे अनेक भाषांतले शब्द कळत-नकळत त्याच्या जाणिवेला चिकटले. आपला आशय जो नेमकेपणाने आणि लोकांना कळेल अशा रीतीनं सांगतो तो शब्द उपयोगाचा ही कबीराची धारणा होती. त्यानं आपली कविता गाताना या शब्दांना नकार दिला नाही. ब्रज, फारसी, उर्दू, खडी बोली, अवधी, पंजाबी, भोजपुरी, मारवाडी, राजस्थानी अशा अनेक भाषातले आणि बोलीतले शब्द कबीर ठणकावून वापरतो. काव्याची भाषा कशी असावी- नसावी या यम नियमांचं कसलंही दडपण चुकूनही मनावर नसल्यामुळे हे अनेक भाषेतले शब्द अगदी नि:संकोचपणे त्यांच्या आशयाची शक्ती घेऊन आत्मविश्वासानं कबीराच्या कवितेत वावरू लागतात. त्याच्या काव्यातील या अनेक भाषातील शब्दांकडे काही अभ्यासक वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्या काळातील इतर संत आणि सुफी कवी यांच्या काव्यातही असं शब्दांचं मिश्रण आढळतं. पण हे मिश्रण इतर संत कवींच्या बाबतीत अतिशय मर्यादित आहे .कबीराच्या बाबतीत हे मिश्रण जबरदस्त आहे ही गोष्ट हे अभ्यासक मान्य करतात. सतत भटकंती आणि श्रोत्यांच्या शक्य तितक्या जवळ जाऊन पोहोचलं पाहिजे ही जाणीव यामुळेच अनेक भाषा आणि बोलींतले शब्द कबीर नि:संकोच उचलत राहिला. कबीराच्या भाषेला प्राप्त झालेलं हे रूप समजून घेताना आणखी एक महत्त्वाचा घटक ध्यानात घेणे आवश्यक आहे आणि तो म्हणजे कबीरानं आपली कविता श्रोत्यांसमोर गाऊन सांगितली आहे. 'कहे कबीर' हा ठसा त्याच्या कवितेच्या एकूण धाटणीवरच आहे. अशा कवितेला बोलभाषेच्या शक्य तितकं जवळ जाणं अटळ असतं. त्याचं गाणं ऐकताना कबीर आपल्याशी खोल जिव्हाळ्यानं बोलतो आहे असं वाटत राहतं आणि त्यामुळे कबीराची भाषा ही बोलणारी भाषा आहे.
कबीराचं काव्य 'कबीरबानी' या नावानं ओळखलं जातं. जी भाषा लोक प्रत्यक्ष बोलतात ती भाषा तिच्या विविध शक्तींसह कबीर आत्मसात करीत गेला. तिच्यात बोलभाषेचा सहजपणा आणि गोडवा आला. सर्वसामान्य माणूस बोलतो तेव्हा त्यानं भाषेच्या रूपाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलेलं असतं. आपण जे सांगतो आहोत ते ऐकणाऱ्याला कळावं, त्याच्या भावनेला भिडावं अशी अत्यंत स्वाभाविक अशी व्यावहारिक प्रेरणा त्याच्या बोलण्यामागे असते. हीच स्वाभाविक प्रेरणा कबीराच्या गाणं सांगण्यामागे आहे. गाण्याच्या मुखड्यात तो तत्वविधान करतो आणि नंतर एखाद्या शिक्षकाप्रमाणे या विधानाचं उदाहरण देऊन स्पष्टीकरण करीत जातो. जी गोष्ट अशी बोलून सांगायची ती सांगताना तिच्यात वक्तृत्वाच्या शक्ती वापरल्या जाणं स्वाभाविक असतं आणि कबीर तशा त्या वापरतो. उदाहरणार्थ सारं काही चैतन्यातूनच निर्माण होतं आणि अखेर या चैतन्यालाच मिळतं हे तत्व कबीराला सांगायचं असतं तेव्हा तो म्हणतो--
शरीर कैसे उपजे ? कुठुनी जीव येऊनी राही?
कुठे इंद्रिये विसावति ? कुठे प्राण निघोनी जाई ?
यासाठी कबीर ही प्रश्नांची नाट्यपूर्ण रचना उभी करतो. ईश्वर हा जन्ममृत्यूच्या अतीत आहे. तो कुठल्याही रूपात अडकून राहू शकत नाही आणि म्हणून कुठल्याही देहधारी रूपात अडकून पडू नका हे कबीराला सांगायचं आहे.
सर्वसामान्य व्यवहारातील अतिपरिचित झालेली भाषा काव्यात वापरणं हे कठीण काम असतं कारण या अतिपरिचित भाषेची काव्यात्म प्रत्यय देण्याची शक्ती क्षीण झालेली असते. पण कबीराचं वैशिष्ट्य हे की अशा रोजच्या वापरातील भाषेलाही तो एखाद्या काव्यात्मतेचा शिक्का नसलेल्या शब्दानं आपल्या शैलीत खास तडका देतो. आता हेच पहा ना-
एक कहावत मुलॉं काजी
रामबिना सब फोकटबाजी
यातला तथाकथित काव्यात्मतेचा शिक्का नसलेला फोकटबाजी हा शब्द कबीरानं मोठ्या ताकदीनं उचलून धरला आहे.
अनुभूतीशून्य पांडित्य , जात आणि धर्म या तीन गोष्टी कबीर जुमानत नाही .आणि म्हणूनच हिंदू -मुसलमान ऐक्यासाठी कबीराचं नाव घेऊन आवाहन करणाऱ्यांनी ध्यानात घेतलं पाहिजे की या ना त्या प्रेषिताचा किंवा पवित्र ग्रंथाचा, देवळाचा झेंडा खांद्यावर घेऊन भजनांचा, प्रार्थनांचा, धार्मिक घोषणांचा संघटित गोंगाट करणाऱ्या धर्मवादी कळपांना कबीर झेपणारा नाही.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com