

दखल
उषाकिरण आत्राम
ज्येष्ठ कवी आणि गोंडवाना दर्शन या मासिकाचे संपादक सुन्हेरसिंह ताराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त कचारगड इथे बहुभाषिक कविसंमेलन संपन्न झाले. परिघावरचे समाजमन कवेत घेणारा एक वेगळा आशय या संमेलनातून पुढे आला.
कवितेची सखोल जाण असलेले हिंदी-मराठी भाषिक, वयाने ज्येष्ठ, ज्ञानाने श्रेष्ठ असलेले असे मातब्बर कवी-कवयित्री..ज्यांनी रसिकांच्या काळजात हात घालून कविसंमेलन काय असते याचा प्रत्यय देत आत्मचिंतन करायला भाग पाडले..याचा नितांत सुंदर अनुभव अलीकडेच आला. ७ नोव्हेंबरला गोंडवानारत्न सुन्हेरसिंह ताराम यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील कचारगड इथल्या ताराम भवन येथे हे कविसंमेलन संपन्न झाले.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर या ह्या कविसंमेलनाच्या अध्यक्ष होत्या. उपस्थितांमध्ये शशी तिवारी, रमेशजी शर्मा, माणिकजी गेडाम, सविता बेदरकर, नागोराव सोनकुसरे, प्रकाशजी मिश्रा आणि उषाकिरण आत्राम या मान्यवर साहित्यिक, कवी मंडळींचा समावेश होता. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात सीमेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात झालेल्या या कविसंमेलनामध्ये सहाजिकच सीमाभागातील कवी-कवयित्रींचा समावेश होता. त्यामुळे कविसंमेलन आपसूकच बहुभाषिक झाले. मराठी, हिंदी आणि गोंडी भाषेतील कविता रसिकांसमोर सादर झाल्या. त्याचवेळी विविध विषयांनाही सामावून घेण्यात आले.
आपल्या गावांची झालेली दुर्दशा आणि त्याकडे होणारे अपार दुर्लक्ष यांना वेधणारी कविता सादर करत चंद्रप्रकाश बनकर यांनी कवी संमेलनाची दमदार सुरुवात केली. भोजराज काकोडे यांनी खणखणीत अशी गोंडी रचना सादर करत हे कविसंमेलन आदिवासी भागात संपन्न होत आहे, याची उपस्थितांना जाणीव करून दिली.
आज काळानुसार नाती बदलत आहेत. कालची संवेदना, प्रेम, जिव्हाळा असलेली नाती कधी कृत्रिम, कचकड्याची झाली ते कळलेच नाही, असे सांगणारी ‘नाती’ कविता सादर करण्यात आली. याच कवितेचा सूर पकडत मनोज यांनी भाऊबंदकीबाबतचा स्वच्छ आरसा दाखवत नात्यांमधल्या भिंती उजागर केल्या. किरण भिसेन यांनी आईवरची सुरेख रचना सादर करून आई म्हणजे विश्वासाचे पंख असलेली निवांत जागा असे भाव प्रगट केले. रमेश जुमडे यांनी “बडी नही..छोटी सही, हर किसी को रोटी मिलनी चाहिये”, अशा शब्दांमधून आपल्या जनकेंद्री संवेदना व्यक्त केल्या. निखिलेश यादव यांनी राजकीय नेते कधीही आमच्या गावाकडे आपली नजर उचलून पाहात नाहीत याकडे लक्ष वेधणारे काव्य सादर केले. “फेरी नही नजर फिर कभी मेरे गाव में” या त्यांच्या पंक्ती श्रोत्यांची दाद घेऊन गेल्या. तोच सूर पकडत अशोक मिश्रा यांनी “आज क्या हो रहा है” यावर भाष्य करणारी मार्मिक रचना सादर केली.
आईपासून सुरू झालेला जिव्हाळा हा कधी संपत नसतो..उलट ती गेल्यानंतर तो आणखी जास्त उजागर होतो, अशी भावपूर्ण कविता प्रनोती कळमकर यांनी सादर केली. प्रतिभा सहारे यांनी माणुसकीचा गंध पेरणारी ‘स्वप्न’ ही रचना सादर केली. स्मिता किडीले यांनी जीवनाचे सुखदुःख आपल्याला संतुलित करता आले पाहिजे तरच आपण सृजन करणारे ठरतो, असा आशय आपल्या कवितेतून व्यक्त केला.
नुकतीच दिवाळी झाली. परंतु गरीबाच्या झोपडीमध्ये आजही दिव्यामधले तेल सरलेले आहे, याची फटाके फोडणाऱ्या आगीला जाणीव का नसावी..? अशा प्रश्नांना अधोरेखित करणारी रचना सुनीता रामटेके यांनी सादर केली.
“बिना दस्तक ही सुरज आता है,
और बिना दस्तक ही रात..”
असे भाव असणारी ‘दस्तक’ ही सुरेख रचना छाया ब्रह्मवंशी यांनी सादर केली.
एकूणच कवीपणाचा आपला बाज सांभाळत एकापेक्षा एक दमदार रचना सादर होत असताना प्रेमामधील विरहाचा भाव घेऊन शालू कृपाले व्यक्त झाल्या. त्यामुळे सारे वातावरण स्तब्ध झाले. काव्याच्या आशयानुसार काव्य रसिकांची दाद मिळवणारे हे कविसंमेलन सातत्याने उंचीवर जात राहिले.
“ती कुठे आता झुरते बिरते,
ती तर आता साऱ्या जगाला पुरून उरते..”
हा बंडखोरीचा सूर लावत व्यक्त झाल्या डॉ. सविता बेदरकर. त्या म्हणतात,
“मी कुठे असते..?
मला काय विचारता..?
मला आहे माझ्या सजगतेचे भान,
भविष्याकडे लक्ष ठेवताना,
मी जाणते माझे वर्तमान...”
समाजाच्या चौकशांना असे सडेतोड उत्तर देणारी कविता त्यांनी तितक्याच दमदारपणे सादर केली. विविध भावभावना या संमेलनातून व्यक्त होत होत्या.
‘कटू सत्य’ ही दमदार रचना घेऊन आलेले सुरेंद्र मेश्राम सांगतात -
“चेहरा मुस्कुराता है
लेकिन दिल में तन्हाई रहती है...” त्यांचे सादरीकरणही प्रभावी होते. त्यांच्या काव्यावर भाष्य करताना अध्यक्ष विजया मारोतकर म्हणाल्या, “सुरेंद्र मेश्राम यांच्या एकूण सादरीकरणाचा सारांश म्हणजे इन्सान तो ऑनलाइन है..लेकिन इन्सानियत ऑफलाइन है.
संतोषसिंग नायक यांनी स्वर्गीय तारामजींच्या संघर्षांना अधोरेखित करत संविधानाला महत्त्व देणारी रचना सादर केली.
मदन सर यांनी वर्तमानात सुरू असलेल्या शिक्षकांच्या व्यथांकडे लक्ष वेधले, तर नंदकिशोर नेताम यांनी रानावनातले सत्य मांडताना गावखेड्यातल्या रानातल्या आदिवासी मुली किती कणखर आणि हुशार असतात हे सांगताना किरण बेदी, कल्पना चावला अशाच मातीतून घडलेल्या आहेत, याचा दाखला दिला. रमेश मेश्राम यांनी आपल्या सादरीकरणातून सभामंडपामध्ये वीर रसाची पेरणी केली.
कवी माणिकराव गेडाम यांनी सर्वांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारी छोटीशीच परंतु मनाचा तळ गाठणारी रचना सादर केली. आश्रम शाळेत शिकणाऱ्या दोन मुलांचा व्यवस्थेने बळी घेतला. शासनाने त्या मोबदल्यात त्यांच्या पालकांना दोन शेळ्या दिल्या. कविता संपली तेव्हा सभा मंडपात सन्नाटा होता. हेच तर कवितेचं यश.
उषाकिरण आत्राम यांनी आजच्या मुलींना संदेश देणारी दमदार कविता सादर केली. तू रातराणी होऊ नको, तर पळसाचा रंग घेऊन परिस्थितीवर मात करणारी मशाल हो, असे त्यांची कविता सांगते. शेवटी हिंदीचे मोठे कवी शशी तिवारी यांनी उडत्या पाखरांना उंचीची जाण असावी, परंतु उडाण घेताना आकाशाला भेटण्याची जाण ठेवावी, हे सांगणारी कविता सादर केली.
संमेलनाच्या अध्यक्ष विजया मारोतकर यांनी स्वत:च्या हिंदी आणि मराठी रचना तर सादर केल्याच, परंतु प्रत्येक कवीच्या कवितेचा आढावा घेत कवितेचे केलेले विश्लेषण पाहून सारे सभागृह थक्क झाले. छगन पंचे यांचे सूत्रसंचालन म्हणजे एक वेगळी सौंदर्यगाथाच होती. प्रत्येक कवितेनंतरचं त्यांचं मार्मिक भाष्य अजोड होतं.
ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखक