

अक्षय वाटवे
काही स्वप्नांना समाजाची परवानगी असते, तर काही स्वप्नं निसर्गच नाकारतो. पण मनाला हे कोण समजावणार? सोनलच्या एका हट्टाने उलगडणारी माणुसकीची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी...
सकाळची पाचची चर्चगेट फास्ट धडधडत गेली. लोकल सिग्नल ओलांडून पुढे गेली, मात्र रूळ थरथरत होते. तांबडं फुटायला अवकाश होता. पण शहर मात्र नेहमीप्रमाणे जागंच होतं. प्रत्येकजण स्वतःच्या कर्तव्यात मग्न. स्टेशनच्या मागच्या भागात लांबलचक पसरलेली झोपडपट्टी. बकाल, उदास, भिकार, गलिच्छ, ओंगळवाणी अशी घाणीची जेवढी म्हणून विशेषणं असतील ती सारी दिमाखाने मिरवणारी ती वस्ती. त्यात कोंबडांना खुराड्यात मारून मुटकून कोंबावं तशी दहा बाय दहा किंवा त्याहूनही कमी आकाराच्या खुराड्यात भरून राहिलेली माणसं. काही स्वेच्छेने, काही अनिच्छेने, काही अपरिहार्यतेने अशा अनेक कारणांमुळे त्या खोल्यांमधून मांडलेले संसार. त्या संसाराच्या खुणा झोपडीच्या पत्र्याच्या छपरापासून ते स्टेशनच्या रेलिंगपर्यंत सर्वत्र पसरलेल्या... मृतप्राय! या शहरानेच जणू आपला जिवंतपणा केव्हाच टाकलाय, उरलं आहे ते फक्त अस्तित्व टिकवण्यासाठीचं यांत्रिकपण आणि जीवघेण्या स्पर्धेतून बळावत चाललेलं पशुत्व. ज्याचे ओरखडे जागोजागी दिसत होते.
झोपडीच्या उंबऱ्यावर चहाचा कानतुटका कप हातात घेऊन बसलेली सोनल शून्यात नजर लावून बसली होती. एके रात्री तिच्या बापाने तिला सीएसटी स्टेशनवर रेल्वेतून खाली उतरवलं आणि ब्रिजवर नेऊन बसवलं. किती वर्षं झाली? आठवत नाहीत. तेव्हापासून या बकाल बजबजपुरीत ती भटकतेच आहे. सुरुवातीची काही वर्षं ठोकरा, शिव्या खाण्यात गेली, मात्र शाळकरी वयातल्या सोनलने आपल्या चुणचुणीत स्वभावाने या स्वप्ननगरीत टिकून राहता येण्याएवढं बळ मिळवलं... सुरुवातीला तिला स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांचं प्रचंड आकर्षण होतं. रोज जाऊन ती ब्रिजवर बसायची, पण कधी ट्रेनमध्ये बसायची तिची हिंमत झाली नाही आणि शहर सोडायचीही हिंमत नाही झाली... का? हाच तर प्रश्न होता. कधीतरी सोनलला असा किंचित मोकळा वेळ मिळायचा आणि तिचं मन भिरंगायचं स्टेशनवर, सीफेसवर... कुठून कुठून फिरायचं आणि माहीम स्टेशनवर येऊन थांबायचं... तिथेच तर तिला सापडलं होतं शहर न सोडण्याचं कारण... तो प्रसंग आठवून आळसावलेल्या सोनलच्या चेहऱ्यावर तजेला आला.
धंद्याला बाहेर पडायला अजून अवकाश होता. तिने सावकाश वळून झोपडीत पाहिलं. पत्र्याच्या एका भोकातून पहाटेच्या किरणांचा एक कोवळा कवडसा कांताच्या उघड्या छातीवर पडला होता. तो पाहून सोनलच्या चेहऱ्यावर नाजूक हसू पसरलं.
कांता... त्याचं नाव. तोच कारण हे शहर न सोडण्यामागचं. पण फक्त तेवढंच नाही तर सोनल जिवंत असण्याचंही कारण तोच. त्या दिवशी सैरभैर झालेली सोनल माहीम स्टेशनच्या पायऱ्या भराभरा उतरत होती. टॉप खांद्यावर फाटलेला. केस विस्कटलेले, डोळ्यातून ओघळलेले अश्रू गालावर येऊन सुकले होते. ओठाच्या कडेतून रक्त ओघळत होतं... सगळं अंग थरथरणारं... सोनल थेट ट्रॅकवर चालू लागली. पलीकडे प्लॅटफॉर्मवर कांता बसला होता. कसं कोण जाणे त्याचं लक्ष सोनलवर गेलं. झोपडपट्टीतली असेल म्हणून आधी त्याने दुर्लक्ष केलं. मात्र न राहवून त्याने तिला हटकले. लांबवर फास्ट लोकल धडधडत होती तो आवाज कांता आणि सोनल दोघांनीही ऐकला. नियतीची गणितं सहज सुटत नाहीत. काहीतरी वेगळी जाणीव होऊन भारल्यासारखा कांता झटकन रुळावर उतरला आणि धावत जाऊन त्याने सोनलला बाहेर खेचलं. अगदी फिल्मी सीन.
कांता काही बोलणार एवढ्यात सोनल त्याला धक्का देऊन मागे फिरली. कांताही एक कचकचीत शिवी घालून वळला. मिनिटभर झालं असेल नसेल. सोनल वळून आली आणि धावत येऊन तिने कांताला मागून धक्का दिला. कांता भेलकांडला, पण कसाबसा सावरला. सोनल त्याला थापाथपा थपडा मारत होती.
“क्यू बचाया मेरे को... क्यू... क्या लगता तू मेरा...” तोंडाने अखंड शिव्या घालत सोनल कांतावर तुटून पडली. कसंबसं स्वतःला सावरत कांताने तिचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले आणि फाडकन तिच्या मुस्काटीत भडकवली. सगळा ताण गेल्यासारखी तिथेच बसून सोनल ओक्साबोक्शी रडू लागली. आज चार वर्षं झाली तरी तो प्रसंग सोनलच्या डोळ्यांसमोर तसाच उभा राहतो. अधिक ओळख मग या झोपडपट्टीत राहायला येणं, मग शिला दीदीची भेट... त्या दिवशी पहिल्यांदा सोनलची सत्याशी गाठ पडली होती. तिच्या आयुष्याचं सत्य! इतकं भयंकर!! आपली एवढी क्रूर चेष्टा का व्हावी याचं उत्तर न सापडल्यामुळेच तर संतापून ती मृत्यूला मिठी मारायला निघाली होती, मात्र नियतीचा डाव असा उरफाटा की, ती थेट कांताच्या कुशीत विसावली...
सोनलच्या आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे प्रसंग. एक तो सीएसटीच्या पुलावरचा आणि दुसरा हा माहीमच्या रेल्वे रुळावरचा. दोन्ही वेळेला जबरदस्त हादरा देऊन आयुष्याने एका वेगळ्या वळणावर तिला उभं केलं होतं.
वाऱ्यावर उडणारे आपले पिंगट केस आणि भरकटलेले विचार दोन्ही सावरत सोनल मागे वळली. झोपडीच्या कोपऱ्यातल्या मोरीच्या कठड्यावर कप ठेवून तिने पत्र्याचं दार सरकवलं आणि कांताच्या शेजारी पसरली. त्याच्या उघड्या छातीवर पडलेल्या त्या कोवळ्या कवडशावर हलकेच बोटं फिरवू लागली. स्वतःशीच खुदकन हसू लागली. हे सगळं सत्यात उतरेल असं स्वप्नातही तिला वाटलं नव्हतं. पण शिला दीदीने पुढाकार घेतला. सगळ्यांच्या विरोधात जाऊन ती सोनलला इथे घेऊन आली. कांताही मागे हटणारा नव्हता. धंद्यातून जमवलेले आणि दीदीकडे साठवलेले पैसे घालून त्याने ही झोपडी घेतली. अजून काही पैसे फेडायचे होते. पण कांता ते नक्की फेडेल आणि मग आपण सुखाने संसार करू याची सोनलला खात्री होती. खूपच धाडसी निर्णय घेतला होता दोघांनी. विरोध खूप झाला. शिव्याशाप, भांडणं झाली... मात्र कांता आणि शिला दीदी ठाम उभे राहिले. कांताने मोठीच हिंमत दाखवली आणि इथपर्यंत तरी सगळं नीट पार पडलं. लवकरच कांता धंदासुद्धा बंद करणार होता. शिक्षण पूर्ण होताच तो नोकरीही करणार होता. कालचं दोघांचं बोलणं आठवून सोनल हरखून गेली होती. तिने पुन्हा कांताच्या छातीवरून आपलं एक बोट फिरवलं.
सोनलच्या त्या स्पर्शाने कांताने थोडी चुळबुळ करत कूस बदलली. एवढ्यात मोबाईलचा अलार्म वाजला. कांताला जाग आली तशी सोनल बाजूला झाली. सकाळचं एकेक आवरून दोघं तयार होऊन बाहेर पडले. स्टेशनशेजारच्या शेट्टी अण्णाकडे इडली-सांबार खाऊन दोघांनीही आपापली ट्रेन पकडली. धावत्या ट्रेनमध्ये चढताना कांताने सोनलवर एक नजर टाकली. त्या नजरेत खूप काही सामावलं होतं. वळून सोनल ब्रिजवर चढली आणि धडधड पायऱ्या उतरत तिने दादर फास्ट पकडली. आता मात्र तिची चाल, चेहऱ्यावरचे हावभाव सारंच बदललं होतं. सराईतासारखी ती पुढे झाली. कारण धंद्याचा टाइम झाला होता. तेवढ्यात शेजारून गडबडीत जाणाऱ्या एका तरुणाचा तिला ओझरता धक्का लागला. चिडका कटाक्ष टाकून, अंग चोरून तो तरुण झरझर पुढे झाला. तेवढ्यातही तो पुटपुटला, “चले आते है सुब सुब...” सोनलच्या तिखट कानांनी ते शब्द बरोबर पकडले आणि “ए क्या रे!” असा खणखणीत आवाज टाकला... मात्र तेवढ्यात तो तरुण चालत्या ट्रेनमध्ये शिरला होता.
दिवस चढत गेला. फिरता फिरता सोनल माहीमला उतरली. वडापाव तरी पोटात टाकावा म्हणून स्टेशनबाहेर आली. एवढ्यात तिची नजर पलीकडून येणाऱ्या एका जोडप्याकडे गेली.
“सावकाश, सावकाश. अगं हळू चाल. काय सांगितलंय डॉक्टरनी माहितीये नं. आता पुढचे सहा महिने धावपळ, दगदग नाही. फक्त आराम. आता तू आई होणार आणि मी बाबा!!”
शेवटचा शब्द त्या मुलाने एवढा मोठ्याने उच्चारला, की एक क्षण पलीकडचा टपरीवाला, टॅक्सीवाला, फुलवाला, पाणीपुरीवाला सगळ्यांनीच वळून बघितलं. सोनलनेही बघितलं. ती मुलगी बिचारी लाजून चूर झाली. सोनल त्या जोडप्याकडे बराच वेळ एकटक पाहत राहिली. सोनलच्या छातीत कसंनुसं झालं. आपल्याला नक्की काय होतंय तिला कळेना. ती बिथरल्यासारखी झाली होती. झटकन पलीकडच्या लिंबूपाणीवाल्याकडे गेली. तिथे भरून ठेवलेला एक लिंबूपाण्याचा ग्लास तिने घटाघटा रिकामा केला. पदराने चेहरा टिपला. लिंबूपाणीवाला पाहतच राहिला. ती आतून-बाहेरून शहारून निघाली होती. ‘ही कसली वेगळीच भावना..?’ तिचं तिलाच उमजेना. ती तशीच थरथरत ट्रेनमध्ये चढली. ट्रेन बदलून झोपडीपर्यंत आली. तिची कानशिलं तापली होती. झोपडीत
शिरताच तिने अंगावरची साडी सोडून टाकली. घटाघटा तांब्याभर पाणी प्यायली आणि पत्र्याला लटकलेला पंखा सुरू करून ती उघड्या फरशीवर पडली. पडून राहिली बराच वेळ.
या आधीही एकदोनदा तिला अशीच काहीशी अंधुक भावना जाणवली होती. सोनलचा आजवरचा प्रवास एवढा उतारचढावांनी भरलेला होता की, त्यात तिच्या सगळ्याच भावना कुसकरून गेल्या होत्या. कांताच्या कुशीत तिला आनंद मिळत होता, मात्र आज उरात अचानक वाढलेली धडधड, घशाला पडलेली कोरड काहीतरी वेगळंच होतं. मागच्या वेळी तिला वाटलं होतं की चक्कर आली असावी, पण ते तसं नव्हतं. आज तिला आतून सगळा नीट उलगडा झाला होता. हळूहळू सोनल थंड थंड होत गेली. संध्याकाळ झाली तशी भानावर आली. स्वतःशीच म्हणाली, ‘मला आई व्हायचंय..! मला आई व्हायचंय!’
रात्री कांता आला. सोनलला आवडतो म्हणून मंचुरियन राईस घेऊन आला होता. आज धंदा बरा झाला होता. खुश दिसत होता. गजराही आणला होता त्याने. दोघं जेवले. गजरा दरवळत होता. सोनल गप्प होती. बराच वेळ कांताच्याही लक्षात आलं नाही. तो आपला नेहमीच्या सवयीप्रमाणे केसांना तेल चोळत बसला होता. रात्र चढत गेली आणि सोनल काही बोलेना हे जाणवून कांताने विचारलं, “क्या हुआ तबियत ठीक नहीं? बात क्यू नहीं करती?”
सोनल गप्प. कांताने तिला ओढून जवळ घेतलं, पुन्हा विचारलं, “क्या हुआ रे मेरी रानी?”
सोनल खूप विचार करून बोलली. “कांता, मला आई व्हायचंय.. मुझे बच्चा चाहिये.”
कांताने चमकून तिच्याकडे पाहिलं. जणू एखादं भूत पाहावं.
“तू पागल झाली काय? काहीतरी काय बोलते? तुला ठाऊक हाय ना ते शक्य नाय तरीपन?”
“कांता..” असं म्हणून सोनल स्फुंदून स्फुंदून रडू लागली.
पुढे कित्येक रात्री अशाच गेल्या. हल्ली बऱ्याचदा त्या दोघांच्यात अबोलाच असायचा. एकदा कांताने सोनलचा हट्ट शिला दीदीच्या कानावर घातला होता. ते ऐकून दीदी निरुत्तर झाली होती. आपल्या संस्थेतल्या वरिष्ठ सहकाऱ्याशी बोलते म्हणाली. पण ते तेवढंच. कांताचं नाइट कॉलेज सुरू होतं. वरवर सगळं बरं असलं तरी आत काहीतरी बिनसलं होतं. लग्नानंतर जेमतेम वर्षभर गेलं असेल आणि सोनलच्या या हट्टानं सगळं विस्कटल्यासारखं झालं होतं.
एकदा संस्थेच्या कार्यालयात शिला दीदीने सोनलला निरोप पाठवला. नियमित आरोग्य तपासणी वगैरे झाली आणि मग डॉक्टर दीदींनी सोनलला थोडावेळ थांबायला सांगितलं. चुळबुळ करत सोनल बाहेर बसून राहिली. वस्तीतले बाकीचे पेशंट निघून गेल्यावर दीदीने सोनलला आत बोलावलं. मग डॉक्टर दीदी आणि शिला दीदी सोनलशी बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या. सोनल आणि कांताचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं... तो विषय दीदीने छेडला. डॉक्टर दीदी बाळाच्या जन्माबाबत बोलू लागल्या, मात्र सोनलचं भान सुटलं. तिच्या कानात जणू जोरात भोंगा वाजू लागला.
“मुझे बच्चा चाहिये...” एवढंच बोलून ती कशीबशी तिथून बाहेर पडली... हताश शिला दीदी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली.
पावसाच्या सरी, कुत्र्यांचं भुंकणं, पंख्याचा खडखडाट आणि मांजराची हालचाल या सर्व आवाजांमुळे होणाऱ्या त्रासाने अस्वस्थ होऊन कांता उठला. त्याने बाहेर येऊन दगड मारून कुत्र्यांना पळवून लावलं आणि घरात मोबाईलच्या प्रकाशात मांजरालाही हुसकावून लावलं. शेवटी पावसाच्या आणि पंख्याच्या आवाजात पुन्हा शांतता साधली गेली आणि त्याने प्रकाश अंथरुणाकडे वळवला.
“सोनल...??” त्याने रिकाम्या खोपटाला प्रश्न विचारला. तो धडपडत बाहेर आला. सोनल कुठे असेल याचा त्याला अंदाज आला होता. पाऊस थांबला होता. तो पुलावरून बाहेर येऊन मेन रोडवरून चालू लागला... लांबवर स्ट्रीट लाइटच्या प्रकाशात चालणारी सोनल त्याला दिसली. तो धावत तिच्याजवळ गेला... चालून रडून थकून गेलेली सोनल त्याला बिलगली. तिला आधार देत तो पुन्हा झोपडपट्टीत आला.
सकाळ झाली. नवा दिवस उगवला आणि तसाच मावळला. दिवसेंदिवस सोनलची आई होण्याची इच्छा अधिकच तीव्र होत होती. आजकाल तर ती जरा वेडसरही वागत होती. कांता अधूनमधून शिला दीदीशी बोले. तीही त्याला धीर देई. ‘तिचं तिला कळेल, समजेल, होईल सगळं नीट’ अशी ताई समजूत काढे आणि त्याला अभ्यासाची आठवण करून देई...
आज खूप दिवसांनी ते दोघे मरीन ड्राइव्हच्या सिग्नलवरून चालले होते. पलीकडे फेसाळता समुद्र. दोघे कट्ट्यावर जाऊन बसले. सोनल आज बरीच शांत दिसत होती. थोडा वेळ असाच गेला आणि ती पुटपुटली...
“मला आई व्हायचंय रे..”
कांता गप्प...
“मला मूल दे... बच्चा दे मुझे... अरे तू मर्द कहलाता ना मेरा...? मग मला मूल दे..”
“सोनल, आपल्याला नाय होणार मूल.. तुला ठाऊक हाय नं..”
सोनल मूकपणे कांताकडे टक लावून पाहत राहिली.
“चल धंद्याला..., आपण लग्न केलं हेच मोठी बात आहे!!”
“मला ठाऊक हाय रे समदं. पण मला बी काळीज हाय. मला बी वाटते. आपल्याला कोणीतरी आई म्हणून हाक मारावी.. उद्या आपलं वय वाढल. धंद्यासाठी फिरायला ताकद नाय उरणार. तेव्हा कोणीतरी आधार नको आपल्याला? आता मला आई व्हायचंय रे... तुला कळत कसं नाही!”
शेजारी बेभान समुद्र. त्याचंही पाणी खारट.. पृथ्वी रडते का? समुद्र अश्रू का तिचे..? कांताच्या डोक्यात कवी कल्पना चमकून गेली.. मग स्वतःला खाडकन वास्तवात आणत तो म्हणाला, “सोनल... कुल्फी खाएगी? ए... तेरी कुल्फी कैसे दी रे!!”
कुल्फीवाला कांताकडे विचित्र पाहू लागला. गोरा, गुलाबी ओठांचा... नशिल्या डोळ्यांचा, पिंगट केसांचा कांता... गुळगुळीत दाढी केलेले त्याचे गाल चमकून दिसत होते. कुल्फीवाल्याने कांताला नीट न्याहाळलं... तेवढ्यात सोनलने कांताचा हात घट्ट दाबला.
“क्या रे क्या देखता? दो कुल्फी दे चल...” सोनलने त्याला वीसची नोट दिली. “मलाईवाली दे दो” असं म्हणत कांता थोडा पुढे सरकला. कुल्फीवाला निघून गेला. कांता हातातली कुल्फी सावरत सोनलकडे बघू लागला.
“क्या डरपोक होते नं लोक...” तो हसता हसता मनगटावरून खाली येणारा कुल्फीचा ओघळ जिभेने चाटू लागला.
“कांता, बच्चा ला दे मुझे मा बनना है...”
“क्या सोनल फिरसे बच्चा... बच्चा... का पोरगं पळवून आणू का आता कुठून..???”
सोनलचे डोळे लकाकले.. पण कांता वैतागून बोलतच राहिला, “चल बस हो गया... धंदे का टाइम मत खराब कर... लोकलका टाइम हो गया..” दोघे स्टेशनच्या दिशेने निघाले.
मध्ये आठ-दहा दिवस गेले. सोनल अधिकाधिक एकटी राहू लागली होती. कांता त्याच्या परीक्षेच्या तयारीला लागला होता. आज शिला दीदी संस्थेच्या कामासाठी झोपडपट्टीपलीकडच्या रस्त्याला लागून असलेल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा तिला तिथे सोनल दिसली. दीदीने हटकले तर तिचं लक्षच नव्हतं. हॉस्पिटलमधल्या ओळखीच्या नर्सकडे चौकशी केली तर सोनल एकदोनदा तिथे येऊन गेल्याचं तिने सांगितलं.
संध्याकाळी उशिरा कांता घरी पोहोचला. दमलेला जीव झटक्यात झोपून गेला. पत्र्यावर पावसाने टिपेचा सूर लावला... मध्येच कांताला जाग आली. शेजारी सोनल नव्हती. तो ताडकन उठून बसला. झोपडीबाहेर, अगदी फुटपाथपर्यंत जाऊन आला, पण सोनलचा पत्ता लागेना. त्याचा धीर खचला. भयंकर विचार मनात येऊन तो थरथर कापायला लागला. काहीच न सुचल्याने तो खाली बसला. शिला दीदीला काय उत्तर द्यायचं? या प्रश्नाने त्याला भंडावून सोडलं. तो धावत दरवाजाबाहेर पडला. सहावी झोपडी शिला दीदीची... तो धडाधड दरवाजावर थापा मारू लागला.
“दीदी... सोनल गायब है!”
“काय?” दीदी आश्चर्याने उद्गारली. “सकाळीच मी तिला हॉस्पिटल बाहेर बघितलं होतं...” दीदीने सांगितलं. सोनल हॉस्पिटलमध्ये का जाईल? एवढ्यात कांताला मरीन ड्राइव्हवरचं बोलणं आठवलं- ‘पोरगं पळवून आणू का?’ म्हणजे सोनल मूल चोरायला... बापरे! कांताच्या काळजाचं पाणी पाणी झालं. तो धावत सुटला, दीदीही त्याच्या मागे धावली.
रस्त्यावर वर्दळ कमी झाली होती. दीड-पावणेदोन वाजले असावेत. पलीकडे सार्वजनिक रुग्णालयाच्या गल्लीच्या तोंडावर पिवळा उजेड पडला होता. त्यातून एक काळी सावली पुढे सरकताना दिसली. रस्ता क्रॉस करण्याच्या बेतात असलेल्या कांताची नजर तिच्यावर पडली.
“सोनल...”
त्याने मारलेल्या हाकेसरशी दीदीनेही वळून पाहिलं. कांता धावत निघाला; मात्र अर्ध्यावरच थांबला... उलट्या पावली माघारी आला. पाऊस कोसळत होता.. कांता थरथरत होता..
“काय झालं कांता?” दीदी पुढे सरकली.
“चंदा है तू मेरा सूरज है तू. ओ मेरी आँखों का तारा है तू..”
नखशिखांत भिजलेली सोनल एक एक पाऊल टाकत फुटपाथवर पोहोचली. तिने हॉस्पिटलच्या चादरीत गुंडाळलेलं ते बाळ खाली रस्त्याच्या कडेला ठेवलं.. “दीदी, देखो मैं बच्चा ले आयी... ये देखो मेरा बच्चा!! बारीक पाऊस आहे, रुक मैं कपडा लाती..”
कांता रागाने थरथरत होता. तिची बकोटी पकडून त्याने हलवत विचारलं, “किसका बच्चा चुराके लायी तू..?? तुला एकदा सांगितलं तर समजत नाही? अरे आपल्याला मूल नाय होणार.. और नाही हमरे घर में बच्चा आ सकता है सोनल.. क्यों किया तूने ऐसा.. क्यों?? मी असंच बोलून गेलो अन् तू खरंच पोर...? सोनल किसका बच्चा है बता, वापस दे के आएंगे..”
“वो तो चले गये...” सोनल पुटपुटली. “चंदा है तू मेरा सूरज है तू... ओ मेरी... आँखों का तारा है वो कांता... वो मेरा बच्चा है रे कांता... वो तेरा और मेरा... अपना बच्चा..!” सोनल बरळू लागली.
कांता भडाभडा बोलू लागला, “वो तेरा बच्चा नहीं है... तू माँ नहीं बन सकती. मैं कभी बाप नहीं बन सकता... हिजडे है हम. हिजडे...”
वीज कोसळून झाड कोसळावं तसा कांता कोसळला.. ढसाढसा रडू लागला. “हिजडे आहोत गं आपण! चर्चगेट-अंधेरी लोकलमध्ये फिरणारे हिजडे..”
कांता फुटपाथवर बसला. दोन हिजड्यांनी लग्न करून एकत्र राहण्याचं धाडस केलं होतं आणि आता सोनलने मूल चोरलं... उद्या ही बातमी फुटेल तेव्हा आपल्याला रस्त्यावर मारतील, या विचाराने कांता भंजाळून गेला. सोनल शून्यात पाहत बसली होती.
तेवढ्यात शिला दीदीने पटकन ते बाळ उचलून घेतलं आणि...
“कांता, बाळ तर रडत पण नाही. एकदम थंड पडलंय...” दीदी कावरीबावरी होऊन म्हणाली...
सोनल धडपडून भानावर आली. तिने बाळाला उचललं.. छातीशी लावलं. पण छातीतून काहीच येणार नव्हतं... तिला छाती होतीच कुठे? तिला पान्हा कधीच फुटणार नव्हता. बाळाचा गार स्पर्श जाणवताच सोनलचा तोल गेला. कसंबसं ते मूल तिने दीदीच्या हातात दिलं.
दीदीने नीट निरखून पाहिलं आणि ती ओरडलीच... “रे कांता, हे पोर मेलंय जन्मल्या जन्मल्या...”
त्या रिकाम्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर दोन हिजडे, एक समाजसेविका आणि एक जन्मतःच मृत पावलेलं मूल बराच वेळ तसेच होते... पुन्हा एक पावसाची जोरदार सर आली तेव्हा शिला दीदी भानावर आली. तिने कांताला सावध केलं. मुलाला सावकाश चादरीत लपेटून घेतलं. कांता सोनलला आधार देत चालवत झोपडपट्टीच्या दिशेने नेऊ लागला. शिला दीदी चादरीचं बोचकं घेऊन स्टेशनच्या दिशेने निघाली... अंधुक उजेडात तीन सव्वीसची फास्ट ट्रेन धडधडत स्टेशनमधून बाहेर पडली तेव्हा अतिशय जड पावलांनी शिला दीदी ब्रिज उतरत होती.