

विशेष
डॉ. रूपेश पाटकर
वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीइतकेच कार्तिकी एकादशीचेही महत्त्व आहे. आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ एकादशी, तर कार्तिकी एकादशीला ‘देवउठनी’ एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात, त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी केली जाते. २ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे. यानिमित्ताने विठ्ठल रूपाविषयीचे हे चिंतन विचारप्रवृत्त करणारे आहे.
'सुंदर ते ध्यान’ हा अभंग मी अगदी लहान असल्यापासून ऐकत आलो असलो तरी बारावी होईपर्यंत प्रत्यक्षात पंढरीचा पांडुरंग मी पाहिला नव्हता. त्याचा फोटो देखील पाहिला नव्हता. पाहिली होती ती काही चित्रकारांनी काढलेली त्याची चित्रे. आज जसे सहज फोटो उपलब्ध असतात, तसे पस्तीस वर्षांपूर्वी उपलब्ध नसायचे. त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती कशी असेल याविषयी मनात अनेक कल्पना मी रंगवल्या होत्या.
दहावीची परीक्षा झाल्यावर आजी-आजोबांच्या सोबत मी पहिल्यांदा पंढरपुरात गेलो. विठ्ठलाची मूर्ती पाहिली. तिच्या पायावर डोके ठेवले. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे प्रत्येक भक्ताला अगदी मूर्तीच्या जवळ जाता येते. इतर देवळात जसे भक्तांना मूर्तींपासून दूर गाभाऱ्याबाहेर थांबवले जाते आणि दुरूनच दर्शन घ्यायला लावले जाते, तसे इथे नाही. तुम्हाला मूर्तीच्या पायावर डोके ठेवता येते. मूर्तीला स्पर्श करता येतो. विठ्ठलाच्या देवळाच्या मागच्या बाजूला रुक्मिणी, राधा आणि सत्यभामा यांचे देऊळ आहे. त्या मूर्तींची दर्शनेदखील जवळून घेता येतात. त्यांनादेखील स्पर्श करता येतो.
आम्ही परत आल्यावर बाबांनी मला गमतीने विचारले, “काय म्हणाला विठ्ठल?”
“बाबा, तो सुंदर नाही”, मी म्हणालो.
“तो सुंदर आहे की नाही, हे नाही तुला सांगता येणार. तुझ्या डोळ्यांना तो सुंदर दिसला नाही, एवढेच फक्त तुला म्हणता येईल”, बाबा म्हणाले.
मी पहिल्यांदाच असे काही ऐकत होतो. तुम्हाला ‘दिसते ते’ आणि प्रत्यक्षात ‘असते ते’ यात फरक असल्याचे बाबा सांगत होते.
“तू तिथे फक्त दगडी मूर्ती पाहिलीस. कोरीव कामाचे तुला वाटणारे निकष घेऊन तू गेला होतास. तुकाराम महाराजांच्या डोळ्यांनी तू त्याला पाहिले असतेस तर तुकाराम महाराजांना दिसलेले सौंदर्य तुला दिसले असते”, बाबा म्हणाले.
“तुकाराम महाराजांच्या डोळ्यांनी पहायचे म्हणजे कसे पहायचे?” मी विचारले.
“प्रेमाच्या डोळ्यांनी. भक्तीच्या डोळ्यांनी. ती दगडी मूर्ती नाही, तो साक्षात परमेश्वर आहे. ज्ञानोबा, नामदेव, जनाबाई, गोरोबाकाका, चोखोबा यांच्या भक्तीने विरघळून जाऊन, अख्ख ब्रम्हांड ज्याच्यात सामावलं आहे, ते परब्रम्ह मूर्त रूप घेऊन तिथे नांदत आहे, असा विचार करून बघितलं असतंस तर ती मूर्ती पाहताना तुझ्या डोळ्यातून पाणी आलं असतं. ती मूर्ती नजरेआड होऊ नये असं वाटलं असतं”, बाबा म्हणाले.
“पण बाबा तसे मनापासून वाटण्यासाठी काय करायला हवे?” मी विचारले.
“कोणत्या गोष्टीविषयी तुला भावनिक जवळीक वाटते?” बाबांनी विचारले.
माझ्या प्रश्नाचे उत्तर न देता बाबांनीच मला उलट प्रश्न केला. प्रश्न विचारून विचार करायला लावणं ही त्यांची समजावून द्यायची पद्धत होती. पण त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मला सुचले नाही.
ते पुढे म्हणाले, “ज्या गोष्टीविषयी भावना दाटून येतात, ती माहीत नसलेली गोष्ट असते का?”
“नाही!”
“ज्या गोष्टीविषयी भावना दाटून येतात ती आपल्या काळजाजवळची गोष्ट असते की दूरची?”
“म्हणजे?”
“तुला माझ्याविषयी, तुझ्या आईविषयी जितके प्रेम वाटते, तितकेच इतरांविषयी वाटते का?”
“नाही.”
“म्हणजे जी गोष्ट जवळची वाटते, आपली वाटते, तिच्याचविषयी आपल्याला प्रेम वाटते.”
“हो.”
“समजा तुझी कोणाशी आजच पहिल्यांदा ओळख झाली तर लगेच तुझी त्याच्याशी मैत्री होते का? नाही ना. ओळखीनंतर पुन्हा पुन्हा भेट होत राहिली, त्याच्याविषयी आणखी समजू लागले की हळूहळू मैत्री होते. बरोबर ना?” त्यांनी विचारले.
“पण हे सगळे तुम्ही मला का सांगताय?”
“कारण त्यात तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. देवाविषयी प्रेम वाटायला हवं असेल तर या तीन गोष्टी आवश्यक आहेत. एक.. त्याची ओळख होणं. दोन.. ओळखीचं रूपांतर जवळीक वाटण्यात होण्यासाठी त्याच्याविषयी सतत चिंतन-मनन करत रहाणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो सर्वात जवळचा वाटणं”, ते म्हणाले.
“ज्याला मी बघितलं नाही तो सर्वात जवळचा कसा वाटेल?”
“तो जवळचा वाटण्याचा प्रश्न नाही, तोच सर्वात जवळचा आहे. तुला शरीर जसं आम्हा आईवडिलांकडून मिळालं आहे, तसा तुझ्यातला जिवंतपणा तुला परमेश्वराकडून मिळाला आहे. जिवंतपणा हा त्याचाच अंश आहे. तुझ्यातला जिवंतपणा म्हणजेच तू नाहीस का? म्हणून म्हणतो परमेश्वराला जरी आपण पाहिले नाही तरी तोच सर्वात जवळचा आहे, आईवडिलांपेक्षाही! खरे म्हणजे आपल्याला जे सर्व जाणवते ते सारे आपल्यातील जिवंतपणामुळेच. आपण जिवंत असल्याचे जाणवणे, हाच देवाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. पण यावर आपण कधी विचार करत नाही. देवाविषयी जाणून घेतल्यानंतर असा विचार सुचू लागतो. गीतेच्या नवव्या अध्यायात देव कसा आहे, याचे रहस्य सांगितले आहे. ते वाचून त्यावर चिंतन करायला हवे. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ वगैरे संतांनी जे समजावून दिले आहे, ते समजून घ्यायला हवे. पण नुसते माहीत करून घेणे पुरेसे नाही. त्याची दररोज आठवण काढायला हवी. त्याची रोज वेगवेगळ्या प्रकारे आठवण काढणं, म्हणजेच साधना!”
“बाबा, देव खरंच दिसू शकतो का?”
“देव म्हणजे काय हे समजून घेतलेस की तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. अर्जुनाला कृष्णाने आपले विश्वरूप दाखवल्याचे वर्णन गीतेच्या अकराव्या अध्यायात आहे. विश्वरूप दर्शन देण्याआधी देखील अर्जुनाला कृष्ण दिसत होता. तो त्याच्यासोबत वावरत होता. त्याच्या रथाचा तो सारथी होता. त्याचा तो मित्र होता. त्याच्याशी त्याने थट्टामस्करी केली होती. राग, लोभ बाळगले होते. पण विश्वरूप दर्शन होईपर्यंत कृष्ण त्याला परमेश्वर वाटत नव्हता. ते दर्शन झाल्यावर अर्जुन म्हणतो,
“खेळे निजे स्वैर चि खात बैसे
चेष्टा करी सर्व तुझ्या समोर!
जनी मनी वा तुज तुच्छ लेखे
क्षमा करी भान तुझे कुणास!..”
तसेच विठ्ठलाच्या मूर्तीचे आहे. तुझ्या नुसत्या डोळ्यांना तिचे सौंदर्य दिसले नाही. साधना करून तू ज्ञानदृष्टी मिळवलीस की त्याच मूर्तीचे अलौकिक सौंदर्य तुला दिसेल.”
“एवढंच नाही तर ‘विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी’ असल्याचं दिसू लागेल आणि व्यवहारात ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ वाटू लागेल. ‘कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे’ जाणवू लागेल. ज्ञानोबांसारखा दुर्जनांबाबतही कळवळा वाटायला लागेल. ‘दुष्टांचा दुष्टपणा सांडो, त्यांना सत्कर्मात गोडी वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ असे पसायदान तू देखील मागशील. एकनाथ महाराजांसारखा स्वभाव बनेल. वैयक्तिक त्रास देणाऱ्यांचा राग येणे बंद होईल आणि त्यासोबतच परिणामांची पर्वा न करता शोषक रूढी मोडण्याचे प्रचंड सामर्थ्य येईल”, बाबा म्हणाले.
मनोविकारतज्ज्ञ व संत साहित्याचे आस्वादक