देवराईतला केशवराज

दापोलीच्या आसूद गावात निसर्गाच्या हिरवाईत, पाखाड्यांच्या वाटेवर आणि झुळझुळणाऱ्या झऱ्यांच्या सान्निध्यात वसलेलं श्री केशवराज मंदिर म्हणजे श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगम. शांत, प्रसन्न वातावरणातून मंदिरापर्यंतचा हा प्रवास मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.
देवराईतला केशवराज
देवराईतला केशवराज
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

दापोलीच्या आसूद गावात निसर्गाच्या हिरवाईत, पाखाड्यांच्या वाटेवर आणि झुळझुळणाऱ्या झऱ्यांच्या सान्निध्यात वसलेलं श्री केशवराज मंदिर म्हणजे श्रद्धा आणि निसर्गसौंदर्याचा अद्भुत संगम. शांत, प्रसन्न वातावरणातून मंदिरापर्यंतचा हा प्रवास मनाला वेगळाच आनंद देऊन जातो.

हिवाळ्याचा तो शेवटचा महिना होता. दापोलीतील आसूद गाव नुकतं जागं झालं होतं. पहाटेची ती कोवळी, निर्मळ वेळ होती. गाव डोंगराच्या उतारावर वसल्याने सूर्याची किरणं अगदी हळुवार गावावर पसरत होती. पाहावी तिथे हिरवाई इतकं निसर्गसंपन्न असं हे गाव आहे. पाहताक्षणी प्रेमात पडावं असं! या गावात हजारो वर्षं जुनं असं एक सुंदर मंदिर उभं आहे. आसूद म्हटलं की, श्री केशवराज मंदिर पटकन डोळ्यांपुढे येतंच. ते मंदिर पाहायला मी गावात आले होते. केशवराज मंदिर असं सुवाच्य अक्षरात लिहिलेला एक छोटासा लाकडी फलक रस्त्याच्या बाजूला लावला होता. त्या फलकाच्या दिशेने जात मंदिराकडे चालायला सुरुवात केली. जाताना वाटेवर पारंपरिक कोकणी घरं दिसू लागली. घराच्या कौलांवर सुपाऱ्या सुकत घातल्या होत्या. सगळं छप्पर त्या सुपाऱ्यांनी झाकून गेलं होतं. कोकणचं कोकणीपण तिथे दिसायला सुरू झालं. काही छोटी छोटी सरबताची, कोकणी मेव्याची दुकानं वाटेत दिसत होती.

अगदी पहाटे गेल्याने तिथे कोणी नव्हतं. पण येताना तिथे थांबून खरेदी करायची हे पक्कं केलं होतं. जशी जशी पुढे जात होते तसतसे आसूद गावाचे सुंदर अंतरंग दिसू लागले. आता सरळसोट वाट संपून उतरत्या पाखाडीची वाट सुरू झाली. पाखाडी म्हणजे जांभ्याच्या दगडाने घडवलेली पायऱ्यांची वाट. त्या पाखाडीच्या पहिल्या पायरीवर थबकून तिथलं सौंदर्य डोळे टिपू लागले. उतरणीवर उंच उंच माड सुपारीची झाडं होती. त्यावर मिरीच्या वेली चढवल्या होत्या. मिरीची हिरवीगार झुंबरं वेलीवर लटकत होती. आंब्याची शेकडो वर्षं जुनी उंच बहारदार झाडं जाणत्या माणसासारखी उभी होती. वाटेच्या कडेने फणसाची झाडं होती. इवले इवले बाळफणस धरले होते. माझी नजर जेव्हा खाली गेली तेव्हा केशराचा सडा पडलाय की काय असं वाटत होतं. एक मोठं विलायती जामाचं झाड होतं. त्याच्या फुलोऱ्यातून गुलाबी रंगाचे केसर गळून पडले होते. पाखाडीच्या कडेने पाण्याचे पाट गेले होते. पाणी अगदी झुळझुळत त्यातून वाहत होतं आणि या स्वर्गासमान जागेला असंच टवटवीत राहण्यासाठी संजीवनी देत होतं. ही पाखाडी संपल्यावर म्हणजे डोंगर उतरल्यावर एक पूल लागला. त्याच्या खालून झऱ्याचा प्रवाह खळाळत वाहत होता. गारंबीचा बापू या पुस्तकात इथलं वर्णन आलेलं आहे. पूल पार करून अजून एक पाखाडी वर गेलेली दिसली. मंदिराकडे जाण्यासाठी ही अजून एक छोटी डोंगुर्ली चढायची होती. साधारण अर्धा तास चालल्यावर एका सपाटीवर केशवराज मंदिराचा कळस दिसू लागला. पावलांनी गती पकडली आणि मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात कधी आले ते कळलंही नाही.

मंदिराच्या बाजूने चिऱ्याची तटबंदी आहे. त्यात असणाऱ्या छोट्याशा दरवाज्यातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केला. तिथे उजव्या बाजूला सुरेख असे दगडी गोमुख आहे. त्यातून स्वच्छ, निर्मळ अशी तीर्थासमान पाण्याची धारा बाराही महिने वाहत असते. गोमुखाच्या खाली पाणी साठवण्यासाठी छोटी दगडी डोणी आहे. त्या डोणीत साठलेल्या पाण्याने हात पाय धुवून मंदिरात प्रवेश करायचा. गोमुखातून वाहणाऱ्या पाण्याचीही गोष्ट खास अशी आहे. गोमुखाच्या पाठी पाहिलं की डोंगराची उतरण दिसते. त्या उतरणीवर शेकडो झाडं आहेत. हे पाणी दगडी पाट करून लांबवरून गोमुखाच्या दिशेने आणलेलं आहे. त्या वनराईत जाण्यासाठी मनाई आहे. त्यामुळे गोमुखाच्या बाजूला थांबून, पाण्याचा आवाज ऐकत त्या वनराईत उगम पावलेल्या या निर्मळ पाण्याच्या स्थानाची कल्पना केली. माझं मन त्या कल्पनेने भारावून गेलं आणि तृप्त वाटलं.

मंदिराकडे पाहिलं आणि साधेपणात सौंदर्य असतं आणि ते मनाला भावतं याची प्रचिती आली. मंदिर काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. सुंदर असं शिखर मंदिरावर आहे. सभोवताली माड-पोफळीची बाग आहे. मंदिराच्या परिसरात या बागेमुळे आणि वनराईमुळे सदैव शीतलता असते.

मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. लाकडी खांब असलेला साधासा खुला हवेशीर सभामंडप. तिथे बसून ध्यान करताना खऱ्या आनंदाची अनुभूती येऊ शकते. सभामंडपातून पुढे आल्यावर अंतराळ आहे आणि त्याच्यापुढे गर्भगृह. त्याच्या द्वारावर एका बाजूला हनुमंत आणि गरुड आहे. ललाटबिंबावर गणपती आहे. अंतराळात उभं राहून मी मूर्तीकडे पाहिलं आणि मी अवाक झाले. नंदादीपच्या त्या मंद उजेडात आणि स्निग्ध वातावरणात केशवराज श्री देव लक्ष्मीकांत होते. मूर्ती साडेतीन फूट उंचीची आणि काळ्या पाषाणात असलेली. नुकतीच पांढरेशुभ्र धोतर आणि उपरणे नेसवून पूजा झाली होती. फुलांच्या माळांनी देव सजले होते. त्यांच्या चरणाशी तुळशी अर्पण केली होती. त्या फुलांचा, तुळशीचा सुगंध इथवर पोहोचत होता आणि हृदयाचा ठाव घेत होता. तिथल्या वातावरणाने अगदी भारावून गेले होते. दर्शन अगदी मनासारखं झालं. मंदिरात मी बराच वेळ रेंगाळत बसले. तिथल्या प्रत्येक कणकणात भगवान विष्णूचा वास आहे, हे जाणवत होतं. तिथली वनराईसुद्धा केशवराजाची आहे, असं समजलं. म्हणजे ती देवाची राई देवराईच आहे.

प्रसन्न चित्ताने आणि पुढची भेट लवकर घडून यावी अशी इच्छा व्यक्त करून परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत आता दुकानं सुरू झाली होती. मग छानपैकी कोकम सरबत प्यायले. आंबा पोळी, फणसपोळी, पेरूची जेली, काही पीठं अशी खरेदी केली आणि पुन्हा त्या फलकापाशी येऊन थांबले. मागे एकवार वळून पाहिलं. स्वप्नवत वाटावी अशी जागा आपल्या कोकणात केशवराजाच्या कृपेने अस्तित्वात आहे. हा अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल पुन्हा नमस्कार केला. तिथल्या त्या चैतन्यमयी वातावरणाचा अंश कायमस्वरूपी सोबत राहिलाय.

  • जवळचे मुख्य शहर दापोली.

  • दापोलीपासून ७ किमीवर आसूद गाव आहे.

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ - सप्टेंबर शेवट ते मे पर्यंत.

  • तिथे मुक्कासाठी Homestay चे पर्याय उपलब्ध आहेत

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in