

ग्रीन गॉसिप्स
सांबारवडी- भाग्यश्री पटवर्धन
तुमची ओळख आहे का निसर्गाच्या या खोडकर मैत्रिणीशी, जिला ‘कपिकच्छु’ असंही म्हणतात?
बालपणीचे दिवस आठवतात तेव्हा त्यातील फक्त खोड्या आणि मस्ती जास्त आठवते! कोणाला तरी हळूच चिमटा काढणं किंवा पाण्याचे फवारे मारून तिथून पळून जाणं, पांगाऱ्याच्या बी चे चटके लावणं इत्यादी.. यात जी मजा असते, ती शब्दांत सांगता येत नाही. हे सगळं तुमच्या आई-बाबांना विचारा. त्यांनी ही मस्ती नक्कीच केली असेल. पण मुलांनो तुम्हाला माहिती आहे का की, आपल्या निसर्गातसुद्धा एक असा ‘खोडकर’ मित्र आहे, जो दिसायला अगदी साधा आहे, पण त्याच्याशी पंगा घेतला की तो समोरच्याला चांगलीच अद्दल घडवतो. त्याचं नाव आ-खाजकुयिरी! तुम्ही कधी याबद्दल ऐकलंय का? किंवा चुकून कधी याला हात लावलाय का?
खाजकुयिरी म्हणजे एक वेलवर्गीय वनस्पती. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेव्हा सगळीकडे हिरवळ पसरते, तेव्हा ही वेल जमिनीतून हळूच डोकं वर काढते. ही वेल खूप कणखर असते; बघता बघता ती आजूबाजूच्या झाडांवर चढते आणि त्यांना आपल्या कचाट्यात घेते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिना आला की, या वेलीला जांभळ्या रंगाची अतिशय सुंदर फुलं येतात. ही फुलं झाडावर लोंबणाऱ्या घोसांसारखी दिसतात, जी दुरूनही तुमचं लक्ष वेधून घेतात. पण याचं खरं ‘रूप’ तर डिसेंबरमध्ये पाहायला मिळतं, जेव्हा फुलांच्या जागी शेंगा तयार होतात.
या शेंगा दिसायला थोड्या वाकड्या-तिकड्या असतात आणि त्यावर मऊ केसांसारखं आवरण असतं. दिसायला या शेंगा एखाद्या मऊ खेळण्यासारख्या वाटतात, पण सावधान! या शेंगांवर असलेले तपकिरी रंगाचे केस जर तुमच्या त्वचेला लागले, तर काही वेळातच तुमच्या अंगाची अशी काही आग होईल की तुम्हाला काय करावं ते सुचणार नाही. अंगावर इतकी खाज सुटते की माणूस एखाद्या माकडासारखा खाजवायला लागतो. म्हणूनच याचं संस्कृत नाव ‘कपिकच्छु’ असं आहे. संस्कृतमध्ये ‘कपि’ म्हणजे माकड आणि ‘कच्छु’ म्हणजे खाज. म्हणजे माकडासारखी खाज आणणारी ही वनस्पती! ज्याच्यावर ही खोडी केली जाते, त्याची अवस्था पाहून हसू येत असलं तरी त्याला होणारा त्रास मात्र मोठा असतो. त्यामुळे याच्याशी खेळणं कधी कधी महागात पडू शकतं.
पण थांबा, ही वनस्पती फक्त खोड्या करण्यासाठीच नाहीये. निसर्गाने या खाजऱ्या शेंगांमध्ये एक मोठं गुपित लपवलं आहे. या शेंगांच्या आत काळ्या रंगाच्या चमकदार बिया असतात. शास्त्रज्ञ याला ‘मुकुना प्रुरिएन्स’ म्हणतात, तर इंग्रजीमध्ये याला ‘वेलवेट बीन’ असं गोंडस नाव आहे. या बिया म्हणजे आरोग्याचा खजिनाच आहेत! या बियांमध्ये ‘L-dopa’ नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो, जो आपल्या मेंदूला आनंदी ठेवण्यासाठी आणि शरीराच्या हालचाली सुरळीत करण्यासाठी मदत करतो. मेंदूशी संबंधित अनेक आजारांवर यापासून औषधं तयार केली जातात. म्हणजे ही वनस्पती बाहेरून जितकी खोडकर आहे, आतून तितकीच ती उपकारी सुद्धा आहे.
गमतीची गोष्ट अशी की, खाजकुयिरीची एक दुसरी जातही असते, जिला अजिबात खाज नसते! या शेंगांची भाजी चवीला तर उत्तम असतेच, पण त्यातून आपल्या शरीराला भरपूर लोह मिळतं. ही भाजी कापताना हात थोडे काळे पडतात, तिथेही ही वेल आपला थोडा खोडकरपणा दाखवतेच! अशी ही खाजकुयिरी आपल्याला शिकवते की निसर्गातील प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कोणतीही गोष्ट टाकाऊ नसते, फक्त ती वापरण्याची पद्धत आपल्याला माहिती हवी. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रानात किंवा बागेत फिरायला जाल, तेव्हा ही वेल शोधायचा प्रयत्न नक्की करा. पण लक्षात ठेवा,
या वेलीशी मैत्री फक्त दुरूनच करायची, तिला हात लावून आपली खोडी उलटी पडणार नाही याची काळजी घ्यायची!
bhgya2510@gmail.com