

बालमैफल
सुरेश वांदिले
"या मार्गेटलीचं काही कळतंच नाही बुवा. त्या नेपोटल्या-फिपोटल्यावर एवढी खार खाऊन असते. पण आज म्हण्ये त्याला काँग्रेट्स द्यायला जावू. येडी झालीय मार्गी. नेपोटल्या काय हिला 'थैंक्यू' म्हणणार का? की त्याचं हाडूक देणार हिला चघळायला? उलट आयतीच मेजवानी चालत आली म्हणून तो थयथय नाचायचा. हिलाही पोटात नि तिच्यासोबत मलाही दातात ! छे, छे मी नाही होऊ देणार असं एकावर एक फ्री. नाही होऊ देणार मी..." रॉबिन्सन उंदीर मामा स्वतःशीच पुटपुटला. "आभाळ कोसळो नाही तर पृथ्वी दुभंगो, काही झालं तरी मार्गेटलीसोबत नेपोटल्याला भेटायला जायचं नाहीच्च", रॉबिन्सनने स्वतःलाच बजावलं. तेव्हढ्यात मागरिट मांजरी मावशीचा आवाज आला...
"रॉब्या तयार झालासना तू. मी कधीचीच वाट बघतेय तुझी."
"मावशे, मी नाही येणार तुझ्यासोबत."
"गधड्या कां येणार नाहीस? आपण चांगल्या कामासाठी चाललोत ना."
"अगं मावशे, त्या नेपाटल्याला भेटणं म्हणजे स्वतःहून आगीच्या स्वाधीन होणं, हे तुला कसं कळत नाही. आणि काय ग मावशे, त्याने कोणता असा मोठा पराक्रम गाजवला की त्याच्याबद्दल तुझं प्रेम इतकं उतू चाललंय ? तुझा काही दुसरा डावफाव तर नाहीना?"
"रॉब्या, तुझ्या इटुकल्या मेंदूत कुठून आलाय डावाफावाचा उजवा विचार?" मावशी ओरडली.
बिळाच्या बाहेर आला नाहीस तर मालकीणबाईंना सांगून बिळ बुजवून टाकीन, अशी धमकीही दिली. ही दुष्टाटली काहीही करु शकते, हे ठाऊक असल्याने मामा बळेबळेच बिळाच्या बाहेर आला. तो बाहेर येताच मावशीने त्याच्या कानाला जोरदार चावा घेतला. तो वेदनेने विव्हळू लागला.
"मावशे, मावशे किती जोराने चावलीस. माझा जीव चाललाय ना."
"तू माझ्यासोबत नेपोटल्याला काँग्रेट्स द्यायला आला नाहीस तर खरोखरच तुझा जीव घेईन राब्या." मावशी दात दाखवत म्हणाली.
"येतो, येतो मावशे, पण आधी मला हे तर सांगना की तू त्या तुझ्या शत्रू नंबर एक नेपोटल्याचं कौतक करण्यासाठी एव्हढी उतावीळ कां झालीस? असा कोणता तीर मारलाय त्याने ?"
"अरे रॉब्या, त्याने भीम पराक्रम गाजवलाय. एक मोठ्ठा गुन्हेगार पकडून दिलाय त्याने."
"म्हणजे काय केलं? नेपोटल्याकडे ही शक्ती आली तरी कुठून?"
"सांगते... सगळं सांगते. बस जरा माझ्या बाजूला." मावशीने मामाला बाजूला बसवलं. त्याच्यासाठी चीजचा एक तुकडा आणला. तो पोटात गेल्यावर मामाला तरतरी आली. मावशी काय सांगते याकडे तो कान देऊन ऐकू लागला.
"अरे हा नेपोटल्या किंवा त्याचे भाईबंद कुत्रोबा यांना ना देवाने एक खास गंधज्ञानशक्ती दिलीय."
"कोणती ग?"
"अरे, या डॉगीजना म्हणजे कुत्रोबांच्या काही जातींना मानवापेक्षा साधारण २० ते ६० पट जास्त सूक्ष्म वास ओळखू येतात. काही कुत्रोबांच्या जातींमध्ये तर १२५ ते ३०० दशलक्ष गंधग्राहक पेशी (ओलफॅक्ट्री रिसेप्टर्स) असतात, तर मनुष्यात ते फक्त सुमारे पाच ते सहा दशलक्ष असतात. त्यामुळे हे कुत्रोबा अगदी क्षीण वाससुद्धा ओळखू शकतात."
"आँ!"
"हाँ! शिवाय वेगवेगळे गंध ओळखून ठेवण्याची आणि गुन्हेगारी तपासात त्यांचा माग काढण्याची एक खास कला असते, तिला 'फॉरेन्सिक ऑडोरॉलॉजी' म्हणतात."
"अग, असं असेल तर मग प्रत्येकच कुत्रोबाने गुन्हेगाराला शोधलं असतं ना ! हाडकाच्या वासाशिवाय त्यांना काही समजत तरी असेल का?" "रॉब्या, तुझं म्हणणं बरोबरच आहे. पण ज्या कुत्रोबांना गंध किंवा वास ओळखण्याचं खास प्रशिक्षण दिलं जातं, ते आपल्या या नैसर्गिक शक्तीचा योग्य वापर करु शकतात."
"तुला कसं कळलं ते?"
"अरे, मी परवा मालकीणबाईंसोबत तिच्या पोलिस भाच्याकडे गेले होते. पोलिस मैदानाजवळ त्यांचं घर आहे. मालकीणबाई बोलत असताना मी हळूच मैदानात गेले. बघते तर काय - हा नेपोटल्या तिथेच ! मी घाबरलेच, पण त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं."
"तिथे कशाला गेला मरायला हा ?"
"अरे, तिथे त्याचं प्रशिक्षण चालू होतं. मी पाहिलं की प्रशिक्षकाने त्याच्या हाताला लागलेला थोडासा घाम एका लोखंडी वस्तूवर पुसला आणि ती वस्तू मैदानात कुठेतरी लपवून ठेवली. मग त्या प्रशिक्षकाने त्याचा घामेजलेला हात नेपोटल्याला आणि इतर कुत्र्यांना हुंगवला."
"कशासाठी?"
"मलाही हाच प्रश्न पडला! मग समजलं की त्या हाताचा जो गंध आहे, तो कुत्र्यांच्या मेंदूत 'ओलफॅक्टरी बल्ब (olfactory bulb)' नावाच्या भागात साठवला जातो. नंतर हा संकेत हिप्पोकॅम्पस आणि इतर स्मरणभागांपर्यंत पोहोचतो. म्हणून मग कुत्रोबा त्या विशिष्ट वासाला ओळखू शकतात."
"मग काय होतं?"
"मग त्यांना मैदानात सोडलं जातं. ते नाकानं गंध घेत घेत त्या लपवलेल्या वस्तूपर्यंत बरोब्बर पोहोचतात. त्यांची स्मरणशक्ती आणि गंधज्ञान दोन्ही जबरदस्त असतं."
"वंडरफूल!"
"हो ना! या प्रशिक्षित कुत्रोबांची ही गंधशक्ती इतकी अचूक असते की त्यांचा वापर मादक पदार्थ, स्फोटके, मृतदेह किंवा इतर संशयास्पद वस्तू शोधण्यासाठी पोलिस आणि सैन्य दल हे दोन्ही करतात. काहीवेळा युद्धातही हे प्रशिक्षित कुत्रोबा बाँब आणि दारुगोळा शोधताना स्वतःचा जीव धोक्यात घालतात, पण सैनिकांचे प्राण वाचवतात."
"ओह माय गॉड!"
"आपला शत्रू असलेल्या नेपोटल्यानेही असाच पराक्रम परवा गाजवला. म्हणून मी म्हणते, त्याचं कौतुक करायला हवं. मन मोठं ठेवायला हवं."
"मावशे, आपण भलेही मन मोठं करू ग, पण त्याचं मन छोटं नि जबडा मोठाच राहिला तर काय?" रॉबिन्सन थरथर कापत म्हणाला नि चटदिशी बिळात शिरला.
मावशीला जागेपणीच नेपोटल्याचा जबडा आठवला. "तो गच्चकन चावला तर सरळ रॅबिजची इंजेक्शन्स घ्यावी लागतील!" या कल्पनेने तिचंही धैर्य गळालं. तिने नेपोटल्याला 'काँग्रेट्स' द्यायचा विचार ताबडतोब सोडून दिला.
ज्येष्ठ बालसाहित्यिक