

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
१९२२ मध्ये वेंगुर्ल्यातून सुरू झालेलं ‘किरात’ साप्ताहिक आज शतक पार करून दुसऱ्या शतकात प्रवेश करत आहे. समाजजागृती, कोकणच्या प्रश्नांना वाचा आणि नि:पक्ष पत्रकारितेचा वारसा जपत चार पिढ्यांनी घडवलेल्या या ऐतिहासिक प्रवासाचा हा वेध.
‘किरात’म्हणजे भिल्ल! आपल्या धनुष्यबाणाने लक्ष्याचा अचूक वेध घेणारा भिल्ल! शब्दांच्या बाणांनी समाज जागृती आणि प्रबोधन करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्वक काळात १९२२ साली तळकोकणा वेंगुर्ला येथून अशाच एका ध्येयवेड्या पत्रकाराने आपलं साप्ताहिक सुरू केलं, त्या साप्ताहिकचं नाव होतं ‘किरात’ आणि त्याचे चालक- मालक-संपादक होते अनंत वासुदेव मराठे. २०२२ साली ‘किरात’नेआपला शतक महोत्सव साजरा केला आणि आता दमदारपणे द्वितीय शतकाची वाटचाल सुरू केलेल्या या साप्ताहिकाच्या संपादक आहेत सीमा मराठे.
साप्ताहिकाच्या संस्थापक संपादकांचं प्रेरणास्थान होते सिंधुदुर्गचे भूमिपुत्र ‘दर्पणकार’बाळशास्त्री जांभेकर. स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करणं हे एक मोठं काम होतं. लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अनिष्ट गोष्टींवर अचूक शरसंधान करणं ही उद्दिष्टं ठरवून सप्ताहिक किरातची वाटचाल सुरू झाली. स्थानिक बातम्यांना प्राधान्य, स्थानिक विषयांवरील लेख याबरोबरच कोकणचा प्रदेश नजरेसमोर ठेवून कोकणच्या समस्या आणि प्रसंग विशेष यांना साप्ताहिकामधून ठळक स्थान देण्यात आलं. त्या काळात ‘केसरी’, ‘ज्ञानप्रकाश’ यासारखी वर्तमानपत्रं वेंगुर्ल्यामध्ये टपालाने येत असत आणि त्यामुळे वाचकांची ताज्या बातम्यांची तहान अपूर्ण राहत असे. म्हणून अनंत वासुदेव मराठे यांनी मुंबईतील एका ओळखीच्या माणसाकडून एक छोटासा परिपूर्ण छापखाना विकत घेतला, वेंगुर्ल्यात आणला आणि मग वेंगुर्ल्यामधूनच साप्ताहिकाची छपाई शक्य झाली.
लहान वयातच मुद्रणालय आणि साप्ताहिक चालवण्याची जबाबदारी अनंत वासुदेव यांच्यावर आली होती. पण उपजत बुद्धिमत्ता, माणसं जोडण्याची वृत्ती या जोरावर त्यांनी सुमारे ३५ वर्षं साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. कोकण रेल्वेचा आराखडा आणि कोकण रेल्वेची आवश्यकता याविषयी अ. ब. वालावलकर यांचे अभ्यासपूर्ण लेख सर्वप्रथम ‘किरात’मधून प्रसिद्ध झाले होते. राशिभविष्य लेखनाने ज्यानी संपूर्ण महाराष्ट्रात धनुर्धारी हे मासिक लोकप्रिय केलं आणि वृत्तपत्रातून राशिभविष्य देण्याची प्रथा सुरू केली ते मालवणचे होरारत्न ज्योतिषी वसंत लाडोबा म्हापणकर यांचं अगदी पहिलं राशीभविष्य ‘किरात’मधून प्रसिद्ध झालं होतं.
‘किरात’च्या तत्कालीन संपादकांनी त्या काळात स्वीकारलेल्या या भूमिकेने वर्तमानाच्या कालपटावर नवी रेघ कोरली गेली. प्रशासकीय सोयीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती करावी, अशी मागणी सर्वप्रथम संपादकांनी ‘किरात’मधून केली होती. कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधिन न राहता किरातने नि:पक्षपातीपणे पत्रकारिता केली. जनतेच्या प्रश्नांना वृत्तपत्राद्वारे वाचा फोडली. अनेक विशेष प्रसंगी विशेषांक प्रसिद्ध करून विधायक कार्यांना प्रसिद्धी दिली. यामध्ये नेहमीच अर्थप्राप्ती होत होती असंही नाही. तथापि वर्गणीदारांकडून येणारी वर्गणी आणि जाहिरातीतून मिळणारा मोबदला हेच आपल्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत किरातने ठेवले आणि लोकाश्रयावर हे साप्ताहिक पुढे नेलं.
१९८० साली बाबा मराठे यांच्या निधनानंतर तिची जबाबदारी श्रीधर केशव मराठे यांच्यावर आली. त्यांनी १९८० सालीच साप्ताहिकाच्या प्रकाशनासोबत दिवाळी अंकही दरवर्षी प्रकाशित करण्याची परंपरा सुरू केली. ‘साप्ताहिक किरात’चे प्रकाशन आणि उपक्रम अखंडित स्वरूपात सुरू राहावेत यासाठी २०११ मध्ये ‘किरात ट्रस्ट’ची स्थापना करण्यात आली आणि सीमा मराठे यांच्या नेतृत्वाखाली आता किरातने डिजिटल युगातही प्रवेश केला आहे. ‘लोकल टू ग्लोबल’ अशी वाटचाल सुरू झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील उपक्रमशील पत्रकारांचा श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. वेंगुर्ला तालुक्यातील निवडक शाळांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या प्रेरणा कार्यशाळा घेतल्या जातात. लिखाणाला कृतीची जोड म्हणून वेंगुर्ल्यातील वायंगणी गावात किरात ट्रस्ट आणि ग्रामस्थांच्या सहयोगाने ‘कासव जत्रा’ हा उपक्रम पाच वर्षं राबवण्यात आला. कासवांच्या प्रजातींचं संवर्धन करणाऱ्या सुहास तोरस्कर आणि ग्रामस्थांच्या चळवळीला प्रोत्साहन म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाला निसर्गप्रेमी पर्यटकांचा अफाट प्रतिसाद आहे. आता हा उपक्रम २०२० पासून शासनाच्या कांदळवन विभागातर्फे राबवण्यात येतो.
बाबा मराठे यांचा वारसा पुढे चालवत असताना श्रीधर मराठे यांना मोलाची साथ त्यांची पत्नी शुभदा व भाऊ सुनील यांची मिळाली. साहित्य- कला- क्रीडा क्षेत्रातील नवनवीन उपक्रम आणि वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठीचे राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना दिशा दाखवणारं साधन म्हणून ‘किरात’च्या माध्यमातून श्रीधर यांनी मोठी कामगिरी केली. जागतिकीकरणानंतर बदललेली व्यवस्था, बदललेलं समाजजीवन आणि समाजमन यांना दिशा देण्यासाठी नवे विचार आणि प्रबोधनाची जरुरी होती. अशावेळी ‘साप्ताहिक किरात’ची धुरा चौथ्या पिढीतील शशांक मराठे यांच्यावर येऊन पडली. त्यांच्या वयाच्या व अनुभवाच्या मानाने जबाबदारी मोठी होती पण ती त्यांनी पूर्ण ताकदीने पेलली. त्यामध्ये त्यांना भक्कम साथ यांच्या सौभाग्यवती सीमा मराठे यांनी दिली. शंभर वर्षं पूर्ण केल्यानंतर ‘किरात ‘ने कात टाकली आणि नव्या उमेदीने जागतिक विषयांनाही स्पर्श करणारी पत्रकारिता सुरू केली. या त्यांच्या कामात त्यांची पाचवी पिढी चिन्मय मराठे हा लहान मुलगाही तेवढाच सक्रिय असतो. वेंगुर्ला गावाशी ‘किरात’ची नाळ जोडलेली आहे. वेंगुर्ल्याच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी दैनंदिन घडामोडींना प्राधान्य दिलं जातंच पण त्याबरोबरच आपलं राज्य, राष्ट्र समृद्ध संपन्न व्हावं यासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवायला किरात ने सुरूवात केली आहे. ‘किरात’ समाजभान असलेल्या पत्रकारितेचा वारसा चालवण्यासाठी सज्ज आहे.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com