कोड्यात बोलणारी मराठी भाषा

Hi friends! कसे आहात? काय गंमतजंमत चालू आहे? ‘गंमत’ हा शब्द तर आबालवृद्धांना प्रिय आहे. हो ना? गंमत या शब्दामुळे आपल्यासमोर काही नवीन, रंजक उभं ठाकणार आहे याची खात्री असते.
कोड्यात बोलणारी मराठी भाषा
Published on

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

Hi friends! कसे आहात? काय गंमतजंमत चालू आहे? ‘गंमत’ हा शब्द तर आबालवृद्धांना प्रिय आहे. हो ना? गंमत या शब्दामुळे आपल्यासमोर काही नवीन, रंजक उभं ठाकणार आहे याची खात्री असते.

आता शब्द बनतात ते अक्षरापासून. शब्दाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे अक्षरांमुळे त्याला आलेला अर्थ होय. अक्षरांच्या एका विशिष्ट क्रमाने अर्थाचे किंवा बिन अर्थाचे शब्द तयार होतात. ‘शब्द’ हा भाषेचा एक मूलभूत घटक आहे. तुम्हाला वाटत असेल की मी आज गंमत सांगता सांगता शब्दांकडे कशी आणि का वळले? अरे हो, सांगते सांगते. त्याचं काय आहे. आज मी तुमच्यासाठी एका खूप महत्त्वाच्या आणि गंमतशीर शब्द असलेल्या पुस्तकाचा परिचय घेऊन आली आहे.

व्यवसायाने शिक्षिका असणाऱ्या सांगलीच्या सुप्रसिद्ध बालसाहित्यिक वर्षा चौगुले या खास शाळकरी मुला-मुलींसाठी लिहित गेल्या आणि त्यातून ‘गंमत शब्दांची’ हे पुस्तक साकारलं.

त्या आपल्या मनोगतात म्हणतात की, “आपली मराठी भाषा वळवाल तशी वळते, इतकी सहज-सोपी आहे, पण तितकीच ती व्याकरणदृष्ट्या कठीणही आहे. एखाद्या अक्षरावरचा अनुस्वार, काना, मात्रा वगैरे जरा जरी इकडून तिकडे सरकले, तरी त्या शब्दाचा पूर्ण चेहरामोहराच बदलून जातो. त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो. अनेक शब्दांचे मुळातच दोन किंवा त्यापेक्षा अधिक अर्थ निघतात. अशा वेळी कुठला शब्द, कुठल्या वेळी, कोणत्या अर्थाने आपण वापरतो. हे फार महत्त्वाचं आहे.”

थोडक्यात काय, तर ‘गंमत शब्दांची’ या पुस्तकात मुलांचा शब्दांमुळे जो गोंधळ उडतो त्याबद्दल लिहिलं गेलं आहे. म्हणजे बघा, ‘ये ग ये ग सरी, माझे मडके भरी’ या ओळीतला ‘सर’ हा शब्द उच्चारला की पावसाची ‘सर’ डोळ्यासमोर उभी राहते. पण ‘सर’ हा शब्द गळ्यातील दागिन्याच्या संदर्भात, तसेच बैलाच्या शिंगाजवळील दोरीसाठीही वापरला जातो. ‘सर’ ही एक पदवी पण आहे. उदा. सरसेनापती. आईच्या मायेला कोणाचीही ‘सर’ नाही असेही आपण म्हणतो. म्हणजे शब्द एक पण त्याचे अर्थ अनेक! आता अजून एक उदाहरण सांगते. ‘पाणी’ हा शब्द घ्या. पाणी म्हणजे पिण्याचे पाणी आणि ‘पाणी पाणी होतंय’ म्हणजे सारखी तहान लागते, खूप घाम येतो वगैरे. जास्त पाऊस आला तरी सगळीकडे पाणी पसरलं, असं आपण म्हणतो. ‘पाणी मुरणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे जमिनीवरचं पाणी जमिनीत पूर्णपणे शोषलं जाणार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे संशयाला वाव असणं, झालेल्या घटनेत काहीतरी गडबड असणं. पाण्याशी संबंधित बहुतेक वाक्प्रचारांचे दोन अर्थ निघतात. डोक्यावरून पाणी जाणं म्हणजे एक तर पाण्याची पातळी डोक्याएवढी वाढणं आणि दुसरा अर्थ म्हणजे सहनशक्ती संपणं. ‘पाण्यात पडलं तर पोहता येणार’ म्हणजे एक तर पोहण्यासाठी पाण्यात पडावंच लागतं, असा एक अर्थ आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणं. ‘हात मारे तिथे पाणी काढे’ म्हणजे प्रत्यक्षात हात मारून पाणी काढणं नव्हे, तर यशाची खात्री असणं, असा अर्थ होतो. ‘पाणी जोखणे’ म्हणजे अंदाज येणे. ‘पाणी पाजणे’ म्हणजे पराभूत करणे. म्हणजे वेगवेगळा रंग टाकला की तो जसा त्या पाण्याला चढतो, तसंच पाण्याबरोबर विशेषण, क्रियापद अशी वेगवेगळी पदं लागली तर त्याचे अर्थही वेगवेगळे होतात. गंमत वाटते ना हे सगळं ऐकून? म्हणूनच ही गंमत शब्दांची!

हे जे पुस्तक लिहिलं आहे ना, ते आजी-नातीच्या संवादामध्ये गुंफलं आहे. त्यामुळे ते हृद्य होतं. त्यात थोडा मिश्किलपणा सुद्धा आहे. खेळीमेळीचं वातावरण आहे. या शब्दांच्या गंमतशीर कहाण्या छोट्या छोट्या गोष्टी रूपांनी लिहिल्या आहेत. या पुस्तकात किती शब्द असतील ते ओळखा बरं? तब्बल १०० शब्द आहेत. हो हो शंभर! वाट, अंक, श्रीगणेशा, दिवा, ट्रंक, हार, प्रेम, सोनं अशा एकूण शंभर शब्दांचं, त्यांच्या अर्थांचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे बघा, तुम्हाला एक शब्द जरी विचारला ना तर त्या शब्दाचा वाक्प्रचार, अर्थ असं सगळं एकाच वेळी सांगता येईल. हे पुस्तक वाचून तुमची मराठीची गोडी वाढेल हे नक्की! हे पुस्तक जरूर वाचा आणि तुमचा शब्दसंग्रह वाढवा. या पुस्तकाला प्रस्तावना देणारे शिक्षक, साहित्यिक आणि भाषेचे मोठ्ठे अभ्यासक असणारे सदानंद कदम या पुस्तकाबाबत काय म्हणतात तेही पाहूया. ते म्हणतात की, “हे पुस्तक जसं भाषेच्या संवर्धनासाठी महत्त्वाचं, तितकंच कुटुंबातले नातेसंबंध सुदृढ करणारंही आहे! म्हणूनच शब्दांच्या अर्थांचं आणि वापराचं भान देणारं हे पुस्तक जितकं मुलांसाठी उपयोगाचं, तितकंच शिक्षित प्रौढांसाठीही महत्त्वाचं... हे पुस्तक भाषेच्या आणि शब्दांच्या वापराबद्दल सजग करतं आणि मनोरंजनही करतं. वाचकाला समृद्ध करतं आणि शब्दांबद्दलची वाचकांची जिज्ञासाही वाढवतं.”

तेव्हा तुमची शब्दसंपदा वाढविण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर सुद्धा करा. त्यांना तुम्ही जर या पुस्तकाच्या आधारे प्रश्न विचारले तर अर्थातच तुम्ही किती हुश्शार आहात, तुमच्यात किती पाणी आहे, हे त्यांना कळेल, हो की नाही?

साहित्याच्या अभ्यासक व आस्वादक

logo
marathi.freepressjournal.in