चंद्र आहे साक्षीला

त्या रात्री रस्त्यावर काहीतरी वेगळं दिसत होतं. कुठे गप्पांचे फड रंगले होते, तर कुठे तीन दगडांच्या चुलींवर भाकरी भाजली जात होती. सुरुवातीला ते दृश्य नेहमीच्या उत्सवी वातावरणाचाच भाग वाटलं; पण जवळून पाहिल्यावर मनात विचारांचं काहूर उठलं. तो दिवस कोजागिरीचा होता. चंद्राच्या प्रकाशात साजऱ्या होणाऱ्या उत्सवामागे जगण्याचं असं वास्तव दडलं असेल, याची जाणीव त्या रात्री प्रथमच झाली.
चंद्र आहे साक्षीला
चंद्र आहे साक्षीला
Published on: 

विशेष

क्रांती गोडबोले-पाटील

त्या रात्री रस्त्यावर काहीतरी वेगळं दिसत होतं. कुठे गप्पांचे फड रंगले होते, तर कुठे तीन दगडांच्या चुलींवर भाकरी भाजली जात होती. सुरुवातीला ते दृश्य नेहमीच्या उत्सवी वातावरणाचाच भाग वाटलं; पण जवळून पाहिल्यावर मनात विचारांचं काहूर उठलं. तो दिवस कोजागिरीचा होता. चंद्राच्या प्रकाशात साजऱ्या होणाऱ्या उत्सवामागे जगण्याचं असं वास्तव दडलं असेल, याची जाणीव त्या रात्री प्रथमच झाली.

काही रात्री मनाच्या कोपऱ्यात कायमच्या घर करून राहतात. कोजागिरीची रात्र अशीच! आकाशातला चंद्र, त्याचा दुधाळ प्रकाश, गप्पांचा फड, खाण्यापिण्याची रेलचेल आणि मसाला दुधाचा गोडवा... या सगळ्यांनी सजलेली ही रात्र प्रत्येकाच्या मनात काही ना काही आठवणी जागवते. पण याच चांदण्याखाली काही माणसांचं जगणंही सुरू असतं, ज्यांच्या आयुष्यात उत्सवापेक्षा रोजच्या जगण्याची लढाई मोठी असते. मागच्या वर्षी कोजागिरीच्या रात्री असंच एक दृश्य दिसलं आणि मनात विचारांची एक वेगळीच चांदणी फुलली.

ती रात्रच वेगळी होती. नेहमीप्रमाणे ऑफिस आणि घर या चक्रात आपण इतके गुरफटलेले असतो की, आजूबाजूला पाहायलाही आपल्याला वेळ मिळत नाही. दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो, हेही अनेकदा कळत नाही. घराच्या भिंतीवर किंवा ऑफिसमधल्या टेबलासमोर दिनदर्शिका लटकलेली असते; पण महत्त्वाचे दिवस आणि सण पाहण्यापलीकडे तिच्याकडे आपलं लक्ष जातंच असं नाही. त्या दिवशीही सकाळ झाली आणि नेहमीची धावपळ सुरू झाली. ऑफिसमध्ये कामाचा व्याप अधिक असल्याने निघायला उशीर झाला. घाईघाईने ट्रेन पकडली आणि नेहमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दिवस संपला आणि पावलं घराच्या दिशेने वळली.

डोंबिवली स्टेशनला उतरले तेव्हा साधारण दहा वाजले होते. नेहमीप्रमाणे नवरा मला न्यायला आला होता. त्या दिवशी आम्ही नेहमीच्या गर्दीच्या रस्त्याने न जाता तुलनेने शांत असलेल्या दुसऱ्या रस्त्याने निघालो. हा रस्ता तसा सुमसाम असतो; पण त्या दिवशी तिथे बरीच वर्दळ दिसत होती. कुठे लोकांचे समूह एकत्र बसले होते, तर कुठे गप्पा मारत खात-पित होते. एखादी पार्टी सुरू असावी, असं वाटलं. मात्र, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या भाकऱ्या थापण्याच्या आवाजाने माझं लक्ष वेधून घेतलं. छोटे छोटे तंबू उभारले होते. तीन दगडांच्या चुलींवर जेवण तयार होत होतं. त्या चुलींच्या प्रकाशात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जमिनीवर बसून जेवत होते. समोरच्या ताटांत लालभडक ठेचा आणि भाकरी दिसत होती. तर पार्टी करणारे समूह हस्त होते आणि वडा, भेळ असं खात होते. ते दृश्य पाहून नवऱ्याला गाडी थांबवायला सांगितली आणि काही क्षण तिथेच थांबून ते सगळं न्याहाळलं.

माझं लक्ष अजूनही त्या दृश्यातच गुंतलेलं असताना नवरा म्हणाला, "उशीर झालाय, चल लवकर.” मी काही न बोलता गाडीवर बसले; पण मन मात्र तिथेच रेंगाळत होतं.

सोसायटीजवळ पोहोचले तर अनेक इमारतींच्या गच्च्यांवर माणसं जमलेली दिसली. कुठून तरी खाद्यपदार्थांचे सुगंध दरवळत होते. आमच्या सोसायटीतही नेहमीपेक्षा वेगळीच लगबग जाणवत होती. गच्चीवरून गप्पांचे आवाज येत होते. मी नवऱ्याला विचारलं, “आज काही विशेष आहे का?” तोही म्हणाला, “मला नाही माहीत.” घरी पोहोचल्यावर दिनदर्शिकेकडे नजर गेली आणि अचानक सगळा उलगडा झाला. अरे, आज तर कोजागिरी पौर्णिमा!

उशीर झाला होता आणि भूकही फारशी नव्हती, म्हणून भेळ बनवली. तरी मनातली अस्वस्थता काही कमी होत नव्हती. पण डोळ्यांसमोरून ते ठेचा-भाकरी खाणारे लोक आणि त्यांच्या छोट्या छोट्या झोपड्या काही केल्या हटत नव्हत्या. शेवटी नवऱ्याला विनंती करून रात्री अकराच्या सुमारास पुन्हा एकदा फेरफटका मारून आले.

गावी असताना या रात्रीची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. मोकळं अंगण, आकाशातला टपोरा चंद्र, चांदण्यांचा शीतल प्रकाश आणि आजूबाजूला पसरलेली निरव शांतता... या वातावरणात भेळ, पोहे, मिसळ पाव असे पदार्थ आणि त्यावर मसाला दूध! कोजागिरी म्हणजे आमच्यासाठी सण नव्हता, तर रोजच्या धावपळीतून बाहेर पडून एकत्र बसण्याचा, गप्पा मारण्याचा आणि चांदण्यांशी हितगुज करण्याचा आनंद होता. कुटुंबाने अंगणात एकत्र बसून वेचलेल्या त्या निखळ आठवणी होत्या. मुंबईत आल्यापासून मात्र सगळ्याच रात्री सारख्या वाटू लागल्या होत्या. आयुष्याच्या धावपळीत कोजागिरीसारख्या रात्रींचं वेगळेपण कुठेतरी हरवलं होतं.

दरवर्षी कोजागिरीच्या रात्री मी बाहेर फिरायला जाते आणि प्रत्येक वेळी एखादा नवा अनुभव गाठीशी बांधून परतते. आमच्या गावीही तंबू उभारून राहणारी कामगार मंडळी मी पाहिली होती; पण त्या रात्री त्यांच्याकडे पाहताना मनात जे काही उमटलं, ते याआधी कधीच उमटलं नव्हतं. इतक्या वर्षांत आम्ही वर्षातून एकदाच कोजागिरीच्या रात्री चांदण्याखाली बसून जेवत होतो. त्या रात्री चंद्रप्रकाशाचा आनंद घेत होतो. पण ज्यांचं बिऱ्हाडच पाठीवर असतं, ज्यांना कामाच्या शोधात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं, त्यांच्या आयुष्यात अशा किती रात्री येत असतील? त्यांच्या डोक्यावर छप्पर नसताना आकाश मात्र कायमचं उघडं असतं. आपण ज्या चांदण्यांचा आनंद घेण्यासाठी खास रात्र निवडतो, त्याच चांदण्यांखाली त्यांचं रोजचं जगणं सुरू असतं. हा विचार मनात आला आणि कोजागिरीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला.

कोजागिरी पौर्णिमेला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. ‘कोजागिरी’ हा शब्द संस्कृतमधील ‘को जागर्ति?’ म्हणजेच ‘कोण जागं आहे?’ या प्रश्नातून आला आहे. या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते आणि जागं राहून तिची आराधना करणाऱ्या भक्तांना आशीर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्रभर जागरण केलं जातं, लक्ष्मीपूजन होतं आणि चंद्राच्या प्रकाशात आनंदाचे क्षण अनुभवले जातात. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं.

या रात्रीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मसाला दूध. आटवलेल्या दुधात केशर, वेलची, जायफळ आणि सुकामेवा घालून ते चंद्रप्रकाशात ठेवण्याची आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे. चंद्राच्या किरणांमध्ये अमृततत्त्व आणि औषधी गुण असतात, अशी पारंपरिक धारणा यामागे आहे. काही ठिकाणी खीरही चंद्रप्रकाशात ठेवली जाते. अर्थात, चंद्रप्रकाशात ठेवल्यामुळे दुधाला विशेष औषधी गुण प्राप्त होतात, याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाही; पण या परंपरेमागची भावना मात्र सुंदर आहे. एकत्र येणं, वाटून खाणं आणि आनंदाचे क्षण अनुभवणं, यातच अशा सणांचं खरं मोल सामावलेलं आहे.

पूर्वी गावाकडे कोजागिरी म्हणजे मोकळ्या अंगणात चंद्राकडे पाहत बसणं. कुणी घरून दूध आणायचं, कुणी भेळ बनवायचं, तर कुणी गप्पांच्या ओघात जुन्या आठवणींना उजाळा द्यायचं. लहान मुलांचे खेळ, मोठ्यांच्या गप्पा, एखादं गाणं, कोडी आणि हास्यविनोद यांनी रात्र कशी सरायची, ते कळायचंच नाही. या आनंदासाठी कोणत्याही मोठ्या नियोजनाची गरज नव्हती. माणसं एकत्र आली की उत्सव आपोआप फुलायचा.

आता मात्र कोजागिरीचं स्वरूप बदललं आहे. सोसायट्यांच्या गच्च्यांवर मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात. संगीत, अंताक्षरी, विविध खेळ, खाद्यपदार्थ आणि मसाला दुधाची मेजवानी असते. या बदलात काहीच गैर नाही. काळानुसार सण साजरे करण्याच्या पद्धती बदलणारच; पण या सगळ्या उत्साहात सणाचा मूळ गाभा, म्हणजे माणसांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्यात आपुलकी निर्माण करण्याची भावना, हरवता कामा नये.

त्या रात्री दिसलेली कष्टकरी कुटुंबं अजूनही माझ्या मनात घर करून आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक रात्र कोजागिरीसारखी असते, असं म्हणणं कदाचित चुकीचं ठरेल. चांदण्याखाली बसून जेवणं हा त्यांच्यासाठी नेहमी आनंदाने निवडलेला पर्याय नसतो; अनेकदा ती परिस्थिती असते. त्यांच्या जगण्यात असुरक्षितता आहे, उद्याच्या कामाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि आरोग्याच्या समस्याही आहेत. चंद्राचा शीतल प्रकाश या सगळ्या अडचणी दूर करू शकत नाही. त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने प्रकाशमान करण्यासाठी सुरक्षित निवारा, शिक्षण, आरोग्यसेवा आणि सन्मानाने जगण्याची संधी आवश्यक आहे.

म्हणूनच त्यांच्या भाकरी-ठेच्याकडे केवळ एखादं सुंदर दृश्य म्हणून पाहून चालणार नाही. त्या भाकरीमागचा घाम, तंबूमागची अस्थिरता आणि त्या मुलांच्या डोळ्यांत असलेली भविष्याची स्वप्नंही आपल्याला पाहता आली पाहिजेत. कोजागिरीच्या रात्री चंद्र सगळ्यांच्याच अंगणात सारखाच उतरतो; पण त्याच्या प्रकाशात जगण्याचा अनुभव प्रत्येकाचा सारखा नसतो. कुणासाठी ती आनंदाची, उत्सवाची रात्र असते, तर कुणासाठी दुसऱ्या दिवसाच्या कामापूर्वीची आणखी एक रात्र. आपल्यासाठी चांदण्यांचा प्रकाश हा क्षणभर अनुभवण्याचा आनंद असतो; पण अनेकांच्या आयुष्यात त्याच चांदण्यांखाली जगण्याची अपरिहार्यता असते. हा फरक समजून घेणं आणि तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, हीच कदाचित या सणाकडून घेण्यासारखी खरी शिकवण आहे.

त्या रात्री मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोजागिरीच्या रात्री चंद्राकडे पाहण्यासाठी जागं राहणं महत्त्वाचं असेलही; पण आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या जगण्याकडे पाहण्यासाठी जागं राहणं त्याहून महत्त्वाचं आहे. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवे लावताना आपल्या समाजातल्या वंचितांच्या आयुष्यातही थोडासा प्रकाश पोहोचवता आला, तर या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ प्राप्त होईल. एखाद्याच्या दुःखाची जाणीव होणं, त्याच्याकडे माणूस म्हणून पाहणं आणि शक्य असेल तिथे त्याच्या जगण्यात हातभार लावणं, हीदेखील एक प्रकारची पूजाच नाही का?

आजही कोजागिरीला गच्च्यांवर दिवे लागतील, दुधाला उकळी येईल, चंद्र आकाशात हसेल. आपणही कदाचित एखादा सुंदर फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकू. गप्पा रंगतील, हास्याचे फवारे उडतील आणि रात्रीची सांगता होईल. पण या सगळ्या आनंदाच्या क्षणी रस्त्याच्या कडेला पेटलेल्या तीन दगडांच्या चुलीची आठवण मात्र कायम होईल पण हतबल असलेले मध्यमवर्गीय आपण विचारांच्या पलीकडे के करू शकणार? फार तर त्या रात्रीपूरतं त्यांना खाऊ म्हणून चांगले पदार्थ देऊ.. त्या चुलीभोवती बसलेल्या कुटुंबांचं जगणं क्षणभर का होईना सुकर करू. कदाचित तेव्हाच कोजागिरीचा खरा चंद्र आपल्या मनात उगवेल.

कारण उत्सव चंद्राच्या प्रकाशात साजरा होत असला, तरी त्याचं खरं चांदणं माणसाच्या मनात उजळायला हवं. त्या रात्री पाहिलेलं दृश्य आणि मनात उमटलेले प्रश्न माझ्या स्मरणात कायम राहतील. चंद्र तोच असेल, चांदणंही तेच असेल; पण त्या प्रकाशात दुसऱ्याचं जगणं पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळाली, तर प्रत्येक कोजागिरी अधिक अर्थपूर्ण होईल.

krantip183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in