डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
कोल्हापूर-कोकण सीमेवरील पाटगाव आणि मठगाव ही निसर्गरम्य गावं घाटमाथ्यावर वसलेली आहेत. दाट जंगल, शांत वातावरण आणि पावसाळ्यातील मोहक निसर्ग अनुभवण्यासाठी ही ठिकाणं खास आहेत. रॉयल कॅम्पिंग क्लबमधील हेरिटेज वास्तूत राहणं या अनुभवाला अजूनच खास बनवतं.
कोल्हापूर आणि कोकणच्या सीमेवर घाटमाथ्यावर दोन सुंदर गावं वसली आहेत. जंगलाच्या सान्निध्यात वसलेली ही गावं आहेत पाटगाव आणि मठगाव. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यात, कोल्हापूरपासून साधारण दोन तासांवर ही गावं आहेत. या गावात मी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही राहिले होते. खरंतर तिन्ही ऋतूंची गंमत इथे राहून अनुभवता येते. इथे मी मठगावातील रॉयल कॅम्पिंग क्लब या हेरिटेज बंगलोमध्ये राहिले होते. एखाद्या चित्रातील किंवा स्वप्नातील घर प्रकट व्हावं असं बंगल्याचं रूप आहे. दारात मोठे नव्हे तर प्रशस्त अंगण आहे. अंगणातून घरात प्रवेश केल्यावर छोटा व्हरांडा आहे. या बंगल्यातील सगळ्यात सुंदर भाग म्हणजे मोठ्या लाकडी बांधकाम असलेली खोली. या खोलीत जिना आहे. तो चढून गेल्यावर माळा आहे आणि हा माळाही लाकडी. काचेच्या खिडक्यांतून येणारा प्रकाश माळ्यावर मंद मंद पसरत असतो. तिथे मुलांना खेळण्यासाठी बोर्ड गेम्स ठेवले होते. कौलारू छप्पर आहे बंगल्याला. खोलीचं दुसरं दार उघडलं की, पाठच्या बाजूला एक मोठा व्हरांडा आहे. तिथून शेतीभातीचे, उंच्यापुऱ्या झाडांचं नेत्रसुखद दृश्य दिसत राहतं. रात्री इथे बसलं की, काजव्यांचा लखलखाट बघायला मिळतो. शिवाय जंगलातील केबिनसारखीच एक मोठी स्वतंत्र रूम ही बंगल्याच्या बाजूला आहे. तिथलं वातावरण एकदम कोझी, सुंदर आहे. चारी बाजूने जंगलाने वेढलेल्या या ठिकाणी पोहोचताना शेवटची दोन मिनिटं कच्च्या रस्त्यावरूनच गाडी न्यावी लागते.
या ठिकाणी मी पहिल्यांदा गेले होते पावसाळ्याच्या सुरुवातीला. हे ठिकाण घाटमाथ्यावर असल्याने पाऊस मनसोक्त कोसळत असतो. दुपारची वेळ होती. ढग दाटून आले होते. गडगडाट झाला आणि पाऊस दमदार कोसळू लागला. मागच्या व्हरांड्यात जाऊन हा पावसाचा सोहळा बघायचं ठरवलं. व्हरांड्यात गेले. लाकडी आराम खुर्चीत बसले. वातावरणात चांगला थंडावा होता. तिथल्या स्टाफनी शेकोटी पेटवली. शेकोटीच्या त्या उबदार वातावरणात बसून मी बाहेर पडणारा पाऊस बघत होते. समोर असणारी सागाची, जांभळाची, फणसाची झाडं अगदी चिंब चिंब भिजून जात होती. वाऱ्याने डोलत होती. पावसाच्या थेंबाचा आवाज कानाला मधुर वाटत होता. मातीचा गंध हवेत दरवळत होता. पाण्यात रंग मिसळावा तसं मी त्या पावसाळ्याच्या मंत्रमुग्ध वातावरणात मिसळून गेले होते. काही न बोलता एका जागी बसून हा सोहळा मी अनुभवत होते. किती वेळ झाला तेही ठाऊक नव्हतं. तोपर्यंत तिथल्या स्टाफनी जेवायला आणू का विचारलं.
जेवायलाही कोल्हापुरी मटण, खास गोळा बिर्याणी, तांबडा पांढरा रस्सा असा बेत होता. पावसाळ्याच्या थंडगार वातावरणात असा बेत म्हणजे सुखच.
जेवण झाल्यावर संध्याकाळी तिथल्याच एका सुंदर ठिकाणी जायला निघाले. तिथल्या गाईडनी 4 by 4 जीप काढली, सोबत कॉफीचा थर्मास घेतला. जंगलाच्या वाटेने, कारवीच्या झुडुपातून गाडी जात होती. रस्ताही कच्चा, ओबडधोबड, वळणाचा होता. कोणता तरी घाट चढत निघाली आहे असं वाटत होतं. असा off-road करत दहा मिनिटांत एका सपाटीला पोहोचले आणि समोरचं दृश्य पाहून मी थक्क झाले होते. घाटमाथ्याच्या टोकावर मी उभी होते. माझ्या चारी बाजूने दाट दाट धुकं होतं. बाजूला डोंगराच्या आकृत्या दिसत होत्या. एक जोरदार वार आला आणि सगळं धुकं बाजूला झालं. बघते तर आजुबाजूला हिरवीगार डोंगररांग होती. ही डोंगररांग पुढे जुळते आंबोलीला. तिथे उभं राहिल्यावर एका बाजूला कोकण दिसत होतं आणि एका बाजूला कोल्हापूर. कोकणाच्या बाजूला खोल दरी होती आणि या पॉइंटला समांतर मनोहर मनसंतोष गड दिमाखात उभे दिसत होते. ही दृश्य टिपायला नजर भिरभिरत होती. झिरमिर झिरमिर पाऊस सुरू झाला, पुन्हा ढग आले आणि सारं दृश्य ढगात गुडूप झालं. पुन्हा वारा आला, पाऊस आणि ढग त्याच्यासोबत निघून गेले. पुन्हा स्वच्छ हिरवं चित्र समोर दिसू लागलं. हे दृश्य पाहत कॉफीचा आस्वाद घेतला. कॉफीची चव आज जास्त आवडत होती. तिथल्या गाईडनी सांगितलं की, ही दरी थोडी उतरली की एक धबधबा आहे. खरं उन्हाळ्यात तिथे जाता येतं. हे ठिकाण इतकं विलक्षण सुंदर, मोहवणार होतं की, उन्हाळ्यात पुन्हा यायचं असं मी त्या झिरमिर पावसात ठरवून टाकलं.
दुसऱ्या दिवशी मी पाटगावमधील एका मठात गेले. जिथे पाऊल ठेवल्याक्षणी गतकाळात प्रवास केल्यासारख वाटलं. हा मठ आहे मौनी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी प्रयाण करण्यापूर्वी मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता, अशी माहिती मिळाली. पावसाने आश्रमाचा सारा परिसर भिजून गेला होता. खूप सात्विक वातावरण पोहोचल्या पोहोचल्या जाणवत होतं. एका भल्यामोठ्या दगडी महाद्वारातून मठात प्रवेश केला. समोर मठाची दुमजली मुख्य वास्तू दिसली. दगड आणि लाकडाचा वापर करून समाधीमंदिर बांधलं आहे. साधारण ३०० वर्षांपेक्षा जास्त जुना हा मठ आहे. समाधीमंदिराच्या भव्य सभामंडपातून चालत, तिथल्या प्रवेशद्वारावर असणारी शिल्प पाहत गर्भगृहाकडे गेले. गर्भगृह पूर्णपणे दगडी आहे आणि मध्यभागी मौनी महाराजांची समाधी काळ्या पाषाणात बांधलेली आहे. तिथलं वातावरण चैतन्याने भारलेलं आहे, हे जाणवत होतं. मनोभावे नमस्कार करून, दर्शन घेऊन मठाचा परिसर बघत होते. तिथे अजून दगडी छोटे समाधी मंदिर आहे. मौनी महाराजांनंतरचे मठाधिपती तुरुतगिरी महाराज यांची तिथे समाधी आहे. मठाच्या आवारात रेंगाळत तिथली शिल्पकला, मराठा स्थापत्यशैली बघितली. तिथलं वातावरण स्वतःमध्ये झिरपू दिलं. तिथे फार प्रसन्न वाटलं.
मी गेले होते तेव्हा आम्ही दोघे तिघेच मठात असू. तिथे इतकी शांतता होती की, आपल्या पावलाचा आवाजानं इथली शांतता भंग होऊ नये असं वाटत होतं.
तिथून मी गेले होते पाटगावमधील धरण बघायला. या धरणाचा जलाशय मौनी सागर म्हणून ओळखला जातो. धरणाच्या तिन्ही बाजूने हिरवीगार डोंगररांग दिसत होती. लांबवर रांगणा गड धुक्यात हरवलेला दिसत होता. बाजूच्या डोंगरांतून पाण्याच्या पांढऱ्याशुभ्र धारा कोसळताना दिसत होत्या. तिथलं दृश्य फार सुंदर नेत्रसुखद होतं. पण मला धरणाच्या बाजूने फिरायला भीती वाटते, त्यामुळे फार काळ तिथे न रमता मी पुन्हा रिसॉर्टकडे आले.
पावसाळ्यात निसर्गभटकंती करण्यासाठी पाटगाव आणि मठगाव ही ठिकाणं अत्यंत सुंदर आहेत. इथला पाऊस मनावरील मळभ दूर करतो, दिलासा देतो. इथं मन शांत होऊन जातं. पराकोटीची शांतता आणि केवळ निसर्गाचं सान्निध्य इथे अनुभवता येतं. या भागात माझ्या पावसाळी भटकंतीचं वर्णन केलं आहे. उन्हाळ्यात हे ठिकाण कसं आहे ते पुढच्या भागात सांगते.
जवळचे विमानतळ - कोल्हापूर एअरपोर्ट.
जवळचे रेल्वेस्थानक - कोल्हापूर.
जवळचे बसस्थानक - कोल्हापूर
स्वतःच्या गाडीने प्रवास करण्यासाठी रस्ता - कोल्हापूर-कळंबा-इस्पुर्ली-गारगोटी- पाटगाव-मठगाव. (८४ किमी)
भेट देण्यासाठी उत्तम काळ - उन्हाळा, हिवाळा. पावसाळा सुरुवातीचा काळ आणि ऑगस्ट, सप्टेंबर पाऊस संपतानाचा काळ. पावसाचे प्रमाण इथे पुष्कळ आहे. त्यामुळे चौकशी करून गेलेले उचित राहील.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com