

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
उन्हाळ्याचा उकाडा असला तरी कोकणचा रानमेवा ओढ लावतोच! कोल्हापूर ते सावंतवाडी अशा प्रवासात काजूच्या बागेतली अनोखी भटकंती केली. लाल-पिवळ्या बोंडूंचा गंध, ताजं सरबत आणि कोकणी पाहुणचाराने सजलेल्या या 'रसगंधमय' मुशाफिरीबद्दल..
घाटावरून कोकणात उतरत असताना उन्हाळ्याचा खास कोकणी गंध आपलं स्वागत करतो. हा गंध असतो आंब्याच्या मोहोराचा, काजूच्या बोंडूचा, फणसाचा, रानमेव्याचा. हा गंध आला की, ओळखायचं आपण कोकणात प्रवेश केला आहे. असा गंध आला की कवी बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्ती आठवतात.
माझ्या गोव्याच्या भूमीत
आंब्या-फणसाची रास
फुली फळांचे पाझर
फळी फुलांचे सुवास!!
आणि खरच फुलांसारखे मधाळ गंध असणारी फळ इथे आहेत. मग उन्हाळ्यात कितीही उकाडा असला तरी या गंधासाठी, चवींसाठी मी भर उन्हाळ्यातही कोकणची भटकंती करतेच. गंधाचे हे वैभव त्याशिवाय कसे अनुभवायला मिळेल..?
यावेळी मी खास काजूसाठी भटकंती करायचं ठरवलं. कोल्हापूर ते सावंतवाडी असा साडेतीन तासाचा प्रवास करून मळगावमध्ये पोहोचले. सावंतवाडीजवळ नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी मळगाव आहे. तिथेच नरेंद्र सृष्टी म्हणून ठिकाण आहे तिथे मुक्काम होता. त्यांची काजूची छान मोठी बाग आहे. बागेत मस्त फिरता येतं. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी हे ठिकाण असल्याने तिथे झाडी पुष्कळ आहे. शिवाय छोटा बिना क्लोरिनचा प्लंज पूल ( छोटा पोहण्याचा तलाव) आहे. तिथल्या रूमसुद्धा झाडांच्या सावलीत विसावल्या आहेत. उन्हाळ्याची सुट्टी छान एन्जॉय करता येणार म्हणून मन आनंदूनच गेलं.
सकाळी जागच मला पक्ष्यांच्या किलबिलाटाने आली. पाहते तर झाडांवर पक्ष्यांची शाळा भरली होती. या झाडाला छोटी छोटी फळे आली होती. नानाविध रंगाचे छोटे मोठे पक्षी झाडावरची छोटी फळं खाण्यात मग्न होते. मी सुद्धा आवरून घावणे चटणी असा नाश्ता केला आणि निघाले काजूच्या बागेत फिरायला. बागेची माहिती द्यायला नरेंद्र सृष्टीच्या owner अर्चना काकू आणि मदतनीस नूतनकाकू सोबत होत्या. त्या बुट्टी घेऊनच आल्या होत्या काजू वेचायला. बागेत काजूचा गंध मस्त दरवळत होता. वेगवेगळ्या स्थितीतील काजू झाडावर दिसत होते. कुठे कुठे कच्चे हिरवे काजूगर, काजूची हिरवी फकं दिसत होती तर कुठे रसरशीत तयार झालेले लाल पिवळे बोंडू. झाडाला लागलेली ही पिवळी लाल फळं किती सुंदर दिसतात!!
हे बोंडू पिकले की गळून पडतात आणि लगेच वेचावे लागतात. नाहीतर साळिंदर तरी बी उकलून फस्त करतं नाहीतर बोंडू इतके बिलबिलीत होतात की हातात धरू वाटत नाहीत. त्यामुळे त्या त्या दिवशी बोंडू वेचतात आणि त्यापासून बी वेगळी करून ठेवतात. काजूच्या बिया आपण वापरतोच पण काजूच्या बोंडूचे काय होतं मी विचारलं??
काकू सांगू लागल्या “गावात या बोंडूचे काही पदार्थ केले जातात. आता उन्हाळ्यात हेच रानमेव्याचे पदार्थ करण्याची खाण्याची मौज सुरू असते. आजही मी तुमच्यासाठी सरबत आणि एक खास पदार्थ करणार आहे.” असे म्हणून त्या, नूतनकाकू बोंडू वेचू लागल्या. मीही त्यांना मदत करू लागले. बोंडू वेचता वेचता काकू सांगू लागल्या, “यावेळी काजू कमी लागले आहेत. हवेतील बदलामुळे आंबा काजूचा मोहोर जळून गेला. नेहेमी असतात त्याहीपेक्षा कमी काजू आंबे आहेत यंदा.” आणि खरच झाडावर बघितलं तर मोहोर काळा पडलेला दिसत होता.
आम्ही छोटी टोपलीभर बोंडू वेचले. सरबताची तयारी सुरू केली. काकूंनी सगळ्यात आधी बोंडू स्वच्छ धुतले आणि वरची काजू बी फिरवून वेगळी केली. नंतर बोंडूचा वरचा आणि खालचा भाग कट केला आणि असे तीन चार बोंडू पाण्यात उकडायला ठेवले. 2 ते 3 मिनिटात त्यांचा रंग बदलला. लाल रंगाचे बोंडू फिके केशरी झाले. पाण्यातून ते बाहेर काढले, स्मॅश करायला वेगळ्या भांड्यात घेतले. पहिल्याचा प्रेसमध्ये त्यातून चांगला कपभर रस निघाला. असे चांगले स्मॅश केल्यावर पेलाभर रस त्यातून निघाला. हा रस थंड झाल्यावर त्यात साखर मीठ घालून छान ढवळल आणि सरबतासाठीचा काजूचा रस तयार झाला. हा रस फ्रीजमध्ये तीन महिने टिकतो. पेला पाव भरेल इतका रस घेतला ,उरलेले भाग पाणी घातलं आणि तयार झाले काजूचे सरबत. काजूचा गोडसा गंध सरबत पिताना येतच होता. सरबताचा एक घोट प्यायल्यावरच इतकं तजेलदार वाटलं ना!! नीरा पितो ना आपण तसंच वाटत होतं पिताना.. मी असं ऐकलं आहे की संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी काजूमध्ये असतं. खरं खोट माहिती नाही पण पिताना अगदी refreshing वाटत होतं. नवीन चव अनुभवण्यासाठी पिऊन बघावेच.
अजून एक या बोंडूचा गावात पदार्थ करतात तोही काकूंनी दाखवला. बोंडूचे छोटे छोटे तुकडे केले. त्यावर तिखट मीठ भुरभुरले आणि छान एकत्र करून खायला दिले. या साध्या सोप्या पदार्थालाही नाव आहे. गावात या पदार्थाला करमठ म्हणतात. गोड तुरट तिखट रसदार छान लागत होतं चवीला. काजूचे बोंडू खाण्याचा अगदी मनसोक्त आस्वाद घेतला.
त्यादिवशी जेवायलाही खास रानमेव्याचे पदार्थ होते. पानात फणसाच्या कुयरीची भाजी. वाटण घालून केलेली कैरीची आंबटगोड कढी(सार), कैरीची चटणी, लोणचं आणि गूळ खोबऱ्याच्या मिश्रणात काजूच्या ओल्या बिया उकडून घालून केलेला गावातला खास पदार्थ होता. या पदार्थाला काजूचा मोहला म्हणतात. हे पान बघूनच असं वाटत होतं की उन्हाळ्याची सगळी सुट्टी, सगळ्या आठवणी या पानात आहेत. प्रत्येक पदार्थ अप्रतिम होता चवीला. रानमेव्याची खऱ्या अर्थाने मौज केली होती.
दुपारी विश्रांती घेतल्यावर गावात तीन दगड म्हणून टेकडीवर ठिकाण आहे तिकडे ट्रेक करत गेले. जाताना वाटेत हिरवी करवंद जाळीत लागलेली दिसली. एक करवंद तोडल, त्याचा चीक पानाला पुसला आणि कच्च करवंद खाण्याचा आस्वाद घेतला. तोंड आंबट आंबट झालं होतं अगदी पण हिच तर मजा असते!!
१० मिनिटात तीन दगडाजवळ पोहोचले. टेकडीवर आपल्यापेक्षा उंच, पपईच्या झाडाएवढे मोठाले तीन काळे दगड आहेत. बसायला सपाट भाग आहे. तिथे बसून गावचे सुंदर दृश्य दिसतं. उन्हाळी भाज्या लावलेल्या शेतीचे हिरवेगार मळे तिथून दिसत होते. उन्हाळ्यात असं दृश्य दिसलं की डोळे सुखावतातच. संध्याकाळी सूर्यास्तही बघितला. ध्यानधारणा करण्यासाठी खूप सुंदर जागा आहे ही.
त्यावेळी मला गोष्ट जाणवली की भटकंती करताना आपण ठिकाणे बघायला प्राधान्य देतो. कधी कधी असे वेगळे अनुभव घेण्यासाठी ठरवून एखाद्या वेगळ्या गावाची भटकंती करायला हवी. यावेळी भटकंतीत मी अनेक पदार्थ पहिल्यांदाच चाखले, त्यांची नावेही कानाला किती वेगळी वाटली. खऱ्या अर्थाने रसगंधमय अशी सावंतवाडीची भटकंती झाली.
जवळचे एअरपोर्ट - चिपी विमानतळ (४३ किमी) मोपा एअरपोर्ट, गोवा (३५ किमी) जवळचे
रेल्वे स्टेशन - सावंतवाडी रेल्वे स्टेशन. (स्टेशनपासून ६ किमी) जवळचे बस स्थानक सावंतवाडी (बस स्थानकापासून (८ किमी) आपल्या गाडीने प्रवास करत असल्यास - कोल्हापूर-आंबोली-सावंतवाड़ी रस्ता घेणे सोयीचे आहे.
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com