तळकोकणातला निर्सगमय गणेशोत्सव

माणुस आणि निसर्ग यांचे नाते अधिक घट्ट करणारा असा हा गणेशोत्सव. आधुनिकीकरणामुळे पर्यावरणाचे प्रश्न बिकट होत असताना पर्यावरण जपण्याचा आणि निसर्गाच्या जवळ नेणारा कोकणातील घरगुती गणेशोत्सव आगळावेगळा ठरतो, तो यासाठीच.
तळकोकणातला निर्सगमय गणेशोत्सव
तळकोकणातला निर्सगमय गणेशोत्सव
Published on

विशेष

सतीश लळीत

कोकणातील गणेशोत्सवावर लिहिणे अतिशय कठीणकर्म आहे. कोकणातील घरगुती गणेशोत्सवातील माटोळीची सजावट असो, पत्री असो किंवा वाण असो, यात वापरला जाणारा प्रत्येक घटक पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत आहे. माणुस आणि निसर्ग यांचे नाते अधिक घट्ट करणारा असा हा गणेशोत्सव. आधुनिकीकरणामुळे पर्यावरणाचे प्रश्न बिकट होत असताना पर्यावरण जपण्याचा आणि निसर्गाच्या जवळ नेणारा कोकणातील घरगुती गणेशोत्सव आगळावेगळा ठरतो, तो यासाठीच.

संपादकांचा फोन आला. म्हणाले, कोकणातील गणपतीवर लिहा ना जरा. अडचणीतच आलो हो. कारण कोकणातील गणेशोत्सवावर लिहिणे अतिशय कठीणकर्म आहे. तुम्हाला कोणी केशर, वेलची, बदाम-पिस्ता, साखर, मध घालून आटवलेल्या दुधाच्या चवीवर लिहा असे सांगितले काय कराल, तशी माझी अवस्था झाली. कारण कोकणातील घरगुती गणेशोत्सव ही वर्णन करायची, सांगायची गोष्ट नाही, ती प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट आहे.

कोकण तसे सर्वच ऋतुंमध्ये सदाबहार असते. पावसाळ्यात, त्यातही श्रावण महिन्यानंतर तर ही बहार कैक पटींनी वाढलेली असते. सस्यशालिनी पृथ्वीमाता हिरवा शालू वगैरे नेसलेली असते. कोकणात श्रावण महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, गोपाळकाला, गोकुळाष्टमी, पोळा अशी सणांची मालिकाच सुरु होते. आमच्याकडे अजूनतरी या सणांचे व्यापारीकरण झालेले नाही. पण या सगळ्या सणांच्याआधीच एका मोठ्या पाहुण्याचे वेध कोकणी माणसाला लागलेले असतात. भिंतीवरच्या कॅलेंडरकडे पहात ‘गणपती यंदा उशीरा कसो?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. घरीदारी, बाजारात, गावच्या देवळात, झापाच्या हॉटेलात अशी सगळीकडे एकच चर्चा असते ती भाद्रपदात घरोघरी येणाऱ्या गणपतीबाप्पाच्या आगमनाची.

कोकण आणि गणेशोत्सवाचे नाते अगदी आगळेवेगळे आहे. पोटापाण्यानिमित्त मुंबई-पुण्यात किंवा अन्यत्र कोठेही राहणारा कोकणी चाकरमानी वाट्टेल ते करुन गणपतीला गावी पोचतोच. घर झाडून लख्ख केले जाते, नंतर रंगरंगोटी होते. दरवर्षीच्या ठरलेल्या गणपतीच्या शाळेत पाट विधीपुर्वक पोचवला जातो आणि मग सुरु होते बाप्पाच्या आणि त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या गौरीच्या आगमनाची प्रतीक्षा.

श्रावण भाद्रपद महिन्याच्या काळात कोकणातील निसर्ग उच्चतम पातळीवर बहरलेला असतो. पावसाचा जोर तसा कमी असतो. शेतीभातीची कामेही कमी असतात. वातावरणात कमालीची प्रसन्नता असते आणि अशावेळी गणपती येतो. कोकणात अजुनही सार्वजनिक गणेशोत्सवाचे लोण आलेले नाही. अगदी तालुक्याच्या ठिकाणी, तेही राजकारण्यांकडुन अलिकडच्या काळात सार्वजनिक उत्सव सुरु झाले आहेत. गणपतीच्या शाळेत पाट देण्याआधी घरात जोरदार चर्चा होते ती मुर्ती कसली सांगायची याची. कृष्णाच्या रुपातील गाय-गणपती, शंकर-पार्वती मधे गणपती, सिंहासनावर बसलेला, सिंह, मोर, उंदीर किंवा गरुडावर बसलेला गणपती आणायचा, यावर चर्चा करुन निर्णय घेतला जातो. या चर्चेत घरातील बाळगोपाळांचाही समावेश असतो.

कोकणातील पारंपरिक घरगुती गणेशोत्सव हा अजुनही बऱ्यापैकी पर्यावरणपूरक आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होत नाही, असे नाही. पण आता पुन्हा बहुतेकांचा ओढा शाडूमातीच्या मुर्तींकडे वळला आहे. गावातील ‘गणपतीच्या शाळा’ हा एक सांस्कृतिक ठेवा आहे. प्रत्येक गावात किमान दोन तरी अशा मूर्तीशाळा असतात. वर्षातील तीन महिने त्या गजबजलेल्या असतात. गणपती मूर्तीकार हे असामान्य प्रतिभेचे कलाकार असतात. साच्यातील मूर्तीबरोबरच हाताने कोणत्याही प्रकारची मूर्ती बनविण्याचे त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे असते. मूर्ती वाळल्यावर रंगकाम करणे आणि ते पहाणे हे खुप आनंददायी असते. पहिल्यांदा सर्व मूर्त्या पांढऱ्या रंगाने रंगवतात. मग शरीर, वस्त्रप्रावरणे, दागिने, मुकुट आदी रंगवले जाते. रंगकामातील सगळयात कसोटीचा भाग असतो मूर्तीचे ‘डोळे उघडणे’. याला ‘रेखणी’ असंही म्हणतात. रेखणी करणारे कलाकार अतिशय एकाग्रतेने आणि तन्मयतेने, पण लिलया हे काम करतात. रेखणीकार नेहमीच भाव खाऊन जातात.

बहुतेकदा चतुर्थीच्या आदल्या दिवशी मूर्ती वाजतगाजत घरी आणली जाते. घरातील लहानथोर मंडळी मूर्तीकाराची बिदागी, मूर्ती झाकण्यासाठी शाल किंवा रंगीत कापड, श्रीफळ घेऊन शाळेत पोचते. तिथे मग आपली मूर्ती ताब्यात घेऊन, मूर्तीकाराचा यथोचित सत्कार करुन मंडळी आपला ‘बाप्पा’ घेऊन घरी निघतात. बहुतेक ठिकाणी आजही मूर्ती डोक्यावरुनच आणली जाते. शाळा जर परगावात असेल तरच वाहनातून मूर्ती आणतात. घरी आल्यावर बाप्पाचे स्वागत करुन घरात आणतात. शेजारीपाजारी, बाळगोपाळ मूर्ती बघायला येतात. त्यांचे कुतुहल शमवण्यासाठी मग घरचा जाणता अगदी काळजीपूर्वक मूर्तीभोवती लपेटलेली शाल अलगदपणे काढून सर्वांना दर्शन घडवतो.

कोकणी माणूस श्रद्धाळू आहे, भाविक आहे. गणपतीची पुजा पुरोहितांनीच सांगितली पाहिजे, असा त्याचा आग्रह असतो. आजही ही प्रथा टिकून आहे. गावातील आठदहा वाड्या, प्रत्येक वाडीतील पंचवीसतीस घरे म्हणजे दोनअडिचशे घरांमध्ये जाऊन षोडशोपचार पुजा सांगताना ग्रामपुरोहिताची तारांबळ उडते. हे एकट्याचे काम नसते. त्यामुळे बाहेरुन पुरोहित आयात केले जातात. भल्या पहाटे आपल्या घरच्या गणपतीची पुजा आटोपून पुरोहित बाहेर पडतो, तो सुर्यास्तानंतर घरी परततो. कितीही वाजले तरी प्रत्येक घरातील सगळे पुरोहिताची वाट पहात थांबतात. साग्रसंगीत पुजा झाल्यावर बाप्पाला ‘उपाहार’ म्हणजे जेवणाचा नैवेद्य दाखवूनच सगळे जेवायला बसतात.

घरगुती गणेशोत्सव खरेतर दीड दिवसाचा आहे. प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या दिवशी सुर्यास्तापुर्वी विसर्जन करायचे असते. पण पाहुणेरावळे यायचे असतात. घरोघरी भजने करायची असतात. सत्यनारायणाची पुजा घालायची असते. यामुळे मग सोयीसाठी बाप्पाचा मुक्काम वाढवला जातो. काही ठिकाणी पाचव्या दिवशी गौरी येतात. त्यामुळे गौरी येईपर्यंत बाप्पाचा मुक्काम वाढतो. त्यामुळे प्रत्येक घराच्या सोयीने पाच, सात, नऊ, अकरा, अठरा, एकवीस अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी बाप्पा घरी असतो. गावातील भजनी मंडळे चतुर्थीच्याआधी दोन महिन्यांपासुन सराव करुन घरोघरी भजने करायला सज्ज असतात. हार्मोनियम, पखवाज किंवा तबलाडग्गा, टाळ यांच्या सहाय्याने अतिशय सुरेल पद्धतीने ही भजने सादर होतात. दक्षिण कोकणातील भजने ही वारकरी पंथाची असतात. म्हणजे सुरुवात ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ या अभंगाने होते. मग ‘रुप पाहता लोचनी’ हा रुपाचा अभंग सादर होतो. नंतर गजर, गौळण, वेगवेगळे अभंग आणि भैरवी अशा क्रमाने भजनाचा बहारदार कार्यक्रम होतो. भजनकऱ्यांसाठी ओल्या नारळाचे खोबरे आणि मालवणी मसाला घातलेली फेमस काळ्या वाटाण्याची ऊसळ तयार असते. तिच्यावर ताव मारुन भजनी मंडळ पुढच्या घरी वळते. ही भजने रात्रभर सुरु असतात. अलिकडे ऊसळीऐवजी समोसे, वडापाव, मिसळ असे वेगळे पदार्थही दिले जाऊ लागले आहेत.

घराची स्वच्छता, रंगकाम याबरोबरच गणपतीची आरास खुप महत्वाची असते. मखराची आकर्षक सजावट, रोषणाई केलेली असते. आराशीमध्ये सगळ्यात महत्वाची असते ती मुर्तीच्या वर बांधायची मंडपी. हिला माटी, माटवी किंवा माटोळी असेही म्हणतात. माटोळी ही सागवानी लाकडाची सुमारे सहा बाय चार फुट किंवा जवळपासच्या आकाराची आयताकृती चौकट असते आणि तिच्यावर उभ्याआडव्या पट्ट्या लावून त्यावर हुक लावलेले असतात. निसर्गात उपलब्ध असलेली फुले, फळे, आंब्याचे टाळ, नारळ लावून ही माटोळी सजवली जाते.

माटोळीची सजावट असो, पत्री असो किंवा वाण असो, यात वापरला जाणारा प्रत्येक घटक पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत आहे. माणुस आणि निसर्ग यांचे नाते अधिक घट्ट करणारा असा हा गणेशोत्सव. आधुनिकीकरणामुळे पर्यावरणाचे प्रश्न बिकट होत असताना पर्यावरण जपण्याचा आणि निसर्गाच्या जवळ नेणारा कोकणातील घरगुती गणेशोत्सव आगळावेगळा ठरतो, तो यासाठीच. खरेतर पर्यटनाच्यादृष्टीने या सणाकडे पहायला हवे. गोव्याने शिमगा सण, कर्नाटकाने दसरा सण पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून रुजवला आहे. तशीच कोकणातील गणपती सणाला पर्यटनाची जोड दिली तर या सणाचा आनंद कोकणाबाहेरील लोकांनाही लुटता येईल.

satishlalit@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in