

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
निळाशार समुद्र, हिरवीगार डोंगररांग, खाड्या, किल्ले, देवस्थानं, गावाकडची संस्कृती आणि तोंडाला पाणी आणणारी मालवणी-कोकणी खाद्यसंस्कृती अशा असंख्य रंगांनी नटलेला हा प्रदेश आज पर्यटनाच्या नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्त चला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या या निसर्गरम्य सफरीला...
गोमू माहेरला जाते हो नाखवा..
तिच्या घोवाला कोकण दाखवा..’
हे गाणं येऊन कित्येक वर्ष झाली. त्यानंतर गोमू आणि तिच्या घोवानं म्हणजे नवऱ्यानं किती वेळा कोकणची सैर केली असेल. पण तुमच्यापैकी अनेक जण असे असतील की ज्यांनी अजून एकदाही कोकण बघितलेलं नसेल. आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं त्यांच्यासाठी ही थोडी कोकणची सैर.
दरवर्षी २७ सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून जागतिक एकात्मता वाढवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या 'जागतिक पर्यटन संघटना' (UN Tourism - पूर्वीची UNWTO) द्वारे १९८० मध्ये पहिल्यांदा हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यात आला. २७ सप्टेंबर १९७० रोजी या संघटनेचे नियम आणि कायदे (Statutes) स्वीकारण्यात आले होते, जो जागतिक पर्यटनाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. याची आठवण म्हणून हा दिवस निवडण्यात आला.
जागतिक पर्यटन दिन २०२६ ची यंदाची थीम आहे- ‘Digital Agenda and Artificial Intelligence to Redesign Tourism’(पर्यटनाची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता). तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञेमुळे पर्यटन क्षेत्र अधिक स्मार्ट, सुलभ आणि शाश्वत कसं बनवता येईल, यावर यंदा विशेष भर दिला आहे.
उत्तर कोकण म्हणजे रत्नागिरी जिल्हा आणि दक्षिण कोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. या दोन्ही जिल्ह्यातले तरुण आता स्मार्ट झालेले आहेत. आणि पर्यटन व्यवसायातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं, हे माहीत झाल्यामुळे अनेक जण त्यामध्ये फुल टाईम उतरलेले आहेत. त्यांना प्रोत्साहन हवं आहे शासनाकडून आणि मोठ्या उद्योग कंपन्यांकडून.
अलीकडील काही वर्षांमध्ये या दोन्ही जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग व कृषी पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. या स्थळांबरोबरच कोकणातील खाद्य संस्कृती हेही या पर्यटकांचं विशेष आकर्षण झालं आहे.
रत्नागिरीचा ' रत्नदुर्ग' किल्ला, युनेस्कोचं मानांकन लाभलेला जागतिक वारसा स्थळ यादीतील हर्णे येथील समुद्रातील 'सुवर्णदुर्ग' किल्ला, हे रत्नागिरी जिल्ह्याचं खास वैशिष्ट्य आहे.दापोली इथल्या 'डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा'ला भेट देऊन तिथल्या अनेक नव्या शेती प्रयोगांची माहिती अनेक पर्यटक घेऊ लागलेले आहेत. रत्नागिरीतील आरे-वारे बीच, गणपतीपुळे समुद्र, गुहागर, दापोली तालुक्यातील मुरुड ,कर्दे, लाडघर हे स्वच्छ समुद्रकिनारे पर्यटकांच्यासाठी आकर्षण स्थळं ठरले आहेत. दापोली तालुक्यातील लाडघर येथील तामसतीर्थ समुद्रकिनाऱ्याला लाभलेली तांबडी वाळू हे तिथलं खास वैशिष्ट्य आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे गावालाही अनेक पर्यटक भेट देत असतात. दापोली तालुक्यातील मुरुड हे भारतरत्न महर्षी कर्वे यांचं मूळ गाव. तिथं त्यांचं घर आहे.अण्णासाहेबांच्या या ऐतिहासिक वाड्यात/घरात सध्या 'महर्षी कर्वे वाचनालय' सुरू करण्यात आलंय. हे स्थान इतिहासप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान झालं आहे. गावात त्यांचं स्मारक, पुतळा आणि माहिती फलक देखील आहेत, ज्यातून त्यांच्या कार्याची माहिती मिळते.
रत्नागिरी जिल्ह्यात मिऱ्या बंदर, दाभोळ, हर्णे, बुरोंडी अशी काही मोठी बंदरं आहेत जी मत्स्य व्यवसायाची कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात. देवरुख येथील श्री मार्लेश्वर मंदिर, हेदवी येथील श्री दशभुजा लक्ष्मी गणेश मंदिर, गुहागरचं श्री व्याडेश्वर मंदिर, दापोली तालुक्यातील कड्यावरचा गणपती, चिपळूण तालुक्यातील श्री परशुरामाचं मंदिर तसंच श्री विंध्यवासिनी देवीचं मंदिर,राजापूर तालुक्यातील श्री धूतपापेश्वर आणि गंगाक्षेत्र परिसर ही महत्त्वाची धार्मिक स्थळं रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. या सर्व ठिकाणी सततची पर्यटकांची रीघ असते,पण त्यांच्यासाठी म्हणाव्या तशा सोयी अजूनही विकसित झालेल्या नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा तारकर्ली बीच, निवती, भोगवे , चीवला हे समुद्रकिनारे तसंच वेंगुर्ल्याजवळील मोचेमाड आणि देवगडचा कुणकेश्वर हे स्वच्छ, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य लाभलेले समुद्रकिनारे पर्यटकांना वेड लावणारे आहेत. जिल्ह्यातील आंबोली, दोडामार्ग परिसर जैवविविधतेनं नटलेला आहे. इथलं पावसाळ्यातील पर्यटन हे विशेष आकर्षण आहे. तेरेखोल, कर्ली , आचरा, देवगड आणि विजयदुर्ग अशा अनेक खाड्यांमुळे किनारी भागाची शोभा वाढली आहे. या खाड्यांमधून होडीतून फिरण्याचा अनुभव , विशेषतः तारकर्लीच्या परिसरात थक्क करून टाकणारा आहे .
वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याजवळ बांधलेला 'ग्लास ब्रिज' हा राज्यातला पहिला ग्लास ब्रिज ठरला आहे. तिथून वाहणारी नदी आणि वनसंपदा पाहायला शेकडो पर्यटक यायला लागलेत. जिल्ह्याचा मानबिंदू असलेला मालवणचा सागरी दुर्ग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं आणि मराठा आरमाराच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला ! १६६४ मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भर समुद्रात बेटावर उभा असलेला हा जलदुर्ग मराठा स्थापत्य कलेचा अत्युत्कृष्ट नमुना आहे.
मालवणच्या उत्तरेस असलेला विजयदुर्ग किल्लाही मराठा आरमाराच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. या दोन्ही किल्ल्यांना आंतर्राष्ट्रीय दर्जाचा वारसा लाभला आहे. रेडी किल्ला आणि सावंतवाडी जवळचा मनोहर मनसंतोष गड हे ऐतिहासिक महत्त्व वाढवणारे आहेत. 'चीपी सिंधुदुर्ग विमानतळ' या पर्यटनाला नवी गती देणारा ठरला आहे. पर्यटनाचा जिल्हा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा तिथल्या लोककला,निसर्गरम्य किनारे , अभेद्य किल्ले आणि चविष्ट मालवणी खाद्य संस्कृती हजारो पर्यटकांना आणि पर्यटन व्यावसायिकांना खुणावते आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील पर्यटन, तंत्रज्ञानस्नेही आणि कृत्रिम प्रज्ञेने अधिक स्मार्ट कसं होईल याबाबत महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने आता तातडीने पावलं उचलली पाहिजेत.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com