आडवाटेवरचं सुंदर गुपित - कोरजाई

कर्ली खाडीचा पैलतीर, डोंगररांगांची सावली आणि पाखाडीची वाट असं निसर्गसौंदर्य लेवून बसलेल्या कोरजाई गावची ही एक अनोखी भटकंती, जी तुम्हाला शहरातल्या गोंगाटाचा विसर पाडेल.
आडवाटेवरचं सुंदर गुपित - कोरजाई
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

कर्ली खाडीचा पैलतीर, डोंगररांगांची सावली आणि पाखाडीची वाट असं निसर्गसौंदर्य लेवून बसलेल्या कोरजाई गावची ही एक अनोखी भटकंती, जी तुम्हाला शहरातल्या गोंगाटाचा विसर पाडेल.

तळकोकणातील भटकंती म्हटलं की मालवण, वेंगुर्ला ही नावं चटकन आठवतात. याच मालवण जवळ एक सुंदर गाव वसलंय. कोरजाई नावाचं. या गावाची भौगोलिक गंमत म्हणजे हे गाव मालवणपासून अगदी दहा मिनिटांवर आहे, पण येतं वेंगुर्ला तालुक्यात. या गावातून वेंगुर्ला शहर ३० ते ३५ किमी म्हणजे जवळपास तासावर आहे. असं हे मालवण नजीक असणारं वेंगुर्ला तालुक्यातील हे गाव म्हणजे एक सुंदर गुपित वाटतं.

मालवण देवबागला समुद्रकिनारा आणि कर्ली खाडी लाभली आहे. या खाडीकाठी उभं राहून पैलतीर पाहिला की जे गाव दिसतं ते कोरजाई गाव. खाडीकाठी आणि टेकडीच्या कुशीत हे गाव वसलेलं आहे. गावातील घरं टेकडीची उतरणी संपल्यावर खाडीच्या काठी आहेत. घरांकडे जायचं तर पाखाडी उतरून जायचं. पाखाडी म्हणजे जांभ्याच्या पायऱ्यांची वाट. अशा या कोरजाई गावात मी एका होमस्टेमध्ये मुक्काम केला होता. कोरजाई किनारा होमस्टे असं नाव आहे. लक्ष्मण राठीवडेकर आणि त्यांच्या कुटुंबाचा हा होमस्टे आहे. टापटीप, स्वच्छ खोल्या आणि अगदी मनापासून केले जाणारे आदरातिथ्य ही त्यांची खासियत आहे. अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे होमस्टेच्या अंगणात बसलं की समोर खाडीचे निळंशार पात्र दिसत राहतं. ज्यांना कोकणातल्या निसर्गरम्य आणि ताज्या-टवटवीत वातावरणात मुग्ध होऊन जायचं आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण अगदी बेस्ट आहे.

मी ठरवून फक्त कोरजाई गाव बघायला गेले होते. गाव अगदी निसर्गसंपन्न आहे. टेकडीच्या उतारावर आंबा, फणस, कोकमाची झाडे आहेत. ताडमाड उंच वाढलेलं माड आहेत. या सगळ्या झाडांनी गावावर छत्रछाया धरली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गेलात तर रानमेव्याची मौजच तिथे असते. ग्रामस्थांचे मांगर, काजू, आंब्याच्या बागा टेकडीच्या वर कातळावर आहेत. कोल्ह्याचं दर्शन तिथे हमखास घडतं.

इथली काही घरं अजून कौलारू कोकणीपण टिकवून आहेत. परसात मोगरा, जास्वंद, जाई-जुई फुललेल्या असतात. अशाच एका सुंदर घरात मी फिरत फिरत गेले. त्यांच्या अंगणातील विहिरी पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. विहीर म्हटलं की, आपल्यापुढे एक भलीमोठी आणि खोलपाण्याची विहीर येते, पण इथली विहीर अगदी बुटकी होती. साधारण सात-आठ फुटांची असेल फक्त आणि त्यात पाणी अगदी आपल्या कोपराभर उंचीचं होतं. पाण्याचा स्तर कायम तेवढाच असतो. कित्येक वर्षं तेवढाच आहे. पाणी कमी होत नाही की वाढत नाही. पाऊस पडला की मात्र ती तुडुंब भरते. एखाद्या कुंडासारखी ती विहीर वाटली. आलीय तर या अनोख्या विहिरीचं पाणी पिऊन बघावं म्हटलं. काकूंनी कळशी आणली. कळशी पाण्यात गेल्यावर डुबुकऐवजी खण.. असा आवाज आला. कारण तळाला कळशी आपटली. काकूंनी रहाटाने पाणी काढलं. पेल्यात पाणी दिलं. पाण्याचा एक घोट घेतला आणि वाटलं अमृत असंच असेल कदाचित. पाण्याला अवीट गोडी होती. हे पाणी घालून साधा भात शिजवला तरी रूचकर होईल. घटाघटा पाणी पिणारी मी सावकाश चवीने पाणी प्यायले आणि काकूंना नमस्कार करून गावची भटकंती पुन्हा सुरू केली.

चालत गावातल्या मंदिरात गेले. जेट्टीच्या जवळच छोटेखानी, कौलारू मंदिर होतं. हे मंदिर होतं कोरजाई देवी आणि गणपती बाप्पाचं. मंदिरात गणपती बाप्पाची अत्यंत देखणी मूर्ती होती. कोरजाई देवीची मूर्ती तर महिषासुरमर्दिनीची आठवण करून देणारी होती. या देवीच्या नावावरूनच गावाचं नाव कोरजाई ठेवलं गेलं अशी माहिती मिळाली. गावच्या एका टोकाला हे कोरजाई देवीचं मंदिर आहे, तर दुसऱ्या टोकाला महादेवाचं मंदिर आहे. पाचपांडव मंदिर म्हणून ते ओळखलं जातं. तिथला परिसर सुंदर आहे. मी गेले होते तेव्हा महाशिवरात्र होती. त्यामुळे उत्सवी वातावरण तिथे होतं.

या गावाचं सूर्यास्तावेळचं वातावरण मला खूप आवडलं. काकांच्या छोटेखानी बोटीतून खाडीत मस्त बोटिंग केलं. ही खाडी कर्ली खाडी म्हणून ओळखली जाते. आम्ही गेलो होतो तेव्हा ओहोटी होती, त्यामुळे बरेच जण खुबे, मुळे (तिसऱ्यासारखे शिंपल्याचे प्रकार) गोळा करायला खाडीच्या चिखलात उतरले होते. काही जण कामासाठी लाकडी बोट घेऊन मालवण देवबागच्या काठाकडे निघाले होते. ही सारी दृश्य बघत बोटसफर सुरू होती. अर्ध्या तासाचा बोटीतून फेरफटका मारला. मला सूर्यास्त मात्र होमस्टेच्या अंगणातून बघायचा होता. होमस्टेकडे परतल्यावर काकांनी कोकम सरबत दिलं. तिथल्या कट्ट्यावर बसून सरबत घेत मी सूर्यास्त बघत होते. केशरी मग गुलाबीसर होत सूर्यदेव क्षितिजावर गुडूप झाले. पाण्यात आभाळाचा गुलाबी रंग मिसळलाय की काय असं वाटत होतं. अंधार पडू लागलाय याची जाणीव बगळ्यांना झाली. समुद्राकडून खाडीच्या दिशेने त्यांचे थवेच्या थवे येत होते. परतीचा प्रवास करत होते. पाण्याच्या अगदी जवळून ते जायचे. असं वाटायचं, जर यांचे पांढरेशुभ्र पोट पाण्याला लागले तर पाण्यात मिसळलेला आभाळाचा गुलाबी रंग त्यांच्या पोटाला लागेल आणि त्यांचे सारे अंग गुलाबी होऊन जाईल. ही कट्ट्याची जागा त्यामुळे माझी विशेष आवडीची होती. निसर्गाची सुंदर दृश्य तिथून पाहता यायची.

इथे बसून जेव्हा भरती-ओहोटी बघायचे ना तेव्हा अगदी लहान मुलासारखा आनंद व्हायचा. ओहोटी लागली की, पाणी कमी कमी होत जायचं. मग तिथल्या चिखलात खेकडे तुरूतुरू पळताना दिसायचे.. भरती लागली की, पाणी हळूहळू भरायचं. आपण कसं एक एक पाऊल अंतर कापत असतो, तसं पाणी लाटालाटांनी वाढत जायचं आणि मग पाण्यात वेगवेगळे सुंदर सुंदर मासे दिसायचे. पाण्याचा स्तर कमी असला की, छोटे मासे दिसायचे. पाण्याचा स्तर वाढत गेला की, तळहाताएवढे मासे पाण्यात दिसायचे आणि एखाद दुसरा मासा नाही तर त्यांचा थवाच असायचा. कट्ट्यावर बसून असं निरीक्षण करणं माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता.

आडवाटेवर असणारं हे कोरजाई गाव दोन-तीन दिवस निवांत वेळ घालवण्यासाठी सुंदर ठिकाण आहे. इथे राहून मालवण देवबागही बघता येतं किंवा कुठेही न जाता होमस्टेमध्ये थांबून आरामात वेळ घालवता येतो. शहरातील गोंगाट, गजबज सोडून जेव्हा या गावात येतो तेव्हा आपसूक शांततेची लाट मनाला शिवून जाते. भरतीच्या लाटांप्रमाणे हळूहळू ही शांतता मनावर चढत जाते. या शांततेत बुडून राहता यायला हवं. मग तेव्हा आत्मिक आनंद नक्कीच मिळतो. भटकंती सार्थकी लागते. बरेच जण इथे वर्क फ्रॉम होमसाठीही येतात. सकाळी लवकर उठून ऑफिसचं काम करतात, तसंच काम झालं की संध्याकाळी गावातून छान फेरफटका मारून येतात. ताजेतवाने होतात.

मग तुम्ही कधी करताय मनाला शांतता देणाऱ्या कोरजाईचा प्लॅन?

  • जवळचा एअरपोर्ट- चिपी विमानतळ

  • जवळचे रेल्वे स्थानक- कुडाळ रेल्वे स्थानक.

  • जवळचे बस स्थानक- मालवण बस स्थानक

  • रस्त्याने प्रवास- फोंडाघाट किंवा आंबोली मार्गे.

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ- ऑक्टो. ते मे

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in