

खुल जा सिम सिम
ज्योती कपिले
Hi friends!
कसे आहात? मला एक सांगा, कोणाकोणाला गोव्याला फिरायला जायला आवडतं? हो, सगळ्यांनाच आवडतं ! मग तुम्ही गोव्याचा किल्ला, चर्च, शांतादुर्गा मंदिर बघितलं आहे का? आणि तिकडचे वेगवेगळे समुद्र किनारे ??? मला तरी समुद्रकिनारी फिरायला खूप आवडतं. भरतीच्या वेळी अंगावर येणाऱ्या लाटा, वाळूत गवसणारे शंख-शिंपले आणि गोव्याचं जेवण... अहाहा... मासे खाणाऱ्यांच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असेल. गोवा आहेच असा... त्यामुळे गोव्याला जाण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात. बरं, गोव्याला गेल्यावर तुम्ही अजून काय बघता बरं? किंवा गोव्याची राजधानी कुठली आहे ? बोला, बोला.. बरोब्बर.. पणजी ! आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी तुम्हाला पणजीमधल्या एखाद्या खास ठिकाणाची ओळख करुन देणार आहे... तर, तुम्ही एकदम बरोब्बर आहात !
झालं काय, मध्यंतरी गोव्याच्या प्रिया कालिका बापट या पत्रकार मैत्रिणीने मोठ्या कवितेच्या कार्यक्रमासाठी आम्हा काही मैत्रिणींना गोव्याला, पणजीला बोलावलं होतं. तेव्हा ती आम्हाला गोव्याच्या एका मस्त ग्रंथालयात घेऊन गेली. नाव आहे, कृष्णदास शामा गोवा राज्य मध्यवर्ती ग्रंथालय. हे गोवा राज्यातील मुख्य ग्रंथालय आहे. तसंच त्यांच्या वेबसाईटवर असं सांगितलं आहे की, १८३० च्या दशकाच्या सरुवातीला संपर्ण भारतात स्थापन झालेलं हे पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे. हे जुनं ग्रंथालय आता पणजीच्या पाटो परिसरातील नवीन परिसरात स्थलांतरित झालं आहे. पुरस्कार विजेते वास्तुविशारद जेरार्ड दा कुन्हा यांनी डिझाइन केलेल्या एका प्रशस्त, तब्बल सहा मजली इमारतीत ते आहे.
तुम्हाला सांगू का, ग्रंथालयाची एवढी अद्ययावत, सुंदर इमारत मी आजपर्यंत बघितलेली नाही.
या सहा मजली इमारतीचं क्षेत्रफळ १३,३६९ चौरस मीटर इतकं अवाढव्य आहे. पण मी आज तुम्हांला फक्त आणि फक्त दुसऱ्या मजल्यावरील बच्चे कंपनीच्या विभागाची ओळख करून देणार आहे. म्हणजे 'खुल जा सिम सिम' असं म्हणावं आणि खजिना उघडावा, असंच काहीसं.... तर दुसऱ्या मजल्यावर मुलांसाठी बाल विभाग आहे. त्या मजल्यावर मी गेले तेव्हा अक्षरशः अवाक झाले, अति आनंदित झाले. अरे, का म्हणून काय विचारता ? ग्रंथालयाचा बाल विभाग असा काही डिझाईन केला आहे की, पुस्तक बदलायला आलेली मुलं दोन मिनिटांत पुस्तकं घेऊन बाहेर पडलीत, असं होतंच नाही. आलेली मुलं जास्तीत जास्त वेळ तिकडेच घालवतात. म्हणजे मलाही तिकडे गेल्यावर वाटलं की, घरी न जाता इकडेच बसून राहावं ! आतमध्ये पुस्तकांचे रंगीत रॅक असून प्रत्येक रॅकवर वेगवेगळ्या प्रकारचे टेडिबियर ठेवलेले आहेत. आणि आपण ते हातात घेऊन पुस्तकं वाचत बसू शकतो. बघा, मी तिकडचे काढलेले फोटो बघा. या ग्रंथालयाचा उद्देशच मुळी 'Learn, Read & Play !' अर्थात 'शिका, वाचा आणि खेळा' असा आहे. तिकडे काही मुली तर टेडीबिअरवर पुस्तक ठेवून वाचत बसल्या होत्या. मुलांसाठी आरामदायी खुर्चा होत्या आणि लहानग्यांसाठी खास छोट्या छोट्या टेबल-खुर्चा होत्या. तिथे बसून ते चित्रांची पुस्तकं बघत, टेडीबिअरशी खेळत होते. एका लहानग्याची आई स्वतःची
पुस्तकं बदलायला आली होती. आणि त्या लहानग्यालाही तिने ग्रंथालयाचा सदस्य बनवून घेतलं होतं. हो, बघा ना, माझ्या कल्पनेपलीकडील दृश्य होतं ते. आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसं माहिती ? तर मी न राहवून त्या लहानग्याच्या आईला विचारलं होतं बरं...अगदी तिच्या मुलाचा फोटो काढला तर चालेल का, हे सुद्धा विचारलं होतं. कारण वाचणारी लोकं दुसऱ्यांच्या भावनेचा आदर करतात. हो ना ? तिकडे फळे म्हणजे ब्लॅकबोर्ड होते. त्यावर तुम्ही चित्रं पण काढू शकता. मी तर दोन मुलं अशी बघितली जी शाळेत जाण्याच्या आधी, शाळेच्या गणवेशात पुस्तकं बदलायला आली होती. पुस्तकांचे सगळे प्रकार तिकडे होते. म्हणजे परीच्या गोष्टी, इसापनीती, फास्टर फेणे, चंपक, हॅरी पॉटर, अकबर-बिरबल आणि इतर... तिकडचा कर्मचारी वर्ग मुलांच्या
मदतीसाठी तत्पर होता. मला तर ग्रंथालयात काय बघू आणि काय नाही, असं वाटू लागलं. माणसांसाठी असलेली लिफ्ट आपण बघितलेली, वापरलेली असते, पण या ग्रंथालयात तर पुस्तकं वरखाली नेण्या-आणण्यासाठी स्पेशल पुस्तकांचीच लिफ्ट होती. मस्तच ना ?
तुम्ही कधी गोव्याला जाणार असाल तर या ग्रंथालयाला आवर्जून भेट द्या. हे ग्रंथालय भारतातील सर्वात जुन्या ग्रंथालयांपैकी एक आहे आणि ते सर्व वाचकांसाठी खुलं आहे. शिवाय या वातानुकूलित ग्रंथालयात दुर्मिळ पुस्तकांचा विभाग, दृष्टिहीन वाचकांसाठी ब्रेल लिपीमधील पुस्तकं, इंटरनेट विभाग, गोवा इतिहास विभाग, मोठमोठे नकाशे आणि संदर्भ विभाग असून त्यात संदर्भासाठी वृत्तपत्रं आणि मासिकं उपलब्ध आहेत. शिवाय मुलांसाठी 'ऑडिओ व्हिडिओ ट्रीट' आहे. म्हणजे मुलांसाठी खास डॉक्युमेंटरी, सिनेमा यांचं आयोजन करण्यात येतं. इतकंच काय,पण तुम्ही घरबसल्या ग्रंथालयाच्या वेबसाइटवर लॉग इन करू शकता आणि त्यात आपल्याला हवं असलेलं विशिष्ट पुस्तक आहे का आणि ते पुस्तक ग्रंथालयाच्या शेल्फमध्ये आहे की कोणी नेलं आहे, ते तपासू शकता. आता बोला ! मी तर आता ठरवलंच आहे की गोव्यात गेल्यावर थोडा वेळ तरी ह्या ग्रंथालयात जायचंच. तुम्हीही असा विचार करत असाल तर बेस्टच ! तुमचे आईबाबा सुद्धा ह्या ग्रंथालयाच्या प्रेमात पडतील ! तेव्हा ही खासम् खास माहिती फ्रेंड्स सोबत आणि आपल्या जवळच्या शाळेच्या ग्रंथालयात शेअर करा. आपल्या भारताच्या एका राज्यात इतकी सुंदर, मनभावन लायब्ररी आहे तर आपल्या राज्यात, आपल्या शहरात, गल्लीत का नको? तो फिर चलो गोवा... Go Goa!
बालसाहित्यिक व साहित्याच्या आस्वादक