कुलूप 'कटकट'

मार्गेटले, कुलूप कुठं ठेवलंय ग, दिसतंय का तुला? मालकीणबाईंनी आवाज दिला. “ठेवणार या आणि आठवणीची अपेक्षा माझ्याकडून. वारे वा! वारे वा! चांगला मामला आहे हा,” मार्गारेट स्वत:शीच पुटपुटली.
कुलूप 'कटकट'
Published on

बालमैफल

सुरेश वांदिले

मार्गेटले, कुलूप कुठं ठेवलंय ग, दिसतंय का तुला? मालकीणबाईंनी आवाज दिला.

“ठेवणार या आणि आठवणीची अपेक्षा माझ्याकडून. वारे वा! वारे वा! चांगला मामला आहे हा,” मार्गारेट स्वत:शीच पुटपुटली.

पुन्हा मालकीणबाईंचा आवाज आला. “मार्गे, खादाडे, तुझ्या काहीच कसं लक्षात राहत नाही. आँ!”

“ओह माय गॉड, हे तर फारच झालं? ज्याच्याशी माझा कवडीचाही संबंध नाही, जे मला काहीच ठाऊक नाही, ते कसं बरं लक्षात राहणार? सारखा समोसा-पाव नि अंडीभूर्जी-पाव खाऊन-खाऊन मालकीणबाईंचा मेंदू बथ्थड झालाय. आळसावलाय. पण हे त्यांना सांगणार कसं? मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?...बाबा.” मार्गारेट मनात म्हणाली. मालकीणबाईंसाठी मांजरीची उपमा सुचल्याबद्दल तिला फार भारी वाटलं. स्वत:च्या हुशारीचं कौतुक वाटलं. आपणही मांजर ‍नि मालकीणबाईही मांजर! मग एका मांजरीने दुसऱ्या मांजरीला प्रेमानं वागवायचं असतं की असं खेकसायचं असतं?” मार्गारेट स्वत:शीच पुन्हा पुटपुटली.

“ओय ओय ओय,” मालकीणबाईंनी तिचा जोराने कान ओढला, तेव्हा ती वेदनेने विव्हळली.

“गधडे, इकडे कुलपासाठी माझा जीव चाललाय, नि तू बसलीस अशी मद्दाडासारखी! कुलूप शोधण्यासाठी जरा हातपाय हलव. मालकीणबाई मार्गारेटवर ओरडल्या. मालकीणबाईंच्या हाताला कडकडीत चावा घ्यावा असं तिला तीव्रतेनं वाटलं. पण बिळाच्या भोकातून बघणाऱ्या रॉबिन्सनने असं काही करू नको, असा इशारा केला नि टीपॉयच्या खाली पडलेल्या कुलपाकडे इशारा केला. मार्गारेटने, मालकीणबाईचं तिकडे लक्ष वेधलं. त्यांनी खाली वाकून टीपॉयच्या खालून कुलूप काढलं. मार्गारेटला थँक्स म्हणण्याचं सौजन्यही त्यांनी दाखवलं नाही. त्यांना बाहेर जायचं असल्याने त्या लगेच बाहेर पडल्या. जाताना कुलूप लावलं.

त्या घराबाहेर जातात, तोच रॉबिन्सन बिळाच्या बाहेर आला. फ्रीजवर ठेवलेल्या बॉक्समधून चिज आणून त्याने ते मावशीला दिलं. मालकीणबाईंच्या आरडाओरडीमुळे आणि कान उपटण्याने वैतागलेल्या मावशीला बरं वाटलं. तिने प्रेमाने मामाचे गाल चाटले.

“काय गं मावशे, या मालकीणबाईंच्या आठवणीत काहीच कसं राहत नाही?”

“मला ठाऊकायना त्याचं कारण.”

“ग्रेट, ग्रेटच हो माझी मावशी. मग, मावशीबाई आम्हाससुद्धा ते सांगा की.”

“रॉबू, आठवणीची क्रिया मेंदूशी जोडलेली असते. आपल्या डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ या पंचेंद्रियांकडून विद्युत रासायनिक संदेशांच्या रूपात माहिती मेंदूकडे‍ येत असते.”

“हो का. मग हे संदेश जातात कुठे?”

“आपल्या पंचेंद्रियांना जोडलेल्या मज्जातंतूवर विहरत विहरत या आठवणी मेंदूकडे जातात.”

“या आठवणींचं मेंदू काय करतो?”

“अरे, आपल्या मेंदूमध्ये असंख्य चेतापेशी (न्यूरॉन्स) असतात. त्याला एक केंद्र असतं. ते पेशीतील रसात बेटासारखं वावरत असतं. या चेतापेशींना ॲक्झॉन आणि डेन्ड्राईट नावाचे दोन ॲन्टेना असतात. यातला ॲक्झॉन ॲन्टेना चेतापेशीकडे संदेश आणतो, तर डेन्ड्राईट ॲन्टेना दुसरीकडे संदेश पाठवतो.”

“थोडक्यात काय, तर पोस्टमनगिरी करतो म्हणायचा.”

“अगदी बरोबर, या डेन्ड्राईटचं जाळं बऱ्याचदा कित्येक मिलीमीटर लांब पसरू शकतं. या डेन्ड्राईटला अनेक शाखा फुटलेल्या असतात. यातली प्रत्येक शाखा दुसऱ्या शाखेला जोडली जाऊ शकते. यातून या चेतापेशींची जाळी तयार होतात.”

“अच्छा, म्हणजे आपल्या आठवणी या जाळ्यात अडकतात म्हणायच्या.”

“तसं नाही रे.”

“मग?”

“अरे, एखाद्या आठवणीच्या स्वरूपातील संदेश थोड्या कालावधीसाठी साठवून ठेवायचा असल्यास हे तयार झालेलं जाळं लवचिक असल्याने एकतर तुटतं किंवा दुसऱ्या प्रकारे जोडलं जातं. असं जेव्हा घडतं तेव्हा ती आठवण पुसली जाऊ शकते. याला ‘शॉर्ट टर्म मेमरी’ किंवा ‘अल्पस्मृती’ म्हणतात.”

“म्हणजे मालकीणबाईंची स्मृती शॉर्ट आहे तर..”

“हे थोडं खरं आहे.”

“म्हणजे थोडं खोटंही आहे का? मज्जाच मज्जा!”

“रॉब्या, तसं नाही रे. आता मालकीणबाई प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी कुलूप ठेवतात. त्या क्षणापुरते ते त्यांच्या आठवणीत राहतं. मग त्या इतर कामात बुडून जातात, त्यामुळे त्या कुलपाची आठवण विसरतात. पण, त्यांनी हे कुलूप नेहमी एकाच ठिकाणी ठेवलं तर त्यांना कुलपाच्या जागेचं विस्मरण होणार नाही. याला ‘दीर्घ स्मृती’ किंवा ‘लाँग टर्म मेमरी’ म्हणतात. आपण आठवण जागृत करण्यासाठी हे चेतापेशीचं जाळं कार्यान्वित करतो. हे जाळं मेंदूच्या हिप्पोकॅम्पस आणि अमिग्डाला या उपांगात साठवलं जातं. दीर्घस्मृती तयार करण्याचं कार्य हिप्पोकॅम्पस करतो तर भावनिक स्‍मृती, अमिग्डाला तयार करतो.”

“ही दोन्ही उपांगे मालकीणबाईंच्या मेंदूत असतील ना ग मावशे?”

“असतील तर ओकेच ओके! नसतील तर, अर्जंटली त्यांच्या मेंदूत ही दोन्ही उपांगे, टाक रे गणपतीबाप्पा नि सोडव आम्हाला, त्यांच्या ‘कुलूप कटकटीतून’ अशी प्रार्थना करूया.” मावशी डोळे बारीक करून म्हणाली. मावशीच्या या तिरकस विनोदला, मिशा हलवत, दात बाहेर काढत नि तिरप्या नजरेने बघत मामाने दाद दिली. n

ज्येष्ठ बालसाहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in