

डोळस भटकंती
मुक्ता नार्वेकर
पावसाळ्यातलं कोकण मनाला कायमच भुरळ घालतं. कणकवलीजवळच्या कुसबे गावात भातशेती, व्हाळ, पारंपरिक घर आणि गावाकडचं जीवन जवळून अनुभवता आलं.
श्रावण-भाद्रपद महिन्यात कोकणात आल्यावर मन इतकं सुखावून जातं की काय सांगू!! त्यामुळे या महिन्यामध्ये कोकण भटकंती मी मुद्दाम प्लॅन करते. यावेळी मी कणकवली जवळच्या कुसबे गावची भटकंती केली. हायवे पासून हे गाव १५ ते २० मिनिटांवर आहे. तिथल्या कोकणाई ऍग्रो टुरिझममध्ये माझा मुक्काम होता. कोकणाईचे मालक म्हणजे प्रज्ञा आणि ओंकार हे बहीण भाऊ. मुंबई सोडून स्वतःच्या गावी परतून हे ऍग्रो टुरिझम त्यांनी सुरू केलं. कोकणातल्या ग्रामीण जीवनाचा भाग होण्याचा प्रयत्न या भटकंतीत मी करणार होते. सोबतच गावातला बहरलेला निसर्गही बघणार होते.
एरवी सकाळी आठ वाजता जागी होणारी मी गावात आल्यावर सहा वाजताच जागी होत होते. पक्ष्यांची शीळ उठवत असल्याने अलार्म क्लॉकची गरजच भासत नाही. सकाळी उठून मी गावातून फेरफटका मारायला बाहेर पडले पाहते तर भातशेती तरारून वाढलेली होती. त्याच्याबाजूने पाण्याचे ओहोळ मंद झुळझुळ आवाज करीत वाहत होते. लाल खेकडा तिथल्या दगडावर बसला होता. गावातून सकाळी असा फेरफटका मारल्यावर मन अगदी प्रफुल्लित तर झालंच पण शांततेचा मुलामा अंतरंगात जाणवत होता.
त्यानंतर पावले कोकणाई मधल्या जुन्या घराकडे वळली. हे घर १६८ सागवानी खांबावर तोललेलं आहे. मातीच्या जाडजूड भिंती घराला आहेत. जमीन तर शेणाने सारवून लखलखीत अशीच केलेली. पारंपरिक कोकणी धाटणीचं, पोटमाळा असणारं कौलारू टुमदार घर आहे. घराच्या अवतीभवती निसर्गाची आणि शेतीभातीची अफाट समृद्धी आहे. पशुधनही आहे. घरात प्रवेश खळ्यात बांधलेल्या पावसाळी भाज्यांच्या मांडवातूनच झाला. दोडकी, पडवळ, कारली चिक्कार लागली होती. भोपळ्याची वेल तर जमिनीवर पसरत गेली होती. खरं वैभव म्हणावं तर हेच, हा साक्षात्कार हे पाहिल्यावर होतच होता. आम्ही परसातल्या भेंडी तोडल्या आणि दुपारच्या जेवणाचा बेत आखला.
त्यानंतर आम्ही चालत घरामागे असणाऱ्या व्हाळाकडे गेलो. तिथे चारोळीचं आणि पळसाचं झाड होतं. त्याची काही पानं आम्ही तोडली. या पानांची पत्रावळी करायला मी शिकणार होते. काकांनी बांबूच्या अगदी बारीक काड्या काढल्या. याच काड्या पत्रावळी शिवायला वापरणार होतो. पहिल्यांदा चारोळीच्या पानांची पत्रावळी शिकवायला घेतली. चारोळीची पानं छान लांबट आणि मोठी असतात. पत्रावळीसाठी उत्तमच. पानांचा देठ तोडला. पत्रावळी शिवायला मधेच एक मोठं पान ठेवलं आणि त्या पानाच्या भोवती पानं लावत, काड्यांनी शिवत गेलो. काका अगदी सराईतपणे पटपट पत्रावळी शिवत होते, पण मी मात्र अगदी सावकाश काड्या खोचत पानं जोडत होते. मनात शंका असायची की काडीने पान फाटलं तर, मोठं छिद्र पडलं तर पत्रावळीतले पदार्थ गळतील. पण याच शंकेनं पान फाटलं जायचं. मग थोडा आत्मविश्वास आणला आणि पानं जोडत, काडीच्या सहाय्याने शिवत चारोळीच्या पानांची गोलाकार पत्रावळी तयार झालीच. त्यानंतर पळसाच्या पानांचीही अशीच पत्रावळी केली. काका पळसाच्या पानाचा द्रोण करत सांगत होते की, आधी गावात लग्नसमारंभ, गावजेवण असायचं तेव्हा प्लॅस्टिकच्या नाही तर अश्याच पानांच्या पत्रावळ्या असायच्या. लोक फावला वेळ मिळाला की पत्रावळ्या करायला घ्यायचे. दिवसाला ४०-५० पत्रावळ्या व्हायचाच. या पत्रावळ्या मग सुकवल्या जायच्या आणि पातळ चपटेपणा येण्यासाठी त्यावर जातं ठेवलं जायचं. या पत्रावळ्या दोन वर्षं तरी टिकायच्याच.
स्वतःच्या हाताने शिवलेल्या पत्रावळीत जेवण करण्याची मला तर आतुरता होतीच. पत्रावळी, द्रोण पाण्याने स्वच्छ धुतले. त्यावर मग भेंडीची भाजी, घरच्या शेतातला भात वाढला. त्यावर शेतात पिकवलेल्या चण्याची आमटी वाढली. पत्रावळीतून एक थेंब गळत नव्हता. एका द्रोणात चवळीचं गोड कढण आणि दुसऱ्या द्रोणात सोलकढी वाढली. जेवायला सुरुवात केली. जेवताना पानाचा स्वाद हलका हलका जेवणात मिसळत होता. त्याचा गंध जाणवत होता. द्रोणातून सोलकढी पिताना तर पानाची चव प्रकर्षानं जाणवायची. जेवताना जुन्या काळात पत्रावळीत वाढलेला प्रसाद आठवत होता, यात्रा समारंभ आठवत होते. पत्रावळी बनवणं, त्यावरचं पौष्टिक जेवण हा खरच एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव होता.
गावातल्या लोकांच्या संस्मरणीय आठवणी असतात त्या व्हाळाकाठी म्हणजे गावातल्या झऱ्याकाठी. मित्रांसोबत डुंबणं, किरव्या पकडणं असे अनेक मौजेचे क्षण तयार होतात ते व्हाळात. संध्याकाळी आम्ही कुसबे गावातल्या व्हाळाकडे जायचं ठरवलं. भातशेतीतून चांगली दहा-पंधरा मिनिटं चालत, पावसाच्या सरी अंगावर झेलत व्हाळाकाठी पोहोचलो. पाहते तर पाणी खळखळ करीत वाहत होतं. पण फार जोरदार प्रवाह नव्हता. त्याच्यावर बांध घातला होता. गावच्या वनराईतून वाहत भातशेतीला पोसत, वळणं वळणं घेत झऱ्याचं पाणी इथवर आलं होतं आणि बांधावरून कोसळत होतं. बांधाच्या दोन्ही बाजूलाही वृक्षांची दाटीच होती. बांधावर बसून पाय मोकळे सोडण्याचा मोह मला आवरला नाही. अगदी निवांत पाय सोडून बसले. काही वेळ डोळे मिटले आणि त्याचा प्रवाह कानातही साठवला. प्रवाहाची एकसंध खळखळ, पक्ष्यांचे कूजन अशी सुंदर सिम्फनी तयार झाली होती.
समोरच्या डोंगरापल्याड सूर्यास्त होत होता. अंधार पडण्याआधी घराकडे जाण्यासाठी निघालो. आकाश आता पिवळसर रंगाचं झालं होतं. भातशेतीचा हिरवा, आकाशाचा पिवळा, निळा असा रंगीत निसर्गसोहळा डोळेभरून पाहिला. सोबतच गावचे संध्याकाळचे शांत वातावरण स्वतःमध्ये झिरपू दिलं.
अशी ही अनुभवसंपन्न ठरलेली ही कुसबे गावची संस्मरणीय भटकंती.
जवळचे रेल्वेस्थानक - कणकवली रेल्वे स्थानक कुडाळ रेल्वे स्थानकजवळचे
बस स्थानक - कुडाळ, कणकवलीजवळचा
एअरपोर्ट - चिपी
ट्रॅव्हल व्लॉगर
muktanarvekarofficial@gmail.com