श्रमाच्या सावलीतील संस्कृती

मानवी संस्कृतीचा प्रवास हा संघर्ष आणि श्रम यांच्या आधारावर उभा राहिलेला आहे. १ मेच्या निमित्ताने कामगारांच्या बदलत्या वास्तवावर आणि त्यांच्या सन्मानाबाबत विचार करायला लावणारा लेख.
श्रमाच्या सावलीतील संस्कृती
Published on

साधक-बाधक

क्रांती गोडबोले-पाटील

मानवी संस्कृतीचा प्रवास हा संघर्ष आणि श्रम यांच्या आधारावर उभा राहिलेला आहे. १ मेच्या निमित्ताने कामगारांच्या बदलत्या वास्तवावर आणि त्यांच्या सन्मानाबाबत विचार करायला लावणारा लेख.

नवी संस्कृतीचा इतिहास हा प्रामुख्याने संघर्षाचा इतिहास आहे, पण त्याही पलीकडे तो 'श्रमाचा' इतिहास आहे. सृष्टीच्या आरंभापासून जेव्हा माणसाने हातात दगड घेतला आणि पहिली शिकार केली, तेव्हापासून ते आज हातातील स्मार्टफोनवर जगाचे नियंत्रण करण्यापर्यंतचा प्रवास ज्या इंधनावर चालला आहे, ते इंधन म्हणजे 'श्रमिकाचा घाम'. १ मे हा दिवस आपण केवळ दिनदर्शिकेवरचा एक लाल आकडा म्हणून पाहतो, पण या तारखेच्या मागे गिरणी कामगारांच्या संघर्षाचा आरडाओरडा, शिकागोच्या कामगारांचे सांडलेले रक्त आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत. आजच्या आधुनिक, चकाचक आणि वेगवान युगात कामगार नेमका कोठे उभा आहे? त्याचे शोषण थांबले आहे की केवळ शोषणाचे स्वरूप बदलले आहे? यावर अंतर्मुख होऊन विचार करण्याची हीच ती वेळ आहे.

कामगार म्हणजे नेमका कोण? ही व्याख्या आजच्या काळात प्रचंड विस्तारली आहे. पूर्वी ज्याच्या हाताला काळे फासलेले असायचे आणि ज्याच्या अंगावर मळकट कपडे असायचे, त्यालाच कामगार मानले जायचे. पण आज, वातानुकूलित केबिनमध्ये बसून १६-१६ तास कोड लिहिणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर, रुग्णालयात रात्रभर सेवा देणारी परिचारिका, भर उन्हात रस्त्यावर उभा राहून वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस आणि घराघरात अन्नाचे पार्सल पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय– हे सर्वजण आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचे नवे कामगार आहेत. श्रमाची विभागणी आपण शारीरिक आणि बौद्धिक अशी केली असली, तरी दोन्ही ठिकाणी होणारी पिळवणूक मात्र सारखीच आहे.

आजच्या कॉर्पोरेट जगाचे 'ग्लॅमर' अंगावर ओढून घेतलेला तरुण वर्ग स्वतःला कामगार म्हणवून घेण्यास कदाचित कचरत असेल, पण वास्तवात तो एका नव्या प्रकारच्या 'अदृश्य गुलामगिरीत' अडकलेला आहे. ही गुलामगिरी पूर्वीच्या बेड्यांसारखी दिसत नाही, तर ती 'टार्गेट्स', 'डेडलाईन्स' आणि 'परफॉर्मन्स रिव्ह्यू' या गोंडस नावाखाली राबवली जाते. मालक आणि कामगार यांमधील नातं आजही अनेक ठिकाणी 'समानतेचं' नसून 'मालकीचं' राहिलं आहे. विशेषतः 'ह्युमन रिसोर्स' (HR) नावाचा विभाग, ज्याची निर्मिती कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी झाली होती, तो आज व्यवस्थापनाचे हित जपण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणारे एक साधन बनला आहे की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्याला केवळ एक 'रिसोर्स' किंवा 'साधन' म्हणून पाहणे, हीच मुळात मानवी मूल्यांची पायमल्ली आहे. तो माणूस आहे, त्याला भावना आहेत, त्याला थकवा जाणवतो आणि त्याचेही एक स्वतंत्र जग आहे, हे व्यवस्थापन विसरत चालले आहे. काही ठिकाणी तर काम किती करता यापेक्षा जाण्यायेण्याच्या वेळा या मीटरपट्टीत मोजल्या जातात पण कंपनीचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ थांबून एखाद्याने आपले १०० पर्सेंट दिले तर ते त्याचे कर्तव्य आहे अशी विधानं ऐकायला मिळतात. अशावेळी फार फार तर कौतुकाचे दोन शब्द नशिबी येतात पान पगारवाढ हा मुद्दा मात्र कायम बाजूलाच राहतो.

आजही अनेक क्षेत्रांत कामगारांना दिली जाणारी वागणूक ही सरंजामी मानसिकतेची साक्ष देते. 'म्ही पगार देतो, म्हणून तुमच्या आयुष्यावर आमचा हक्क आहे,' हा अघोषित नियम अनेक कंपन्यांमध्ये पाळला जातो. कामाच्या वेळेनंतरही सतत फोन करणे, सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावणे किंवा खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणे, ही आधुनिक गुलामीच नाही का? 'राईट टू डिस्कनेक्ट' (कामाच्या वेळेनंतर संपर्क न करण्याचा अधिकार) यावर जगभरात चर्चा सुरू आहे, पण भारतात आजही कर्मचाऱ्याला 'नाही' म्हणण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वतःच्या अधिकाराची भाषा केली, तर त्याला 'नॉन-परफॉर्मर' ठरवून बाहेरचा रस्ता दाखवला जातो. भीती ही या आधुनिक शोषणाची सर्वात मोठी शक्ती आहे.

या सर्व अंधारात भारतीय संविधान आणि कामगार कायदे हे एखाद्या दीपस्तंभासारखे उभे आहेत. पण प्रश्न असा उरतो की, हे कायदे सामान्यांपर्यंत पोहोचतात का? 'किमान वेतन कायदा (Minimum Wages Act), १९४८' हा केवळ कागदावरचा आकडा नाही. तो एका गरिबाच्या चुलीचा आधार आहे. जेव्हा एखादा मालक आपल्या अफाट नफ्यातून कामगाराला केवळ तुटपुंजी मजुरी देतो, तेव्हा तो त्या श्रमिकाच्या घामाची चोरी करत असतो. 'कारखाना कायदा (Factories Act), १९४८' सांगतो की, माणसाचे शरीर हे यंत्र नाही. त्याला विश्रांतीची गरज आहे. ८ तासांच्या कामाच्या मर्यादेचे उल्लंघन करणे, हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून तो मानवी हक्कांचा भंग आहे. तरीही अनेक असंघटित क्षेत्रांत आणि अगदी आयटी पार्क्समध्येही १० ते १२ तास काम करणे ही एक 'संस्कृती' बनवली गेली आहे.

महिला कामगारांच्या बाबतीत तर हे वास्तव अधिक भीषण आहे. आजही समान कामासाठी महिलांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाते, हे 'समान वेतन कायदा (Equal Remuneration Act), १९७६' चे सरळ सरळ उल्लंघन आहे. मातृत्व लाभ कायदा महिलांना संरक्षण देतो, पण अनेकदा 'करिअर गॅप'च्या नावाखाली आई होणाऱ्या स्त्रियांना पदोन्नतीपासून वंचित ठेवले जाते किंवा त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आपण प्रगत समाज म्हणवून घेण्यास पात्र नाही.

आजच्या 'गिग इकॉनॉमी'मध्ये (उदा. डिलिव्हरी, टॅक्सी सेवा) काम करणाऱ्या लाखो तरुणांकडे तर कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही. त्यांना 'पार्टनर' म्हटले जाते, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे कामगारांचे कोणतेही हक्क नसतात. ना विम्याचे संरक्षण, ना ठराविक कामाचे तास, ना पेन्शन. हे तंत्रज्ञानाच्या युगातील शोषणाचे सर्वात क्रूर रूप आहे. ज्या हातांमुळे आपल्या घरापर्यंत सुविधा पोहोचतात, त्या हातांना भविष्याची शाश्वती नाही, हे विदारक सत्य आहे.

मालक आणि वरिष्ठ अधिकारी यांनी हे समजून घेण्याची गरज आहे की, भीतीवर उभे राहिलेले साम्राज्य कधीही कोसळू शकते, पण विश्वासावर उभे राहिलेले उद्योगच चिरकाल टिकतात. कामगाराला 'गुलाम' न मानता 'सहकारी' मानण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. 'वर्क-लाईफ बॅलन्स' हा केवळ भाषणातला शब्द न राहता तो प्रत्यक्षात उतरला पाहिजे. श्रमिकांचा सन्मान म्हणजे केवळ वर्षातून एकदा हार घालणे नव्हे, तर त्यांना त्यांच्या कष्टाचा रास्त मोबदला, सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'आदर' देणे होय.

कामगारानेही आता जागे होण्याची गरज आहे. आपल्या हक्कांप्रति जागृत राहणे, कायद्याची माहिती करून घेणे आणि अन्यायाविरुद्ध संघटित होणे हाच यावरचा मार्ग आहे. 'औद्योगिक विवाद कायदा (Industrial Disputes Act), १९४७' सारखे कायदे आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देतात. पण ही लढाई केवळ कायद्याची नाही, ती अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे.

शेवटी, १ मे चा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, या राज्याची माती श्रमिकांच्या घामाने आणि हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली आहे. गिरणी कामगारांनी या शहराला जो संघर्ष शिकवला, तोच संघर्ष आज आपल्याला नवीन रूपात करायचा आहे. ज्या दिवशी एखाद्या कार्यालयातील सफाई कामगाराला आणि तिथल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून सन्मानाने उभे राहता येईल, ज्या दिवशी कामाच्या वेळा संपल्यानंतर कर्मचाऱ्याच्या मनावर दडपण राहणार नाही आणि ज्या दिवशी श्रमाचे मूल्य हे निव्वळ पैशात न मोजता मानवी मूल्यांत मोजले जाईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने कामगार दिनाचे सार्थक होईल.

घामाचे चांदणे होऊन जेव्हा रस्ते उजळतात, तेव्हाच प्रगतीची पहाट होते. या सृष्टीचा निर्माता जरी देव असला, तरी तिला घडवणारा शिल्पकार मात्र कामगारच आहे. या शिल्पकाराच्या हातातील अदृश्य शृंखला तोडणे, हेच आपल्या सुसंस्कृत समाजाचे पहिले कर्तव्य आहे. श्रमिकांच्या या महायज्ञात आपलाही खारीचा वाटा असावा, तो म्हणजे किमान त्यांच्या कष्टाचा आदर करणे. कारण लक्षात ठेवा, ज्या हातांना जग घडवण्याचे सामर्थ्य आहे, त्या हातांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे बळही सुप्त अवस्थेत असते. श्रमिकाचा सन्मान, हाच मानवतेचा विजय आहे!

krantip 183@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in