

समाजचिंतन
जगदीश काबरे
सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावावर, सामाजिक जबाबदारीच्या दुर्लक्षावर आणि पाश्चात्य संस्कृतीतील शिस्तबद्ध व स्वच्छ जीवनशैलीच्या गुणांपासून आपण कसे दूर राहतो यावर सखोल भाष्य करणारा लेख
पाश्चिमात्यांची भाषा, खाणंपिणं, पेहराव, राहणीमान, पब संस्कृती यांचा प्रभाव आपण आवडीनं अंगवळणी पाडून घेतलाय. पण त्यांच्याकडून आपण जे शिकायला हवं होतं, ते म्हणजे तर्कशुद्ध विचार, श्रमाला आणि कामाला प्रतिष्ठा, सार्वजनिक स्वच्छता, नियमांचे पालन करणे आणि स्वावलंबीपणा, तेच नेमकं आपण दृष्टिआड केलं आहे.
आपण त्या लोकांचे नेमके दुर्गुणच का घेत असतो, सद्गुण का नाही? याचे ताजे उदाहरण म्हणजे मुसलमान धर्मांध आहेत म्हणून आपणही धर्मांध होत चाललो आहोत. ते धार्मिक दहशतवाद माजवतात म्हणून आपणही धार्मिक दहशतवाद माजवायला सुरुवात केली आहे. पण त्याचबरोबर ते हजारोंनी एकत्र येऊन शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने नमाज पढतात आणि देवाची करुणा भाकतात, हा त्यांचा गुण आपण न घेता आपल्या देवळात मात्र आपण झांजा-घंटांचा ठाणाणा आवाज करत जोरजोराने आरत्या म्हणत असतो आणि प्रचंड ध्वनी प्रदूषण करत असतो. असे करून आपण आपला देव बहिरा आहे म्हणून त्याला जोराने आपले गाऱ्हाणे ऐकवणे क्रमप्राप्त आहे असे आपल्याला वाटते काय?
विकसित देशात सार्वजनिक मुताऱ्या एवढ्या स्वच्छ असतात की ती मुतारी आहे असे वाटतच नाही. कारण ते खऱ्या अर्थाने स्वच्छतागृह असते. एवढेच काय पण त्यांची सहलीची ठिकाणेच नाही तर जंगलेही स्वच्छ असतात. हे मी स्वानुभवाने ठामपणे सांगू शकतो. याउलट भारतात कुठेही जा सार्वजनिक मुताऱ्या म्हणजे नरक असतो. दुर्गंध असह्य झाल्यामुळे नाक मुठीत धरून केव्हा एकदा मोकळे होतोय असे होऊन जाते. नाव मात्र 'स्वच्छतागृह' असते! किती विरोधाभास हा!! आपली सहलीची ठिकाणे तर प्लास्टिकच्या कचऱ्याने ओसंडून वाहत असलेली दिसतात. जंगलातही अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, वाटेवरच काचेच्या फोडून टाकलेल्या बाटल्या, खाद्यपदार्थाची वेष्टणे इकडे तिकडे पडलेली दिसतात. एकूण सगळीकडे कचरा करणे आणि घाण करणे हेच आपले वैशिष्ट्य राहिलेले आहे.
पाश्चात्य देशातील रस्त्यांवर प्रत्येक गाडी लेन सिस्टीम पाळत पळत असते. ते सिग्नल कधीही तोडताना दिसत नाहीत – रस्त्यावर चिटपाखरू नसतानाही अगदी रात्री बारा वाजतासुद्धा! पादचाऱ्यांना तिथले गाडीवाले प्राथमिकता देत असतात. ते रस्ता ओलांडेपर्यंत शांतपणे थांबतात– अगदी कितीही महत्त्वाचे काम आणि घाई असली तरीही! या पार्श्वभूमीवर आपल्याकडे काय परिस्थिती असते? एक तर आपण कधीही लेन सिस्टीम पाळत नाही. सिग्नल तोडणे हा आपल्या अभिमानाचा विषय असतो. एक दिशा मार्ग असेल तर उलट दिशेने गाड्या नेणे, चार-पाच वा जमतील तेवढी माणसे बरोबर घेऊन सर्कस करत दुचाकी हाकणे, चालत्या दुचाकीवर मान वाकडी करून फोनवर बोलणे आणि पादचाऱ्यांच्या अगदी अंगाजवळून गाडी नेत त्यांना घाबरवणे, याला आपण मर्दुमकी समजत असतो. एकंदरीत आपल्याला सगळ्याचीच घाई झालेली असते, पण काम मात्र कवडीचे नसते.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाधर्माच्या बाबतीत आपण खूपच संवेदनाशील आहोत, ते ठीक. पाश्चात्यांची चर्चेस अतिशय स्वच्छ असतात. मुसलमानांच्या मशिदीही तेवढ्याच स्वच्छ असतात. या पार्श्वभूमीवर हिंदूंची देवळे मात्र तेवढी क्वचितच स्वच्छ दिसतात. मला तर अनेक मोठ्या श्रीमंत देवळातही जळमटं लटकतांना दिसली आहेत. त्याविषयी व्यवस्थापकांना विचारल्यावर उर्मट उत्तरेही ऐकावी लागली आहेत. चर्चमध्ये तर लोक पायात चप्पल घालून जातात; तरीही तिथे कुठेही घाण नसते, धूळ नसते... असते ती फक्त शांतता. अशी शांतता आपल्या देवळात का असत नाही? का सतत नुसता गोंगाट असतो? अशा देवळांमध्ये जाऊन आपल्याला खरंच मन:शांती मिळते काय? म्हणूनच असे वाटते की, आपल्या सामाजिक सवयींवर नव्याने सर्वकष विचार व्हायला नको का? की नुसत्याच आपली 'संस्कृती महान'च्या गप्पा मारायच्या! आपणास फक्त हक्क हवे आहेत; पण जबाबदारीची जाणिव केव्हा होणार?
आपल्याकडे सुशिक्षितांची आणखी एक वेगळी जमात निर्माण झालेली आहे. त्यांना स्वच्छता तर आवडत असते, पण त्यांच्या घरात मात्र सगळीकडे पसारा पडलेला असतो. लहान मुले असतील तर ते सारवासारव करत म्हणतात, 'घरात लहान मुले असल्यामुळे पसारा होणारच ना?' जर दोघेही नवरा बायको का नोकरी करत असतील तर घरात वेळ कमी मिळतो म्हणून स्वयंपाक घरापासून जेवणाच्या टेबलापर्यंत सगळीकडे पसाराच पडलेला असतो. खरंतर हा पसारा पाच-दहा मिनिटात आवरून ठेवता येतो आणि किचन स्वच्छ करता येते. पण आळसामुळे आपण ते करत नाही. मग अशा वेळेला ही मंडळी स्वच्छतेचे गोडवे गात असताना 'आम्हाला अस्वच्छता जरासुद्धा आवडत नाही.' असे कसे म्हणू शकतात? खरंच आपल्याला स्वच्छता आवडत असेल तर आपण असा नियम करायला हवा की, स्वयंपाक घर झोपण्यापूर्वी स्वच्छ करूनच शांतपणे झोप घेईन. स्वच्छ घरांमध्ये झुरळे, पाली, मुंग्या अशा कीटकांचाही वावर कमी असतो हे आपल्याला माहित नाही का? घराबाहेरही आपले तशीच वागणूक असते. आनंद उपभोगण्याच्या नादात आपण पर्वत आणि थंड हवेच्या ठिकाणांची जी काही अवस्था केली आहे त्याबद्दल पुढच्या पिढ्या आपल्याला कधीही माफ करणार नाहीत. वारशात मिळालेल्या या सुंदर देशाला प्रदूषित केल्याबद्दल ते आपल्याला जबाबदार धरतील. पण लक्षात कोण घेतो?
एवढे सगळे दुर्गुण आपल्या अंगात असूनही आपण पाश्चात्य परधर्मीयांना तुच्छ लेखतो आणि स्वतःची संस्कृती उच्च समजतो! याला दांभिकपणा म्हणायचे नाही तर काय? सार्वजनिक स्वच्छता ही शासनापेक्षा आपली जबाबदारी आहे हे आपल्या केव्हा लक्षात येणार? चारचाकी गाडी आतून स्वच्छ करणारे आम्ही गाडीच्या काचा खाली करून खाल्लेल्या शेंगदाण्याची रिकामी पूरचुंडी, फ्रुटीचा शोषून पोचटलेला पुठ्ठ्याचा खोका, बिस्लेरीची रिकामी बाटली रस्त्यावर सहज फेकतो. घराच्या भिंती स्वच्छ करणारे आणि घरात दररोज केर काढून घर स्वच्छ करणारे आम्ही तोच केरकचरा दरवाज्याबाहेर वा खिडकीतून घराबाहेर आम्ही बिंदिकतपणे टाकत असतो. रंगलेल्या पानाच्या तोबऱ्याने महापालिकेने सकाळी स्वच्छ केलेले रस्ते आणि सरकारी कार्यालयाच्या भिंती रंगवातो. 'घर घर शौचालय' बांधण्याच्या घोषणा केल्यावरही उघड्यावर रस्त्याच्या कडेला मलमूत्र विसर्जन करतो. चॉकलेटचा कागद तसंच बरंच काहीबाही रस्त्यावर टाकून सार्वजनिक ठिकाणी घाण करतो, वर सिंगापूर, दुबईच्या स्वच्छतेचे गोडवे गातो. तेव्हा आपले सामाजिक भान सुटलेले असते हेच खरे. सफाई हे जर शासनाचे काम असेल तर स्वच्छता राखणे हे समाजाचे कर्तव्य आहे, हे आपण जाणले पाहीजे.
मुंबई-पुण्याच्या पलीकडेही माणसं राहतात. तिथे नळाला पाणी येत नाही. टँकरच्या फेऱ्यांवर त्यांचे आयुष्य अवलंबून असते आणि एखाददुसऱ्या बादलीसाठी मैलोगणती बायाबापड्यांना फेऱ्या माराव्या लागतात. इकडे मात्र आम्ही बिनदिक्कतपणे बिस्लेरीची अर्धी बाटली रस्त्यात ओतून देतो. एवढेच काय पण काही घरातून दररोज सकाळी रात्रीचे पाणी शिळे झाले म्हणून ओतून टाकण्यात येते. याला काय म्हणावे? ज्यांना पाणी मिळत नाही त्यांना ते देणे, त्यांच्यापर्यंत ते पोहोचवणे, हे ज्यांना मुबलक पाणी मिळते त्यांचे कर्तव्य नाही काय? तीच गोष्ट कबुतरांना दाणे घालण्याची. दररोज भरभरून हजारो कबुतरांना दाणे घालणारे कुपोषित बालकांना मात्र उपाशी ठेवत असतात. त्यांच्यासाठी कुठलीही मदत पोहोचवत नाहीत. तरीही आपण मात्र भूतदयेच्या मोठमोठ्या गप्पा मारत असतो.
शेवटी आपल्या अस्वच्छतेचे मर्म खालील कवितेतून व्यक्त करतो आणि थांबतो...
आम्ही शिकलेली माणसे, आम्हाला शिकवू नका बरे.
नागरिकशास्त्र आम्ही पहिली पासून शिकतो, आम्हाला कळत सारे बरे!
अगदी बरोबर, पण होतं काय सांगू का खरे?
म्हणतात ना काही सवयी "हाडी माशी मुरे!"
रस्त्यातून चालताना चणेदाणे लागतात बरे
पण खाऊन झाल्यावर, पुडी कुठे जाईना का बरे!
बसचे तिकीट सांभाळताना भान असते पुरे,
पण बसमधून उतरता क्षणी ते वाऱ्यावर भिरभिरे!
गाडीतून प्रवास करताना हवे गरम वडे अन् फळांचे गरे,
पण कागद कुठेही टाकताना स्वच्छता ना स्मरे!
लॉटरीचे तिकीट घेताना मनी स्वप्न वसे सुनहरे,
'निक्काल" पाहून निराश होताच उडून जाते ते चिटोरे!
देवाला वहायला घेतो आपण फुले, हार आणि गजरे,
पण निर्माल्य पाण्यात फेकताना मन जराही ना कचरे !
थेंबे थेंबे तळे साचे... हे जेव्हढे असे खरे
थोडाथोडा कचरा साठून ढीग बने... हेही तेव्हढेच खरे !
लाल सिग्नल जरी आम्ही तोडतो खरे,
परी पोलिसाला चिरीमिरी देऊन सुटकाही करतो त्वरे!
इतरांनी केला तर तो भ्रष्टाचार असतो बरे !
अस्मादिकांसाठी मात्र शिष्टाचारच असतो हे खरे !
१५ ऑगस्ट, २६ जानेवारीला देशभक्तीचे येणारे उमाळे जर असतील खरे....
तर नागरिकशास्त्र आणि पर्यावरणाचे धडे १२ महिने गिरवा असे सांगती सारे.
लेखक विज्ञान प्रसारक आहेत.
jetjagdish@gmail.com