लॉ-किन्टांग - मेघालयातील अस्पर्शित देवराई

५ जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा असा दिवस साजरा करावा लागतो. कारण आधुनिक विकासाच्या संकल्पना निसर्गाला उद्ध्वस्त करत पर्यावरणापासून कोसो दूर गेल्या आहेत. म्हणूनच पर्यावरणासोबत जगायचं असेल तर कसं जगायचं? जंगल तोडून का जंगल राखून? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मेघालयमधील मावफ्लांग गावातील पवित्र वनात मिळतात.
लॉ-किन्टांग - मेघालयातील अस्पर्शित देवराई
Published on

विचारभान

संध्या नरे - पवार

५ जूनला जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हा असा दिवस साजरा करावा लागतो. कारण आधुनिक विकासाच्या संकल्पना निसर्गाला उद्ध्वस्त करत पर्यावरणापासून कोसो दूर गेल्या आहेत. म्हणूनच पर्यावरणासोबत जगायचं असेल तर कसं जगायचं? जंगल तोडून का जंगल राखून? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मेघालयमधील मावफ्लांग गावातील पवित्र वनात मिळतात.

दूरवर एखाद्या पक्ष्याने घातलेली हलकीशी शीळ, वाऱ्याच्या झुळुकीने होणारी पानांची सळसळ, पालापाचोळ्यातून सरपटत जाणाऱ्या एखाद्या जीवाच्या अंगाची होणारी हालचाल, कुठेतरी कशाच्या तरी वजनाने मोडणाऱ्या एखाद्या वाळलेल्या फांदीची कडकड...अगदी बारीकसाही आवाज तिथल्या त्या नीरव शांततेला छेदत होता. आपल्या श्वासाचा-उच्छ‌्वासाचा आवाजही आपल्याला ठळक ऐकू यावा, इतकी स्तब्धता. या स्तब्धतेत बोलत होता तो केवळ निसर्ग. ऐकू येत होती ती केवळ निसर्गाची स्पंदनं. आदिमतेशी नातं सांगणारी. शतकांचा वारसा सोबत घेऊन आलेली. असं वाटलं, हा क्षण इथे असाच थांबावा.

सभोवती होतं घनदाट जंगल..वेलींनी लगडलेली रुंद बुंध्यांची उंच झाडं..प्रत्येक झाड दुसऱ्या झाडापेक्षा वेगळं. प्रत्येकाची पानं, पानांचे रंग वेगळे. फुलांचे गंध वेगळे. भर दुपारीही झाडांचे उंच शेंडे उन्हाच्या प्रवेशाला अडवत होते. भर दुपारीही जंगलात तिन्हीसांजेचं वातावरण होतं. एक छोटी वाट ए‌वढीच मानवी स्पर्शाची खूण तिथे होती. बाकी सारं जंगल अस्पर्शित होतं मनुष्य स्पर्शापासून. या जंगलातल्या झाडाची एखादी फांदीही कधी मानवाकडून तोडली गेलेली नाही.

हे होतं पवित्र वन. सेक्रेड फॉरेस्ट. खासी भाषेत ‘लॉ-किन्टांग’.

मेघालयची राजधानी असलेल्या शिलाँगपासून साधारण तासाभराच्या अंतरावर मावफ्लांग हे गाव आहे. या गावात मेघालयमधील सगळ्यात मोठं पवित्र वन आहे. मेघालयमध्ये गारो आणि खासी या दोन आदिम जमातींचं वास्तव्य आहे. खासी जमातीच्या गावांमध्ये प्रत्येक गावात गावकऱ्यांच्या सामूहिक मालकीचं राखीव पवित्र वन आहे. मेघालयमध्ये साधारण पन्नासपेक्षा अधिक अशी राखीव पवित्र वनं आहेत. समुदायाने जपलेली, समुदायाने राखलेली.

मावफ्लांगच्या छोट्याशा टेकडीवर या पवित्र वनाचं प्रवेशद्वार आहे. तिथेच तुम्हाला आत प्रवेशासाठीचं तिकीट काढायचं असतं. तिकिटासोबत स्थानिक गाईडही सोबत मिळतो. स्थानिक गाइड म्हणजे गावातलाच एखादा विशीतला मुलगा असतो. या पवित्र वनात स्थानिक गाइडच्या सोबतीशिवाय बाहेरच्या कोणाला प्रवेश मिळत नाही. टेकडीच्या उतारावर समोर मोकळं कुरण होतं आणि कुरणाच्या पलीकडे लांबच लांब हिरवा पट्टा. हेच ते लॉ किन्टांग- सेक्रेड फॉरेस्ट. आमच्यासोबत सतरा-अठरा वर्षांचा विकी गाइड म्हणून आला. म्हणजे त्याचं खरं नाव होतं, मिरथॉन्ग. पण पर्यटकांसाठी त्याने ‘विकी’ हे सोपं नाव घेतलं होतं. त्याने सुरुवातीलाच महत्त्वाच्या सूचना केल्या. एकदा का पवित्र वनात प्रवेश केला की बोलायचं नाही. गरज पडली तर अगदी हळू आवाजात बोलायचं. आत जाणारी जी वाट आहे ती सोडून इतरत्र जायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे काहीही तोडायचं नाही. एखादी फांदी, एखादं फूल, एखादं पान...काहीही नाही. शेवटची सूचना त्याने अधिक ठाम आवाजात सांगितली. जंगलातून बाहेर येताना आतलं काहीही सोबत आणायचं नाही. एखादं पान, फूल, माती, दगड, बी...काहीही नाही. जर एखादी गोष्ट तुम्ही उचललीत आणि लपवून जरी बाहेर आणलीत तरी पवित्र जंगलाच्या दैवी शक्तीला, ‘लाबासा’ला ते कळतं, ती कोपते आणि वाईट गोष्टी, दुर्दैव तुमच्या पाठीशी लागतं. छोट्या विकीचा केवळ आवाजच नाही, तर चेहराही ही सूचना करताना गंभीर होता. यातील श्रद्धेचा-अंधश्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तरी या सगळ्या सूचनांचा सारांश एकच होता, जंगलात आवाज न करता, जंगलाची एकतानता भंग न करता हळूच जायचं आणि परतताना रिकाम्या हातांनीच बाहेर यायचं. जंगलाला कुठेही ओरबाडायचं नाही.

पवित्र वनात शिरताना विकी वनाविषयी माहिती देत होता. हे विस्तीर्ण जंगल शिलाँग परिसरातल्या खासी टेकड्यांमधील सेंग खासी जमातीच्या २३ गावांच्या मालकीचं आहे. या जंगलाची देखभाल या २३ गावांची समिती करते. या गावांमधील २० ते २५ मुलं इथे आपलं शिक्षण आणि व्यवसाय सांभाळून अर्धवेळ गाइडचं काम करतात. पवित्र वनाच्या देखभालीत शासनाचा कोणताही सहभाग नसतो. ती गावकऱ्यांचीच जबाबदारी मानली जाते. जंगलाच्या देखभालीसाठी गावकऱ्यांची समिती असते. समुदायाचा पुजारी, जो राजा किंवा समुदायाचा प्रमुखही मानला जातो, त्याच्याकडे निर्णयाचे अंतिम अधिकार असतात. जंगलात बिबटे, लांडगे, कोल्हे, हरणं, रानकुत्रे असे विविध प्राणी आहेत. शेकडो प्रकारच्या वनस्पती, वेली, वृक्षं आहेत. मुख्य म्हणजे याच जंगलात खासी समुदायाच्या पूजाविधीची जागा आहे. इथे पूर्वजांचं स्मारक म्हणून मोठ्या उंच शिळा आहेत. इथेच पवित्र वनाच्या दैवीशक्तीला प्रसन्न करण्यासाठी परंपरागतरीत्या पशूंचे बळी दिले जातात. पूजाविधीच्या वेळी आत येताना आठवणीने सगळं सामान आणावं लागतं. एखादी वस्तू विसरले, म्हणून परत माघारी जाता येत नाही. त्यामुळेच जंगलात शिरताच एक चेक पॉइंट आहे. तिथे थांबून सगळं सामान आणलं आहे की नाही, ते तपासलं जातं.

हे जंगल किती जुनं आहे? या प्रश्नाला विकीचं उत्तर होतं, ‘व्हेरी ओल्ड’. या सगळ्या गाइड होणाऱ्या मुलांनी पर्यटकांना प्राथमिक माहिती देता येईल, ए‌वढं इंग्रजी शिकून घेतलं आहे. या जंगलाला साधारण ८०० वर्षांचा इतिहास आहे. इथली काही झाडं तीनशे ते चारशे वर्षं जुनी आहेत. अलीकडेच यातलं एक झाड पडलं तेव्हा संपूर्ण जमातीसाठी तो शोकाचा प्रसंग होता. कुटुंबातीलच कोणी सदस्य गेल्याची प्रत्येकाची भावना होती. मोडून पडलेले वृक्षही जंगलात तसेच ठेवले जातात. त्यातील कोणताच भाग बाहेर आणला जात नाही. ती जंगलाची अमानत असते. ती जंगलातच राहते आणि कधीतरी निसर्गक्रमानुसार मातीत होऊन मातीत मिसळते. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही, हीच यामागची मुख्य संकल्पना आहे.

जंगलातून चालताना विकी वाटेत दिसणाऱ्या झाडांची हळू आवाजात माहिती देत होता. कुठच्या झाडांपासून चित्रकलेचे ब्रश बनवले जातात, कशाच्या पानांपासून रंग बनवले जातात, पूजाविधीत कुठच्या झाडांची पानं वापरली जातात, हे तो सांगत होता. काही झाडांचे औषधी उपयोगही त्याने सांगितले. अर्थात यासाठी पवित्र वनाच्या बाहेर गावात जे जंगल आहे त्यातील झाडं वापरली जातात. इथली नाहीत.

सहज कुतूहल वाटलं आणि विचारलं, सरकारने जर हे जंगल ताब्यात घेतलं तर? काही तरी अभद्र ऐकल्यासारखे विकीने डोळे मोठे केले, मान जोराजोरात नकारार्थी हलवली आणि हळू आवाजात पण ठाम स्वरात सांगितलं, “नो, वुई हॅव पॉवर्स.’ आमच्याकडे शक्ती आहे, ताकद आहे, निर्णयाचे अधिकार आहेत, हे सांगताना विकीला पवित्र वनाची दैवीशक्ती जितकी अभिप्रेत होती, तितकीच खासींच्या सामूहिक एकतेची ताकदही अभिप्रेत होती.

समुदायाच्या या सामूहिक शक्तीमुळेच मेघालय राज्यातील ५० हून अधिक असलेली पवित्र वनं आजही शाबूत आहेत. कोणत्याही विकासाचा, प्रकल्पाचा वरवंटा त्यांच्यावर फिरलेला नाही. खरं तर, महाराष्ट्रातल्या कोकणातही पूर्वी गावोगाव देवळांच्या सभोवती अशा देवराया असायच्या. पण विकासाच्या नव्या कल्पनांनी यातल्या अनेक देवराया संपल्या. केवळ कोकणातच नाही, तर खाली दक्षिणेला गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या पश्चिम घाटाच्या वन्य परिसरात देवराई जपण्याची परंपरा होती. देवाच्या नावे राखीव असलेलं गावच्या सामूहिक मालकीचं पवित्र वन. देवराईची, पवित्र वनाची ही परंपरा आपसूक गावच्या पर्यावरणाचं रक्षण करणारी, गावातील जैवविविधता जपणारी होती. पण ब्रिटिश काळात सगळा परंपरागत कारभार बदलला, आधुनिक ‘जंगल खातं’ निर्माण झालं आणि दक्षिण भारतातल्या अनेक देवराया शासनाच्या मालकीच्या झाल्या. गेल्या काही वर्षांत माधव गाडगिळांसारखे काही पर्यावरणतज्ज्ञ शिल्लक राहिलेल्या देवराया वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण काळाच्या ओघात यातला बराचसा मौल्यवान भाग नष्ट झाला आहे.

विकीबरोबर मावफ्लांगच्या जंगलात आत आत जाताना हे सगळं आठवत होतं. जितकं आत जात होतो तितकी झाडांची दाटी वाढत होती. अंगाला फांद्यांचा, पानांचा स्पर्श होत होता. पायाखाली वाळलेल्या पानांचा गालिचा होता. कुजलेल्या गवताचा, ओलसर मातीचा आणि झाडांवरच्या पाना-फुलांचा एक वेगळाच गंध सोबत करत होता. जणू गेल्या अनेक शतकांची ती सोबत होती. पुन्हा एकदा जंगलांचं संगोपन स्थानिक समुदायांकडे सोपवलं तर प्रत्येक गावात ही अशी आदिम सोबत लाभेल, असं वाटलं.

तोवर आम्ही आणखी आत आलो होतो. जंगलात बाहेरच्यांना इथपर्यंतच प्रवेश होता. पुढे आणखी बरंच जंगल बाकी होतं. पण त्याला तसंच अस्पर्शित ठेवण्यात आलं होतं. विकी थांबला, तिथे समोर मातीचा थापटल्यासारखा सपाट भाग होता. त्याच्या समोर उंच शिळा आणि त्या शिळांना जणू आच्छादणारी भलीमोठी झाडं होती. हेच ते सेंग खासी जमातीचं पूजास्थान. उंच शिळा, बाकी काही नाही. पूजास्थळ म्हणून इतर कसलीही सजावट नाही. खरं तर, सजावट नाही, हे म्हणणंही चुकीचंच. ती आपली नजर. संस्कृतीच्या खोट्या-भ्रामक संकल्पनांनी भारलेली आणि म्हणूनच फसलेली. खासी जमातीच्या दृष्टीने त्यांचं पूजास्थानही सजलेलं होतंच की. वृक्षांची भिंत होती, वेलींची महिरप होती, पक्ष्यांचं गुंजन होतं, आभाळाचं आच्छादन होतं, वाहत्या पाण्याचा खळाळ होता. निसर्ग पूजताना आणखी काय हवं?

उंच शिळा असलेल्या पूजास्थळाच्या इथे विकीने आम्हाला काही काळ एकटं सोडलं. तो मागे जाऊन थांबला. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे प्रार्थना करू शकता, असं सांगितलं. पिढ्यान‌्पिढ्या अबाधित असलेल्या या जंगलाच्या नीरव शांततेत नि:शब्द होत स्तब्धता अनुभवणं, आपल्याच श्वासाचा आवाज ऐकणं, हीच एक प्रार्थना होती. हिरवाईची ही श्रीमंती अशीच कायम राहो, या सदिच्छेशिवाय दुसरी कोणती प्रार्थना त्या क्षणी स्फुरू शकते?

मावफ्लांग

मावफ्लांग हे नावही निसर्गाशी नातं जोडणारं आहे. माव म्हणजे दगड आणि फ्लांग म्हणजे गवत. मावफ्लांग म्हणजे दगडांनी, शिळांनी भरलेली गवताळ भूमी. खासी लोकांचं निसर्गाशी असलेलं नातं समजून घ्यायला मावफ्लांग हे गाव आणि त्यातील पवित्र वन याखेरीज अधिक योग्य जागा कुठली असणार? १९९६ पासून या गावाने आपल्या पवित्र वनात बाहेरच्या पर्यटकांना काही अंतरापर्यंत आत जाऊ देण्यास अनुमती दिली. मेघालयमधल्या इतर पवित्र वनांमध्ये पर्यटकांना आत जाता येत नाही. या पवित्र वनाचं क्षेत्र एकूण १९२ एकर ए‌वढं आहे.

sandhyanarepawar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in