

विशेष
रवींद्र राऊळ
आता फिरून अंडरवर्ल्डमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. छोटा राजनच्या पावलावर पाऊल टाकत चालणारा लॉरेन्स बिश्नोई स्वत:ला देशप्रेमी डॉन म्हणवून घेतोय. भारतातील माफिया टोळ्यांची पारंपरिक प्रतिमा त्याने पार बदलून टाकलीय. गॅंगवार त्याने खऱ्या अर्थाने ‘लोकल टू ग्लोबल’ पोहचवले. देशविदेशाची वारी करणारे त्याच्या टोळीतील सुटाबुटातील रुबाबदार गुंड पाहून गल्लीतले गावठी गुंड आ वासत आहेत. खुद्द एनआयएनेच लॉरेन्स बिश्नोई टोळीचे संबंध प्रतिबंधित खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी असल्याचा सनसनाटी आरोप केला. त्यामुळे या टोळीने दहशतवाद्यांच्या हत्या देशप्रेमापोटी केल्या की दुसऱ्या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावरून हाही प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. म्हणूनच या सगळ्या खातेऱ्यात कोण कोणाचा मोहरा म्हणून वापर करतोय हेच न उलगडणारे कोडे झाले आहे.
जुहूच्या रस्त्यावर अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी साता समुद्रापारच्या अमेरिकेतील एका इसमाने सोशल मीडियावर स्वीकारली. पण गोळीपेक्षाही अस्वस्थ करणारी बाब वेगळी आहे. ज्याच्या नावाने ही गोळी झाडली गेली, तो लॉरेन्स बिश्नोई गेली साडेतीन वर्षे अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातल्या हायसिक्युरिटी बराकीत मजेत पहुडला आहे. याच बरकीतून आदेश देत तो जगाच्या पाठीवर कुठेही अंधाधुंद गोळीबार घडवून धुडगूस घालतो आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड इथपासून कॅनडा, अमेरिका, युरोप आणि आखाती देशात सर्वदूर त्याच्या टोळीचे कार्यक्षेत्र पसरलेले असताना त्याला रोखण्यात सरकार हतबल आहे.
जगात प्रत्येकाला सर्वाधिक हादरवून टाकते ते मृत्यूचे भय. हेच भय दाखवत नव्वदच्या दशकात मुंबईच्या रस्त्यांवर बॉलीवूडवाल्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडवत अंडरवर्ल्डने आपले उखळ पांढरे करून घेतले होते. कारण १९९८ मध्ये चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्यात आल्याने २००१ च्या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनांनंतर प्रत्यक्ष बँक वित्तपुरवठ्याचे मार्ग खुले होत चित्रपट उद्योगाला बँकांचे कर्ज मिळू लागल्याने बॉलीवूडच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात घेऊन बसलेल्या पाकिस्तान - दुबईतील भाई लोकांचे फोन थंडावले. दरम्यान १९९९ चा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, टोळ्यांची आपापसातील फाटाफुटी, पोलिसांनी उगारलेले एन्काऊंटरचे अस्त्र असे वेगवेगळे मुद्दे अंडरवर्ल्डची बॉलीवूडवरची पकड ढिली करण्यास कारणीभूत ठरले. कॅसेटकिंग गुलशन कुमार यांच्यासह अनेकांच्या हत्या करणारे आणि राकेश रोशन यांच्यासह कैक जणांवर बेछूट गोळ्या झाडणाऱ्या क्रूर अंडरवर्ल्डचे राज्य संपले असा सार्वत्रिक समज निर्माण होत असतानाच लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने केलेल्या गोळीबाराच्या आवाजाने मधल्या काळातील बॉलीवूडमधला शांततेचा भंग केला आहे.
आघाडीच्या कलाकारांना आपले लक्ष्य बनवत चित्रपटसृष्टीसह मुंबईच्या गुन्हेगारी वर्तुळातही कमालीची अस्वस्थता निर्माण केली आहे. प्रश्न असा पडतो की, हजारो कोटींचे अधिकृत अर्थकारण असलेला चित्रपट उद्योग आणि राजस्थान, पंजाब, हरियाणातील तुरुंगांतून चालणारी गुन्हेगारी टोळी यांच्यात नेमका कोणता धागा जुळला आहे? यामागे बॉलीवूडवर दहशतीची सावली पाडून खंडणीचे जाळे विणण्याचा सुनियोजित आर्थिक कट आहे. दाऊद टोळीची पकड सैल झाल्याने निर्माण झालेली पोकळी हेरत लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूडमध्ये आपल्या टोळीचा जम बसवण्याचा प्रयत्न करत असल्याची अटकळ आहे.
राजकारण आणि गुन्हेगारी हातात हात घालून चालत असल्याने दोहोंमध्ये कार्यपद्धतीही एकसारखी आहे. राजकारणात कोणता मुद्दा कधी उचलायचा आणि तो कसा चालवायचा याला जितके महत्व असते तितकेच गुन्हेगारीतही कोणती पताका कधी खांद्यावर घ्यायची यालाही महत्व असते. राजकारणात वेगवेगळे रंग धारण केले जातात तसे ते अंडरवर्ल्डमध्येही दाखवले जातात. धर्म, भाषा आणि प्रांताच्या भिंती दोन्ही क्षेत्रात उभ्या केल्या जातात तसेच एकमेकांना वापरुन घेण्यातही कोणतेच क्षेत्र मागे नाही.
अंडरवर्ल्डच्या पन्नास वर्षांपूर्वीच्या इतिहासात जातीधर्माला स्थान नव्हते. हाजी मस्तान, करीम लालासोबत वरदराजन मुदलियारचे चांगलेच मेतकूट होते. नंतरच्या काळात दाऊद इब्राहीम आणि अरुण गवळीची रमा नाईक टोळी गळ्यात गळे घालून एकत्र काम करत होते. त्यांच्यात वाद झाल्यानंतर अंडरवर्ल्डमधल्या पहिल्यांदा जातीयतेचा उल्लेख झाला तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’ या विधानाने. दाऊद हा कॉँग्रेसचा मोहरा असल्याचा समज झाल्याने अरुण गवळीची प्रतिमा हिंदू डॉन अशी जाणीवपूर्वक उभी केली गेली. पण अखिल भारतीय सेनेच्या रूपाने आपली संघटना स्थापन करत गवळीने शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र या मोहऱ्याची उचलबांगडी तुरुंगात करत त्याच्या साथीदारांचे एन्काऊंटर सुरू झाले.
मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवल्यानंतरच्या काळात दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांचेही बिनसले. दोघेही दुबईतून परागंदा होत एकमेकांना पाण्यात पाहू लागले. तेव्हापासून छोटा राजन स्वत:ला देशभक्त म्हणवून घेत बॉम्बस्फोटातील खटल्यातील आरोपींना कंठस्नान घालू लागला. देशप्रेमी विरुद्ध देशद्रोही टोळी अशी चांगलीच जुंपली. गुप्तचर यंत्रणांनाही हेच हवे होते. लोहा लोहे को काटता है, म्हणतात ते काही खोटे नाही. कुठलीही गॅंग डोईजड होऊ लागली की तिचा बंदोबस्त करण्यात आपली ताकद खर्ची करण्यापेक्षा तपासयंत्रणा त्या टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळीला तिच्याशी भिडवतात. अंडरवर्ल्ड टोळ्या एकमेकांना जितक्या पुरेपूर ओळखून असतात तितक्या तपासयंत्रणा नाही. अशा तपासयंत्रणांच्या पाठबळामुळेच दुबईतून निसटलेला छोटा राजन वेगवेगळ्या देशांमधून वर्षानुवर्षे फिरत राहिला आणि देशद्रोही आरोपींच्या हत्या करत राहिला. म्हणजे प्रत्येकवेळी कोणी ना कोणी मोहरा बनतच होते.
आता फिरून अंडरवर्ल्डमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. छोटा राजनच्या पावलावर पाऊल टाकत चालणारा लॉरेन्स बिश्नोई स्वत:ला देशप्रेमी डॉन म्हणवून घेतोय. भारतातील माफिया टोळ्यांची पारंपरिक प्रतिमा त्याने पार बदलून टाकलीय. गॅंगवार त्याने खऱ्या अर्थाने ‘लोकल टू ग्लोबल’ पोहचवले. देशविदेशाची वारी करणारे त्याच्या टोळीतील सुटाबुटातील रुबाबदार गुंड पाहून गल्लीतले गावठी गुंड आ वासत आहेत. काळविटांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या अभिनेता सलमान खानला आपल्या रडारवर आणल्याने लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव देशभर पसरले. २०१८ मध्ये त्याचा सहकारी संपत नेहरा बंगळुरूत पकडला गेला, तेव्हा सलमान खानवर हल्ला करण्याची योजना समोर आली. २०२२ मध्ये गायक सिधू मुसेवालाची हत्या झाली; त्याची जबाबदारी कॅनडातून गोल्डी ब्रारने घेतली. २०२३ मध्ये जयपूरमध्ये करणी सेनेचे सुखदेवसिंग गोगामेडी याची, तर २०२४ मध्ये मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या, एकामागोमाग या सर्व प्रकरणांत लॉरेन्स टोळीचे नाव पुढे येत गेले. सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करत आपल्या टोळीच्या कारवायांचा धावफलक कायम हलता राहील याची काळजी लॉरेन्स बिश्नोई कायम घेत असतो.
देशभरात एकामागोमाग एक गुन्हे दाखल होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार सुरक्षेच्या कारणास्तव लॉरेन्सला साबरमती तुरुंगाबाहेर हलवता येत नाहीय. ऑगस्ट २०२६ मध्ये तो आदेश चौथ्यांदा वाढवला गेला. ही खरोखरच त्याच्या सुरक्षेसाठी की कुठल्या पोलिसांनी त्याचा ताबा घेऊ नये यासाठीची दक्षता, ही शंका बुचकळ्यात टाकणारी आहे. मुंबई पोलिसांनी सलमान खान गोळीबार आणि बाबा सिद्दीकी हत्येच्या तपासासाठी लॉरेन्सचा ताबा मागूनही तो मिळालाच नाही. पोलिसांनी न्यायालयातच म्हटले की ताब्याशिवाय तपास विकलांग होतोय. हे केंद्र सरकारला समजत नसावे का? सुरक्षेचे कारण खोटे नसावे तरी तेच कारण तपासापासून संरक्षणाचे कवच का बनते, याचे उत्तर सरकारने द्यायला हवे. अमेरिकी आरोपपत्र त्याने व्हॉट्सअॅपवरून खंडणी मागितल्याचा दावा करते, तेव्हा तुरुंग प्रशासनाला कोण जबाबदार धरणार?
२०२२-२३ मध्ये तुरुंगात मुलाखती घडल्या; त्यासाठी पोलिसांनीच सुविधा दिल्याचे चौकशी समितीने नमूद केले. सात पोलिस अधिकारी निलंबित झाले आणि एक उपायुक्त बडतर्फ झाला. तरीही हल्ले काही थांबले नाहीत, अल्पवयीन मुले गोळीबारासाठी वापरली जाताहेत, सूत्रधार परदेशात असतात आणि टोळी मुंबईत दाऊद टोळीची जागा घेण्याची भाषा करते. टोळीने दहशतवाद्यांना का ठार केले? खलिस्तानवादी हरदीप सिंह निज्जर याला भारताने दहशतवादी घोषित केले आणि अज्ञात इसमांनी कॅनडात त्याची गोळ्या झाडून हत्या केली. संशय याच टोळीवर आहे. या हत्याकांडात भारत सरकार सहभागी असल्याचा आधी केलेल्या आरोप कॅनडा सरकारने नंतर मागे घेतला. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील पंजाबमधील कुख्यात गॅंगस्टर सुखदूल सिंग याची कॅनडातील विनिपेग येथे तशीच हत्या करण्यात आली. लॉरेन्स टोळीची मजल इतपत गेली की टोळीने अॅबॉट्सफर्ड पोलिसांना पत्र पाठवून ‘आम्ही कॅनडावर राज्य करू’ असे आव्हान दिले. पुढच्याच महिन्यात कॅनडाने या गटाला दहशतवादी संघटना घोषित केले.
दुसरीकडे खुद्द एनआयएनेच लॉरेन्स बिश्नोई टोळीचे संबंध प्रतिबंधित खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी असल्याचा सनसनाटी आरोप केला. त्यामुळे या टोळीने दहशतवाद्यांच्या हत्या देशप्रेमापोटी केल्या की दुसऱ्या दहशतवादी संघटनेच्या इशाऱ्यावरून हाही प्रश्न बुचकळ्यात टाकणारा आहे. म्हणूनच या सगळ्या खातेऱ्यात कोण कोणाचा मोहरा म्हणून वापर करतोय हेच न उलगडणारे कोडे झाले आहे.