

जगतवारी
मेधा आलकरी
लेबनॉन म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो बैरूटचा महानगरी थाट; पण या देशाच्या गावागावांत इतिहास, निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. बायब्लॉसच्या प्राचीन अवशेषांपासून जेइटा ग्रोटोच्या अद्भुत गुहांपर्यंत, मुसाच्या स्वप्नातील किल्ल्यापासून सेडरच्या हिमाच्छादित जंगलापर्यंतचा हा प्रवास मनाला मोहवून टाकणारा आहे.
बैरूटला महानगराचा थाट आहे. राजधानीची ऐट आहे; मात्र लेबनॉनमधील इतर जागांना मनाला मोहून टाकणारा गावरान गंध आहे. लेबनॉनच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं, नव्या-जुन्या संस्कृतीचा संगम असलेलं बंदराचं गाव म्हणजे बायब्लॉस! फेनेशियन ही आता अस्तित्वात नसलेली संस्कृती तिथे मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होती. असं म्हणतात की इसवीसनपूर्व सहाव्या शतकापासून आजतागायत या गावात मानवाचं वास्तव्य आहे. निर्मनुष्यतेचा शाप या प्राचीन गावानं कधीच सहन केला नाही. म्हणून असेल कदाचित, जुन्या शहरातही पडझड फारशी कुठे दिसली नाही. भूमध्य समुद्राच्या निळ्याभोर पडद्याची पार्श्वभूमी लाभलेला हा भूभाग. भिंतीचा कोट असलेल्या टेकाडावरील जुन्या शहरात बाराव्या शतकात बांधलेल्या क्रुसेडरांच्या किल्ल्यातून प्रवेश करावा लागतो. जुन्या शहरातील मुख्य आकर्षण म्हणजे ओबेलिस्क टेम्पल. ३२०० वर्षांहून अधिक प्राचीन अशा या मंदिरात छोटे छोटे दगडी स्तंभ आहेत. इतिहासाची आवड असणारे काही पर्यटक त्यांच्या पुस्तकाची खुणा करून ठेवलेली पानं उलटत या मंदिराकडे आणि रोमन अवशेषांकडे भारावून पाहत होते. जणू काहीतरी भव्यदिव्य पाहतोय! जुन्या बाजारातील दगडी गल्ल्यांतील एका स्थानिक कॅफेमध्ये बसून त्या अवशेषांकडे पाहताना मला जाणवलं की या प्राचीन मोडक्या तुटक्या दगडी इमारतींची एक वेगळीच मोहिनी आहे. या विस्कळीत इमारतींच्या मोकळ्या जागेत, कल्पनेनं आपण ठोकळे बसवू लागतो तेव्हा ती पूर्ण इमारत त्याच्या मूळ स्वरूपात आपल्या मनःचक्षूंसमोर उभी ठाकते आणि तिची भव्यता पाहिली की दिपून जायला होतं.
प्राचीन इतिहासातील एक महत्त्वाचं पान इथे ‘लिहिलं’ गेलं होतं. आधुनिक जगातील ग्रीक, लॅटिन आणि इंग्रजी लिपींची जननी मानली जाणारी बावीस अक्षरांची पहिली वर्णमाला इथेच विकसित झाली. बायबल शब्दाशीही या शहराचं एक वेगळं नातं आहे. पापायरस या वनस्पतीपासून तयार केलेल्या कागदावर पूर्वी चित्रं आणि चित्रलिपी रेखाटत असत. या कागदाला ग्रीक भाषेत बायब्लॉस म्हटलं जातं. या शहरातूनच मोठ्या प्रमाणावर पापायरसचा व्यापार होत असल्यामुळे या शहराला तेच नाव पडलं आणि याच शब्दावरून पुढे बायबल आणि ‘बिब्लोग्राफी’ हे शब्द जन्माला आले. या शहराच्या अतुलनीय ऐतिहासिक महत्त्वामुळे १९८४मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं.
खलील जिब्रान या लेबनॉनच्या भूमिपुत्राचा एक हुबेहूब आणि जिवंत वाटणारा पुतळा येथील वॅक्स म्युझियममध्ये पाहिला. टेबलापाशी बसून लिखाणात व्यग्र असलेल्या जिब्रानचा पुतळा माझ्यातल्या उभरत्या लेखिकेला फारच भावला. ‘द प्रॉफेट’ या प्रसिद्ध पुस्तकाचा हा लेखक, कवी हृदयाचा असला तरी त्याला तत्त्वज्ञानातही तितकाच रस होता. जिब्रान उत्तम चित्रकारही होता. बहुगुणसंपन्न! बाकीचे मेणाचे पुतळे यथातथाच असले तरी पूर्वापार चालत आलेलं लेबनॉनचं सामाजिक जीवन आपल्यासमोर उलगडून ठेवण्यात ते यशस्वी होतात.
दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावरील सिडॉन या गावातील समुद्रकिल्ला फारच सुंदर आहे. समुद्रापेक्षा, उंच पर्वतराजींवर प्रेम करणाऱ्या मला लेबनॉनमध्ये या समुद्राने वेड लावलं. राखाडी रंगाचे दगड डकवलेला हा किल्ला आणि तिथून पाहिलेला सूर्यास्त माझ्या मनात कायमचा कोरून ठेवला गेला. तो पाहत असताना चालकाच्या आग्रहावरून आम्ही तिथला ‘नाहना चहा’ प्यायलो. बिनदुधाच्या या कोऱ्या चहात नाहना म्हणजे चक्क बचकभर पुदिन्याची पानं टाकतात. पुढे कितीतरी टपऱ्यांवर थांबून आम्ही वेगळ्याच चवीच्या या चहाचा मनमुराद आस्वाद घेतला.
लेबनॉनमध्ये निसर्गाचा एक चमत्कार दृष्टीस पडतो. जेइटा ग्रोटो! बैरूटच्या उत्तरेकडे अठरा किलोमीटर अंतरावर या चुनखडीच्या गुहा आहेत. एक डोंगरमाथ्यावर, तर एक पायथ्याशी. खालच्या गुहेच्या तळाशी पाणी असल्यामुळे नावेत बसूनच ती पाहता येते. वरच्या गुहेत मात्र पायी चालावं लागतं. या गुहेतील निसर्गाची करामत आपल्याला थक्क करून सोडते. गुहेच्या आत छतामधून जे निवळीयुक्त पाणी पडत असतं, त्याचं बाष्पीभवन होऊन खाली निमुळते होत जाणारे, बर्फाच्या सुयांच्या आकाराचे, लटकणारे लाइम कार्बोनेटचे थर जमतात. यांना म्हणतात स्टॅलेक्टाइट. यातून पडणाऱ्या थेंब थेंब पाण्यामुळे जमिनीवर शंकूच्या आकाराचे थर जमतात. त्यांना म्हणतात स्टेलेग्माईट. कधी कधी हे दोन्ही थर वाढत जाऊन एकमेकांना टेकतात आणि त्यांचा एक स्तंभ तयार होतो. मात्र या सगळ्या प्रक्रियेला वर्षानुवर्षं लागतात. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस मोजावा लागतो. या ‘थेंबे थेंबे तळे साचे’ प्रक्रियेत वेगवेगळ्या आकृत्या तयार होतात. कुठे घड्याळाचा मोठा लंबक; तर कुठे छान कातरलेलं झुंबर! एके ठिकाणी तर हुबेहूब चर्चमध्ये उच्च आसनावर बसून प्रवचन देत असलेला बिशप दिसला आम्हाला. या सगळ्या आकृत्या पाहून मला लहानपणीचा ‘स्टॅचू’ हा खेळ आठवला. वाटलं, धावता धावता यांना सवंगड्यांनी स्टॅचूची आज्ञा दिली आणि तेव्हापासून हे तसेच स्तब्ध उभे आहेत. या गुहा खूप मोठ्या आहेत. अगदी आतपर्यंत खोल पसरलेल्या. जगातील नैसर्गिक आश्चर्यात समावेश व्हाव्या इतक्या सुंदर! मी इतर देशातही अशा चुनखडीच्या गुहा पाहिल्या आहेत; पण या सम याच!
लहानपणी पाहिलेली भाबडी स्वप्नं साकार करण्यासाठी धडपडणारी किती माणसं असतील या जगात? बालिशपणा म्हणून अशी स्वप्नं कधीच अडगळीत टाकली जातात किंवा मनाच्या एका हळुवार कोपऱ्यात निद्रिस्त अवस्थेत पडून राहतात. प्रचंड इच्छाशक्ती, दृढता आणि सातत्य हे गुण अंगी असलेल्या मुसा नावाच्या एका इसमाने मात्र असं न करता, लहानपणापासून जपलेलं किल्ला बांधण्याचं आपलं स्वप्न साठ वर्षं खपून पूर्ण केलं. खिशात पैसा खुळखुळू लागल्यावर हौसेखातर किल्ला बांधून घेतला असं नाही; तर तो चक्क स्वहस्ते बांधला. मुसाला बांधकामाचं बाळकडू त्याच्या वाडवडिलांकडून मिळालं होतं. चौदा वर्षांच्या किशोरवयात त्याला आवडणाऱ्या त्याच्या मैत्रिणीनं त्याचं प्रेम झिडकारलं. तिच्या स्वप्नातील राजकुमार कॅसलमध्ये राहणारा होता. त्या दिवसापासून मुसाने हे गुलाबी स्वप्न जपलं. अभ्यासाच्या वह्यांची पानं किल्ल्याच्या ड्रॉईंगनी भरू लागली आणि छड्या खाऊन कोडगं झालेलं त्याचं शरीर एके दिवशी शाळा सोडून पळालं. उराशी बाळगलेलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने खूप कष्ट उपसले. बांधकाम कामगाराचं काम केलं. डोईवर विटा-दगड वाहून नेले. पै पै जमवली आणि साठ वर्षांत आपला हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवला. विधात्यानं या कामासाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सुशील, सुजाण पत्नी मात्र नियोजित करून ठेवली होती. कॅसलची स्वप्नं पाहणारी प्रेमिका नव्हे; तर नवऱ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवायला हातभार लावणारी कर्मकुशल सहधर्मचारिणी!
किल्ल्यात प्रवेश केल्यावर पाऊणशे वयोमान असलेला मुसा सपत्नीक आमच्या स्वागतासाठी उभा आहे हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं. प्रदर्शनात त्याने स्वहस्ते बनवलेले पाण्याच्या शक्तीवर हलणारे-डुलणारे मेणाचे पुतळे आहेत. त्यात लेबनॉनमधील लोकजीवन, रूढी परंपरा तर होत्याच; पण मला आवडलं ते मुसाच्या शाळेतलं दृश्य. शिक्षक मुसाला छडीचा मार देताहेत, ते पाहून त्याचे वर्गसोबती खिदळताहेत. भिंतीवरील खिळ्यांवर दप्तरं टांगली आहेत. जमिनीवर मुलांनी शिक्षकांसाठी घरून आणलेल्या मेव्याच्या टोपल्या ठेवल्या आहेत. त्यात खंडीभर खजूर, भुईमुगाच्या शेंगा दिसताहेत. कोपऱ्यात झाडूही आहे. कहर म्हणजे एक टारगट पोरगा कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून, गुडघ्यावर बसून आणि दोन्ही हात वर करून शिक्षा भोगतो आहे. गुडघ्याखाली खडी आहे. हे पुतळे सुंदर सुबक खचितच नाहीत; पण त्यात एका कोवळ्या वयातल्या मुलाची इच्छाशक्ती आणि जिद्द मात्र दिसते.
बैरुटजवळील फराया स्कीईंग रिसॉर्ट पाहायला गेलो असताना आम्ही जबरदस्त बर्फाच्या वादळात अडकलो होतो, तरी लेबनॉनमध्ये आढळणाऱ्या सेडर वृक्षांचं जंगल पाहण्याची ओढ आम्हाला स्वस्थ बसू देईना. दुसऱ्या दिवशी कुंद वातावरणात आणि कडाक्याच्या थंडीत आम्ही बरुक नेचर रिजर्व्हला जाऊन पोहोचलो. सेडर वृक्षाचा उल्लेख बायबलमध्ये सत्तर वेळा आलाय. अतिउत्तम प्रतीचं हे लाकूड इजिप्शियन देवळांसाठी आणि जहाजाच्या डोलकाठीसाठी राखून ठेवलं जाई. मिलिटरीच्या अखत्यारित येणाऱ्या या जागी जायला परमिट घ्यावं लागतं. तिथे पोहोचलो तर ऑफिस बंद. शेवटी त्या भुरभुरणाऱ्या बर्फात बुटांचे ठसे उमटवत आम्ही अर्धा किलोमीटरची रपेट करून आलो. ताजा धवल बर्फ अंगावर ल्यायलेले ते सेडर वृक्ष अतिमोहक दिसत होते. लेबनॉनच्या झेंड्यावर लाल फितींच्या मध्यभागी या सेडर वृक्षाला ध्रुवपद का दिलं गेलं हे मला त्या दिवशी समजलं.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com