
दुसरी बाजू
प्रकाश सावंत
दहशतवादाचा पोशिंदा असलेल्या पाकिस्तानने भारतामधील लष्करी ठाणी, नागरी वस्त्या, आरोग्य केंद्रे, शैक्षणिक संस्था, गुरुद्वारासह अन्य प्रार्थनास्थळांवर हल्ले चढवण्याचा घाट घातला होता, तर दुसरीकडे भारतानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानमधील केवळ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली होती. दहशतवादविरूद्ध मानवतावाद यातील हा संघर्ष इथे समजून घेणे आवश्यक आहे.
काश्मीर खोऱ्यातील निसर्गरम्य बैसरन व्हॅलीच्या नंदनवनात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या निरपराध पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत धर्मांध दहशतवाद्यांनी भेकड हल्ला केला. हा हल्ला करताना स्त्रिया आणि पुरुष यांना वेगळे करण्यात आले. आपल्या मुलाबाळांसमोर, स्त्रियांसमोर दहशतवाद्यांनी पुरुष पर्यटकांना गोळ्या घातल्या. हा हल्ला करीत असताना त्यांनी पर्यटकांचे नाव व त्यांचा धर्म विचारला. पर्यटक हिंदू असल्याचे लक्षात घेऊनच त्यांच्यावर वेचून वेचून गोळीबार केला. या अमानुष हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. हा धर्मांधांचा माणुसकीवरचा हल्ला होता.
पाकिस्तानने क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनला अबोटाबादमध्ये आश्रय दिला होता. मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम असो अथवा दहशतवाद्यांचे म्होरके हाफीज सईद वा मसूद अझर असो, त्यांना राजाश्रय देण्याचे काम पाकिस्तानी राज्यकर्त्यांनीच नव्हे, तर तेथील लष्करशहांनी वेळोवेळी केले आहे. पाकिस्तानच्या अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला करून निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत. पाकिस्तानमधील बहावलपूर, सियालकोट, मुरीदके यासह जवळपास नऊ ठिकाणी लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आहेत. येथील दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या आजवरच्या प्रत्येक राज्यकर्त्यांनी व लष्करशहांनी पोसले आहे. या जिहादी दहशतवाद्यांना शिक्षण, प्रशिक्षण व अर्थसहाय्य पुरविले आहे. त्यामुळेच दहशतवाद्यांचा पोशिंदा असलेला पाकिस्तान आधीपासूनच जगभरातील देशाच्या रडारवर आहे.
या दहशतवाद्यांच्या जोरावरच पाकिस्तानातील लष्करी जमात माजली आहे. या जमातीने पाकिस्तानात लोकशाहीची बीजे कधीच रुजू दिलेली नाहीत. वेळोवेळच्या लष्करशहांनीच पाकिस्तानवर एकतर्फी लष्करी अंमल गाजविला आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना चिरडण्याबरोबरच त्यांची सत्ता घालवण्याचे उद्योगही लष्करशहांनी केले आहेत. त्यामुळेच धर्मांध पाकिस्तान लष्करी दमनशाहीच्या जात्यात अधिकाधिक भरडला जात आहे.
काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या नंदनवनात घुसून दहशतवाद्यांनी रक्तपात घडविला. हा हल्ला करतानाही दहशतवाद्यांनी स्त्री-पुरुष, हिंदू-मुस्लिम भेदाभेद केला. आता अमृतसरच्या गुरुद्वारासह तेथील अन्य प्रार्थनास्थळांवरही हल्ले करून पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या धर्मांधतेचे, कपटनीतीचे व अमानुषतेचे दर्शन अवघ्या जगाला घडवून दिले आहे.
मुंबईतील बॉम्बस्फोटांची मालिका, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, संसदेवर हल्ला करुन पाकिस्तानने भारताविरूद्ध अघोषित युद्धच पुकारले आहे. या युद्धाला व पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला भारताने आता चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य केले आहे. याउलट, पाकिस्तानचे हल्ले भारताच्या लष्करी तळ, नागरी वस्त्या, आरोग्य केंद्रे, शैक्षणिक संस्थांसह प्रार्थनास्थळांवरही सुरू होते. लेह ते सीर क्रीक दरम्यानच्या ३६ स्थळांवर पाकिस्तानने ३०० ते ४०० ड्रोनचा मारा केला असला तरी त्याला चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचेच दात त्यांच्याच घशात घालण्याचे काम भारतीय शूर जवानांनी केले आहे. पाकिस्तानच्या युद्धखोरीविरूद्ध जम्मू-काश्मीर लेह-लडाख, पंजाब, राजस्थानसह सारा देश एकवटला आहे. मध्य प्रदेशातील ताज उल मशिदीसह अनेक मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी भारताच्या विजयासाठी व पाकिस्तानच्या पराभवासाठी प्रार्थना करण्यात आल्या. उत्तर प्रदेशच्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी, शिक्षकांनी एकत्र येऊन भारतीय जवानांच्या पराक्रमाचे कौतुक करून त्यांच्या कारवाईला जोरदार समर्थन दिले आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्व धर्मीयांनी परस्परातील मतभेद विसरून एकीचे बळ दाखवले आहे. ही धर्मांधतेला, दहशतवादाला सणसणीत चपराक आहे.
लोकशाही व्यवस्थेत समानता, सामाजिक बंधुभाव, धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मूलतत्त्वांशी लष्करी दमनशाहीवर विश्वास असलेल्या धर्मांध पाकिस्तानला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळेच पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातले आहे. आता हेच धर्मांध दहशतवादी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना व लष्करशहांना डोईजड झाले आहेत. त्यांच्या कारवायांनी धर्मांधता व दहशतवादावर पोसलेल्या पाकिस्तानची पुरती कोंडी झाली आहे. या उलट भारताने धर्मांधता व माणुसकी विरुद्ध पुकारले आहे. म्हणूनच त्याला आता जगभरातून पाठबळ मिळू लागले आहे. भारत पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणीवाटप करार प्रकरणी हस्तक्षेप करण्यास जागतिक बँकेने स्पष्ट नकार दिला आहे.
त्याचबरोबर भारत पाकिस्तान युद्धात हस्तक्षेप करण्यास अमेरिकेच्या उपाध्यक्षांनीही नकारघंटा वाजवली आहे. पाकिस्तानचा सर्वच आघाड्यांवर कोंडमारा सुरू झाला आहे. देशातून व देशाबाहेरूनही कोणी साथ देत नसल्याने हा देश व तेथील लष्करशहा एकाकी पडत चालले आहेत. हा संघर्ष परवडणारा नाही असाच सूर पाकिस्तानामधील काही राजकीय नेत्यांनी आळवण्यास सुरुवात केली होती. आता भारत आणि पाकिस्तान यांनी युद्धविरामाची तत्काळ घोषणा करून परस्परांशी संवाद सुरू केला आहे. ही बाब दोन्ही देशांच्या हिताचीच ठरणार आहे.
महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी एकेकाळी ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू जिंकू किंवा मरू’ असे अप्रतिम गाणे रचले होते. भारताने दहशतवादाविरुद्ध, माणुसकीच्या शत्रू विरुद्ध युद्ध छेडल्याने या युद्धाला देशातील हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई या साऱ्यांनी आपले पाठबळ दिले होते. त्यातूनच धर्मांधता आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याचे आत्मबळ भारताला लाभले. हाच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामाचा सांगावा आहे.
prakashrsawant@gmail.com