आयुष्याचे पान

मुलाने मग पैशासाठी शेतच काढले खणून, पावसाळ्यात म्हादूने त्यात बियाणे घेतले पेरून..
आयुष्याचे पान
Published on

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

म्हादू आपला दिवसभर

शेतात असतो राबत,

त्याचा मुलगा आळशी

नुसताच बसतो खेळत..

एकदा काय झाले

म्हादू आजारी पडला,

शेतात जाता येईना

म्हणून आतल्याआत रडला..

उघडे बोडके शेत पाहून

म्हादू उदास होई,

मुलाला म्हणे शेती कर

मुलगा ऐकत नाही..

एकदा म्हादू म्हणाला

‘मुला, पैसे गेलेत संपून,

तुला हवे असेल तर

शेतात ठेवलेत पुरून..

मुलाने मग पैशासाठी

शेतच काढले खणून,

पावसाळ्यात म्हादूने त्यात

बियाणे घेतले पेरून..

काही दिवसांनी शेतातून

पीक तरारून आले,

तेच पीक विकून मुलाने

रग्गड पैसे कमावले..

म्हादू म्हणे मुलाला

‘हेच जमिनीतील धन’,

कष्टाचे मोल समजून घे

सफल होईल जीवन..

कष्टाविना जगणे व्यर्थ

याचे राहू दे भान,

कष्टातूनच फुलते मुला

आयुष्याचे ‘पान न् पान’..

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

eknathavhad23@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in