

विशेष
क्रांती गोडबोले-पाटील
भौतिक प्रगतीचा मखमली पोशाख परिधान केलेला आजचा आधुनिक समाज आतून मात्र कमालीचा संवेदनशून्य आणि नैतिकदृष्ट्या सडत चालला आहे. अवतीभोवती घडणाऱ्या हिंसक घटना आणि लोकांची 'मूक प्रेक्षक' बनून व्हिडिओ काढण्याची वृत्ती याच विदारक मानसिकतेचा पुरावा आहे.
लोखंडी पटरीवरून धावणाऱ्या लोकलच्या डब्यात, पावसाच्या एका रात्री रक्ताचा पाट वाहतो... कारण काय? तर फक्त 'दरवाजा बंद करण्याचा' एक किरकोळ वाद! दुसरीकडे, इतिहासाची साक्ष देणाऱ्या लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून एक तरुण संशयास्पद रीतीने कोसळतो... आणि नंतर उघड होतं की, प्रेमासाठी आणि लग्नाचा व्यवहार टाळण्यासाठी एका तरुणीने तिच्या प्रियकराच्या मदतीने रचलेलं ते एक कारस्थान होतं! या सगळ्या थराराच्या मधोमध सोशल मीडियावर एक पाच वर्षांच्या चिमुरड्याचा व्हिडिओ थडकतो, जिथे एक लहान जीव दुसऱ्या लहान जीवाला अमानुषपणे झोडपताना दिसतोय. या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी, हा आपल्या आधुनिक, सुशिक्षित आणि प्रगत म्हणवून घेणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचा 'पोस्टमॉर्टम' रिपोर्ट आहे असं म्हणावं लागेल. ज्या समाजात रोज सकाळी वर्तमानपत्राची पानं रक्तानं माखलेली असतात आणि लोक मदतीचा हात पुढे करण्याऐवजी मोबाईल सरसावून 'शूटिंग' करण्यात धन्यता मानतात, तो समाज खरोखर जिवंत राहिलाय की आपण केवळ एका हिंसक बजबजपुरीत जगत आहोत, असा प्रश्न पडतो. या सर्व घटना वाचल्या, पाहिल्या की अंगावर काटा येतो आणि मनात प्रश्न निर्माण होतो की, मुळात सध्या माणसांमध्ये एवढी क्रूरता आणि टोकाची असंवेदनशीलता वाढलीच का आहे? माणसाच्या आतला हा 'राक्षस' अचानक एवढा का जागा झालाय?
या क्रूर मानसिकतेचा वेध घेण्यासाठी आपल्याला सर्वात आधी माणसाच्या बदलत्या मानसशास्त्राकडे आणि त्याच्या रोजच्या जगण्याकडे वळावं लागेल. आधुनिक मानवी जीवन हे अत्यंत वेगवान, स्पर्धात्मक आणि अनाकलनीय मानसिक तणावाने भरलेलं आहे. आजचा माणूस सतत एका अदृश्य दबावाखाली जगतो आहे. मानसशास्त्रीय भाषेत सांगायचं तर, माणसाची 'इंपल्स कंट्रोल' म्हणजेच स्वतःच्या तीव्र भावना आणि तात्कालिक राग नियंत्रित करण्याची क्षमता कमालीची खालावली आहे. पूर्वीच्या काळी मानवी मनात निर्माण होणाऱ्या रागाला किंवा आक्रोशाला वाट करून देण्यासाठी कौटुंबिक संवाद, जिव्हाळ्याचे मित्र किंवा सामाजिक बंधनांचं एक भक्कम सुरक्षा कवच असायचं. आज ते कवच गळून पडलं आहे आणि त्याची जागा कमालीच्या एकाकीपणाने आणि आभासी जगाने घेतली आहे. त्यामुळे अगदी क्षुल्लक कारणंसुद्धा माणसाला थेट हिंसक बनवण्यासाठी 'ट्रिगर' करत आहेत. लोकल ट्रेनमधील ती हत्या याचंच जिवंत आणि भयानक उदाहरण आहे. दरवाजा बंद करण्यासारख्या अगदी किरकोळ कारणावरून एखाद्याचा थेट जीव घेण्यापर्यंत माणसाची मजल जाते, याचा अर्थ असा की, तो राग केवळ त्या दरवाजापुरता मर्यादित नव्हता. तो राग त्या व्यक्तीच्या आत साठलेल्या वर्षानुवर्षांच्या वैफल्याचा, असंतोषाचा, अपमानाचा आणि आर्थिक-सामाजिक असुरक्षिततेचा एक सुप्त ज्वालामुखी होता, जो एका क्षुल्लक कारणाने अचानक भडकला आणि समोरच्या निष्पाप प्रवाशाचा बळी घेऊन गेला.
या हिंसेचं मूळ शोधताना जेव्हा आपण त्या पाच वर्षांच्या चिमुरड्याचा व्हिडिओ पाहतो, तेव्हा तर पायाखालची जमीनच सरकते. पाच वर्षांचं मूल क्रूर कसं असू शकतं? मुलांचं मन तर मातीच्या ओल्या गोळ्यासारखं असतं, मग त्यात ही हिंसेची विषवल्ली कुठून आली? आज आपली मुलं ज्या पर्यावरणात आकार घेत आहेत, ते पर्यावरणच हिंसेनं माखलेलं आहे. लहान मुलं जे पाहतात, तेच शिकतात. आज आपल्या अवतीभवतीच्या आभासी विश्वात म्हणजेच व्हिडिओ गेम्समधील 'व्हर्च्युअल किलिंग', ओटीटी प्लॅटफॉर्मवरील हिंसक आणि अश्लील चित्रपट, सोशल मीडियावरील प्रक्षोभक रील्स आणि घरातल्या मोठ्या माणसांच्या वर्तनातील आक्रमकता या सगळ्यातून मुलांवर हिंसेचे नकळत संस्कार होत आहेत. जेव्हा एखादं लहान मूल हिंसक बनतं, तेव्हा ते केवळ त्या मुलाचं वैयक्तिक अपयश नसतं, तर ते समाज म्हणून आपण त्याला दिलेल्या वातावरणाचं अपयश असतं. कौटुंबिक पातळीवर मुलांशी असलेला संवाद संपत चालला आहे आणि त्यांची जागा गॅजेट्सनी घेतली आहे. भावनांची निरोगी देवाणघेवाण न झाल्यामुळे लहान वयातच मुलांमध्ये सहानुभूती म्हणजेच 'एम्पथी' निर्माण होत नाही. समोरच्याला होणाऱ्या वेदनेची जाणीवच जर नष्ट झाली, तर क्रूरता जन्माला येते आणि नेमकी हीच सहानुभूतीची कमतरता आजच्या प्रौढांमध्येही प्रकर्षाने जाणवत आहे.
लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवालच्या हत्येची घटना तर मानवी नात्यांच्या झालेल्या नैतिक अधःपतनाचा ढळढळीत आणि काळजाला घरे पाडणारा पुरावा आहे. सिया नावाच्या त्या मुलीने केवळ स्वतःचं तथाकथित प्रेम मिळवण्यासाठी किंवा घरच्यांनी ठरवलेलं लग्न टाळण्यासाठी एका निष्पाप जीवाची हत्या केली. तिने विचार केला की, लग्न केलं तर घराची बदनामी होईल, मग त्यापेक्षा थेट खून केलेला बरा! हा किती बिनडोक, विकृत आणि राक्षसी विचार आहे! खून केल्यावर बदनामी होणार नाही का? पण इथे मुख्य मुद्दा बदनामीचा नाहीच, तर बदलत चाललेल्या जीवनमूल्यांचा आहे. आज प्रेम, लग्न, नातेसंबंध हे आत्मिक किंवा भावनांचे राहिले नसून ते निव्वळ एक 'करार' किंवा स्वार्थाचा 'व्यवहार' बनून राहिले आहेत. ‘माझ्या सुखाच्या आड जे जे येईल, ते मी संपवून टाकेन,’ ही आत्मसंतुष्ट आणि आत्मकेंद्री मानसिकता आजच्या पिढीत वेगाने वाढत आहे. तसेच व्यसनाधीनतेमुळे मानवी मेंदूवरील ताबा सुटून विवेकबुद्धी नष्ट होते, ज्यामुळे छोट्या वादांचेही रूपांतर मोठ्या गुन्ह्यांत होते. मात्र, दारू हे केवळ एक निमित्त असून, अशा हिंसेचं खरे मूळ माणसाच्या मनात दडलेल्या सुप्त क्रूरतेतच असतं.
अशा घटना घडल्या की, आपण तात्काळ 'कायद्याचा धाक नाही' म्हणून ओरड करतो. पण खरंच प्रश्न फक्त कायद्याच्या अस्तित्वाचा आहे का? आपल्याकडे कायदे आहेत, पण त्यांच्या अंमलबजावणीतली संथ गति आणि गुन्हेगारांना मिळणारी न्यायालयीन सवलत गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालते. कायद्याच्या प्रक्रियेत पडल्यावर होणारा मनस्ताप, पोलिस स्टेशनच्या फेऱ्या आणि सुरक्षेची नसलेली हमी यामुळे सामान्य माणूस साक्षीदार व्हायला घाबरतो. कायद्यातील ही गुंतागुंत प्रत्यक्षदर्शींना 'मूक प्रेक्षक' बनण्यास प्रवृत्त करते. जोपर्यंत गुन्हा घडत नाही, तोपर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची कोणतीही भक्कम यंत्रणा आपल्या कायद्यांकडे नाही. कायद्याचे हात लांब असतात असे म्हणतात, पण ते वेळेवर गुन्हेगाराच्या गळ्यापर्यंत पोहोचत नाहीत, हीच खरी शोकांतिका आहे.
आजच्या समाजाची सर्वांत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे त्याची 'मूक प्रेक्षक' अवस्था; जिथे लोक संकटात सापडलेल्याला मदत करण्याऐवजी मोबाईलवर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्यात धन्यता मानतात. गर्दी असूनही कोणावर होणारा अन्याय किंवा हिंसा थांबवण्याऐवजी केवळ 'शूटिंग' करण्यापुरतीच मानवी संवेदनशीलता मर्यादित राहिली आहे. रक्षण करणं किंवा मदत करणं तर दूरच, पण दुसऱ्याच्या वेदनेचा हा जो एक 'तमाशा' बनवला गेला आहे, तीच खरी बजबजपुरी आहे. मानसशास्त्रात याला 'बायस्टँडर इफेक्ट' म्हणतात म्हणजेच, ‘माझ्या व्यतिरिक्त इतरही लोक तिथे आहेत, मग मीच कशाला पुढे जाऊ? कोणीतरी दुसरे मदत करेल,’ असा विचार करून प्रत्येक जण मागे सरकतो आणि शेवटी कोणाचीच मदत मिळत नाही. ही उदासीनता माणसाला एकाकी पाडत आहे आणि गुन्हेगारांचं धाडस वाढवत आहे. त्यातच, अशा भयंकर प्रसंगी समोर येणारी भीती माणसाच्या वर्तनावर पूर्णपणे हावी होते; स्वतःच्या सुरक्षेची चिंता विवेकबुद्धीला ग्रासून टाकते आणि माणूस हतबल बनतो.
या सर्व विदारक परिस्थितीकडे जर आपण केवळ एक सामाजिक समस्या म्हणून न पाहता वैचारिक आणि दार्शनिक पातळीवर पाहिलं, तर लक्षात येतं की आपण 'मूल्यशून्यतेच्या' एका भयंकर गर्तेत अडकलो आहोत. आजचा माणूस बाह्य जगाशी 'कनेक्टेड' असूनही आतून प्रचंड 'डिस्कनेक्टेड' झाला आहे. आपण अशा एका चंगळवादी संस्कृतीचे गुलाम झालो आहोत, जिथे प्रत्येक गोष्टीचं, माणसाच्या भावनांचं आणि अस्तित्वाचंही मूल्य केवळ त्याच्या उपयुक्ततेवरून ठरवलं जातं असं एक फ्रेंच तत्ववादी त्यावेळीच म्हणून गेला आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंवा व्यक्ती आपल्या सुखाच्या आड येते, तेव्हा तिला बाजूला करणं किंवा नष्ट करणं हाच या व्यवहारी जगातला अंतिम पर्याय समजला जात आहे हेच सध्याचं चित्रं आहे. आपण 'अस्तित्ववाद' एवढा चुकीचा समजून घेतला आहे की, ‘माझं स्वातंत्र्य' म्हणजे 'समोरच्याच्या अस्तित्वाचा बळी' हा राक्षसी विचार आज प्रगत मानला जाऊ लागलाय. विचारवंत ओशो यांनी म्हटलं होतं की, ‘जेव्हा समाजात प्रेम कमी होतं, तेव्हा कायद्याची गरज वाढते.’ पण आज कायदा असूनही तो हतबल ठरतो आहे, कारण आपण माणसाच्या विवेकबुद्धीला आणि त्याच्या आतील 'नैतिक आवाजालाच' मारून टाकलं आहे. भौतिक सुखाच्या आणि तंत्रज्ञानाच्या अंधाधुंद शर्यतीत धावताना आपण प्रगतीचे चकचकीत कपडे तर परिधान केले, पण संवादाचा ओलावा गमावून बसल्याने आपल्या आत्म्याचं कुपोषण झालं आहे. खऱ्या संस्कृतीचं मोजमाप गगनचुंबी इमारतींवरून नव्हे, तर समाजातील शेवटच्या माणसाला मिळणाऱ्या सुरक्षितता आणि आदरावरून होते, ज्याकडे दुर्लक्ष केल्याने आपली आधुनिक संस्कृती आतून पूर्णपणे सडली आहे.
नैतिक मूल्यांची जी चौकट पूर्वी समाज आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवायची, ती चौकट आपण 'स्वातंत्र्य' आणि 'आधुनिकता' यांच्या नावाखाली मोडून टाकली. त्याचेच हे दुष्परिणाम आज गुन्हेगारीच्या आणि क्रूरतेच्या रूपाने आपल्या समोर येत आहेत. कायदे बदलतील, पोलिस बदलतील, सरकारे बदलतील... पण जेव्हा लोकलच्या डब्यात शेजारी बसलेल्या माणसाच्या डोळ्यातला राग अनावर होतो, तेव्हा त्याला रोखणारा कायदा तिथे हजर नसतो; तिथे फक्त आपण असतो. ज्या समाजात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाला वाचवण्याऐवजी त्याचा व्हिडिओ काढणारे हात जास्त सरसावतात, त्या समाजाला खरोखरच 'प्रगत' म्हणायचं का? आज लोकलमध्ये तो अनोळखी तरुण होता, लोहगडवर केतन होता... उद्या या गर्दीत किंवा त्या कड्यावर आपलं कोणीतरी असेल, तेव्हाही समाज असाच कॅमेरा चालू ठेवून उभा राहणार आहे का? विचार करा, कारण आपण फक्त कॅमेरा सुरू ठेवलाय... आणि माणूस म्हणून जगण्याची पात्रता मात्र हळूहळू बंद करत चाललोय!
krantip183@gmail.com