संदेश ढगेचा ‘नवा संग्रह’

आपला पाचवा कविता संग्रह येऊनही त्याचा प्रकाशन समारंभ व्हावा किंवा त्याचा गवगवा होण्यासाठी , पुरस्कार मिळण्यासाठी काही लॉबिंग बिबिंग करावं यात अजिबात स्वारस्य नसलेला, म्हटलं तर स्वतःबद्दल अत्यंत उदासीन असलेला संदेश ढगे याच्यासारखा कवीही याच काळात जगतो आहे.
संदेश ढगेचा ‘नवा संग्रह’
संदेश ढगेचा ‘नवा संग्रह’
Published on

महेश्वरी

डॉ. महेश केळुसकर

आपला पाचवा कविता संग्रह येऊनही त्याचा प्रकाशन समारंभ व्हावा किंवा त्याचा गवगवा होण्यासाठी , पुरस्कार मिळण्यासाठी काही लॉबिंग बिबिंग करावं यात अजिबात स्वारस्य नसलेला, म्हटलं तर स्वतःबद्दल अत्यंत उदासीन असलेला संदेश ढगे याच्यासारखा कवीही याच काळात जगतो आहे.

आपल्या नावावर एखाद दुसरं पुस्तक असलं तरी चालतं. आपण तसे लेखकबिखक नसून असलोच तर बोरूबहाद्दर आहोत ,या उघड सत्याशी संबंध नसला तरी चालतं. पण जर आपली सत्तेशी जवळीक असली, पुढे पुढे करण्याची सवय असली आणि अत्यंत निर्लज्जपणे कुठल्याही कार्यक्रमात आपल्या आत्मचरित्रात्मक मजकुराला आपल्या फालतू भाषणांमधून वाट देण्यात अडचण नसली तर आपण एखाद्या साहित्य मंडळाचे अध्यक्ष बिध्यक्षही होऊ शकतो किंवा थोडेफार प्रयत्न केले तर शंभराव्या किंवा एकशे एकाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होऊ शकतो. दिवसच तसे आले आहेत सध्या. सुमारांचा बेसुमार सुकाळ असं या काळाचं वर्णन करावं लागेल.

पण आपला पाचवा कविता संग्रह येऊनही त्याचा प्रकाशन समारंभ व्हावा किंवा त्याचा गवगवा होण्यासाठी , पुरस्कार मिळण्यासाठी काही लॉबिंग बिबिंग करावं यात अजिबात स्वारस्य नसलेला, म्हटलं तर स्वतःबद्दल अत्यंत उदासीन असलेला संदेश ढगे याच्यासारखा कवीही याच काळात जगतो आहे. आहेत. असेही अपवाद आहेत.'नवा संग्रह' असं त्याच्या पाचव्या कविता संग्रहाचं शीर्षक असून तो 'संवेदना प्रकाशन'ने काढला आहे. रवींद्र दामोदर लाखे या आपल्या ज्येष्ठ कविमित्राला हा संग्रह संदेशने अर्पण केला आहे‌.

अद्भुताकडे झुकणारी स्वैर कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि धारदार उपहास ही सदानंद रेगे यांच्या कवितेची गुणवैशिष्ट्ये होती‌. तर अरुण कोलटकर यांनी 'ग्राफिक डिझाईन'मधली आपली प्रातिभिक शक्ती कवितेसाठीही वापरून रोजमर्रा जिंदगीचे वेगळे तुकडे आणि आपले अध्यात्मिक अनुभव यांचं मिश्रण करून मराठी कवितेला १९७० च्या दशकात नवीन वळण दिलं. संदेश ढगे यांच्या कविता वाचत असताना मला रेगे आणि कोलटकर यांची एकत्रित आठवण येते. ' नवा संग्रह ' च्या मलपृष्ठावर जी कविता छापलेली आहे ती तशी 'मीटर' मध्ये नव्हती. तर एके दिवशी बोलता-बोलता संदेशने त्या कवितेचं स्क्रिप्ट मला दिलं आणि 'ही कविता मीटरमध्ये करून मिळाली तर बरं होईल, असं म्हणाला. मुक्तछंदावर कमांड असलेला एखादा कवी जेव्हा आपली एखादी कविता मीटरमध्ये असावी, अशी इच्छा धरतो तेव्हा त्याच्याही मनात आपली मूळं शोधण्याची धडपड असणारच की ! तर ह्या कवितेमधील पुढच्या चार ओळी बघा:

पोट केले वेगळे आहे छिनाल भुकेपासून

शोकेशीमध्ये स्वप्न, स्वच्छ घासून- पुसून

इतके करून मिळेल का हो शब्दांमधून काही ?

कमरेपर्यंत पुरून घेतले, फांदी फुटत नाही..!

दुःखाचा, वेदनेचा गळा पकडण्यासाठीची ही जी आर्तता आहे, तीच संदेश ढगे यांच्या कवितेची ताकद आहे. मूळात ते दु:ख तरी पीवर आहे का? दु:खाचाही निर्गुण निराकार अनुभव कोणाला येतो का? येत असणार. तसं नसतं तर आरती प्रभूंनी ही अवस्था लिहून ठेवली नसती. अनुक्रमणिकेच्या आधीच्या पानावर , आपल्या कवितेची वाट दाखवताना संदेश ढगे यांनी आरती प्रभू यांच्या दोन ओळी उद्धृत केल्या आहेत. त्या अशा :

दुःख ना आनंदही अन् अंत ना आरंभही

नाव आहे चाललेली कालही अन् आजही

मी सुरुवातीला म्हटलं तसं अत्यंत किरकोळ आणि क्षुल्लक गुणवत्ता असलेल्यांचा उदो उदो होण्याचा हा काळ आहे आणि समाजाच्या आकलनाचाही निर्देशांक म्हणून त्याकडे बोट दाखवता येईल. झटपटपणाला दाद देण्याची, प्रतिष्ठा देण्याची ही लोकांची वृत्ती या कवीला खटकते आणि तो म्हणतो:

या कागदावर

मी असे काही खरडले, की

तुमच्या बुब्बुळांना, दिसलेल्या नक्षीलाच

तुम्ही 'व्वा !'बोलत सुटलात

मी फक्त, भूतकाळातल्या गिचमिडीचा

सोडला योग्य समास, तर भविष्याने राखून ठेवले

इवले कोरे पान

कवीच्या भूतकाळाच्या समासात खूप गोष्टी आहेत-- वारसा हक्काने वडिलांकडून मुलाकडे चालत आलेलं व्यसन, काळाने किडनॅप केलेलं बालपण, काळोख फासून रंगरंगोटी केलेल्या रात्री, शिक्षणाचा माज करताना घरच्यांना दिलेला त्रास.. आणि असं बरंच काही. या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टी. पण त्यांचं स्मरण आजही तीव्र वेदना देणारं‌ . जन्मापासून मरणापर्यंत मधल्या काळात सेकंद काट्यासारखा अविरत गरगरत राहिलेल्या आणि १२० बोटे फुटल्यागत स्वप्नांना सलत राहिलेल्या कवीच्या या कविता आहेत. 'शय्येवरील बाबा' आणि 'आई बाथरूम मध्ये पडली' या दोन अप्रतिम कविता या संग्रहात आहेत. नातेसंबंधातील आर्तता कवीनं या कवितांमधून काव्यात्म केली आहे.आई म्हातारी झाल्यावर कधीतरी एकदा न्हाणीघरात पडते आणि या साध्या घटनेला कवी एका वेगळ्या दार्शनिक पातळीवर नेतो. संपूर्ण भारतीय स्त्री समाजाचं भागधेय चार ओळीत सांगताना म्हणतो:

आधी चाचपडली

मग पडली

नव्हताच तिला आधाराचा उ:शाप

फक्त खोक कपाळावर

कुंकवाऐवजी साकळलेल्या रक्ताची.

निदान प्रत्येक कवीनं वाचण्यासारखी आणखी एक कविता म्हणजे ' कुणाच्या चुकीमुळे मेलाय कवी'. यामध्ये उपरोध आणि उपहासाचं जे उपयोजन कवीने केलेलं आहे ते पाहून संदेश ढगे यांनी स्वतःच्या आणि एकंदरीतच कवितेच्या निर्मिती बाबत दीर्घकाळ चिंतन केलेलं असणार यात शंका नाही. " मग मी चिंतन करून मळकट मनाला पुन्हा पुन्हा माझ्या लेखनात यायला भाग पाडतो, " असं आपल्या मनोगतात खुद्द कवीनंच म्हणून ठेवलंय.या कवितेत कवी म्हणून आपण चिरंतन असल्याचा दावा कवी करत आहे आणि व्यवस्था किंवा सरकार हे तसं तात्कालीक असलं तरी त्यांच्या दृष्टीने कवी हे प्रकरण फारसं दखल घेण्याजोगं नाही, इकडे कवी लक्ष वेधतो.

हा कवी आडवा तिडवा वाढलेला आहे आणि म्हणूनच त्याच्या कवितेमध्ये आखीव रेखीव किंवा चौकटीला अपेक्षित असे अनुभव येत नाहीत. प्रत्येक माणसात जसं देवत्व आणि पशुत्व असतं तसंच ते कविमध्येही असतं आणि हा जो संघर्ष होतो, घालमेल होते, त्याच्याच रचना होतात असं संदेशचं म्हणणं आहे. साहित्यातल्या राजकारणाची आणि चमकोगिरीची पूर्ण कल्पना या कवीला आहे. पण हे सगळं टाळून आपल्याला दिलासा देणारे , शब्दच अधिक प्रिय आहेत, असा अभिप्राय कवी व्यक्त करतो आणि शेवटी म्हणतो :

या वेड्या शब्दांचा आकार

पुस्तकात न मावणारा असेल

तर ओसंडून वाहू द्या ना

पुस्तकाबाहेर सांडू दे खुल्या जगात.

ज्येष्ठ कवी आणि लेखक

aheshkeluskar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in