चमचेपुराण

घरातल्या अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. आज अशाच आपल्या स्वयंपाकघरातल्या धावपळ करणाऱ्या चमच्यांच्या दुनियेत डोकावूया.
चमचेपुराण
चमचेपुराण'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

प्रासादिक म्हणे

प्रसाद कुळकर्णी

घरातल्या अगदी रोजच्या वापरातल्या वस्तूंकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. आज अशाच आपल्या स्वयंपाकघरातल्या धावपळ करणाऱ्या चमच्यांच्या दुनियेत डोकावूया.

आज आपण खादाडीवरचं लक्ष थोडं बाजूला सारून, खादाडीसाठी लागणाऱ्या चमच्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

आता, चमच्यांच्या इतिहासात शिरायचं, तर प्राचीन इजिप्शियन लोकांनी वापरलेल्या विविध प्रकारच्या चमच्यांच्या जतन केलेल्या उदाहरणांमध्ये हस्तिदंत, चकमक दगड, स्लेट आणि लाकूड यांपासून बनवलेल्या चमच्यांचा समावेश आहे. त्यापैकी अनेकांवर धार्मिक चिन्हं कोरलेली आहेत. चीनमधील सुरुवातीचे कांस्य चमचे टोकदार बनवले जात होते, तर रोमन लोकांचे चमचे प्रामुख्याने कांस्य आणि चांदीचे बनवलेले होते आणि त्यांची मूठ सहसा टोकदार दांड्याच्या स्वरूपात असे. घरगुती वापरासाठी असलेले मध्ययुगीन चमचे सामान्यतः गाईच्या शिंगाचे किंवा लाकडाचे बनवलेले असत, परंतु सुमारे १५ व्या शतकात सामान्यतः पितळ, प्युटर आणि लॅटेनचे चमचे होते असं दिसतं. चमच्यांचा थोडाफार इतिहासा जाणून आता आपण पुन्हा एकदा वर्तमान काळात येऊया.

आपल्या घरातल्या, कप बशा स्टॅंडच्या दोन्ही अंगाने चमच्यांच्या रांगा झुलत असतात. यात मोठ्ठ्या चेहऱ्याचे, लांबट उभ्या चेहऱ्याचे, काही वाटोळे तर काही चपट्या तोंडाचे. उंचीही प्रत्येकाची वेगळी. छान तेजस्वी बांधेसूद रूप.

भातवाढणी, डाव, ओगराळी, उलथनी ही यांच्याच जातीमधली ज्येष्ठ मंडळी या लिंबू टिंबूना आपल्याजवळ फिरकू देत नाहीत. अगदी चुकुन आलाच एखादा, तर ढकलून देतात की काय कोण जाणे, पण टण् कन् पडतो खाली आणि आपली जागा चुकल्याचं त्याच्या लक्षात येतं.

चमच्यांच्या नशिबी असणारे मोकळे झोके या ज्येष्ठांच्या वाट्याला मात्र येत नाहीत. त्यांची घरंही आडवी. स्वयंपाक झाला जेवणं आटोपली की नळाखाली आंघोळ करून आणि स्वच्छ कोरडं होऊन एकमेकांसोबत आडवं व्हायचं. चमच्यांचं तसं नसतं. त्यांची चिमणीची आंघोळ झाली, अंग कोरडं झालं की आपापल्या अंगाच्या जागेत स्वतंत्रपणे छान लटकून बसायचं. कधी पाहुणे आले, की अधिक साठ्यातले चुलत चुलत, मावस, मामे बंधू बाहेर येतात, काही वेळापुरतं चमचेगिरी करून पुढे पुढे करायला. आणि मग काही वेळ तरी प्रायव्हसी बाजूला ठेवून, एकेका जागेत दोघा दोघांना खेटून लटकायला लागतं, तेव्हढाच काय तो त्रास. तिथेही या पाहुण्यांची जागा पुढे असते, पण ती ही थोड्या वेळासाठी. पुन्हा त्यांना आतच जायचं असतं.

प्रत्येकाची जबाबदारी, कामाची गरज मात्र वेगवेगळी. मोठ्या चेहऱ्याचे लंबाडे कोशिंबीर, पचडी, श्रीखंड वाढायला, तर लांबट उभ्या चेहऱ्याचे पोहे, खिचडी, शिरा, उपमा यापासून ते खीर, आमरस, सूप यासारखे पातळ पदार्थ खायला, खीर आमरस किंवा कोणत्याही पातळ पदार्थात साखर अथवा तत्सम काही मिसळलं, तर ते टणन् टणन् टणन् आवाज करत विरघळवण्यासाठी, महत्वाच्या कामाला निघालेल्या घरातल्या व्यक्तीच्या हातावर अगदी प्रेमाने दही ठेवण्यासाठी. पानावर चटणी, लोणचं वाढण्यासाठी इथपासून वेळेला स्क्रूड्रायव्हर सारखा उपयोग करून कीचनमधल्या हाताच्या तव्याचे, किंवा एखाद्या हाताच्या पॅनचे सैल झालेले स्क्रू घट्ट करण्यासाठी इथपर्यंत उपयोग होत असतो. टिफीनसोबत आत बसून, ऑफिसमध्ये सुद्धा पोहोचतात. अनेकदा तर एकमेकांत घट्ट बसलेली भांडी, वाट्या मोकळ्या करण्यासाठीही यांचा पुरेपूर उपयोग होतो.

श्रीखंड, आइसक्रीम, दही, घट्ट लस्सी खाण्यासाठी चपट्या तोंडाच्या चमच्यांची योजना असते. त्याचबरोबर पानावर तूप वाढायला, पावाला लोणी, मस्का फासायला, चहा कॉफी, दूध, यामध्ये घातलेली साखर ढवळायलाही हे उपयुक्त असतात. पूर्वी लग्नात रिसेप्शनला आइसक्रीम असे, आणि प्लेटमधील तो चौकोनी काप खायला सोबत हे चपट्या तोंडाचे चमचे. यांची देहयष्टी तशी पीचपीचीत आणि अगदीच किरकोळ. शरीराला ना रूप ना गोलाई ना सुदृढ बांधा. सगळ्या बाजूंनी तीक्ष्ण धारधार रूप. पांढऱ्याशुभ्र मिठाच्या डब्यात हाच रुतून बसलेला असतो. दुधाच्या भांड्यातली खरपुड खरवडून खायला याच्याशिवाय पर्याय नाही.

मसाल्याच्या भांड्यातल्या चमच्याचं रूपच वेगळं. निमुळता लांबट गोल चेहरा आणि निमुळतं शरीर. पदार्थांना झणझणीत चव देणाऱ्या या गरम डोक्याच्या सोबत्यांसोबत हा अगदी रुबाबात नांदतो. सगळ्यांमध्ये अजिबात मिसळून न जाता, मोजून मापून आणि जेव्हढ्यास तेव्हढं राहून स्वतःचं अस्तित्व जपून असतो. याची मूर्ती लहान पण नेमक्या मापाने पदार्थात प्रत्येकाला टाकत आपलं काम अगदी चोख बजावतो बेटा. याच्या भाळी स्वच्छ, चकचकीतपणा नाही. लाल पिवळ्या रंगात कायम न्हालेला असतो. मसाल्याच्या डब्यासोबत अधूनमधून आंघोळ घडते आणि तेव्हढ्यापुरता काही वेळ मूळ रुपात येतो.

चहा साखरेचे छोट्या चणीचे, आणि कीलवरच्या आकाराचे चमचे. यांचंही मसाल्याच्या चमच्यासारखं डब्यात बंदिस्त आयुष्य. नशिबी मोकळ्यावर लटकत रहाण्याचं, मोकळा श्वास घेण्याचं सुख नाही. डबा उघडला की तेव्हढ्यापुरतं काय ते बाहेरचं जग बघेपर्यंत पुन्हा आपला बंदिवास. साखरेच्या चमच्याला तरी पांढऱ्या शुभ्र गोडव्याचा सहवास आणि बाहेर आल्यावर चहा कॉफिमध्ये जाताना फारसे चटकेही बसत नाहीत. शिवाय प्रत्येक पदार्थाला चव येण्यासाठी साखर पेरणी सुरूच असते याची. मंगल कार्याचं निमंत्रण घेऊन आलेल्याच्या हातावर साखरेचे दाणे ठेवल्याशिवाय हा जाऊ देत नाही त्याला.

रूपा गुणांनी वेगळे असले, तरी बहुसंख्यांक या वर्गात मोडणारे हे चमचे, दिवसभर आपापल्या कामात अगदी मग्न असतात. कुणी दह्याच्या सटात, कुणी तुपात बुडलेला तर कुणी तेलाने माखलेला, कुणी कोशिंबीर चटणीमध्ये लडबडलेला तर कुणी रुबाबात इतरांकडे पहात आंब्याच्या रसात न्हालेला. रिकामा बसलेला अगदी कुणीही नाही.

सहज मनात विचार येतो, की तसं पाहिलं तर ही सगळी लहान थोर चमचे मंडळी, जराही इकडचं तिकडे न करता, कुणाच्या अध्यात मध्यात न पडता, कुणाची हांजी हांजी न करता, आपण बरं आणि आपलं काम बरं या वृत्तीने काम करत रहाणारी. आपलं काम आटोपलं की जराही एकत्र येऊन गॉसिप न करता आपापल्या जागी एकेकटी लटकून रहाणारी. मग मानव जातीत मुखी येणारा चमचेगिरी हा शब्द यांच्या नावाने का पडला असेल बरं?

तर, या सगळ्यांत पूजा धार्मिक कार्य यावेळी सगळ्यांना तीर्थ देण्यासाठी, नेहमी वापरात नसलेला ठेवणीतला बहुधा चांदीचा चमचा, घासून पुसून चकचकीत होऊन, तिर्थाच्या वाटीत विसावतो, आणि अगदी अलगदपणे समोर येणाऱ्या हातावर तीर्थ देऊन पुण्य साठवतो. असं हे चमचे पुराण कायमच आपल्याला मदत करत राहतात हे खरं!

kprasad1959@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in