

अजब निसर्ग
मकरंद जोशी
लाखो वर्षे उलटली, डायनासॉर आले आणि गेले, पृथ्वीचे रूप बदलले; पण काही प्राणी आजही टिकून आहेत! चला, या अद्भुत ‘लिव्हिंग फॉसिल्स’ची रंजक सफर करूया.
गेल्या आठवड्यात याच सदरात निसर्गाचा फ्लॅशबॅक दाखवणाऱ्या फॉसिल्स म्हणजे जिवाश्मांबद्दलचा लेख आठवत असेलच. उत्क्रांतीच्या अवस्था, वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांमध्ये झालेले बदल, आजच्या प्राण्यांचे काही लाख वर्षांपूर्वीचे पूर्वज या सगळ्याची माहिती फॉसिल्समधूनच तर मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘डायनासॉर’. अगदी आपल्या भारतातही ‘डायनासॉर’ होते याचा खात्रीशीर पुरावा त्यांचे जे फॉसिल्स गुजरात आणि हरयाणा येथे सापडले त्यामुळेच मिळाला. प्राणिशास्त्राच्या अभ्यासात फॉसिल्सना त्यामुळेच अतिशय महत्त्व आहे. प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींचे जिवाश्मही आपल्याला भूतकाळातील वेगळ्या, अनोख्या वनस्पतींविषयी माहिती देतात. आता हे फॉसिल्स तर मेलेल्या-नष्ट झालेल्या प्राण्यांचे व वनस्पतींचे असतात; मग काही वेळा ‘लिव्हिंग फॉसिल्स’ अर्थात सजीव जिवाश्म असा शब्दप्रयोग काही प्राण्यांबाबत का केला जातो? हा शब्दप्रयोग थोर शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने पहिल्यांदा केला होता. सजीवांच्या उत्क्रांतीचे कोडे उलगडताना त्याने संशोधन करून लिहिलेल्या ‘ओरिजिन ऑफ स्पेसिज’ या ग्रंथात त्याने हा शब्द वापरला आहे. ज्या प्राण्यांमध्ये हजारो-लाखो वर्षांमध्ये फारसा फरक झालेला नाही, जे आजही त्यांच्या पुरातन पूर्वजांसारखेच दिसतात; थोडक्यात ज्यांच्या बाबतीत जणू उत्क्रांतीची प्रक्रिया मध्येच थांबली आहे अशा प्राण्यांसाठी डार्विनने ‘लिव्हिंग फॉसिल्स’ हा शब्द वापरला होता. मात्र या प्राण्यांच्या बाबतीतही उत्क्रांतीची प्रक्रिया प्रत्यक्षात पूर्णपणे थांबलेली नसते, ती अगदी सूक्ष्मपणे सुरूच असते हे नमूद करायला डार्विन विसरलेला नाही.
अशा प्रकारे अगदी ज्युरासिक काळापासून (किंवा त्याही पूर्वीपासून) ते आजपर्यंत ‘तस्सेच’ राहिलेले प्राणी कोणते? तर यामध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे ‘हॉर्स शू क्रॅब’. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आणि आशिया खंडातील काही सागरकिनाऱ्यांवर आढळणारा हा खेकडा प्रत्यक्षात खरा खेकडा नाही; इतकंच नाही, तर बाकीचे खेकडे ज्या गटात येतात त्या क्रस्टेशियन गटापेक्षा हा खेकडा अष्टपाद कोळी ज्या गटात येतात त्या ‘आर्चनिडे’ गटाशी जास्त मिळताजुळता असतो. डायनासॉरचा अवतार होण्याआधीपासून हॉर्स शू क्रॅब या पृथ्वीवर आहेत, त्यांचे साडेचार कोटी वर्षांपूर्वीचे जिवाश्म सापडले आहेत. त्या जिवाश्मात आणि आजच्या हॉर्स शू क्रॅबमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. निळ्या रंगाचे रक्त असलेल्या या खेकड्यांचा कॅन्सरवरील वैद्यकीय संशोधनात खूप उपयोग झाला आहे. भारतात सुंदरबनच्या खारफुटी रानात तसेच पश्चिम बंगाल, ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर हॉर्स शू क्रॅब आढळतात, जे थेट त्यांच्या लाखो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांसारखेच दिसतात.
डायनासॉरच्या काळापासून अस्तित्वात असलेला आणि आजही पाहायला मिळणारा आणखी एक सजीव जिवाश्म म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या रानात आढळणारा ‘इंडियन पर्पल फ्रॉग’. सुमारे तेरा कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या बेडकाने डायनासॉर युगाचा अंत जसा पाहिला आहे, त्याचप्रमाणे खंडांचे विस्थापनही अनुभवले आहे. वर्तमान काळात हा बेडूक फक्त भारतातल्या पश्चिम घाटातील रानात अर्थात सह्याद्रीच्या रांगांमध्ये आढळतो. त्याचा सगळ्यात जवळचा नातलग मादागास्कर, सेशेल्स या बेटांवर दिसतो. त्यामुळे गोंडवन खंडाच्या काळातला हा जीव आहे आणि खंडांचे विस्थापन झाल्याने तो फक्त भारतात शिल्लक राहिला असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. आश्चर्य म्हणजे तेरा कोटी वर्षे इतका काळ अस्तित्वात असूनही या बेडकाची एक प्रजाती म्हणून शास्त्रीय नोंद २००३ साली करण्यात आली. इतर बेडकांपेक्षा याचा अवतार अगदी वेगळा असतो. एखाद्या रबरी फुग्यात हवा भरावी तसा हा दिसतो. त्याचे एखाद्या तोटीसारखे दिसणारे आखूड नाक चटकन लक्ष वेधून घेते. आपल्या आयुष्याचा जास्तीत जास्त काळ जमिनीच्या खाली घालवणारा हा बेडूक फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम दोन आठवड्यांपुरता जमिनीवर येतो आणि जोडीदाराशी मिलन झाल्यानंतर पुन्हा जमिनीत गडप होतो; त्यामुळे फार क्वचित नजरेस पडतो. या बेडकाचा आवाजही अगदी विचित्र, एखाद्या कोंबडीच्या पिल्लाच्या ओरडण्यासारखा असतो.
शेकडो वर्षे गायब असलेल्या आणि पुन्हा सापडलेल्या लिव्हिंग फॉसिल्सपैकी एक म्हणजे सिलॅकँथ मासा. १९ व्या शतकात या साठ कोटी वर्षांपूर्वीच्या माशाची फक्त फॉसिल्स मिळाली होती; त्यामुळे हा मासा नष्ट झाल्याचा समज होता. मात्र १९३८ मध्ये साऊथ आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर हा मासा मच्छिमारांना मिळाला आणि लिव्हिंग फॉसिल्सच्या यादीत महत्त्वाची भर पडली. गेल्या चाळीस कोटी वर्षांमध्ये या माशात आकार सोडला तर फारसा फरक पडलेला दिसत नाही. अस्थिमाशांच्या गटातील लंगफिशच्या जवळचा म्हणून हा मासा ओळखला जातो. या माशाला एकूण ८ फिन्स म्हणजे पर असतात. प्राचीन काळात या माशाचा आकार १२ ते १६ इंचांपासून सुमारे १५-१६ फुटांपर्यंत वाढत गेल्याचं फॉसिल्समधून लक्षात येतं. आता जगात याच्या दोन प्रजाती आढळतात. त्यांची वाढ साधारण सहा फुटांपर्यंत होते. खोल सागरतळाशी राहणारा सिलॅकँथ सुमारे १०० वर्षे जगतो.
लिव्हिंग फॉसिल्स म्हणून मगर, कासव, शार्क मासे यांच्याही काही प्रजातींचा उल्लेख केला जातो. यांचेही त्यांच्या हजारो वर्षांपूर्वीच्या पूर्वजांशी असलेले थेट नाते ठळकपणे पाहायला मिळते. अंडी घालणारा सस्तन प्राणी म्हणून ओळखला जाणारा प्लॅटिपसदेखील हजारो वर्षे जसाच्या तसा राहिल्याने सजीव जिवाश्म मानला जातो. त्याचप्रमाणे फक्त न्यूझीलंडमध्येच सापडणारे टुआतारा, आफ्रिकेतच मिळणारा आर्डवार्क, चीनमध्ये आढळणारे गिंगो किंवा मेडनहेअर ट्री हे झाड, आफ्रिकेच्या किनाऱ्यावर आढळणारे कोलिकॅन्थ मासे असे मोजके प्राणी लिव्हिंग फॉसिल्स म्हणून ओळखले जातात. यांच्यातील साम्य म्हणजे एकतर यांचे भाईबंद आता जिवंत नाहीत आणि यांच्या भूतकाळातील पूर्वजांसारखीच यांची शरीररचना आहे. सजीव जिवाश्म म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांची यादी फार मोठी नाही, पण या सगळ्यांनी हजारो वर्षांच्या प्रवासात आपल्यात फारसे बदल होऊ दिले नाहीत हेच कदाचित यांच्या इतकी वर्षे टिकून राहण्याचे रहस्य असू शकते.
निसर्ग अभ्यासक व लेखक
makarandvj@gmail.com