तार्किक व्हा, तर्कदोषयुक्त नको

एखादी चर्चा कशी करावी, वादविवाद कसा करावा, याचे काही नियम असतात. युक्तिवाद तर्कसंगत असावा, ही मूळ अपेक्षा असते. कारण तरच योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचता येते. पण ज्यावेळी कोणतेच नियम न पाळता तर्कविसंगत युक्तिवाद केला जातो, तेव्हा केवळ वितंडवाद निर्माण होतो.
तार्किक व्हा, तर्कदोषयुक्त नको
Published on

विशेष

जगदीश काबरे

एखादी चर्चा कशी करावी, वादविवाद कसा करावा, याचे काही नियम असतात. युक्तिवाद तर्कसंगत असावा, ही मूळ अपेक्षा असते. कारण तरच योग्य त्या उत्तरापर्यंत पोहोचता येते. पण ज्यावेळी कोणतेच नियम न पाळता तर्कविसंगत युक्तिवाद केला जातो, तेव्हा केवळ वितंडवाद निर्माण होतो. आजची तरुण पिढी या वितंडवादात अधिक अडकलेली दिसते. समाजमाध्यमांवर याचा अधिक अनुभव येतो. म्हणूनच तर्कविसंगत युक्तिवादाचे विविध प्रकार समजून घ्यायला हवेत.

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील भक्तगणांच्या वाद करण्याच्या पद्धतीचा नीट अभ्यास केला तर लक्षात येते की, ते वारंवार तर्कदोषांचा आधार घेतात. त्यांना खऱ्या अर्थाने सत्यशोधक, तार्किक चर्चा करायची नसते; त्यांचा उद्देश फक्त स्वतःच्या नेत्याला, धर्माला किंवा गटाला वाचवणे हा असतो. म्हणून ते तर्कसमृद्ध उत्तरे देत नाहीत, तर तर्कदोषित उत्तरे देत असतात. त्यामुळेच त्यांच्या उत्तरांमध्ये विवेकाऐवजी भावना, बहुसंख्येचा दबाव, व्यक्तीवर हल्ला, मुद्द्याचे विकृतीकरण आणि चुकीच्या तुलना या गोष्टी दिसतात. हे सर्व तर्कदोष (फॅलसी) ओळखूनच आपण शहाणपणाने चर्चा करू शकतो. भक्तगणांच्या प्रतिक्रियांमधून सर्वसाधारणपणे खालील प्रकारचे तर्कदोष (फॅलसी) दिसून येतात -

ॲड होमिनेम (Ad Hominem) : सोशल मीडियावर जेव्हा कुणी सरकारविरोधी किंवा धर्मांधतेवर टीका करणारा मुद्दा मांडतो, तेव्हा भक्तगण मूळ मुद्द्यावर चर्चा करत नाहीत, तर थेट त्या व्यक्तीवर हल्ला करतात. “तू परदेशी एजंट आहेस”, “तुझ्यात देशभक्ती नाही”, “तूच भ्रष्ट आहेस म्हणून सरकारवर आरोप करतोस”, अशी विधानं याच उदाहरणात मोडतात. या फॅलसीचा मुख्य दोष असा की, व्यक्तीचे गुणदोष तपासून त्या आधारे त्याच्या विचारांची सत्यता ठरवली जाते, जे तर्कशास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे. वादाचा गाभा मुद्द्यात आहे, व्यक्तीच्या भूतकाळात किंवा व्यक्तिगत ओळखीत नाही. पण भक्तगणांना मुद्द्यावर चर्चा करण्यापेक्षा विरोधकाची प्रतिमा कलंकित करणे सोपे वाटते.

व्हॉटअबाऊटिझम (Whataboutism) : हा तर्कदोष भारतीय सोशल मीडियात फार मोठ्या प्रमाणावर दिसतो. सरकारच्या एखाद्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला की लगेच उत्तर येते - “पण काँग्रेसच्या काळात काय झाले?”, “मुघलांनी देश लुटला तेव्हा कोठे होता?” अशा प्रकारे मूळ प्रश्न टाळून भूतकाळातल्या इतर घटनांचा उल्लेख केला जातो. ही पद्धत श्रोत्यांचे लक्ष विचलित करते आणि प्रत्यक्ष प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी टाळते. यातून प्रतिवाद करणारा भक्त स्वतःला सुरक्षित ठेवतो, पण खरी चर्चा पुढे सरकत नाही.

स्ट्रॉ मॅन फॅलसी (Straw Man) : यात विरोधकाचा खरा मुद्दा बाजूला ठेवून त्याचा विकृत अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ, “शिक्षण मोफत असावे”, असे कुणीतरी म्हणाले की, भक्तगण तत्काळ उत्तर देतात, “म्हणजे शिक्षकांनी पगार घेऊ नये असे म्हणायचे आहे का तुला?” मूळ मागणी होती की, शिक्षणव्यवस्थेतील सार्वजनिक गुंतवणूक वाढावी. पण त्याचा चुकीचा अर्थ काढून हल्ला केला गेला. अशा विकृतीमुळे श्रोत्यांना वाटते की, विरोधकाची बाजू मुळात हास्यास्पद आहे, पण प्रत्यक्षात ती चुकीच्या अर्थामुळे हास्यास्पद झालेली असते. सोशल मीडियात ही युक्ती विशेष लोकप्रिय आहे. कारण ती लगेच विरोधकाला ‘देशद्रोही’ किंवा ‘धर्मविरोधी’ ठरवते.

अपील टू ऑथॉरिटी (Appeal to Authority):

तर्काला बाजूला ठेवून एखाद्या नेत्याचे नाव पुढे करणे हा तर्कदोष भक्तगण सतत करतात. “मोदीजींनी सांगितले म्हणजे ते बरोबरच असेल”, “आमच्या गुरूंनी शास्त्र सांगितले म्हणून ते खरे” अशा प्रकारे विचार मांडले जातात. इथे पुरावा किंवा तर्क वापरला जात नाही, तर केवळ अधिकाराच्या स्थानावर असलेल्या व्यक्तीच्या विधानाला अंतिम सत्य मानले जाते. ही पद्धत लोकशाहीच्या चर्चेला मारक ठरते, कारण नेत्याबाबत प्रश्न उपस्थित करणे हेच चुकीचे ठरवले जाते.

बँडवॅगन फॅलसी (Bandwagon) : यात एखाद्या गोष्टीचे सत्य हे किती लोक त्यावर विश्वास ठेवतात यावर ठरवले जाते. “हजारो लोक मंदिरात जातात, म्हणजे देव आहेच”, “कोट्यवधी लोक नेत्याला पाठिंबा देतात म्हणजे तो नेता जे सांगतो ते बरोबर आहे” अशा विधानांचा आधार पुराव्यांवर नसतो, तर फक्त बहुसंख्यांकांच्या पाठिंब्यावर असतो. मात्र तर्कशास्त्रात सत्य हे लोकप्रियतेवर नाही तर पुराव्यावर ठरते. पण भक्तगणांमध्ये हा तर्कदोष ठळकपणे दिसतो. कारण लोकांना गप्प करण्यासाठी बहुसंख्येचा दबाव हा सहजसोपा उपाय असतो.

अपील टू इमोशन (Appeal to Emotion) : फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅपवर चर्चा बहुधा भावनिक होऊन केली जाते. जेव्हा वैज्ञानिक किंवा तर्कसंगत प्रश्न विचारले जातात, तेव्हा भक्तगण उत्तर न देता भावना जागृत करणाऱ्या प्रतिक्रिया देतात. “तू आमच्या धर्माबाबत प्रश्न विचारतोस म्हणजे तू धर्मद्वेषी आहेस”, “सैनिक सीमारेषेवर लढत आहेत आणि तू सरकारवर टीका करतोस?” या प्रकारच्या युक्तिवादात कोणताही विवेक नसतो. विवेकाच्या ऐवजी भावनिक अपराधगंड निर्माण केला जातो. त्यामुळे श्रोते खऱ्या मुद्द्यापासून दूर जातात.

फॉल्स डिलेमा (False Dilemma) : भक्तगण वारंवार असा दावा करतात की, “तू सरकारसोबत आहेस किंवा देशद्रोही आहेस.” अशा विधानात मध्यवर्ती किंवा पर्यायी भूमिका अस्तित्वातच नसते, असे गृहीत धरले जाते. पण प्रत्यक्षात लोकशाहीत विविध मतप्रवाह असतात. म्हणूनच ‘चुकीची कोंडी’ उभा करणारा हा तर्कदोष चर्चा संकुचित करतो आणि जटिल वास्तवाला सोप्या ‘किंवा–किंवा’ चौकटीत बसवतो. या दोषात भक्त ‘हा’ किंवा ‘तो’ असे दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे भासवतात.

स्लिपरी स्लोप (Slippery Slope) : या ‘निसरड्या उतारा’च्या तर्कदोषात एखादी लहान गोष्ट केल्यास लगेच संपूर्ण समाजाचा ऱ्हास होईल असा अतिशयोक्तीपूर्ण दावा केला जातो. “जर मुलींना स्वातंत्र्य दिले तर संस्कृती संपेल”, “जर मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केला तर राष्ट्र तुटेल” अशा विधानांमधून भीती निर्माण केली जाते. ही पद्धत तर्काऐवजी भीतीवर आधारलेली असते. भक्तगण समाजात ‘भीतीचा माहोल’ पसरवण्यासाठी वारंवार हा निसरड्या उताराचा तर्कदोष वापरतात.

चेरी पिकिंग (Cherry Picking) : सोशल मीडियावर भक्तगण नेहमी आपल्या भूमिकेला पूरक असेच निवडक पुरावे पुढे करतात. उदा. “एका ऋषीने विमानाची कल्पना सांगितली म्हणजे संपूर्ण प्राचीन शास्त्र खरं” किंवा “गणपतीला हत्तीचे मुंडके बसवणे ही जगातील सगळ्यात पहिली प्लास्टिक सर्जरी होती”, असे म्हणत त्या काळातील खोट्या कल्पना पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जातात. निवडक पुरावे प्रमाण मानणारी ही फॅलसी अर्धसत्य दाखवते. परिणामी लोक भ्रमित होतात.

पर्सनल इनक्रेड्युलिटी (Personal Incredulity) : यात ‘मला पटत नाही’ असे सांगत म्हणजेच व्यक्तिगत समजुतीचा निकष लावत एखादी गोष्ट नाकारण्याची क्रिया केली जाते. भक्तगणांना जटिल वैज्ञानिक सिद्धांत सहज समजत नाहीत. म्हणून असे सिद्धांत ते सरळ नाकारतात. “बिग बँगमधून एवढे प्रचंड ब्रह्मांड कसे तयार होईल? म्हणून देवानेच हे विश्व निर्माण केले असणार” किंवा “माणसाची माकडापासून उत्क्रांती झाली आहे हे दिसत नाही. कारण अजूनही माकडे अस्तित्वात आहेतच. मग ते खरे कशावरून?” अशा विधानांतून हे स्पष्ट दिसते. येथे स्वतःच्या समजुतीच्या मर्यादा हा नकार देण्याचा आधार बनतो. पण पुरावे हेच विज्ञानाचा आधार असतात, एखाद्या व्यक्तीची समज नाही.

रेड हेरिंग फॅलसी (Red Herring Fallacy) : यात मुद्दा बदलून लक्ष विचलित केले जाते. रेड हेरिंग फॅलसी म्हणजे मूळ प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी चर्चेचे लक्ष पूर्णपणे वेगळ्या, बहुधा असंबंधित मुद्द्याकडे वळवणे. यात प्रतिवाद करणारा भक्त खऱ्या समस्येला थेट उत्तर देऊ शकत नाही किंवा देऊ इच्छित नाही. त्यामुळे तो मुद्द्याशी संबंध नसलेली पण भावनिक किंवा आकर्षक अशी बाजू पुढे आणतो. यामुळे श्रोत्यांचे लक्ष मुख्य विषयापासून दूर जाते आणि चर्चा दिशाहीन होते.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवरील भक्तगण ही पद्धत खूप वापरतात. उदाहरणार्थ, कुणीतरी सरकारच्या बेरोजगारीविषयी पोस्ट टाकली की लगेच प्रतिक्रिया येते - “पण आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास बघ, जगात सर्वात जुनी संस्कृती आपली आहे.” मूळ प्रश्न होता बेरोजगारीवर उपाय काय, पण उत्तरात तो विषय टाळून गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला गेला किंवा एखाद्याने वैज्ञानिक मुद्दा मांडला की, “तुला आपल्या सैनिकांच्या बलिदानाची कदर नाही का?” असे विचारले जाते. येथे विज्ञानाच्या चर्चेला न जुमानता राष्ट्रीय भावनांचा मुद्दा पुढे आणला जातो किंवा एखाद्याने एका धर्माची चिकित्सा करणारी पोस्ट केली की, त्याला उत्तर म्हणून दुसऱ्याच धर्माचे दोष दाखवायचे. म्हणून ‘रेड हेरिंग फॅलसी’ धोकादायक आहे. कारण ती तर्कशुद्ध वाद थांबवते आणि श्रोत्यांना खोट्या दिशेला घेऊन जाते. मूळ प्रश्नाचे उत्तर न देता दुसरा मुद्दा पुढे करून श्रोत्यांना गोंधळवणे ही तिची वैशिष्ट्ये आहेत. या पद्धतीने भावनिक उत्तेजना निर्माण होऊन लोक मूळ प्रश्न विसरतात आणि दोषी पक्ष सुटून जातो.

थोडक्यात, सोशल मीडियावरील भक्तगणांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट दिसते की, त्यांचा मुख्य हेतू सत्यशोधन आणि तत्त्वबोधासाठी वाद करणे हा नसतो. त्याऐवजी त्यांच्या भूमिका नेते, धर्म किंवा विचारसरणी यांचा बचाव करणे किंवा त्यांचे समर्थन करणे हा असतो. त्यामुळे त्यांचे युक्तिवाद पुराव्यांवर, तर्कशुद्धतेवर किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेले न राहता विविध प्रकारच्या तर्कदोषांवर आधारलेले असतात. हे तर्कदोष विविध स्वरूपात दिसतात- कधी व्यक्तीवर थेट हल्ला केला जातो (ॲड होमिनेम), कधी मूळ प्रश्न टाळण्यासाठी भूतकाळातील दुसरे मुद्दे पुढे आणले जातात (व्हॉटअबाऊटिझम), कधी विरोधकाच्या विचाराला विकृत करून खोटा मुद्दा उभा केला जातो (स्ट्रॉ मॅन), तर कधी केवळ नेत्याच्या अधिकारामुळे तो विचार योग्य आहे असे सांगितले जाते (अपील टू ऑथॉरिटी). त्याचबरोबर बहुसंख्येचा दबाव (बँडवॅगन), भावनिक आवाहन (अपील टू इमोशन), फक्त दोनच पर्याय दाखवण्याची पद्धत (फॉल्स डिलेमा), अतिशयोक्तीपूर्ण भीती निर्माण करणे (स्लिपरी स्लोप), निवडक पुरावे दाखवणे (चेरी पिकिंग), स्वतःला पटत नाही म्हणून सिद्धांत नाकारणे (पर्सनल इनक्रेड्युलिटी) आणि मूळ मुद्दा टाळण्यासाठी लक्ष दुसरीकडे वळवणे (रेड हेरिंग) या सर्व पद्धतींनी चर्चा गोंधळवली जाते. या सर्व फॅलसींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वाद जिंकण्याचा आभास निर्माण होतो, पण खऱ्या अर्थाने सत्याजवळ जाणे किंवा प्रश्न सोडवणे घडत नाही.

अशा तर्कदोषांचा परिणाम म्हणून लोकशाहीतील मुक्त चर्चा, वैज्ञानिक दृष्टी आणि विवेकवादी विचार मागे पडतात. भावनिक उकळ्यांमध्ये आणि खोट्या युक्तिवादांमध्ये सत्य हरवते. त्यामुळे अशा फॅलसी ओळखणे, त्यांना शांतपणे उघड करणे आणि मुद्द्यांवर आधारलेली चर्चा पुढे नेणे हीच विवेकवादी समाजाची खरी जबाबदारी आहे. सत्य हे व्यक्तीवरच्या हल्ल्याने, बहुसंख्येच्या दबावाने किंवा भावनिक आक्रोशाने ठरत नाही; ते केवळ तर्क, पुरावे आणि चिकित्सक विचारांनीच उलगडते, हे आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ तेवढे बरे.

jetjagdish@gmail.com

विज्ञान विषयाचे अभ्यासक व अंनिसचे कार्यकर्ते

logo
marathi.freepressjournal.in