वयाच्या शर्यतीतले विजेते

माणूस साधारण शंभर वर्षांपर्यंत जगतो, पण काही प्राणी आणि झाडं त्यापेक्षा कितीतरी जास्त काळ जगतात. कोण जगतं ५०० वर्षं आणि कोण जगतं हजारो वर्षं? चला, पाहूया!
वयाच्या शर्यतीतले विजेते
वयाच्या शर्यतीतले विजेते
Published on

अजब निसर्ग

मकरंद जोशी

माणूस साधारण शंभर वर्षांपर्यंत जगतो, पण काही प्राणी आणि झाडं त्यापेक्षा कितीतरी जास्त काळ जगतात. कोण जगतं ५०० वर्षं आणि कोण जगतं हजारो वर्षं? चला, पाहूया!

वयाची शंभरी पार केलेल्या लोकांच्या बातम्या अधूनमधून प्रसारमाध्यमांवर झळकताना तुम्ही पाहिल्या असतील. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या नोंदीनुसार २०२६ सालात जिवंत असलेली जगातली सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहे युनायटेड किंगडममधील ‘एथेल कटरहॅम’, वयवर्ष फक्त ११६ (एप्रिल २०२६ पर्यंत!). याआधीचा रेकॉर्ड तपासला तर ११५, ११७, १२२ वर्षांपर्यंत जगलेल्या लोकांची यादी मिळते. मात्र पृथ्वीवरच्या सगळ्या जीवसृष्टीत सर्वांत बुद्धिमान ठरलेला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बाकीच्या प्राण्यांना वेठीला धरणारा मानवप्राणी दीर्घायुष्याच्या बाबतीत काहीसा मागेच म्हणावा लागेल. माणूस ज्या गटात येतो त्यात म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये पाहिलं तर हत्ती ७० ते ८० वर्षं, घोडा ६० वर्षं, पोलार बेअर्स ४० ते ४२ वर्षं मजल मारताना दिसतात. आता या सगळ्यांत माणसाचंच आयुष्य जास्त असं वाटलं असेल. पण थांबा, सस्तन प्राण्यांचे काही प्रकार समुद्रातही आढळतात (ज्यांना आपण अनेकदा विसरूनच जातो), तर अशा सागरी सस्तन प्राण्यांनी मात्र आयुर्मर्यादेच्या बाबतीत मानवावर मात केल्याचं लक्षात येतं. आर्क्टिक समुद्रातील बोहेड व्हेल सुमारे २०० वर्षं जगतो. ५० फुटांपेक्षाही लांबीला मोठा असणारा हा व्हेल आपल्या मजबूत डोक्याच्या सहाय्याने चोवीस इंचांचा बर्फाचा थर भेदून बाहेर येतो.

बोहेड व्हेलच्या इतकं दीर्घ आयुष्य जगणारा दुसरा सस्तन प्राणी नसला तरी याबाबतीत त्याचा तगडा स्पर्धक पाहायला मिळतो तो रेप्टाइल्सच्या गटात. गॅलापेगोस टॉरटॉइज हे प्रशांत महासागरातील बेटावरचं कासव आहे, कासवांच्या जगातील आकाराने सर्वांत मोठं असलेलं हे कासव सुमारे चारशे किलो वजनाचं असतं. वयाची शंभरी आरामात पार करणारं हे कासव प्राणी संग्रहालयात पावणेदोनशे वर्षं जगलं आहे. आता याच्या दीर्घायुष्याचं रहस्य याच्या शाकाहारीपणात आहे की दिवसाचे सोळा तास आराम करण्यात आहे हे ठरवणं कठीण आहे. याच म्हणजे रेप्टाइल्सच्या गटातील मगरींचं आयुष्य बघितलं तर नैसर्गिक अवस्थेत ६० वर्षांपर्यंत जगणाऱ्या मगरींनी बंदिवासात मात्र ८०च्या पुढे मजल मारल्याचं दिसून येतं. पक्ष्यांच्या जगात डोकावल्यावर लक्षात येतं की, सर्वांत लांबलचक पंख असलेला अल्बाट्रोस हा पक्षी ३२-३४ वर्षं जगतो, तर व्हाइट टर्न ३५ वर्षं जगतात. लेयसन अल्बाट्रोस वयाचं अर्धशतक पूर्ण करतो, तर आपल्या आकर्षक रंगाने जगाचं लक्ष वेधून घेणारे (आणि म्हणून पाळले जाणारे!) मकाव पक्षी नैसर्गिक अवस्थेत पस्तिशीपर्यंतच मजल गाठतात. मात्र पाळीव पक्षी म्हणून संरक्षित वातावरणात हे पक्षी ८० वर्षांपर्यंत जगतात असं आढळलं आहे.

जमिनीवरून पाण्यात जाऊ तसतशी आयुर्मर्यादा वाढू लागते. अटलांटिक महासागरातील ‘ग्रीनलँड शार्क’ हा मासा पृथ्वीवरील सर्व कणाधारी प्राण्यांमधील सर्वांत जास्त काळ जगणारा प्राणी आहे. एकवीस फुटांपर्यंत वाढणारा हा मासा सुमारे ५०० वर्षं जगतो असं सिद्ध झालं आहे. मात्र या माशाची वाढ अतिशय हळूहळू होत असते, म्हणजे वर्षाला जेमतेम १ सेंटिमीटर इतकाच तो मोठा होतो. आता जगायला हातात पाचशे वर्षं असल्यावर कुणाला वाढायची घाई असेल ना? समुद्रातील आणखी एक दीर्घायुषी जीव म्हणजे ‘कोहोग काम’, म्हणजे ज्यांना आपण तिसऱ्या म्हणतो त्यांचाच एक प्रकार, तर सागरी जीवसृष्टीचाच हिस्सा असलेल्या या शिंपल्यातील जीवाने सागराच्या तळाशी पडून राहून सर्वात जास्त आयुष्य जगण्याचा विक्रम केला आहे. आइसलँड येथील समुद्रात पकडलेल्या अशाच एका ‘काम’चे वय ४०० वर्षांहून जास्त असल्याचं शास्त्रज्ञांनी शोधून काढलं. आता या जिवाचं वय कसं ठरवतात? तर त्याच्या शिंपल्यावर वय वाढल्याच्या खुणा पाहायला मिळतात. झाडाच्या खोडावर अंतर्भागात जशी वर्तुळं असतात तशा खुणा या शिंपल्यावर बाहेर असतात, त्यावरून वयाचा अंदाज लावता येतो. याच सागरी सृष्टीत एक जीव असाही आहे की, ज्याला चक्क ‘अमर’ म्हणूनच घोषित केलं आहे. हा जीव म्हणजे जेलीफिशचा एक प्रकार आहे. टुरिटोपसिस डोर्निल हे त्याचं नाव असलं तरी ‘इम्मॉर्टल जेलीफिश’ म्हणूनच तो ओळखला जातो. जगभरातल्या सागरांमध्ये आढळणारा हा जेलीफिश वयाच्या एका टप्प्यानंतर जणू यू टर्न घेतो आणि पुन्हा लहान होऊन नव्याने परत जगू लागतो. हा जेलिफिश लार्वा रूपात आपल्या आयुष्याची सुरुवात करतो, नंतर ही बाल्यावस्था सोडून तो मोठा होतो. पण मोठेपणी जर त्याला काही दुखापत झाली किंवा भोवतालची परिस्थिती जगण्यासाठी अनुकूल नाही असं वाटलं तर हा जेलीफिश पुन्हा लहान होतो, लार्वा अवस्थेत जातो आणि परत आपल्या आयुष्याला सुरुवात करतो. हा बदल तो कितीही वेळा करू शकतो. त्यामुळे निसर्गामधील एकमेव ‘अमर प्राणी’ म्हणून तो ओळखला जातो.

हालचाल करणारे, पाणी, जमीन, हवा असे सर्वत्र संचार करणारे प्राणीच फक्त लांबलचक आयुष्य जगतात असं नाही, तर एकाच जागी जखडलेले गेलेले वृक्षसुद्धा याबाबतीत मागे नाहीत. साधारणपणे दीड हजार ते चार हजार वर्षं जुनी झाडं जगभरातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आढळतात. झाडांचं वय निश्चित करण्यासाठी रेडिओ कार्बन डेटिंगपासून ते ट्री रिंग्ज म्हणजे झाडाच्या खोडावर उमटणाऱ्या वर्तुळांपर्यंत अनेक प्रकार वापरले जातात. शिवाय सर्वांत जास्त काळ जगलेलं झाड ठरवताना ‘क्लोनल’ म्हणजे ज्या झाडाच्या फांद्यांपासून नवीन झाडं तयार होतात तशी झाडं आणि नॉन क्लोनल झाडं यातला फरकही लक्षात घ्यावा लागतो. सध्याच्या नोंदींनुसार पाइन प्रकारातली दोन झाडं जी अमेरिकेतल्या नेवाडा आणि कॅलिफोर्निया येथे आहेत ती जगातली सर्वांत वयोवृद्ध झाडं मानली जातात. यातील ‘प्रॉमेथिअस’ नावानं ओळखलं जाणारं झाड सुमारे ४९६१ वर्षांचं आहे, तर मेथुसेलाह नावानं ओळखलं जाणारं झाड ४६६९ वर्षांचं आहे, तर क्लोनल प्रकारातील झाडांची सर्वात जुनी वसाहत ऑस्ट्रेलियात असून ती सुमारे त्रेचाळीस हजार वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. किंग्ज लोमाटिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समूहातील झाडं जरी जमिनीवर स्वतंत्रपणे वाढत असली तरी त्यांची मुळे एकमेकांना जोडलेली असतात. अमेरिकेतील अशाच प्रकारचा एक झाडांचा समूह जो ‘पांडो’ नावाने ओळखला जातो तो सोळा ते पस्तीस हजार वर्षं पुरातन असल्याचा अंदाज आहे. पृथ्वीवरच्या इतर सजीव प्राण्यांपेक्षा झाडं खूप आधी इथे अवतरली असल्याने बहुदा वयाच्या शर्यतीत झाडंच जिंकली आहेत असं लक्षात येतं.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in