

विशेष
विकास नाईक
प्रेम सगळ्यांसाठी सारखं असतं असं म्हणतात, पण प्रत्येकाच्या अनुभवात त्याचा अर्थ वेगळाच उमलत जातो.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं” — ही ओळ आपण सहज म्हणून जातो; पण खरंच प्रेम सगळ्यांचं सारखंच असतं का? प्रत्येकाला विचारलं की, ‘काय असतं प्रेम?’ तर प्रत्येक जण आपापल्या अनुभवातून उत्तर देतो. कोणासाठी प्रेम म्हणजे त्याग, कोणासाठी साथ, कोणासाठी आकर्षण, तर कोणासाठी आयुष्यभराची जबाबदारी. मग ते सेम कसं? कदाचित भावना सारखी असावी; पण तिचं रूप, तिचा प्रवास, तिची अभिव्यक्ती प्रत्येकासाठी वेगळी असते. म्हणूनच प्रेम ही एकच संकल्पना असूनही ती हजारो अर्थांनी फुलते.
शाळेतलं प्रेम आठवलं की, मन आपोआप हसतं. निरागस, गोंडस, निष्पाप. काही कळत नसतानाही एखाद्या मुलीने पेन्सिल मागितली तरी हृदय धडधडायचं. ९० च्या दशकात तर मुलामुलींनी एकमेकांशी दोन शब्द बोलणं ही मोठी अचीवमेंट वाटायची. नजरेतून कथा सुरू व्हायच्या आणि बहुतेकदा नजरेतच संपायच्या. ‘आवडतंय’ हे कळेपर्यंत दहावी संपलेली असायची. त्या काळात प्रेमात दिखावा नव्हता, सोशल मीडियाचा गाजावाजा नव्हता, तुलना नव्हती. होती ती फक्त निरागस धडधड. अनेक लव्ह स्टोरीज मनात सुरू होऊन मनातच संपल्या. कुणाला सांगायची हिंमत नव्हती, आणि सांगितलं तरी पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. पण त्या आठवणी आजही गोड वाटतात, कारण त्या स्वच्छ होत्या अगदी सफेद.
कॉलेजमध्ये पाऊल टाकलं की, वेगळंच जग उलगडायचं. गेटमधून आत जाताना भांबावलेले आपण आठवतो का? सगळं इतकं नवीन, इतकं आकर्षक की काय करू आणि काय नको असं व्हायचं. एखाद्या नजरेतून जादू उमटायची, आणि मनात ‘पहला नशा’सारखं काहीतरी वाजायचं. इथे प्रेम म्हणजे काय हे कळो ना कळो, पण आकर्षणाला प्रेम समजण्याची
चूक अनेकदा व्हायची. मेसेज, कॉल, कँटीनमधल्या भेटी, बर्थडे सरप्राईज
हे सगळं प्रेम वाटायचं. पण खरंच ते
प्रेम होतं का? की त्या वयातल्या भावनांचा उफाळा?
नंतर डिग्री संपता-संपता काही नाती घट्ट झाली, काही अर्ध्यावर मोडली. ‘ब्रेकअप’ हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने समोर आला. आज तो शब्द इतका कॉमन झाला आहे की, जणू नात्याचा अपरिहार्य टप्पाच. पण ज्यांनी तो अनुभवला आहे त्यांनाच माहीत तो आतून किती हादरवतो. रात्री झोप लागत नाही, आठवणी त्रास देतात, स्वतःवर शंका येते. तेव्हा प्रश्न पडतो हे खरंच प्रेम होतं का? आणि असेल तर इतक्या सहज संपलं कसं? ज्या व्यक्तीसाठी इतकी धडपड केली, तीच व्यक्ती मिळाल्यावर कंटाळा कसा येतो? प्रेमाची जागा तिरस्कार कसा घेतो?
आज प्रेमापेक्षा ‘रिलेशनशिप स्टेटस’ महत्त्वाचं झालं आहे. नातं जगण्यापेक्षा ते दाखवणं महत्त्वाचं वाटतं. संवाद, संयम, समजून घेणं कमी झालं; अपेक्षा मात्र वाढल्या. वेळ मेसेजला आहे, पण मन ऐकायला नाही.
सध्याच्या प्रेमात ‘मालकी’ वाढली आहे. माझं ऐक, माझ्या मर्जीप्रमाणे वाग. पण प्रेम हे बंधन नसून बंध आहे; नियंत्रण नसून विश्वास आहे. संशय, तुलना, असुरक्षितता यामुळे नातं कमकुवत होतं. छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होतात. ‘तू बदललास’ किंवा ‘तू आधीसारखी राहिली नाहीस’ ही वाक्यं नात्याच्या शेवटाची चाहूल देतात.
पूर्वी प्रेम टिकवण्यासाठी संयम आणि सहनशीलता होती, असं म्हणतात. पण सध्या एखादं नातं जरा डगमगलं की, दुसरा पर्याय सहज उपलब्ध असतो. नातं जपण्यापेक्षा बदलणं सोपं वाटतं. म्हणूनच अनेक नाती हातावरच्या बोटांवर मोजण्याइतकी टिकतात. प्रेमात गुंतण्यापेक्षा ‘मुव्ह ऑन’ हा शब्द जास्त वापरला जातो.
प्रेम संपलेलं नाही; प्रश्न त्याच्या गुणवत्तेचा आहे. नातं टिकतं ते परस्पर आदरामुळे. स्वातंत्र्याचा मान, स्वप्नांचा सन्मान आणि कमतरतांचा स्वीकार यामुळे. कारण प्रेम ही फक्त भावना नाही, ती एक जबाबदारी आहे.
स्वतःवर प्रेम करण्याचाही मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो. आपण दुसऱ्यावर जीव ओवाळून टाकतो; पण स्वतःची किंमत करतो का? स्वाभिमान, मर्यादा आणि गरजांची जाणीव ठेवली तर नातं निरोगी राहतं. स्वतःला स्वीकारलं की, दुसऱ्यालाही मनापासून स्वीकारणं सहज होतं. म्हणूनच प्रेमाची सुरुवात स्वतःपासून करावी लागते.
‘पहिलं प्रेम विसरता येत नाही’ असं म्हणतात. पण कदाचित आपण विसरायचा प्रयत्न करत नाही. योग्य व्यक्ती आली की पुन्हा प्रेम होतं; फक्त नव्या व्यक्तीत जुन्याला शोधू नये. तुलना केली की मिळालेलंही हातातून निसटतं. जुन्या आठवणींना सन्मान द्यावा, पण त्यांना वर्तमानावर हुकूमत करू देऊ नये. प्रेमाला प्रेमच रिप्लेस करतं फक्त त्याला नवा अर्थ देण्याची तयारी हवी.
‘सफेद इश्क’ या संकल्पनेत एक निरागसता आहे. सफेद म्हणजे पारदर्शक, स्वच्छ, कपटविरहित. ‘ना छल, ना कपट, ना भेद’ अशी प्रेमाची कल्पना आहे. आजच्या काळात प्रेमाला पुन्हा तो सफेद रंग द्यायचा असेल, तर दिखावा कमी करून प्रामाणिकपणा वाढवावा लागेल. सोशल मीडियावरच्या घोषणांपेक्षा मनातली शांत खात्री महत्त्वाची आहे. महागड्या भेटींपेक्षा वेळ देणं महत्त्वाचं आहे. शब्दांपेक्षा कृती बोलकी असावी लागते.
आजचं प्रेम तकलादू वाटतं कारण ते अनेकदा क्षणिक आणि सोप्या मार्गाने मिळते. पण जिथे प्रयत्न, संवाद आणि आदर असतो, तिथे प्रेम अजूनही टिकतं.
प्रेमदिन ही फक्त तारीख आहे. प्रेम ही रोज जगायची गोष्ट आहे. प्रेम फक्त स्टेटस नसून संस्कार आहे. आकर्षणापलीकडचं, स्वार्थापलीकडचं, अहंकारापलीकडचं जे काही आहे, ते प्रेम. नात्यांना जपणं, चुकांमधून शिकणं, एकमेकांसोबत वाढणं हेच प्रेमाचं खरं स्वरूप.
शेवटी एकच पुन्हा प्रेम करा. पण सुरुवात स्वतःपासून करा. स्वतःला समजून घ्या, स्वीकारा, सन्मान द्या. मग दुसऱ्यावर प्रेम करणं ओझं वाटणार नाही. प्रेम जर खरंच कळलं, तर ते फक्त एका दिवसापुरतं राहणार नाही; ते आयुष्याचा पाया बनेल. आणि कदाचित तेव्हाच आपण ठामपणे म्हणू शकू हो, आता ‘सफेद इश्क’ खऱ्या अर्थाने उमगलं आहे.
RJ आणि सोशल मीडिया क्रिएटर