

जगतवारी
मेधा आलकरी
आफ्रिकेतील मसाई मारा हे केवळ जंगल नाही, तर निसर्गाच्या रंगमंचावर दररोज घडणाऱ्या अद्भुत नाट्याचं जिवंत संग्रहालय आहे. इथल्या जंगल सफारीत प्रत्येक वळणावर भेटणारे वन्यजीव त्यांच्या मुक्त, स्वाभाविक वावरातून जीवनाचं वेगळंच दर्शन घडवतात.
मसाई मारा येथील तीन दिवसांच्या जंगल सफारीला आम्ही काहीशा कुतूहलाने आलो होतो. प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक निवासात बघायची आमची ही पहिलीच वेळ होती. जंगलातील त्यांचा मुक्त वावर पाहायचा असेल तर पहाट व सायंकाळ या दोन वेळेत जंगलाला भेट द्यावी. दुपारी त्यांची वामकुक्षी चालू असते. आमचा ड्राइव्हर पीटरबरोबर झुंजुमुंजुच्या आधीच जीप कॅम्पबाहेर काढली.
थोडं पुढं जातोय तोच पीटरने ब्रेक मारत गाडी थांबवली आणि इंजिन बंद केलं. त्या धक्क्याने पुढे मागे झालेले आम्ही समोरील दृश्य पाहताच स्तंभित झालो. भरपूर आयाळ असलेला जंगलचा राजा मोठ्या ऐटीत, राजा महाराजांच्या रुबाबात एका झाडाखाली विसावला होता. काळी आयाळ नी ती सिंहकटी, अगदी राजबिंडं रूप! थोड्या दूरवर भेदरून उभी असलेली हरणं पळून न जाता, कान टवकारून त्याच्या दिशेने नुसती टकामका पाहत होती. त्यांच्या शेजारीच चरत असलेल्या मतिमंद झेब्र्यांना अजून सिंहाचा वास आला नसावा. आणखी थोड्या अंतरावर हत्तीही होते. स्वमग्न! त्यांचं ‘एकवीस पातींचा एकच घास’ करणं सुरू होतं. त्यांना सामर्थ्यशाली सिंहाची फिकीर नव्हती. त्या कळपातल्या हत्तींच्या पिल्लांना तर त्या वनकेसरीची चाहूलही लागली नसावी. ती आपली निर्भयपणे आपल्या चिमुकल्या सोंडेने लाडे लाडे करत आपल्या आईलाच घास भरवत होती. थोड्या वेळाने आई त्रासलेली दिसली. तिच्या टपल्या (सोंडेचे फटकारे) सुरू झाल्या. आईचा मूड ओळखून ती पिल्लं शिस्तीत उभं राहून फक्त पुढ्यातलं गवत खाऊ लागली. अजून हा वनकेसरी उठत का नाही? याच्या न्याहारीची वेळ झाली नाही का? की भूक लागली तरच शिकार करायची हा जंगलाचा नियम तो पाळत होता. तेव्हा पीटरने महत्त्वाची माहिती दिली आम्हाला. सिंह क्वचितच शिकार करतो. तीही आकाराने मोठ्या आणि धीम्या प्राण्यांची. रोजच्या जेवणाची, कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी सिंहीणीची. तिच्या अंगी असलेली चपळता आणि सांघिक कौशल्याने शिकार करण्याची क्षमता तिला हा ‘ब्रेड विनर’चा किताब बहाल करते. सिंहाकडे मुख्यत्वे कळपाच्या रक्षणाची जबाबदारी असते.
त्या वनराजाला तिथेच सोडून जीप पुढे निघाली. थोडं पुढं जाताच समोरून एक कुत्रा धावत आल्यासारखं वाटलं. नंतर लक्षात आलं हा तर ‘द्राक्षं आंबट’ म्हणणारा कोल्हा! त्याचाच भाऊबंद वाटावा असा तरस रस्त्यात आडवा आला. एखाद्या वनकन्येला कंचुकी शिवण्याचा मोह व्हावा इतकी सुंदर कातडी असलेल्या तरसाचा चेहरा इतका कुरूप कसा? असा विचार करत असतानाच जीप एका तलावापाशी येऊन थांबली. कोल्ह्याच्या गोष्टीतला करकोचा साक्षात समोर उभा होता. नदीचं पाणी गवतात शिरून तयार झालेल्या डबक्यात उभं राहून, आपल्या लांब चोचीनं माशांचा शोध घेऊन झटक्यात ते गटकावणं चालू होतं. लबाड कोल्ह्यानं बिचाऱ्याला उथळ भांड्यातून खीर खायला दिली होती, या बालपणी ऐकलेल्या गोष्टीची आठवण झाली.
राखाडी-पांढरं शरीर, तपकिरी शेपटी, लाल दाढी, डोळ्यांखाली शुभ्र पांढरा चट्टा, इंग्रजी एस अक्षराच्या आकाराची लवचिक मान आणि मोतिया रंगाचा तुरा असणारा बगळ्याचा एक भाऊबंद पाहिला. एका पायावर तोल सांभाळत ‘बकध्यान’ लावून उभा होता. चालताना मात्र ठुमकत, तुरा उडवत, मान वळवत चाले. मनात आलं, पुण्याच्या प्रसिद्ध बागेला आपलं नाव बहाल करणारा हा सारस पक्षी तर नव्हे? बगळ्याच्याच जातीतला ‘सेक्रेटरी’ पक्षी पाहिला तेव्हा मात्र हे नाव पक्कं लक्षात राहिलं. गरुडासारखं डोकं, बगळ्यासारखे उंच पाय, पोपटासारखी बाकदार चोच, पिसारा झडलेल्या मोरासारखे पंख, डोळ्यांभोवती कथकली डान्सरने लावावा तसा शेंदरी रंग आणि डोक्यावर पिसाचा मुकुटासारखा तुरा. चार फूट उंचीच्या आणि साडेचार फूट लांबीच्या या सेक्रेटरी पक्ष्याची मान मात्र तितकीशी लांब नसून त्यात लवचिकपणाही कमी असतो. त्यामुळे पाणी पिताना तो बगळ्यासारखी मान न झुकवता गुडघ्यात वाकून पाणी पितो. त्याच्या त्या उठाबशा खूप गमतशीर वाटतात. तरीही या सेक्रेटरी नामकरणाचं प्रयोजन काही कळेना. ‘या पक्ष्याच्या डोक्यावरील पिसांचा मुकुटरूपी तुरा पाहिला की कानामागे लेखणी खोचलेला जुन्या जमान्यातील सेक्रेटरी आठवतो की नाही?’ पीटर उवाच. तसेच त्याचे काळे आणि राखाडी पंख त्यावेळच्या सेक्रेटरीच्या कोटासारखे दिसतात. खरंच की! अगदी साजेसं नाव!
पिंगट गवताच्या रानात एका छोट्याशा उंचवट्यावर सांबरासारखा दिसणारा एकला गडी उभा होता. तुकतुकीत कांती, तपकिरी अंगावर राखाडी चट्टे, पार्श्वभागावर निळसर छटा, स्नायू पीळदार आणि शिंग झोकदार अशा या प्राण्याचं नाव काय तर म्हणे ‘टोपी’. नाव सार्थक करावं म्हणून नेहमी उंचवट्यावर (टेकाडाच्या डोक्यावर) विराजमान असतो हा गडी.
जंगलातील प्रजेची अशी टप्प्याटप्प्यानं ओळख होतेय तोपर्यंत नाश्ता आटपावा म्हणून जेमतेम सावली असणाऱ्या काटेरी झाडाखाली पीटरने जीप थांबवली. आम्हाला वाफाळत्या चहाचे घोट सावकाशपणे घेताना बघून पीटर म्हणाला, “आटपा लवकर, सिंहाच्या कुटुंबीयांची नाश्त्याची वेळही होत आली आहे.” त्याच्या या विनोदावर मनमुराद हसत जीपमध्ये चढलो, तर पाचव्या मिनिटाला तीन भुकेल्या सिंहीणी रस्त्यावरून दमदार पावलं टाकत चालत येत असलेल्या दिसल्या. हे त्रिकुट म्हणजे आई सिंहीण आणि तिचे किशोरवयीन छावे असून ते भुकेल्या नजरेनं भक्ष्याच्या शोधात फिरताहेत ही पीटरच्या तोंडून आलेली माहिती ऐकून, जीपच्या टपातून बाहेर काढलेली मान गपकन आत घेऊन ‘बापरे!’ म्हणत मी खाली सीटवर बसले. पीटर हसून म्हणाला, “घाबरू नका! जीपवर आरूढ फोटो काढणाऱ्या माणसांची त्यांना सवय आहे. मात्र तोच माणूस जीपखाली उतरला असता, त्याच्यापासून धोका आहे असं वाटून ते हल्ला करू शकतात.”
मसाई माराच्या जंगलात बऱ्याचदा प्रत्यक्ष शिकार पाहायला मिळते असा पीटरचा वैयक्तिक अनुभव. तो भीषण प्रकार पाहणं आपल्याला झेपेल का? भीती, करुणा, किळस आणि थरार अशा संमिश्र भावनांनी ओथंबलेल्या मनानं शिकारीच्या प्रसंगाची कल्पना करायला सुरुवात केली. इतक्यात पीटरच्या तीक्ष्ण नजरेला झाडावर, फांद्यांच्या बेचकीत बसलेला बिबट्या आणि हरणाचं डोकं दिसलं. म्हणजे ताजी ताजी शिकार करून आला होता हा प्राणी. पीटरने वॉकीटॉकीवरून अगदी दबक्या आवाजात इतर चालकांना सूचना दिली. तरीही त्या बेट्याला आमची चाहूल लागलीच. चोरट्या पावलानं तो झाडाच्या फांदीवरून उतरून मागच्या झुडुपांच्या जाळीत अदृश्य झाला. परतीच्या प्रवासात मात्र आम्हाला झाडावर उलटं लटकलेलं हरणाचं मुंडकं आणि खाली लोंबकळणारा पाठीच्या कण्याचा सांगाडा दिसला. चार पावलांवर, मारलेल्या भक्ष्याकडे आशाळभूत नजरेनं पाहणारा हाईना (तरस) हजर होता. खरंतर तरस हे लांडग्याच्या जातीतलं जनावर; पण हा आळशी आणि संधीसाधू जीव स्वतः शिकार न करता आयत्या पीठावर रेघोट्या ओढणारा. दिसायलाही बेढब. हरणासारखा पिंगट रंग आणि त्यावर गडद तपकिरी रंगाची बुट्टी असली, तरी त्याला सौंदर्याचा एक शतांश भागही विधात्यानं दिला नाही हे खरं. कधी एकदा हे ताकदवान प्राणी शिकार करतील आणि मी उरलेल्या मांसावर ताव मारेन असा छद्मी भाव.
कॅम्पवर परतायची वेळ झाली होती. हिरवाई दिसू लागली आणि अचानक त्या गर्द हिरव्या पार्श्वभूमीवर अत्यंत देखणे जिराफ चरताना दिसले. पिवळसर उन्हात त्यांची पॉलिश केल्यागत दिसणारी कांती चमकत होती. ते चट्टेरी डिझाईन खूपच आकर्षक दिसत होतं. खरं तर त्यांचं शरीर किती बोजड. लांबीरुंदीचा काही मेळच नाही. कोवळी पालवी खाण्यासाठी विधात्यानं त्याची मान तर उंच करून दिली; परंतु त्या प्रमाणात त्याचे कान, शिंगं, धड, शेपटी, पाय या कशाचीच ओढाताण केली नाही त्याने. तरीही हा बेटा आकर्षकच दिसतो.
पुढील भागात पाहू ‘द ग्रेट मायग्रेशन!’ मारा नदी ओलांडणाऱ्या झेब्रांची आणि त्यांची शिकार करण्यासाठी टपून बसलेल्या मगरींची कहाणी.
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com