

जगतवारी
मेधा आलकरी
पेरूच्या अँडीज पर्वतरांगांमध्ये वसलेले माचूपिचू हे प्रत्येक प्रवाशाला खुणावणारे स्वप्नवत ठिकाण आहे. इतिहास, निसर्ग आणि मानवी कल्पकतेचा अद्वितीय मिलाफ अनुभवताना प्रत्येक पाऊल एका नव्या आश्चर्याची ओळख करून देते.
जगातील नवीन सात आश्चर्यांची यादी ७-७-२००७ रोजी प्रसिद्ध झाली तेव्हापासून त्यातील माचूपिचू हे आश्चर्य का कोण जाणे मला साद घालू लागलं होतं. थोड्या विलंबाने का होईना, पण दक्षिण अमेरिकेतील या पेरू देशात जाण्याचा बेत पक्का केला. माचूपिचूला जाण्यासाठी आधी कुस्को शहरी मुक्काम करावा लागतो. समुद्रसपाटीवर असलेल्या राजधानी लिमाहून कुस्कोला थेट विमान असल्यामुळे तिथे पोहोचणं ही डोकेदुखी नसली तरी मुक्कामास गेल्यावर ती लगेच सुरू होते, कारण कुस्को आहे अकरा हजार फुटांवर. विरळ हवेमुळे श्वासोच्छ्वास अवघड वाटू लागतो आणि डोकं जड झाल्यासारखं वाटतं. काहीजणांना मळमळ सुरू होते. तेथील स्थानिक त्यावर रामबाण उपाय म्हणून वर्षानुवर्षे कोकोआची पानं चघळतात. (या पानांपासून कोकेन बनतं. त्यामुळे पेरूबाहेर पडताना ही पानं वानगीदाखलही जवळ बाळगता येत नाहीत.) लोह, कॅल्शियम आणि ई जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेली ही पानं माणसाच्या रक्तप्रवाहाला प्राणवायू शोषून घेण्यास मदत करतात. उंचीमुळे होणाऱ्या डोकेदुखीला, थकव्याला दूर पळवणारी ही पानं चवीला थोडी तुरट असतात; परंतु ती पाण्यात उकळून केलेला चहा पोटात रिचवणं सोपं असतं. हॉटेलच्या लॉबीत ठेवलेल्या या चहाचं प्राशन करूनच आम्ही आमच्या खोलीत शिरलो आणि तो पूर्ण दिवस आडवं पडून सक्तीचा आराम केला. शरीराला त्या उंचीच्या वातावरणाची सवय होण्यासाठी हे असं पहुडणं आवश्यक असतं.
कुस्को हे अकरा हजार फुटांवर असलं तरी माचूपिचू खाली दरीत आठ हजार फुटांवरच आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी झुकझुकगाडीचा प्रवास करावा लागतो म्हणताना माझं मन आनंदलं. गाडीच्या खिडक्या कितीही मोठ्या असल्या तरी बंद काचेच्या खिडकीतून मान बाहेर काढून उंच डोंगरांची शिखरं कशी न्याहाळता येणार? त्यावर उपाय म्हणून पेरू रेल या कंपनीनं त्या खिडकीला छतापर्यंत मोठी केली आहे. विस्टाडोम असलेल्या या खिडकीतून विनाअडथळा निसर्ग न्याहाळता येणार या लालसेपोटी त्या गाडीचं बुकिंग केलं. पौरोय स्टेशनवर जाण्यास टॅक्सी बुक केली. टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला बघून इतका हर्षभरित झाला, जणू फार वर्षांनी कुणी जुना मित्र भेटलाय. जोरजोरात हस्तांदोलन करत त्याने आम्हाला मोठ्या अदबीनं टॅक्सीत बसवलं. आम्ही बुचकळ्यात! गाडी सुरू झाल्यावर त्याने स्वच्छ उच्चारात नमस्ते म्हटलं आणि साक्षात शाहरुख आणि काजोल टॅक्सीमध्ये बसल्यासारखा आनंद व्यक्त केला. ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमाची पारायणं झाली होती त्याची आणि हे बॉलिवूड प्रेम इतक्या टोकाला पोहोचलं होतं की त्याने त्याच्या मुलीचं नाव अंजली ठेवलं होतं.
अगीनगाडीच्या खिडक्यांमधून आणि काचेच्या छतामधून निसर्ग अगदी लडिवाळपणे आमच्याबरोबर धावत होता. हिरवीगार शेतं, वाऱ्यावर डुलणारी मक्याची रोपं, कुठं निवडुंगाचं जंगल, मातकट नद्या तर लांबवर हिमाच्छादित शिखरं. येथील डोंगरांची ठेवण इतकी अजब की एके ठिकाणी गाडी गोलाकार वळण घेण्यासाठी झिगझॅग करत, थोडं पुढं थोडं मागं जात, अग्वास कॅलेन्टिन या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या गावी पोहोचते. हे माचूपिचूच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं गाव. माचूपिचूला जाणाऱ्या बसेस इथूनच सुटतात.
माचूपिचूचे अवशेष बघण्यासाठी आणि इंका सम्राटांचा इतिहास समजून घेण्यासाठी गाईडची सोबत अनिवार्य आहे. त्यातून माचूपिचूला दिशादर्शक फलकांचं वावडं. कुठल्याही प्राचीन अवशेषांना भेट द्यायची तर तो इतिहास जिवंत करून सांगणारा चांगला गाईड हवाच. प्रवासदेवतेसारखे हे गाईडदेवही प्रसन्न व्हावे लागतात. त्यांचं हेलमिश्रित इंग्रजी कळण्यासाठी जिवाचे कान करावे लागतात. ‘अमिगो’ म्हणजे मित्रहो अशी स्पॅनिश सुरुवात करून आमच्या या मित्राने अगदी सावकाश आणि स्वच्छ इंग्रजीत बोलायला सुरुवात केल्यावर आमचा जीव भांड्यात पडला.
कर्णद्वय माचूपिचू अवशेषांचा इतिहास ऐकत असले तरी आमचे चक्षु मात्र त्या लोभस निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत होते. माचूपिचूला पोहोचल्यावर सर्वप्रथम आपल्या मनात भरते ती तेथील विशालता. एक मोकळा खोल श्वास छातीत भरून घेत, ३६० अंश कोनातून फिरत आजूबाजूचे उंच पर्वत आणि त्यावर उतरलेले ढग पाहिले तेव्हा मन प्रसन्न झालं. प्रवेशद्वारापासून वरच्या आणि खालच्या बाजूस असलेल्या डोंगरात सज्जे खोदले होते. नजर जाईल तिथपर्यंत पसरलेले हे पायऱ्या पायऱ्यांचे डोंगर नैसर्गिक खचितच नव्हते. इन्कांनी कोकोआची शेती करण्यासाठी हे खणून तयार केले होते. आमचा अमिगो रॉनी म्हणाला, “माचूपिचू बांधायला अंदाजे ९० वर्षं लागली. त्यातील साठ टक्के वेळ त्या शहराचा भरभक्कम पाया आणि हे सहा हजार सज्जे खणण्यात गेला.” हे सज्जे शेतीसाठी उपयोगात येत असले तरी त्याचा मुख्य उद्देश डोंगराची झीज थांबवणं हा होता. अतिवृष्टीमुळे पडणारं पाणी वाहून कसं जाईल याचा खोल विचार इन्कांनी केलेला होता. त्यासाठी सज्जे खणताना भूमीलगतचा थर ग्रॅनाईट दगडांचा, त्यावर खडी आणि वाळूचं मिश्रण आणि मग सर्वात वर मातीचा थर दिलेला होता. हे जलव्यवस्थापन प्राचीन अभियांत्रिकीचा एक चमत्कारच म्हणावा लागेल. नैसर्गिक झऱ्यांचे पाणी साठवून ते शहरापर्यंत आणण्यासाठी इन्कांनी एक पन्हाळीसारखी दगडी जलवाहिनी बांधली. तिचा उतार ठरवताना पाणी गुरुत्वाकर्षणाच्या नियंत्रित वेगाने वाहील याची काळजी घेतली. यामुळे तटबंदी अभेद्य राहिली. सरासरी ८० इंच पाऊस पडणाऱ्या या शहरातील जमिनीखालून जाणारे सांडपाणी आणि जमिनीवरून जाणारी पाणीपुरवठ्याची चोख व्यवस्था दोन्ही उल्लेखनीय!
माचूपिचू हे इन्का सम्राट पचाकुटीच्या कार्यकाळात, साधारण १४५० च्या सुमारास शाही विश्रामगृह आणि एक अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ म्हणून बांधण्यात आलं. मात्र हे वैभव अल्पायुषी ठरलं. शंभर वर्षांनंतर स्पॅनिशांनी पेरूवर हल्ला केला; तेव्हा हे शहर तसंच सोडून सम्राटाने पलायन केलं. स्पॅनिशांनी जंग जंग पछाडलं तरी त्यांना हे शहर कधीच सापडलं नाही. पुढील चारशे वर्षं ते निसर्गातील वृक्षवल्लींनी आपल्या कवेत जपून ठेवलं आणि १९११मध्ये अमेरिकेतील हिरम बिंगहॅम यांनी स्थानिक वाटाड्याच्या मदतीने हे रत्न शोधून काढलं.
तटबंदीने सुरक्षित केलेलं हे किल्लेवजा शहर दोन भागात विभागलं आहे. कृषी क्षेत्र आणि नागरी क्षेत्र. पूर्वेकडे सामान्य प्रजा राहत असे आणि पश्चिमेकडे मंदिरं आणि समारंभस्थळ होतं. सर्वात उंच जागेवर राजवाडा होता. रॉनी आम्हाला सूर्योपासक इन्कांच्या सूर्यमंदिरापाशी घेऊन गेला. एकेकाळी तो खूप उंच मनोरा असावा. त्याला दोन खिडक्या आहेत. एकीतून जून महिन्यातील दक्षिणायनाच्या सूर्याचा पहिला किरण प्रवेश करतो आणि दुसरीतून सूर्यास्ताला क्वालका नावाचे नक्षत्र दिसते. या सूर्यमंदिराच्या समोर जमिनीवर ग्रॅनाइटची पाण्याने भरलेली दोन वर्तुळं बांधलेली आहेत. त्याचा खगोलशास्त्रीय उपयोग होत असावा. इन्का हे खगोलशास्त्रात खूपच अग्रेसर होते असं म्हणावं लागेल. माचूपिचूत ‘इंतिहुआताना’ नावाचा खगोलशास्त्रीय दगड कोरलेला आहे. त्याचा वापर सूर्यघड्याळासारखा होत असला तरी खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठीही होत असावा. त्यायोगे ऋतुबदल, सूर्यग्रहण आणि शेतीच्या वेळापत्रकाचा अंदाज बांधला जात असे. सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड स्रोत असलेला हा दगड इन्कांसाठी पूजनीय होता. ‘तीन खिडक्यांची खोली’ नावाच्या मंदिरात असलेल्या तीन खिडक्या या स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या इन्का संस्कृतीतल्या तीन विश्वांचं प्रतीक मानल्या जातात. कोंडोर हा प्रचंड पंखाविस्तार असणारा पक्षी पेरूमध्ये देवतुल्य मानला जातो. त्याचंही एक मंदिर इथे आहे. जमिनीवर असलेल्या एका नैसर्गिक खडकाला त्याच्या मानेचा आणि डोक्याचा आकार दिला आहे आणि त्याच्या मागे असलेल्या दोन विशाल खडकांकडे पाहिल्यावर ते कोंडोरचे पसरलेले प्रचंड पंख वाटतात.
माचूपिचू अवशेषांच्या जागेत फिरत असताना रॉनीने आम्हाला इन्कांच्या प्रगत आणि अनोख्या स्थापत्यकलेबद्दल सांगण्यास सुरुवात केली. सहाशे वर्ष टिकून राहिलेल्या या भिंतींचे दगड अजूनही एकमेकांना चिकटून उभे आहेत. त्यांना एकत्र बांधून ठेवणारं सिमेंट तिथे नावालाही नव्हतं. माती, लामाचे दाट केस आणि राख निवडुंगाच्या रसात एकत्र कालवून या भिंती लिंपल्या होत्या. राजमहालाच्या किंवा मंदिरांच्या भिंती काळजीपूर्वक तासून गुळगुळीत केलेल्या आणि कप्पीच्या चाकांच्या आऱ्यांसारख्या एकमेकांमध्ये घट्ट बसणाऱ्या दगडांपासून बनवलेल्या आहेत. त्याला ‘अश्लार तंत्र’ म्हटलं जातं. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. भूकंप येतो तेव्हा हे दगड जागेवरून थोडे हलतात आणि हादरा संपताच पुन्हा आपल्या जागी स्थिर होतात. येथील दारे आणि खिडक्या वरच्या बाजूला अरुंद होत जातात. भिंती सुद्धा आतल्या बाजूला किंचित झुकलेल्या आहेत. भूकंपाच्या वेळी ही रचना वास्तूला प्रचंड ताकद देते.
पायऱ्या उतरून आम्ही खालच्या बाजूला पोहोचलो ते एका विस्तीर्ण आणि हिरवळ अंगावर पांघरलेल्या चौकात. हजार लोकसंख्येच्या या शहरातील मनोरंजनाचे खेळ, अटीतटीचे सामने इथे खेळले जात. दवंडी पिटणारा माणूस या चौकातच उभा राहत असे. दवंडीचा आवाज आजूबाजूंच्या खडकांवर आपटून दसपटीने मोठा होऊन दुमदुमत असे. म्हणजे इन्कांना स्थापत्य, पाणीपुरवठा, खगोलशास्त्र याबरोबरच ध्वनिविज्ञानही अवगत होतं तर! हे सारं समृद्ध ज्ञान-विज्ञान काळाच्या पडद्याआड जाऊन विस्मृतीत कसं जातं हा प्रश्न मला नेहमी पडत असतो.
अचानक रॉनीनं आम्हा दोघांच्या खांद्याला हात लावून खासगीत काही गोष्ट सांगावी तसं थोडं बाजूला नेलं. म्हणाला, “भारतीयांसाठी इथे एक आकर्षण आहे. तुमचे सुपरस्टार ऐश्वर्या राय आणि रजनीकांत इथे त्यांच्या ‘रोबो’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी येऊन गेलेत. जेम्स बॉण्डला मात्र परवानगी नाकारली होती आमच्या सरकारने.” इन्कांच्या या अद्ययावत शहरांच्या अवशेषांमध्ये उभी राहून सहाशे वर्षं मागे गेलेलं माझं मन खाडकन वर्तमानात आलं.
खरं तर, माचूपिचू ही अनुभवायची गोष्ट आहे. छप्पर उडून गेलेल्या या दगडांच्या नगरीला दोन्ही हात पसरून जणू आपल्या कवेत सुरक्षित ठेवणारा वायनापिचू हा गरुडासारखा डोंगर आणि एकेकाळी संपन्न असलेली ती नगरी केवळ अवर्णनीय!
लेखिका आणि ट्रॅव्हलर
medhaalkari@gmail.com