चला वाचूया मुलांना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी

जनरेशन कोणतीही असो, जेन झी असो की आता जन्मलेली जेन बीटा असो, गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. मुलांच्याच नजरेतून मुलांच्या विश्वाकडे बघितलं तर या विश्वातलं रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उलगडतं. माधुरी पुरंदरे या लेखिकेने बालसाहित्याला एक दर्जा देत अक्षररूपाबरोबरच त्याला एक चित्ररूपही दिलं.
चला वाचूया मुलांना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी
Published on

बालविश्व

प्राची बापट

जनरेशन कोणतीही असो, जेन झी असो की आता जन्मलेली जेन बीटा असो, गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. मुलांच्याच नजरेतून मुलांच्या विश्वाकडे बघितलं तर या विश्वातलं रंगीबेरंगी इंद्रधनुष्य उलगडतं. माधुरी पुरंदरे या लेखिकेने बालसाहित्याला एक दर्जा देत अक्षररूपाबरोबरच त्याला एक चित्ररूपही दिलं. बालसाहित्यात त्यांनी विविध प्रयोग केले आहेत. १४ नोव्हेंबरच्या भारतीय बालदिनानिमित्त माधुरीताईंनी निर्मिलेल्या या बालविश्वाची सफर करायलाच हवी.

सुखवस्तू घरांच्या पुरतीच मर्यदित राहिली हे वास्तव उरतंच आणि तो काळ वेगळा होता. आयुष्य बरंच शांत आणि कमी पर्याय असलेलं होतं. त्यामुळे ते सगळं बालसाहित्य हे त्या काळाला अनुरूप असंच होतं. पण माध्यम क्रांती झाल्यानंतर जन्मलेल्या आणि मोबाईल लहानपणीच हातात पडणाऱ्या काळातल्या मुलांनी पण मराठी बालसाहित्याकडे वळण्यासाठी त्यांना काहीतरी वेचक, वेधक आणि वेगळं देण्याची गरज होती.

नेमकी ही गरज माधुरीताईंच्या बालसाहित्याने मोठ्या प्रमाणात भागवली असं निश्चितच म्हणता येईल. माधुरीताईंच्या लेखनाची त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वासारखीच अनेक वैशिष्ट्यं आहेत. त्यातलं प्रमुख वैशिष्ट्यं म्हणजे त्यांनी ही सगळी पुस्तकं लिहिताना वापरलेली भाषा आणि भाषाशैली. अत्यंत सोपे, साधे शब्द, मुलांना न अडखळता वाचता येतील अशी छोटी सुटसुटीत वाक्यं आणि मुलं जसा विचार करतात त्या अंगाने लिहिलेली मुलांची गोष्ट. मुलांच्या नजरेतूनच माधुरीताईंनी आजवर त्यांची सगळी पुस्तकं लिहिली आणि ती देखील थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल तेवीस पुस्तकं. त्यामुळे मुलं ही पुस्तकं सहज वाचायला घेतात आणि मग वाचतच राहतात. लहान आणि अडनिड्या वयातल्या मुलांना एखादा लेखक अशा प्रकारे आवडणं आणि त्यांनी अगदी सपाटून त्याची पुस्तकं मिळवून वाचणं असं मराठीत फार काळानं झालं.

चित्र भाषेचा प्रयोग

त्यांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्यं म्हणजे त्यांच्या लेखनात असलेली प्रयोगशीलता. मराठी बालसाहित्यामध्ये मुलांसाठीच्या पुस्तकांत चित्रं काढलेली फारशी दिसत नाहीत. पण माधुरीताईंची सगळीच पुस्तकं ह्याला अपवाद आहेत. मुलांची 'अक्षर भाषे' सोबतच 'चित्रं भाषे'शी ओळख करून देण्याचं मोठं काम ह्या पुस्तकांनी नक्कीच केलं. 'यश' आणि 'राधाचं घर' ह्या मालिका तर इतक्या देखण्या झाल्या आहेत की वाचता न येणाऱ्या अगदी लहान मुलांना सुद्धा आपण ही पुस्तकं पाहायला म्हणून नक्कीच देऊ शकतो. मुलं त्यातली चित्रं अगदी हरखून जाऊन बघतात. त्यात येणाऱ्या सगळ्याच वस्तू त्यांच्या भावविश्वाचा अविभाज्य घटक असल्यामुळे मुलं त्यात रमतात, अगदी रममाण होतात आणि पुस्तकांत अशी डोकं खुपसून बसलेली मुलं किती साजरी दिसतात. चित्रं भाषेमुळे मुलांच्या मनात कायम जागृत असणारे कुतूहल अधिक वाढीस लागते आणि कोणाच्याही नकळत ती अधिकाधिक चौकस आणि सजग होतात. मराठीत मुलांसाठी म्हणून खास लिहिलेल्या जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये चित्रांचा हमखास असणारा अभाव ह्या पुस्तकांनी भरपूर अंशी भरून काढला आहे, हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. मराठी बालसाहित्याला लाभलेलं हे चित्रभान मोबाईलमुळे व्हिज्युअली विचार करणाऱ्या नवीन पिढीतल्या मुलांना त्यांचा हक्काचा आनंद मिळवून देते.

माधुरीताईंच्या लेखनाचे तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी निवडलेल्या कथांना असलेले आधुनिक आणि उत्तर आधुनिक विषय भान. जागतिकीकरणाच्या नंतर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने आधी चंचुप्रवेश केला आणि मग हळूहळू मानवी जीवनाचा प्रत्येक अविभाज्य कोपरा अगदी बघता बघता व्यापला. त्याचे साद पडसाद फार मोठ्या प्रमाणात आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात पडले नसते तरच नवल. आई-वडिलांच्या बदललेल्या भूमिका, घरात अधिकाधिक वेळ देणारे आणि मुलांशी जोडले गेलेले वडील आणि घराबाहेर पडणारी आणि उशिरा कामावरून येणारी महानगरातील आई, बाहेरगावी किंवा त्याच शहरांत पण वेगळे राहणारे व्हिजिटिंग ग्रॅण्डपेरेंट्स हे आजच्या मुलांच्या जीवनाचे वास्तव आहे आणि माधुरीताईंनी कोणताही अट्टाहास न बाळगता, ज्या कमालीच्या सफाईदारपणे ही बदलून गेलेली आधुनिक महानगरीय कुटुंबं रंगवली आहेत त्याला तर तोडच नाही. हाच बदलता अवकाश इतक्या थेट आणि अचूक शब्दांत त्यांनी त्यांच्या 'बाबांच्या मिशा' ह्या कथेत लिहिला आहे की हे कागदाचं कासव करणारे, अनूच्या मामासोबत कुस्ती खेळणारे, संध्याकाळी मस्त कांदाभजी तळणारे आणि सगळ्यांना खूप हसवणारे अनूचे अक्कडबाज मिशा ठेवणारे बाबा आपल्याला पण हवेहवेसे वाटू लागतात. मग ते मुलांना तर किती हवेहवेसे वाटत असतील ह्याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी. हे असं मुलांना एकाचवेळी हवंहवंसं वाटणारं आणि दुसऱ्याच क्षणी मोठ्यांना मुलांत रमणारा बाबा होण्याची नकळत प्रेरणा देणारं माधुरीताई किती सहज लिहून जातात. त्यांच्या लेखणीला लाभलेली ही सहजताच त्यांच्या बालसाहित्याला आधुनिकतेचा नवीन आणि अगदी हवाहवासा वाटणारा सुखकारक, दिलासादायक स्पर्श देऊन जाते. काही माणसं खरोखरच किती देखणं लिहितात.

माधुरीताईंनी लिहिलेलं हे सगळं बालसाहित्य आणि 'वाचू आनंदे' सारख्या बालगट आणि कुमारवयीन गटातील मुला-मुलींच्या निकोप वाढीसाठी केलेल्या पुस्तकांचं संपादन हे माधुरीताईंचे मराठी बालसाहित्य विश्वाला लाभलेले विशेष उल्लेखनीय योगदान आहे. बालसाहित्यातील ह्या भरीव योगदानासाठी त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार ही या दखलपात्र कामाची योग्य पोचपावतीच ठरावी. शेवटी मुलांच्या चष्म्यातून मोठ्यांनी जर जग पाहिले आणि त्यांचे जगच त्यांना दाखवले तर आजची 'जेन बिटा' मुलं देखील मराठी पुस्तकं नक्कीच वाचतील. हीच आशा आपल्या सर्वांच्याच मनात पल्लवित करण्यासाठी तमाम मराठी भाषिकांनी माधुरीताईंचे ऋण मानावे तितके कमीच आहे.

साहित्याच्या आस्वादक आणि अभ्यासक

logo
marathi.freepressjournal.in