माणसातील ‘माणूसपणा’चा सत्याग्रह

सवर्ण समाजाला दलितांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केल्याचं अजिबात सहन झालं नाही. हे तळे दलितांनी अशुद्ध केलं, बाटवलं असा त्यांनी आरोप केला. गाईचं दूध-तूप-दही-मूत्र व शेण याने तळ्याला शुद्ध (?) केलं. महाडचा सत्याग्रह पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवण्याबरोबरच ‘माणूस’ म्हणून अस्तित्व मान्य करण्यासाठी देखील केला होता.
माणसातील ‘माणूसपणा’चा सत्याग्रह
Published on

डॉ. प्रवीण घोडेस्वार

सवर्ण समाजाला दलितांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केल्याचं अजिबात सहन झालं नाही. हे तळे दलितांनी अशुद्ध केलं, बाटवलं असा त्यांनी आरोप केला. गाईचं दूध-तूप-दही-मूत्र व शेण याने तळ्याला शुद्ध (?) केलं. महाडचा सत्याग्रह पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवण्याबरोबरच ‘माणूस’ म्हणून अस्तित्व मान्य करण्यासाठी देखील केला होता.

आजपासून सुमारे ९९ वर्षांपूर्वी २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचं पाणी पिऊन ब्राह्मणी व्यवस्थेने निर्माण केलेल्या कायद्याचा भंग केला. पुढच्या वर्षी या क्रांतिकारक घटनेला शंभर वर्षे पूर्ण होतील. सार्वजनिक पाणवठ्यावर दलितांना पाणी भरण्याची मनाई होती. पाणी भरणे हाच जिथे गुन्हा होता तिथं पाणी पिणे तर लांबची गोष्ट होती. सार्वजनिक पाणवठ्यावर सवर्ण व स्पृश्य लोकांप्रमाणेच दलितांनाही पाणी भरण्याचा, पाणी पिण्याचा सारखाच हक्क नि अधिकार असल्याचे सिद्ध करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित आणि सवर्ण अनुयायी व कार्यकर्त्यांसह महाड इथल्या चवदार तळ्यावर दोनदा सत्याग्रह केला.

दुसऱ्यांदा चवदार तळ्यावरच्या सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी जमलेल्या समुदायासमोर बाबासाहेबांनी आपले विचार व्यक्त केले. ‘चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरिता जायचे नाही, इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपणास जायचे आहे.’ म्हणजे ही सभा समतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठीच बोलविण्यात आली आहे, हे उघड आहे... या दृष्टीने या सभेचा विचार केला असता ती अपूर्व आहे, याबद्दल कोणासही शंका वाटणार नाही, अशी माझी खात्री आहे. आजच्या प्रसंगास या हिंदुस्थानच्या इतिहासात तोड सापडेल असे मला मुळीच वाटत नाही. (पान क्र. १५८, डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र खंड-३, चां. भ. खैरमोडे)

पहिल्यांदा बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले सर्व दलित मिरवणूक काढून चवदार तळ्यावर पोहचले आणि त्यांनी पाणी पिऊन आपला उद्देश पूर्णत्वास नेला. म्हणजे या सत्याग्रहाची यशस्वी फलश्रुती झाली. मात्र दुसऱ्यावेळी परिस्थिती वेगळी होती. यावेळी चवदार तळे हे सार्वजनिक आहे की नाही याचा वाद न्यायालयात सुरू होता. परिणामी लोकांना चवदार तळ्यापर्यंत जाता तर आले पण पाणी पिता आले नाही! तरीही आता आम्ही आम्हाला समानता प्राप्त होईपर्यंत अर्थातच माणुसकीचा हक्क नि अधिकारासाठी लढा देत राहणार आहोत, हे या सत्याग्रहाने अधोरेखित केलं. महाडचा दुसरा सत्याग्रह इतिहासात एका महत्त्वपूर्ण नि अभूतपूर्व अशा क्रांतिकारी घटनेसाठी प्रसिद्ध आहे. ही घटना म्हणजे ‘मनुस्मृती दहन!’ काही सुधारणावादी आणि विचारी सवर्ण प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून बाबासाहेबांचे महाडचे हे दोन्ही सत्याग्रह सफल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तीन वर्षांनंतर म्हणजे १९३० च्या ६ एप्रिलला देशात अजून एक महत्वाची घटना घडली. याच दिवशी गांधीजींनी दांडी इथं मिठाचा सत्याग्रह केला. ब्रिटिशांचा कायदा मोडला. गोऱ्या साम्राज्याला आव्हान दिलं. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत गांधीजींच्या या मिठाच्या सत्याग्रहाच्या घटनेला महत्वाचे स्थान दिलं जातं. देशी (डावे-निधर्मी-धर्मवादी-प्रगत आदी) तसेच विदेशी इतिहासकारांनी मिठाच्या सत्याग्रहाची आवर्जून दखल घेऊन याचं महत्व बिंबवण्यात अजिबात कुचराई केलेली नाहीये. ही घटना महत्वाची आहेच, यात शंका नाही. पण याच इतिहासकारांनी बाबासाहेबांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केलेल्या ऐतिहासिक सत्याग्रहाची म्हणावी तशी दखल घेतली नाही, असं खेदाने म्हणावं लागतं. पिण्याच्या पाण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेला हा लढा मानवमुक्तीच्या आणि मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या कार्यातली अपूर्व अशी घटना म्हणायला हवी.

महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षामागची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वपूर्ण आहे. तत्कालीन मुंबई इलाखातल्या महाड नगर परिषदेने एक ठराव ऑगस्ट १९२३ मध्ये पारित केला होता. यानुसार सर्व सार्जनिक स्थळे, ठिकाणे, इमारती, वास्तू, तलाव, पाण्याचे स्त्रोत, उद्यान, विश्रामगृहे, धर्मशाळा यांची निर्मिती सरकारने केली आहे आणि त्यांची देखभाल सुद्धा सरकारच करीत असेल तर अशा घटकांचा वापर कोणालाही करता येऊ शकतो. हा ठराव बाबासाहेबांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच पारित झाला होता. पण असं असलं तरी सनातनी पुढारी हा ठराव मान्य करायला नि अंमलात आणायला अजिबात तयार नव्हते. त्यामुळे १९२३ मध्ये केलेला हा ठराव सात वर्षांनी देखील प्रत्यक्षात येऊ शकला नव्हता. सरकारने मान्य केलेला ठराव वास्तवात येण्यासाठी बाबासाहेबांना सत्याग्रहाचा पर्याय निवडावा लागला. यावरुन आपल्या लक्षात येऊ शकते की तेव्हा इंग्रंजांचे राज्य असले तरी त्यांनी केलेले नियम-कायदे सवर्ण समाज धाब्यावर बसवत होता. या सुधारणावादी कायद्यांना सवर्ण समाज भीक घालत नव्हता. ब्रिटीश अधिकारी देखील या बाबतीत कानाडोळा करत होते. सत्ता ब्रिटीशांची असली तरी प्रशासनात इथल्या सवर्ण समाजाचेच वर्चस्व होते. म्हणजे कायदे कितीही समानता प्रस्थापित करणारे असले तरी इथल्या उच्चवर्णीय समाजाची मानसिकता जोवर बदलत नाही तोवर असे कायदे कागदावरच राहतात. आजही थोड्या-फार फरकाने अशीच परिस्थिती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

चवदार तळ्याचे पाणी प्यायलेल्या दलितांना मोठी किंमत चुकवावी लागली. दलित वस्त्या जाळण्यात आल्या. लहान मुले-स्त्रिया-पुरुष- म्हातारे यांना अमानुष मारहाण करण्यात आली. त्यांच्या घरांची तोडफोड केली. सवर्ण समाजाला दलितांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन केल्याचं अजिबात सहन झालं नाही. हे तळे दलितांनी अशुद्ध केलं, बाटवलं असा त्यांनी आरोप केला. गाईचं दूध-तूप-दही-मूत्र व शेण याने तळ्याला शुद्ध (?) केलं. महाडचा सत्याग्रह पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळवण्याबरोबरच ‘माणूस’ म्हणून अस्तित्व मान्य करण्यासाठी देखील केला होता. या सत्याग्रहाच्या वेळी महाड मधल्या सनातन्यांनी डॉ. आंबडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते वीरेश्वर मंदिरात प्रवेश करणार असल्याची अफवा पसरवली होती. यामुळे बाबासाहेबांना मंदिर प्रवेशाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करावं लागलं होतं.

अभ्यासकांच्या मते महाड इथल्या चवदार तळ्याचा सत्याग्रह ही एक सर्वसाधारण घटना नाहीये. मानवी तसेच नागरी हक्क प्राप्त करण्यासाठी करण्यात आलेला आधुनिक काळातला उल्लेखनीय संघर्ष म्हणून याकडे बघायला हवं. महाडच्या या सत्याग्रहाने बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र दलित चळवळीची भक्कम पायाभरणी केली.

बाबासाहेबांचा महाड सत्याग्रह आणि गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह दोन्हीही प्रतीकात्मक होते, यात शंका नाही. जनावरांना देखील जिथून पाणी पिण्याची मुभा होती पण माणसांना नाही अशा क्रूर व्यवस्थेविरोधातला एल्गार म्हणजे चवदार तळ्याचा सत्याग्रह. गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याला ज्ञात असतो पण बाबासाहेबांचा चवदार तळ्याचा संगर मात्र अनभिज्ञ असतो. याचं कारण आमच्या अभ्यासक्रमात या सत्याग्रहाला योग्य स्थान दिलेलं नसतं. दांडी सत्याग्रहाने ब्रिटीश सत्तेला आव्हान दिलं. हा सत्याग्रह यशस्वी झाला. कॉंग्रेस नेतृत्वाची धुरा गांधींकडे आली. या सत्याग्रहाचा भारतातीलच नव्हे तर जागतिक इतिहासातली महान घटना म्हणून गवगवा करण्यात आला. तशी प्रसिद्धी देण्यात आली. मिठाचा सत्याग्रहानंतर १७ वर्षांनी आपला देश पारतंत्र्यातून मुक्त झाला. देशाची सत्ता इंग्रजांकडून इथल्या उच्च वर्णीयांच्या हातात आली. ज्यांना सत्ता मिळाली त्यांनी गांधीजींना ‘बापू’, ‘महात्मा’ आणि ‘राष्ट्रपिता’ बनवले. असे असले तरी आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते म्हणून भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेबांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ghodeswar.pk@ycmou.ac.in

logo
marathi.freepressjournal.in