महाराष्ट्रातील आद्य बळीराजा

महाराष्ट्र हे केवळ कृषिप्रधान नव्हे, तर कृषी संस्कृतीचा आधारस्तंभ असलेलं राज्य. इथल्या मातीने शेतकऱ्यांना भरपूर दिलं आहे. महाराष्ट्रात मानव स्थायिक कसा झाला, इथल्या निसर्गाशी त्याचं असलेलं नातं अधिक घट्ट करायला कशी सुरुवात झाली आणि कृषिप्रधान संस्कृतीचा उदय कसा झाला, याबद्दल या लेखात जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील आद्य बळीराजा
Published on

पाऊलखुणा

महाराष्ट्र हे केवळ कृषिप्रधान नव्हे, तर कृषी संस्कृतीचा आधारस्तंभ असलेलं राज्य. इथल्या मातीने शेतकऱ्यांना भरपूर दिलं आहे. महाराष्ट्रात मानव स्थायिक कसा झाला, इथल्या निसर्गाशी त्याचं असलेलं नातं अधिक घट्ट करायला कशी सुरुवात झाली आणि कृषिप्रधान संस्कृतीचा उदय कसा झाला, याबद्दल या लेखात जाणून घेऊयात.

अश्मयुगीन काळात माणूस फक्त प्राण्यांची शिकार करणारा, रानातील फळं, कंदमुळे गोळा करणारा होता. त्याचं जगणं निसर्गाच्या मर्जीवर होतं. कधी शिकार करायची, तर कधी जंगलात सापडणाऱ्या फळांवर पोट भरायचं. पण काळानुसार सगळं बदलत गेलं. ‘शिकारी’ आणि ‘अन्न संकलक’ असलेल्या मानवामध्ये फार मोठा बदल होऊन तो ‘शेती-पशुपालन’ करणारा आणि एका ठिकाणी स्थिर राहणारा मानव झाला. या बदलाला पुरातत्त्वशास्त्रात ‘नवाश्मयुगीन क्रांती’ असं म्हटलेलं आहे. शतकानुशतके शिकार करणाऱ्या पुरुषांना, वन्यजीवांच्या जीवनचक्राची, त्यांच्या सवयींची माहिती झाली होती. त्याचप्रमाणे, स्त्रियांना वनस्पतींच्या जीवनचक्रांची माहिती झाली होती. यातूनच, पुरुषांनी ‘पशुपालनाचा’ तर स्त्रियांनी ‘शेतीचा’ शोध लावलेला दिसून येतो.

नदीकाठी वसाहत करून राहू लागलेल्या माणसाच्या स्वप्नांना मातीने आकार दिला. ज्वारी, बाजरी, गहू, भात यासारख्या पिकांमधून ही स्वप्नं उगम पावली. आदिमानवाने निसर्गाशी असलेलं नातं अधिक घट्ट करायला सुरुवात केली. आता तो फक्त शिकारी राहिला नाही, तर तो ‘शेतकरी’ झाला. पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि माती या सगळ्यांच्या मदतीने त्याने स्वतःचं जग निर्माण केलं आणि कृषिप्रधान संस्कृती जन्मास आली. माणसाने पहिल्यांदा मातीत बीज पेरलेला तो क्षण कायमचा इतिहासात कोरला गेला. शेतीने त्याला मातीशी जोडलं आणि मातीने त्याला ‘माणूस’ बनवलं. भारतीय उपखंडातील आद्य शेतकऱ्यांच्या म्हणजे नवाश्मयुगीन वसाहतींमध्ये इसवी सनपूर्व ७००० च्या सुमारास अस्तित्वात असलेल्या मेहेरगढ या स्थळाचं विशेष महत्त्व आहे. बार्ली आणि गव्हाचं पीक तेथील लोक घेत.

महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन माणूस इसवी सनपूर्व साधारणपणे १०,००० ते ४००० या कालखंडात गुहांमध्ये, शैलाश्रयांच्या आश्रयाने राहत होता. नद्यांच्या काठांवर वावरत होता. गारगोटीच्या दगडाची सूक्ष्मास्त्रं बनवत होता. परंतु महाराष्ट्रात पूर्णतः नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळं मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव-वसाहती ताम्रपाषाणयुगीन होत्या. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील इनामगाव हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव-वसाहतींचं अत्यंत महत्त्वाचं उदाहरण आहे. याच दरम्यान, इसवी सनपूर्व १६०० च्या सुमारास ‘माळवा’ संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोहचले. शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव-वसाहती महाराष्ट्रात प्रथम ‘माळवा’ संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या. ते महाराष्ट्राचे ‘आद्य शेतकरी’ होत. तापी, गोदावरी, कृष्णा या मोठ्या नद्यांच्या आणि त्यांच्या उपनद्यांच्या खोऱ्यात माळवा संस्कृतीच्या लोकांनी वस्ती वसवली. माळवा संस्कृतीच्या वसाहती फारशा मोठ्या नव्हत्या. त्यातील दायमाबाद आणि इनामगाव ही मोठी खेडी होती. महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी आला. त्याद्वारे माळवा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्यांचे तंत्रज्ञान, घाट आणि नक्षीचे नमुने यांमध्ये काही बदल घडून आले आणि ‘जोर्वे संस्कृती’ या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयाला आली. अहमदनगर जिल्ह्यातील जोर्वे या गावी ही संस्कृती प्रथम उजेडात आली.

जोर्वे काळातील लोक मुख्यत्वे शेती करीत. इनामगाव आणि दायमाबाद इथे सापडलेल्या धान्याच्या पुराव्यावरून असं दिसून येतं की, तेथील शेतकरी खरीप आणि रब्बी अशी दोन्ही प्रकारची पिकं काढत होते. याचा विश्वसनीय पुरावा इनामगाव येथील जोर्वे कालखंडात मिळतो. तसंच गव्हाच्या लागवडीचाही पुरावा आहे. या काळात पर्यावरण थोडं फार अनुकूल होतं. या काळात पाऊस थोडा अधिक असल्यामुळे नदीला पूर येत होता आणि वस्तीला कदाचित धोका निर्माण झाला असावा. त्यासाठी तेथील लोकांनी घोडनदीच्या पुराचे पाणी एका नाल्यावाटे वळवून, साठवून ठेवण्याची सोय केली. हे पाणी एक तलाव खोदून त्यात आणून सोडले आणि तेथून एका कालव्याद्वारे ते शेतीला पुरवण्याची सोय केली. पाण्याच्या या बारमाही सोयीमुळे, हे लोक रब्बी आणि खरिप अशा दोन्ही हंगामात शेती करीत असत. येथे गहू, ज्वारी, बाजरी, सातू, वाटाणे, कुळीथ इ. पिकं घेतली जात. काही वेळा, मुख्य वसाहतीपासून सुपीक जमीन दूर असेल त्याठिकाणी हंगामी वस्त्याही उभारण्यात आल्या होत्या. बैलाच्या हाडाचा नांगर वापरून हे लोक शेती करीत असत.

काही विद्वानांच्या मते, महाराष्ट्रातील काळी, चिकण जमीन नांगर असल्याशिवाय लागवडीखाली आणणं अशक्य होतं. त्यामुळे नदीकाठच्या गाळवट भागात थोडीफार शेती केली जात असावी. परंतु काळ्या जमिनीला उन्हाळ्यात मोठ्या भेगा पडतात. त्यामुळे खोलवर नांगरणी करण्याची गरज नसते. परंतु इनामगावाजवळच्या वाळकी येथील उत्खननात काही नांगराची पाती सापडली आहेत. यात हरणाच्या शिंगापासून बनवलेले छोटे नांगर, बैलाच्या खांद्याच्या हाडापासून बनवलेलं छोटं नांगराचं पातं, तसंच हरणाचं शिंग पोकळ करून त्यातून पेरणी करताना बिया सोडण्यासाठी केलेलं साधन यांचा समावेश आहे. तेव्हा या भागात थोडीफार नांगरणी होत असावी. नांगरणीमुळे शेतीतील उत्पादनात निश्चितच वाढ झालेली असणार. शेतीबरोबरच गुरे, शेळ्या-मेंढ्या, डुक्कर, कोंबड्या यांचं पालन केलं जाई. तसंच शिकार आणि मासेमारी हे पर्यायही होतेच. शेतीच्या विकासामुळे, कारागिरी आणि विनिमयही विकसित झालेला दिसतो.

पुढे महाराष्ट्रातील हवामान हे शेतीसाठी प्रतिकूल झाले; पाऊस कमी झाला आणि हवामान हे अधिक कोरडे झाले. महाराष्ट्राचा आद्य बळीराजा शेती करीत असला, तरी केवळ शेतीवर जगणं कठीण होऊ लागलं. त्यामुळे ते पशुपालनाकडे वळले. स्वाभाविकच त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली. लोकसंख्याही कमी झाली. अशा परिस्थितीत एकाजागी स्थिर राहत शेती करीत राहणं या लोकांसाठी अशक्य बनलं. परिणामी निमभटकी जीवनशैली स्वीकारली गेली. तसंच शिकार, मासेमारी याचं प्रमाणही वाढलं. हरणांच्या शिकारीचं प्रमाण या काळात वाढलेलं आढळतं.

या संस्कृती नष्ट कशा झाल्या याचं निश्चित कारण देणं अवघड आहे. परंतु शुष्क हवामान व पर्जन्यमानातील घट यामुळे ही संस्कृती हळूहळू लयास गेली असावी आणि काळाच्या ओघात नष्ट होऊन विस्मृत झाली असावी!

rakeshvijaymore@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in