महेंद्रगिरीची पावसाळी सफर

वाशिष्टीच्या काठावर वसलेल्या चिपळूणच्या कुशीत, निसर्गाच्या निवांत छायेत घेतलेल्या एका तृप्त अनुभवाची ही शब्दबद्ध सफर आहे. महेंद्रगिरीच्या वनराईतून वाहणारा धबधब्याचा नाद आणि परशुराम भूमीतील सात्विक चैतन्य मनाला उभारी देणारं आहे.
महेंद्रगिरीची पावसाळी सफर
Published on

डोळस भटकंती

मुक्ता नार्वेकर

वाशिष्टीच्या काठावर वसलेल्या चिपळूणच्या कुशीत, निसर्गाच्या निवांत छायेत घेतलेल्या एका तृप्त अनुभवाची ही शब्दबद्ध सफर आहे. महेंद्रगिरीच्या वनराईतून वाहणारा धबधब्याचा नाद आणि परशुराम भूमीतील सात्विक चैतन्य मनाला उभारी देणारं आहे.

मागच्या पावसाळ्यात चिपळूणची आडवाटेवरची भटकंती केली आणि एकापेक्षा एक सुंदर अनुभव तिथे घेतले. मुंबई-गोवा महामार्गालगत आणि वाशिष्ठी नदीच्या काठी वसलेलं कोकणातील नगर म्हणजे चिपळूण. चिपळूणचे नाव बऱ्याच जणांनी ऐकलं आहे, पण या चिपळूणमध्ये मुक्काम करून अनेक अनवट ठिकाणाची भटकंती करता येते. ही भटकंती करताना मी चिपळूणजवळ वृक्षराजीनी सजलेल्या, पक्ष्यांच्या आवाजात गुंजणाऱ्या डोंगराच्या सान्निध्यात गेले होते. हा डोंगर साधासुधा नव्हे!! याचे नावच आहे महेंद्रगिरी पर्वत. जिथे भगवान परशुरामाचं वास्तव्य होतं. या पर्वताच्या कुशीत धबधब्याचा नाद ऐकवणारं, ऐतिहासिक खुणा दाखवणारं, मंदिराच्या सात्विक वातावरणाची अनुभूती देणारं निसर्गसंपन्न गाव वसलं आहे. हे गाव आहे परशुराम.

इथली भटकंती करण्यासाठी मी डोंगराच्या कुशीत नव्हे तर डोंगराच्या माथ्यावर रहायचं ठरवलं आणि झाडांच्या राईतून जाणारा, तीव्र वळणाचा

चढ चढून मी गाठली निसर्गसंवर्धन करणारी जागा. डोंगरमाथा इको केअर रिसॉर्ट. इथेच माझा

मुक्काम होता.

मंगेश गोवेकर आणि श्रद्धा गोवेकर या दांपत्याने परशुराम गावातच एका टेकडीवजा जागेवर उंच अशा ठिकाणी छानसं इको केअर रिसॉर्ट बांधलं आहे. ही टेकडी आधी एका वैराण जागेप्रमाणे होती. तिथे पक्ष्यांना, पतंग फुलपाखरांना आवडतील अशी देशी, स्थानिक झाडं लावून सबंध टेकडी हिरवीगार केली आहे. पक्ष्यांचं, पक्षी निरीक्षकांचं, निसर्गभटकंती करणाऱ्यांचं हे आवडतं ठिकाण झालं आहे. रिसॉर्टचं बांधकाम बांबू वापरून केलंय, त्यामुळे इथे राहण्याचा एक वेगळाच अनुभव आहे आणि जितका बांबू बांधकामाला लागला, तितका बांबू पुन्हा लावलाही आहे.

रिसॉर्टची रचना म्हणजे मध्यभागी राजांगण आणि त्याच्या भवताली रूम्स. हॉलमध्येही बसायला ऐसपैस जागा आहे. झोपाळा आहे. वेगवेगळी पुस्तकं, जुन्या गाण्यांच्या कॅसेट्स, मंगेश दादांनी जमवलेल्या दुर्मिळ वस्तूंचं आणि जुन्या फिल्म्स पोस्टर्सचं कलेक्शन हॉलमध्ये आहे. छान हवेशीर अशी ही जागा आहे.

रूमसुद्धा अगदी आटोपशीर आणि सगळ्या सुविधा असणाऱ्या आहेत. प्रत्येक रूमच्या बाहेर बसण्यासाठी वेगळी जागा केली आहे. तिथून वाशिष्ठी नदीचं दृश्य दिसतं तर काही रूम्समधून रिसॉर्टमधल्या दाट वनराईचं नयनरम्य दर्शन घडतं. इथे बसलं की नानाविध प्रजातीचे पक्षी वनराईत नांदताना दिसतात. जणू आपण इथे निसर्गाशी जोडले गेलो आहोत असं वाटतं.

चेकइन केल्यावर तो दिवस निवांत रिसॉर्टवर घालवला. संध्याकाळी छान पाऊस सुरू झाला होता. बाल्कनीत बसून पाऊस बघत गरम गरम कांदाभजी, चहा पिण्याचा आनंद घेतला.

दुसऱ्या दिवसापासून परशुराम गावाची भटकंती करायला सुरुवात केली. सकाळी उठून बाल्कनीत येऊन पाहते तर ढग उतरले होते. अशा मोहक वातावरणात मंगेश दादा आम्हाला वॉटरफॉल ट्रेकसाठी घेऊन चालले होते.

हा धबधबा म्हणजे सवतसडा या प्रसिद्ध धबधब्याची वरची बाजू. मुंबई-गोवा हायवेवरून जाताना हाच धबधबा दिसतो. पण त्याच्या उगमस्थानी आम्ही ट्रेक करत जात होतो. तिकडे जायची वाट महेंद्र पर्वताच्या वनराईतून जात होती. चिपळूणच्या जवळ इतकं दाट जंगल आहे, याची मला कल्पनाही नव्हती. मोठ्या वृक्षांसोबतच रक्तदाबावर गुणकारी सर्पगंधा, बलवर्धक शतावरी, पावसाच्या खुणा दाखवणारं फर्न, वेगवेगळे मशरूम्स असे नानाविध प्रकार ट्रेक करताना पाहायला मिळाले.

हळूहळू धबधब्याचा आवाज कानावर पडू लागला आणि थोड्याच वेळात धबधबाही स्पष्ट दिसला. पहिल्या टप्प्यात छोटासा, देखणा धबधबा दिसला. अगदी नितळ पाणी! इथेच आम्ही दगडावर तीन कप मांडून चहा घ्यायचं ठरवलं. चहा म्हणजे मंगेश दादाने मस्त कशाय करून आणलं होतं. कशाय पिऊन सगळेच थोडे रिलॅक्स झाले. छानसा ब्रेक घेऊन पुढे निघलो.

धबधब्याच्या कडेनेच वाट जात होती. मोठाले दगड पार केले आणि एका सपाट दहा ते बारा फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा दिसला. सावकाश त्याच्याजवळ गेले. पाहते तर डोंगरातून, झाडीतून वाट काढत, मोठ्या टप्प्यावरून झोकून देऊन हा धबधबा कोसळत होता. तिथल्या दगडावर बसून, अंगावर पाणी झेलत मी चिंब चिंब भिजले. याच धबधब्याच्या जवळ थोडे अंतर वर चढल्यावर एक भग्नावस्थेत असणारं कुंडही होतं. याच कुंडातून सवतसडा धबधब्याचा उगम होतो. ब्रह्मेंद्र स्वामींनी याच कुंडातून पाणी पाट काढून गावात आणलं होतं. चिपळूणचं हे जंगल निसर्गसमृद्ध आहेच शिवाय अशा थक्क करणाऱ्या ऐतिहासिक खुणाही पोटात घेऊन आहे.

दुपारी आल्यावर श्रद्धाताईने जेवणाचा झकास बेत केला होता. फणसाचे घारगे, भेंडीची पीठ पेरून केलेली भाजी, कुळथाची उसळ, कुळथाचे कढण, करवंदाचं लोणचं असे चविष्ट पदार्थ होते. राजांगणात बसून जेवणाचा मस्त आस्वाद घेतला.

त्यानंतर आम्ही महेंद्र पर्वताच्या कुशीतील श्रीक्षेत्र परशुराम इथे गेलो. अपरांत, कोकणभूमीची निर्मिती केल्यावर परशुरामांनी तपश्चर्यासाठी निवड केली ती या महेंद्र पर्वताची.

मंदिराचा परिसर अगदी प्रशस्त आहे. हे मंदिर इस. ५७० मध्ये बांधण्यात आलं. सध्याचा जो मंदिर परिसर आहे तो ब्रह्मेंद्रस्वामी यांनी १७१० मध्ये उभारला. त्यांचेही स्मृतीकेंद्र तिथे आहे. मुख्य मंदिरात भगवान परशुराम, काल आणि काळ यांच्या मूर्ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज श्रीपरशुराम क्षेत्राला दर्शनासाठी येत असत, अशी माहिती मिळाली. मुख्य मंदिराच्या समोर रामदास स्वामींनी स्थापन केलेली मारुतीरायाची मूर्ती मंदिरात विराजमान आहे, तर मागील बाजूला परशुरामाच्या मातेचं म्हणजे रेणुकामातेचं मंदिर आहे. सुंदर कुंडही इथे आहे. त्याला बाणगंगा म्हणतात असं समजलं. मंदिराच्या वातावरणात चैतन्य आणि कमालीची प्रसन्नता आहे. त्यादिवशी मी मनसोक्त भटकंतीही केली आणि श्रीक्षेत्र परशुरामाच्या चैतन्यमयी वातावरणात गढूनही गेले. खरंच चिपळूणमध्ये आल्यावर दोन ते तीन दिवस मुक्काम करून बघता येतील अशी अनेक ठिकाणं दडली आहेत. त्याची ओळख पुढच्या भागात करून देईन.

  • जवळचे रेल्वेस्थानक - चिपळूण

  • जवळचे बसस्थानक - चिपळूण

  • मुंबई ते परशुराम, चिपळूण-पुणे ते परशुराम, चिपळूण

  • भेट देण्यासाठी उत्तम काळ - जून ते जानेवारी. पावसाळा ते हिवाळा वातावरण सुंदर असते. फक्त पावसाच्या दिवसात चौकशी करून जावे.

ट्रॅव्हल व्लॉगर

muktanarvekarofficial@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in