

प्रशांत असनारे
पूर्वी मी हसायचो
खूप हसायचो
अगदी मनमुराद हसायचो
पण आताशा कळत नाही
कुठे गायब झालंय
माझं ते निर्व्याज हसणं.
शोधायला बाहेर पडलो तर
अंगणात खेळणारी मुलं
खदखदून हसत होती
हसता हसता खेळत होती.
मी त्यांना विचारलं,
माझं हसणं हरवलंय.
तुम्हाला सापडलंय का ते?
तर ती म्हणाली,
कामाच्या व्यापात तुम्ही लक्षच दिलं नाही
तुमच्या हसण्याकडे.
शेवटी तुम्हाला कंटाळून
ते आमच्याकडे आलंय...
आमच्याशी खेळायला.
तेव्हापासून
वेळ मिळेल तेव्हा
मी त्या मुलांसोबत खेळतो,
बोलतो धावतो पळतो
अन् खळखळून हसतोही;
अगदी पूर्वीसारखाच.