विक्रम गायकवाड जादुई हातांचा रंगभूषाकार

प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं नुकतंच १० मे रोजी निधन झालं आणि चित्रपटसृष्टीने जादूई हातांचा कलाकार गमावला. ते रंगभूषेचे, मेकअपचे मॅजिशियन होते. त्यांच्या हातात कलाकाराचा चेहरा गेला की जादू होत असे.
विक्रम गायकवाड जादुई हातांचा रंगभूषाकार
Published on

सिनेरंग

पूजा सामंत

प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचं नुकतंच १० मे रोजी निधन झालं आणि चित्रपटसृष्टीने जादूई हातांचा कलाकार गमावला. ते रंगभूषेचे, मेकअपचे मॅजिशियन होते. त्यांच्या हातात कलाकाराचा चेहरा गेला की जादू होत असे.

ज्यांच्या हातात चेहरा गेला की जादू होते, असे रंगभूषाकार फार कमी असतात. कदाचित म्हणूनच त्यांच्याविषयीच्या आठवणींमध्येही ही जादू कायम असते.

‘लोकमान्य-एक युगपुरुष’ हा सिनेमा करताना टिळकांसारख्या राष्ट्रीय नेत्याला मी कसा न्याय देईन, मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य साधता येईल का, अशा अनेक शंका माझ्या मनात होत्या. पण प्रख्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड, ज्यांना आम्ही सगळे दादा म्हणत असू, त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वातून चक्क लोकमान्य टिळक घडवले. मला सेटवर लोकमान्य टिळकांच्या गेटअपमध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर सगळेच चक्रावले होते. ही किमया घडवली होती विक्रमदादांनी. दादा म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेलं वरदान होतं.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्याविषयी बोलताना सुबोध भावे भावूक झाले होते. ‘लोकमान्य-एक युगपुरुष’ अशा विविधांगी भूमिका करणाऱ्या सुबोध भावेंना त्यांच्या भूमिकांना होणारा दादांचा स्पर्श महत्त्वाचा वाटत होता. सुबोध भावे यांनी विक्रम गायकवाड यांच्या हातातील कौशल्याबद्दल, त्यांच्या अद्वितीय रंगभूषेबद्दल जे वक्तव्य केले आहे त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही. परेश रावल अभिनित ‘सरदार’ चित्रपटापासून विक्रम गायकवाड यांची कारकीर्द प्रकाशझोतात आली. परेश रावल यांच्या व्यक्तिमत्त्वातून त्यांनी आपल्या मेकअपच्या सहाय्याने साक्षात सरदार वल्लभभाई पटेल साकारले होते. आजही सरदार वल्लभभाई पटेल म्हटलं की, परेश रावल डोळ्यासमोर येतात. उत्तम अभिनेता म्हणून परेश रावल यांची कारकीर्द सर्वश्रुत आहेच, पण जोपर्यंत कलावंत त्या विशिष्ट व्यक्तिमत्त्वासारखा दिसत नाही, तोपर्यंत त्याच्या अभिनयाला उंची लाभत नाही. विशेषत: बायोपिक करताना जोवर कलाकार आणि त्या कलाकाराला साकारायची असलेली व्यक्तिरेखा यांच्यात देहबोली, चेहऱ्याची-शरीराची ठेवण यात शारीरिक साम्य आढळत नाही तोवर त्या कलाकाराने कितीही उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला तरी त्याला योग्य ती दाद मिळत नाही. व्यक्तिरेखा ऐतिहासिक असो किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाची असो, विक्रमदादा गायकवाड आपल्या मेकअपच्या तंत्राने कलाकारांना हुबेहूब त्या व्यक्तिरेखेप्रमाणे साकारत. अभिनेत्री विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ या फिल्ममध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची व्यक्तिरेखा साकारली होती. ज्यांनी वेळोवेळी विद्या बालनला तिच्या चित्रपटांमधून पाहिलेलं आहे, त्यांच्या हे लक्षात आलंच असेल की, विद्या बालन आणि साऊथमधील सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री सिल्क स्मिताच्या व्यक्तिमत्त्वात काडीचं साम्य नव्हतं. त्यामुळे एखाद्या रंगभूषाकारासाठी हे प्रचंड मोठं आव्हान होतं. पण एकता कपूरने बालाजी स्टुडिओत विद्या बालन आणि विक्रम दादा गायकवाड यांची भेट घडवून आणली. विक्रम गायकवाड यांच्यामधील स्वभावातील अतिशय टोकाचा साधेपणा, निगर्वी स्वभाव, ऋजुता आणि विशेष म्हणजे रंगभूषेतील त्यांचं अफाट ज्ञान, त्यातील त्यांचा गाढा अनुभव पाहून विद्या बालन स्तिमित झाली आणि तिने सिल्क स्मिता होण्यापूर्वी, ती व्यक्तिरेखा साकारण्यापूर्वी विक्रमदादांची तीनदा भेट घेतली आणि त्यांच्या मेकअपची प्रोसेस जाणून घेतली.

आपल्या देशात जेव्हा ‘प्रॉस्थेटिक मेकअप’चं टेक्निक पूर्णतः विकसित झालं नव्हतं तेव्हाही दादा आपल्या अभूतपूर्व कल्पनांनी आणि हातातल्या कौशल्याने कलाकाराला त्या व्यक्तिरेखेच्या अतिशय जवळ नेत असत. याच ‘डर्टी पिक्चर’ फिल्मसाठी विक्रमदादा गायकवाड यांना रंगभूषेसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत मराठी, हिंदी, दक्षिणी आणि बंगाली असे अनेक चित्रपट आपल्या नावीन्यपूर्ण आणि ॲडव्हान्स्ड मेकअप टेक्निकने एका उंचीवर नेले होते. त्यांच्या मेकअपमुळे त्या व्यक्तिरेखा सजीव आणि जिवंत दिसत. विद्यासोबत विक्रमदादांनी पुन्हा ‘शकुंतला देवी’ या चित्रपटासाठी काम केलं. आपल्या रंगभूषेद्वारे विद्यामधून गणिततज्ज्ञ शकुंतला देवी साकार केली.

‘तानाजी’, ‘संजू’, ‘थ्री इडियट्स’, ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’, ‘ओंकारा’, ‘बालगंधर्व’, ‘कमीने’, ‘मकबूल’, ‘इश्किया’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘पानिपत’, ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’, ‘दिल्ली -६’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘काशिनाथ घाणेकर’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’, ‘शेरशिवराज’... अशा अनेक चित्रपटांना विक्रम गायकवाडांनी एक उंची, एक खोली दिली. हे सगळेच चित्रपट चित्रपटांच्या इतिहासात ‘आयकॉनिक’ झालेत. आपल्या कामात, कलेत निष्णात असलेला हा रंगभूषाकार कलेचाच पूजक होता. त्यांनी फक्त आपल्या कलेशी फक्त इमान राखलं. कायम प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या विक्रमदादांना सेटवर आपलं काम करत असताना कधीही कुणीही गप्पा मारताना, अनावश्यक चर्चा करताना पाहिलं नाही. इतकंच काय, पण प्रसिद्धीपासून, मुलाखतींपासून सदैव फर्लांगभर दूर राहणाऱ्या या रंगाच्या कलावंताची मुलाखत घेण्यासाठी माध्यमं कायम उत्सुक असत, पण त्यांना प्रसिद्धी आवडत नव्हती. लो प्रोफाइल राहणारं एक उमदं, बुद्धिमान आणि आपल्या कामाशी वाहून घेणारं विक्रम गायकवाड हे नाव म्हणजे साधेपणाचं एक ठळक उदाहरण होतं.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे लक्षात राहिलेला अभिनेता रणवीर सिंग म्हणतो, “मला विक्रमदादांसोबत वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी वारंवार मिळाली. माझा लूक ते टोकाचा बदलत असत. त्यांनी केलेल्या मेकअपनंतर स्वतःला आरशात निरखताना माझा माझ्यावरच विश्वास बसत नसे.” रणवीर सिंगच्या मते, ‘विक्रमदादा वॉज ट्रूली मॅजिशियन.’ रणवीरच्या करियरमधील टर्निंग पॉइंट म्हणजे त्याने साकारलेली ‘८३’ सिनेमातील कपिलदेवची व्यक्तिरेखा. रणवीर सांगतो, “विक्रमदादांनी अडीच तास उभं राहून आधी माझ्यावर ट्रायल घेतल्या, त्याचे मुखवटे बनवले. अशा अनेक ट्रायलनंतर त्यांना समाधान देणारा चेहरा तयार झाला. मी कपिलदेवच्या किमान पायांजवळ पोहचू शकलो, प्रेक्षकांना मी रंगवलेली कपिलदेवची व्यक्तिरेखा भावली. मी भरून पावलो. अर्थात हे सगळं श्रेय मुख्यतः विक्रमदादा आणि मग दिग्दर्शक कबीर खान यांना जातं.”

‘रंग दे बसंती’, ‘पीके’ आणि ‘दंगल’ हे आमिर खानच्या कारकीर्दीतील तीन महत्त्वाचे चित्रपट. या तिन्ही चित्रपटांत आमिर खान हा स्क्रीनवर कधीही आमिर खान भासला नाही, तर तो जणू त्या व्यक्तिरेखाच बनून गेला होता.

विक्रम गायकवाड अतिशय अभ्यासू, मेहनती रंगभूषाकार होते. त्यांची कमतरता कायम जाणवेल. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचा कुंचला आता कलावंताच्या चेहऱ्यावर फिरणार नाही. चित्रपटसृष्टीची ही अपरिमित हानी कधीही भरून येणारी नाही.

ज्येष्ठ सिने पत्रकार.

logo
marathi.freepressjournal.in