
नोंद
डॉ. आनंद जोशी
‘सत्यमेव जयते’ हे आपले घोषवाक्य आहे. प्राचीन तत्त्वज्ञानापासून ते आजच्या काळापर्यंत सगळ्यांनी ‘सत्य’ हेच अंतिम मूल्य मानलं आहे. पण आजचं जागतिक वास्तव असं आहे की, निखळ सत्य असं काही असतं का? हा प्रश्न निर्माण होतो. पोस्ट ट्रूथच्या आजच्या काळात हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरत आहे. या प्रश्नाचा ललित अंगाने घेतलेला हा मागोवा.
फ्रेंच टीव्ही चॅनेल मी नेहमी पहातो. मला फ्रेंच भाषा येत नाही. पण बऱ्याच कार्यक्रमांना इंग्लिश सब टायटल्स असतात. फ्रेंच मंडळी कलासक्त. त्यांच्या बातम्यांमध्ये सुद्धा कलेबाबत काही तरी असतं. त्यांच्या बातम्यांच्या चॅनेलचं एक बोधवाक्य आहे - ‘स्वातंत्र्य, समतेच्या बातम्या’.
मी एक फ्रेंच सिनेमा बघत होतो. त्या सिनेमात एक वाक्य होतं. त्याचा आशय ‘खरे आणि खोटे हे दोन मित्र असतात...’ मी पडलो विचारात. डोक्यात एक गोष्ट आकार घेऊ लागली. एकदा काय झालं, एका गावात खरे आणि खोटे असे दोन दोस्त रहात असतात. अगदी जानी दोस्त. एका नाण्याच्या जणू दोन बाजू. जुळे भाऊच म्हणाना. एकाला झाकावा, दुसऱ्याला काढावा. चेहरामोहरा जवळ जवळ सारखा. कपड्यात मात्र थोडा फरक होता. त्यांना ओळखण्याचा तो एक मार्ग होता. ते दोघे हातात हात घालून गावभर भटकत असत. त्या दोघांना पाहिलं म्हणजे गावकऱ्यांचा गोंधळ उडत असे. गावकरी त्यांना निरनिराळ्या नावांनी ओळखत. ज्यांना संस्कृत वगैरे येत असे ते ‘खरे’ याला कौतुकाने ‘सत्य’ म्हणत, इंग्लिशवाले ‘ट्रूथ’, सामान्य पब्लिक मात्र खऱ्याला ‘खरे’च म्हणत असे. ‘खोटे’ याला संस्कृतवाले ‘असत्य’ ‘मिथ्या’, इंग्लिशवाले ‘लाय’ ‘फॉल्स’, तर पब्लिक मात्र खोटे याला ‘खोटा’ किंवा“खोटारड्या’ असं म्हणत असे. खरे आणि खोटे या दोन दोस्तांबाबत लोकांच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. विज्ञान जाणणारे म्हणत ‘खरं’ असं काही नसतं. नवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञान आलं म्हणजे एक ‘खरं’ जाऊन त्याजागी दुसरं ‘खरं’ येऊ शकतं. काही विद्वान लोक ‘ब्रम्ह सत्य, बाकी मिथ्या’ असं म्हणत. राजकारणी वगैरे म्हणत आम्ही ‘खरे’, ‘सत्य’ या दोस्ताला ओळखतो, ‘खोटे’ हा कोण आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण सामान्य लोक तसे दोन्ही दोस्तांना ओळखत असत. मात्र बरेच वेळा त्या दोघांना ओळखण्यात त्यांची गल्लत होत असे. पण व्यवहारात या दोन्ही दोस्तांचा गावकऱ्यांना उपयोग होत असे. एकदा हे दोन्ही मित्र गावाजवळच्या जंगलात भटकायला गेले. तिथे एक सुंदर तळं होतं. दोघांनी ठरविलं की, आज मस्त भरपूर पोहायचं. त्यांनी झाडाच्या फांदीवर आपापले कपडे टांगले आणि पाण्यात उड्या घेतल्या.
खूप वेळ पोहल्यानंतर ‘खोटे’ म्हणाला, “मी थकलो बाबा, मी आता झाडाखाली विश्रांती घेतो. तू ये मागाहून.”
खरे म्हणाला, “मित्रा, मी आणखी थोडा वेळ पोहणार आहेय अशी संधी पुन्हा येणार नाही. गावात गेल्यावर मला बरीच कामं आहेत. माझ्या कपड्याकडे जरा लक्ष ठेव. मी थोड्या वेळात आलोच.”
खऱ्याने खोट्यावर विश्वास ठेवला. खोटे झाडाखाली आला. त्याने खऱ्याचे कपडे चढवले. स्वत:चे कपडे खाकोटीला मारले. त्याने त्याचा कार्यभाग साधला. खोट्याला खऱ्याची मैत्री कधीचीच सोडायची होती. खऱ्याची त्याला कटकटच वाटायची. त्याने गावाकडे धूम ठोकली. ‘खरे’ पोहून वर आला. त्याला ‘खोटे’ कोठे दिसला नाही. खऱ्याचे कपडे पण गुल आणि ‘खोटे’ही गुल. ‘खरे’ आता उघडावाघडा झाला. त्याला असं उघडंवाघडं गावात जाणं शक्यच नव्हतं. आपला मित्र आपल्याला केव्हा तरी भेटेल या आशेने ‘खरे’ उघडावाघडा रानातच भटकत राहिला. इकडे ‘खोटे’ खऱ्याचे कपडे घालून गावात वावरू लागला. लोक त्याला ‘खरे’ समजून विचारू लागले, “अरे, तुझा दोस्त ‘खोटे’ हल्ली तुझ्याबरोबर नसतो. कोठे गेला तो?” खरा तर तो ‘खोटेच’ होता. म्हणूनच त्याला थाप मारायला वेळ लागला नाही. तो म्हणाला, “अहो, हल्ली तो ‘खोटे’ घरून काम करतो, वर्क फ्रॉम होम. पण कधी कधी येईल तो.” त्याचा तो खुलासा गावकऱ्यांनी स्वीकारला. हल्ली ‘खरे’च फक्त गावभर फिरतो. ‘खोटे’ गायब आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. हे वाचून बऱ्याच लोकांची पंचाईत झाली. कारण त्यांना नको त्या कामात ‘खोटेची’ खूप मदत व्हायची. गावातही एकट्या ‘खरे’ला लोक टाळू लागले. कारण बहुतेक सगळ्यांनाच ‘खोटेची’ मदत लागायची. ज्यांना ‘खरे’ खूप आवडायचा त्यांना सुद्धा कधी कधी ‘खोटेची’ गरज पडायची, मदत लागायची. खऱ्याचे कपडे घातलेला ‘खोटे’ हुशार होता. त्याला गावकऱ्यांची नाराजी जाणवली. मग एक दिवस ‘खोटे’ स्वत:चे कपडे घालून गावात फिरू लागला. त्याला कल्पना नव्हती इतकं त्याचं स्वागत झालं. सोशल मीडियावर पोस्ट फिरू लागली, ‘खोटे परत आला आहे’. आता ‘खोटे’ कधी ‘खरे’चे कपडे घालून फिरतो, तर कधी स्वत:चे कपडे घालून गावात फिरत असतो. इथे खरा ‘खरे’ जंगलात उघडाच भटकत आहे. गावात ‘खरे’ काय आणि ‘खोटे’ काय याचा संभ्रम तसाच कायम आहे.
‘खरे’ आणि ‘खोटे’ यांच्या दोस्तीने जगाचे व्यवहार अनंत काळापासून अव्याहत चालू आहेत. ‘सोलीव’ खरे, निखळ सत्य असं काही असतं का? का निखळ सत्य रानावनातच भटकत असतं?
विज्ञान लेखक व साहित्याचे आस्वादक.