ग्रंथाच्या लीळा

दोन-तीन दिवसांपासून ग्रंथमित्रांची आसन व्यवस्था बदलण्याचं काम सुरू आहे. ग्रंथमित्रांसोबत माझ्या अन् प्रयासच्या गप्पागोष्टी सुरू आहेत. काही ग्रंथ जीर्ण झाले आहेत, काहींची मुखपृष्ठं निखळली आहेत. अशा ग्रंथांची देखभाल करण्यासाठी प्रयास उत्तम साथ देतोय. हे काम करताना प्रयासला आणि मलाही खूप काही नव्याने शिकता आलं.
ग्रंथाच्या लीळा
Published on

आनंदाचे झाड

युवराज माने

दोन-तीन दिवसांपासून ग्रंथमित्रांची आसन व्यवस्था बदलण्याचं काम सुरू आहे. ग्रंथमित्रांसोबत माझ्या अन् प्रयासच्या गप्पागोष्टी सुरू आहेत. काही ग्रंथ जीर्ण झाले आहेत, काहींची मुखपृष्ठं निखळली आहेत. अशा ग्रंथांची देखभाल करण्यासाठी प्रयास उत्तम साथ देतोय. हे काम करताना प्रयासला आणि मलाही खूप काही नव्याने शिकता आलं.

गेल्या वीस वर्षांत तीन हजार ग्रंथांनी माझ्या घरात सन्मानाने जागा मिळवली. अर्थात तीन हजार अधिक चार सदस्य असलेलं आमचं कुटुंब! आमचं हे कुटुंब सदैव गजबजलेलं असतं. एकमेकांशी जणू काही आम्ही दररोज हितगुज करत आहोत, असं आम्हाला वाटतं.

ग्रंथ कधी सन्मानपूर्वक, तर कधी हट्टाने माझ्या घरी प्रवेशित झाले, होत आहेत...होत राहतील....कधी कधी तर ग्रंथ चोरपावलांनी येतात घरात. त्यांची ही चाल कळतच नाही. यांच्या येण्याने होणारा आनंद शब्दातीत आहे. प्रत्येक महिन्याला येणारी मासिकं, दररोजचं दैनिक, तर कधी मित्रांनी पाठवलेले ग्रंथ यांची एक वेगळीच तऱ्हा पाहायला मिळते. ग्रंथ आपल्याच घरात येऊन आपल्यालाच घराच्या बाहेर कसे काढतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे दिवंगत सतीश काळसेकर दादाचं. त्यांचं ग्रंथ प्रेम आणि वाचन माझ्यासाठी आदर्श होतं. त्यांच्या ग्रंथांनी माझी अन् त्यांची भेट होऊ दिली नाही. कधीही “मी येतोय आपल्याला भेटायला” असं म्हंटलं की ते म्हणायचे, “अरे, मलाच राहायला जागा नाही. मीच आपल्या घराच्या पडवीत राहतोय. काही दिवस थांब. या पुस्तकांची व्यवस्था करतो. मग ये...” आणि मग पुढे त्यांचं अचानक जाणं माझ्या जिव्हारी लागलं. त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या ग्रंथात त्यांनी अनेक आठवणी नमूद केल्या आहेत. ग्रंथांवर प्रेम करणारा हा ग्रंथदूत न भेटता गेल्याचं शल्य कायम राहील.

ग्रंथमित्र घरी येतात खरे, पण सर्वांशी खलबतं करायला वेळच अपुरा पडतो. वेळेचं गणित काही केल्या जमत नाही. अनेक ग्रंथमित्र वर्ष वर्ष आपल्याला मिळालेल्या जागेवर गुपचूप बसलेले असतात. कसलीही तक्रार न करता, तर काही ग्रंथमित्र प्रत्येक महिन्याला माझीच हजेरी घेतात. लेकरांना दररोज नवं ताजं टवटवीत हवं असतं. त्यासाठी काही ग्रंथांना तर दररोज हाताळावं लागतं. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कारागीर लोकांचं काहीतरी भांडवल असतं, काही ना काही साधनं, हत्यारं असतात. तसं शिक्षक म्हणून माझं भांडवल काय असावं, असा प्रश्न पडायचा. मग लक्षात आलं की, ग्रंथ हेच आपलं मोठं भांडवल आहे. यातील अनेक ग्रंथ तर संदर्भग्रंथ म्हणून माझ्या सोबतीला आले. कधी कधी तर वाटतं की, अनेक शिक्षक एकही पूरक पुस्तक न वाचता, संदर्भग्रंथ न हाताळता कसे काय आपल्या वर्गातील लेकरांना पौष्टिक अनुभव देत असतील... वर्षानुवर्षे..!

मी नेहमी म्हणत असतो की, “मला माझ्या विद्यार्थ्यांनीच श्रीमंत केलं आहे.” २००६ पासून सुरू झालेल्या ‘वाचनाच्या आनंद सोहळ्यामुळे’ हे सर्व ग्रंथमित्र माझ्या अंगणी येऊ लागले आणि आज माझं मोठं कुटुंब बनलं. याचं सर्व श्रेय माझ्या लेकरांना जातं. लेकरांचे कान समृद्ध होत होत त्यांची आवड समोर येऊ लागली आणि त्यातून ग्रंथ खरेदीची दिशा ठरू लागली. त्यातूनच वैविध्यपूर्ण ग्रंथ घरी येऊ लागले. अशा या ग्रंथमित्रांची अधूनमधून जोपासना करावीच लागते. वर्षभरातून एकदा तरी प्रत्येक ग्रंथाला आपला स्पर्श लाभला पाहिजे. प्रत्येक ग्रंथ हाताळताना त्याचं आगमन आणि त्याची पूर्ण माहिती जागी होते. कोणत्या निमित्ताने या ग्रंथाचं आगमन झालं, त्याचा कसा उपयोग झाला, त्या ग्रंथाने आमच्या ज्ञानात कशी भर घातली, आमच्या मनात कसं स्थान मिळविलं, असं बरंच काही आठवत जातं. आपल्या संग्रही असलेले काही ग्रंथ नाही दिसले की अस्वस्थ वाटू लागतं. शोध घेतल्यास कळतं की काही आपले निष्ठूर वाचक मित्र आहेत, त्यांच्याकडे हे आपले ग्रंथमित्र अडकून पडले आहेत. वेळेवर पुस्तक परत न करणाऱ्या, पुस्तकावर खुणा करणाऱ्या, पानं दुमडणाऱ्या वाचकांना काळ्या यादीत समाविष्ट करा, असा कठोर सल्ला आमचे ग्रंथदूत मित्र गजानन थत्ते देतात.

ग्रंथांच्या लीळा अजबच असतात. काही ग्रंथ सतत खुणावत राहतात मला घेऊन चल, तुझ्या शाळेतल्या लेकरांना मला भेटायचं आहे म्हणून, तर काही रागावतात, मला वर्षभर स्पर्श का केला नाही म्हणून. भेट मिळालेले ग्रंथ नाराज असतात नेहमी. कुठं येऊन फसलो असा भावही त्यांच्यात दिसतो. साफसफाई करताना प्रयास अनेक प्रश्न विचारत होता. चित्र पाहत होता. बऱ्याच नवीन गोष्टी त्याला या ग्रंथांच्या डागडुजी करताना शिकायला मिळाल्या. मलाही नवीन काही युक्त्या आणि समाधान मिळालं. आपल्या संग्रहात कोणत्या लेखकाचे ग्रंथ नाहीत, कोणत्या विषयाचे ग्रंथ कमी आहेत, अशा अनेक बाबी लक्षात आल्या.

काही ग्रंथमित्रांना वाळवी लागली होती. ती साफ करताना त्यांच्या सद्भावना मला व प्रयासला जाणवत होत्या. ग्रंथांच्या सान्निध्यात किती मोठं समाधान लाभतं हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय कळत नाही. कधी पुरस्कार म्हणून ग्रंथांसोबत सन्मानचिन्ह मिळतात. त्यांची पण साफसफाई झाली.

ज्यांच्या संग्रही ग्रंथ असतात ते कधीच एकटे नसतात. त्यांच्या घरी जणू एखादं गाव वसलं आहे असंच वाटतं. तीन दिवस या ग्रंथमित्रांसोबत राहून त्यांची केलेली सुश्रुषा सुखावह होती.

प्रयोगशील शिक्षक आणि ललित लेखक

logo
marathi.freepressjournal.in