नाच ग सुमा

मैत्रीचा अर्थ समजावणारी निरागस गोष्ट
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र (Photo-@belladivadance.com/)
Published on

कथा

माधव गवाणकर

मैत्रीचा अर्थ समजावणारी निरागस गोष्ट

बॉबीला नाच करण्याची भारी हौस आहे. ‘नृत्यकला’ हा शब्द जरा भारी वाटतो. है ना? नाच करून दाखवते हे आपलं बरं आणि खरं. तर बॉबी नृत्याच्या क्लासला जायची. पीयूष सर तिला नृत्य शिकवायचे. त्यांची फी देणं बॉबीच्या पप्पांना सहज शक्य होतं. ते सरकारी अधिकारी होते. बॉबीला फार छान नाचता येत होतं असं नाही, पण व्यायाम तर व्हायचा! नाचामुळे चपळपणाही येतो. पीयूष सर तर खूपच मस्त नृत्य करायचे. त्यांना खूप बक्षिसं मिळाली होती. पीयूष जाधव हे नाव टीव्हीच्या पडद्यावरही दिसायचं. कोरोनाच्या काळात तर सरांनी ऑनलाइन पद्धतीने मुलींना नृत्य शिकवलं आणि क्लासही सुरूच ठेवला.

बॉबीला पीयूष सरांच्या त्या क्लासच्या ठिकाणी सोडायला कार जायची. येतानाही कार असायची. सर म्हणाले, बॉबी तुला कार का लागते? उगाच पेट्रोल वापरलं जातं. तुझ्याकडे सायकल आहे ना? सायकलवरून येत जा. इंधनावरची वाहनं कमीत कमी वापरावी. हा एक नवा धडा बॉबीला मिळाला. तीही इतर मुलींप्रमाणे सायकलवरून येऊ लागली. कधी कधी तर चालतही येऊ लागली. “सगळ्या मुला-मुलींकडे कुठे असते कार? मग मला तरी सारखी कार कशाला पाहिजे?” असा विचार करू लागलेली बॉबी पाहून तिच्या श्रीमंत पप्पांनाही जरा नवलच वाटलं. स्वतःला ‘सामान्य’ समजण्यात काही कमीपणा नाही असं सर म्हणाले. सर स्वतः सामान्य नव्हते, पण किती साधी राहायचे!

नृत्याचा सराव करण्यासाठी एक मोठा हॉल सरांनी भाड्याने घेतला होता. बॉबीच्या लक्षात आलं की, दिसायला खूप छान, नाजूक असलेली एक मुलगी हॉलच्या बाहेर राहून खिडकीतून तिचा आणि इतर मुलींचा नाचाचा सराव बघत असते. जवळजवळ रोजच ती तिथे हजर असते. का कोण जाणे बॉबीला वाटलं की, त्या बाहुलीसारख्या दिसणाऱ्या मुलीची चौकशी करावी. तिच्याशी ओळख करून घ्यावी. नाचणाऱ्या मुलींकडे एकटक बघणाऱ्या त्या मुलीलाही नाच करण्याची इच्छा असेल का? मग ती क्लासमध्ये नाव का घालत नाही? बॉबी धीट होती. तिने जुना फ्रॉक घालून येणाऱ्या त्या मुलीला नाव विचारलं, तिची विचारपूस केली. हॉलची साफसफाई करायला येणाऱ्या आजीबाईची ती नात होती. तिचं नाव होतं सुमा. कागदोपत्री सुमित्रा.

बॉबी म्हणाली, “सुमा तू नाच बघायला रोज येतेस ना? मग आत का येत नाहीस? तुला पण नाच करायला आवडतं का?”

“खूप आवडतं पण.. पण

“पण काय?”

“आमच्याकडे पैसे नाहीत. परिस्थिती चांगली नाही. माझी आजीच माझा खर्च करते. माझे पप्पा.. देवाघरी गेले. त्यांना कोरोना झाला होता. माझी आई चहापाण्याची टपरी चालवते.” कष्ट करून जगणाऱ्या त्या बायकांच्या कुटुंबाबद्दल बॉबीला आदर वाटू लागला. तिने घरी जाताना काहीतरी ठरवलं, अगदी मनाशी नक्की केलं. या २०२६मध्ये नव्या वर्षी बॉबीला नवा निश्चय करायचा होता.

तिने पप्पा आल्यावर त्यांना लगेच विचारलं, “पप्पा, सुमा नावाची माझी एक मैत्रीण आहे, खूप गरीब आहे. तिची नाचाच्या क्लासची फी तुम्ही भराल का? रोज ती नाच बघायला आमच्या हॉलच्या बाहेर उभी असते. आपण करायची का तिला मदत? भरायची का तिची फी?” फी फार कमी होती असं नाही, पण पप्पांना पैशाची काहीच कमतरता नव्हती.

नवीनच ओळख झालेल्या सुमाला बॉबीने मैत्रीण बनवून टाकलं. तिच्या छोट्याशा घरी ती जाऊन आली होती. खाडीच्या अगदी जवळ झोपडीसारखं तिचं छोटंसं घर होतं. पावसाळ्यात तर फारच हाल व्हायचे आणि घरात पाणी शिरलं की, उपसावं लागायचं. सुमा बॉबीमुळे नृत्याच्या सराववर्गाला येऊ लागली. खरोखरच तिला नाचाची आवड होती. तिला नृत्य छान जमू लागलं. गरिबी विसरून तिचं मन त्या नाचात रमू लागलं. बॉबीपेक्षाही ती मस्त नाचू लागली तरी बॉबीला तिचं कौतुकच वाटलं. आता तर पीयूष सर या मुलींना टीव्हीवर कार्यक्रम करण्यासाठी घेऊन जाणार होते.

‘मैतरणी बिगी बिगी चल ग..’ नावाचं नृत्यगीत त्यांनी दूरदर्शनसाठी बसवलं होतं. त्यात बॉबीबरोबर सुमाही मस्त नृत्य करणार होती. सरांनी मुलींच्या त्या गटाला नाव दिला होतं ‘मयुरी डान्स ग्रुप.’ सुमा आता नर्तिका बनत आहे. तिचं स्वप्न बॉबीमुळे पूर्ण होतंय. मुलांची मैत्री निरागस असते, त्यात स्पर्धा नसते, असतं फक्त प्रेम आणि एकत्र शिकणं आणि आनंदाचे क्षण जमा करणं.

ज्येष्ठ साहित्यिक

logo
marathi.freepressjournal.in