

बालोद्यान
एकनाथ आव्हाड
रविवारचा सुट्टीचा दिवस. बाळू, शमीच्या शाळेला आज सुट्टी, त्यामुळे ते घरीच होते. बाबांच्या ऑफीसलाही तशी रविवारची सुट्टीच असते. पण आज ते एका आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी सकाळीच शिवडीला गेले होते. आता तिथून ते संध्याकाळीच परतणार, हे त्यांनी सकाळीच घराबाहेर पडताना सांगून ठेवले होते. मग आता दुपारच्या जेवणाला घरात इनमीन तीनच माणसं...आई, बाळू आणि शमी. दुपारची जेवणं त्यांची पटापट आटपली. जेवण झाल्यानंतर बाळू शमीला म्हणाला, “शमू, आता फुल्ली - गोळा खेळायचा का आपण ? पण परवा साप-शिडी खेळताना जसा चिडीचा डाव तू खेळलीस तसं आज नाही चालणार बरं, आधीच सांगून ठेवतोय. तसं असेल तर, बस तुझी तू एकटी खेळत. मी आपला जातो मित्रांसोबत बाहेर क्रिकेट खेळायला.”
“असं रे काय करतोस दादा. गळ्याशप्पथ सांगते, मी अगदी शहाण्या मुलीसारखं खेळेन. चिटिंगबिटिंग बिलकूल करणार नाही.” त्यांचं बोलणं ऐकून आई गालातल्या गालात हसली. ते दोघेही आतल्या खोलीत गेले. आईने मग जेवणानंतरची सगळी आवरासावर केली. सारी कामं आटपल्यावर बाहेरच्या खोलीत येऊन ती संध्याकाळच्या भाजीसाठी मेथीची जुडी खुडत बसली.
दुपारच्या वेळी वारा घरात यावा म्हणून दार मुद्दामहूनच उघडं ठेवलं होतं. थोड्याच वेळात, दारात पावलांचा आवाज आला. पाहिलं तर बाळूचं मित्रमंडळ भर दुपारच्या वेळी दारात उभं. बाळूचा मित्र राकेशने तर बाळूच्या आईला दारातूनच विचारलंसुद्धा.
“अहो काकी, बाळू आहे का घरात ?”
“हो, आहे की. तो आणि शमी बसलेत आतल्या खोलीत, फुल्ली-गोळा खेळत. पण काय रे पोरांनो, आज काय विशेष काम काढलंत, अगदी भर दुपारचं ?” मेथीची भाजी खुडता खडताच तिने विचारलं.
“काही खास नाही हो काकी. खरं तर , क्रिकेट खेळायलाच जाणार होतो आम्ही त्या आपल्या सुभाषनगर चौकाजवळच्या सावरकर मैदानावर. पण छे...! नेमकं आजच म्युनिसिपालिटीने ते मैदान दुरूस्तीच्या कामासाठी ताब्यात घेतलंय ना. मैदानावर माती टाकून त्यावर रोलरही फिरवायचाय म्हणे. त्यामुळे आज नो क्रिकेट.” मुलांचे नाराज चेहरे पाहून आई म्हणाली, “बरं, बरं, आधी घरात तर या, की दारातूनच सगळं रामायण-महाभारत सांगत बसणार? आणि मला एक सांगा, क्रिकेट हाच एकमेव खेळ आहे का रे खेळायला? अरे, दुपारचं उन्हातान्हात बाहेर खेळत, भटकत बसण्यापेक्षा कधी कधी घरातल्या घरातही खेळून पाहा की. शेवटी कोणताही खेळ मनापासून खेळला की तो खेळ खेळणाऱ्यालाच काय, पण पाहणाऱ्यालाही आनंद देतो.” मुलांनी बाळूच्या आईशी बोलता बोलता घरात प्रवेश केला. आणि पाहता पाहता बाहेरची बैठकीची खोली मुलांनी फुलून गेली. आईची भाजीही आता खुडून झाली होती. एका छोट्या टोपलीत खुडलेली भाजी ठेऊन भाजीची देठं तिने ओल्या कचऱ्यासाठी वेगळ्या केलेल्या डब्यामध्ये टाकली. बाळूच्या घरी ओला-सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी वेगवेगळे डबे होते.
मित्रांच्या आवाजाने शमी, बाळू लागलीच आतल्या खोलीतून बाहेर आले.
शंकेखोर रघुनाथने आपली प्राथमिक शंका बाळूच्या आईला विचारली.
“घरातल्या घरात बसून कसं खेळणार काकी ? खेळाला मैदान नको का ? खेळ म्हटला की मैदान हे आलंच. नाही का रे बाळू?” बाळूऐवजी आईच पटकन म्हणाली.
“अरे हो, पण थंडी-ऊन-पावसात घरात बसून बैठे खेळ खेळू शकता ना तुम्ही ? त्याला कुठे हवे मैदान ? ....सापशिडी, व्यापार, कॅरम, बुद्धिबळ, अंताक्षरी, ओळखा कोण ?......असे कितीतरी खेळ घरातल्या घरात खेळता येतील. जे एका जागी बसून तुम्ही छान खेळू शकता. कॅम्प्यूटरवरचे गेम एकट्या-दुकट्याने खेळण्यापेक्षा असे कितीतरी बैठे खेळ तुम्ही एकत्र येऊन खेळू शकता. जे तुमच्या बुद्धीला खुराक देतील, विचारांची देवाणघेवाण करतील आणि त्यातून तुम्हांला मनमोकळा आनंद मिळेल.”
सुशांत साशंकपणे लगेच म्हणाला, “ओळखा कोण ?.....हा कोणता खेळ काकी ? मी नाही बुवा खेळलो अजून तरी हा खेळ. या खेळाबद्दल सांगा ना काकी.” मधुकरनेही मग तीच री ओढली. आई म्हणाली, “अरे, सांगते, सांगते, असे घाईकुतीला येऊ नका.” बाळू म्हणाला, “आई, या खेळाची नुसती माहिती नको आम्हाला. आता प्रत्यक्ष खेळच हवा. काय रे मित्रांनो, हो की नाही?” सगळ्या मित्रांनी लगेच ‘होय’, ‘होय’चा नारा लावला. आता ‘ओळखा कोण?’, ‘ओळखा कोण?’ हा एकच आवाज घरात घुमला. नवा नवा, हा खेळ हवा, असंच मुलांचं झालं होतं. मुलांचा तो नूर पाहून आता आईलाही हा खेळ मुलांसोबत खेळल्याशिवाय गत्यंतर नव्हती. ती म्हणाली, “अरे, हा खेळ म्हणजे, मी तुम्हांला एक कोडं घालेन आणि तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. खेळ अगदीच सोप्पा. आता बघा,
छाताडावरून त्याच्या, नौका फिरे डौलात,
सूर्याच्या उष्णतेने, तापून जाई ढगात,
मासे,मीठ,मोती, तो इंधनही देतो,
लाटालाटातून सांगा, कोण उसळतो ?...
आता याचं उत्तर आहे - समुद्र, सागर...
बरोबर ना ?.... हे उत्तर तुम्ही काव्यमय द्यायचं...जसं जमेल तसं. आता याचं उत्तर मी असं देईन ....
परदेशाची तो यात्रा घडवतो
सर्वांचा सहप्रवासी, ‘सागर’च तो..
“अरे व्वा...! छानच की. म्हणजे कवितेतून उखाणाच घालायचा. आणि त्याचं उत्तर काव्यातूनच द्यायचं. मस्तय हा खेळ. चला चला, खेळूया आपण हा खेळ, मस्त जाईल आपला वेळ.” राघव उत्साहाने म्हणाला.
त्यावर शामू म्हणाली, “आता दुसरं कोडं मी तुम्हांला घालते. तुम्ही एकाएकाने उत्तर द्या बरं.
कागद केवढा, आहे ढवळा,
कधी काळा, कधी सावळा,
रात्री चमचम, चमकत राहतो
दिवसा मात्र कोण, लख्ख होतो?....”
बाळू लगेच म्हणाला,
“चंद्र आणि असंख्य तारे, ज्यात आहेत चमकत
ईश्वर कृपेचे आहे, ‘आकाश’ हे छत...”
आई उत्साहाने म्हणाली, “व्वा... ! छान. ‘आकाश’... अगदी बरोबर सांगितलंस उत्तर. आता रघुनाथची पाळी हा.
...सकाळच्या वेळी, हळूच डोकावतो,
दुपारच्या वेळी, डोळे दिपवतो,
रात्रीच्या कुशीत म्हणे, गुडूप झोपतो,
संध्याकाळी क्षितिजाला, कोण बरं टेकतो?”
...रघुनाथ थोडा विचारात पडला. पण लगेच सरसावून म्हणाला,
“योग्यच म्हटले आहे, तेजोनिधि गगनराज,
प्रकाशदाता विश्र्वाचा, हे तर ‘सूर्य’ महाराज.”
आई म्हणाली, “छानच. सूर्य....अगदी बरोबर हां. आता पुढचं कोडं राकेशसाठी.....
तो नसला की, झाडही रुसते,
धरणीमाय तर, गप्पच बसते,
आल्यावर पानं, वाजवतात टाळ्या,
कुणाला झेलत, हसतात कळ्या?”
राकेश म्हणाला, “सोप्पय याचं उत्तर.
“जीवनाचा प्राण,चैतन्याने बहरे सृष्टी,
‘पाऊस’ जणू ईश्वराच्या, कृपेचीच वृष्टी...”
आई म्हणाली, “अरे व्वा. पाऊसच बरसला की या काव्यपंक्तीतून. छानच. आता शमू तुझी पाळी हां.
झाडावर डोलतात, पानांशी बोलतात,
टपटप उतरून, वाऱ्यासोबत चालतात,
सुगंध साऱ्यांना, वाटीत बसतात,
नव्या रंगरूपात, कोण बरं हसतात?..”
.......शमीचं डोकं पटकन चाललंच नाही. उत्तर तिला काही सुचलंच नाही. बाळूचा मित्र राघव मात्र मी... मी... करून उत्तर सांगण्यास आतूर होता.
आई म्हणाली, “शमू, तुझ्यावर एक हंडी चढली बरं. राघव, चल तू सांग उत्तर.” राघव म्हणाला,
“कोणाच्या नशिबी पूजा,कोणाच्या नशिबी धूळ
हसून जगत असते, प्रत्येक फुललेले ‘फूल’ ”
मस्तच रे राघव, असं म्हणत आई संतोषला म्हणाली, “संतोष तू सांग हा उत्तर.
ऊन्हात उभे राहून, सावलीत साऱ्यांना घेतात,
शुद्ध प्राणवायूही भरभरून देतात,
पर्यावरणाचा समतोल राखतात किती छान,
सांगा मुलं, कोणाची फळं, फूलं, पानं?”
संतोष तर हुशारच. पटकन म्हणाला,
“त्याग समर्पणाची, जिवंत ही निशिणी.
वाचा आणि जपा, ही ‘वृक्ष’कहाणी.”
“अगदी बरोबर उत्तर. वृक्ष, झाड.”, आई हसून म्हणाली.
बाळू म्हणाला, “आई, आता मी घालू का तुला एक कोडं?” आईने होकार दिला.
“पर्वतावरून ती धावत येते
सागरास मग, जाऊन मिळते
थांबत नाही, ती पुढेच जाते
बाग, शेती कोण फुलवते?”
आई हसून म्हणाली,
“जिच्या काठी वाढली, संस्कृतीची महानता,
‘नदी’ ही खरोखरंच, आपली संस्कृती माता.”
बाळू म्हणाला, “नदी. व्वा. अगदी बरोबर उत्तर दिलंस आई.”
आई हसली. म्हणाली, “बरं बरं, कळला ना आता खेळ? चला, आता बराच झालाय वेळ. तुम्ही बसा खेळत. मला जरा स्वयंपाक खोलीत काम आहे. शिवाय, तुमच्यासाठी खायला काहीतरी घेऊन येते. खेळल्यावर भूक तर लागणारच. नाही का?” मुलांनी माना डोलावल्या. आई मग तिथून उठली. आतल्या खोलीकडे वळली. मुलांची खेळाची झुकझुक गाडी आता वळणं घेत घेत पुन्हा नव्या वेगाने धाऊ लागली. आनंद, उत्साहाचं इंद्रधनुष्य मुलांच्या चेहऱ्यावर फुलवू लागली. खेळात केवढा वेळ गेला. कुणाला कळलंच नाही. शमीला मात्र एक आयडीया सुचली. शाळेत मैत्रिणींना कोडी घालण्यासाठी मुलांची खेळातली कोडी ती भरभर एका वहीत लिहून घेऊ लागली. गरमागरम पोह्यांच्या बशा स्वयंपाकघरातून बाहेर आल्या, तेव्हा कुठे खेळाला विराम मिळाला.
संध्याकाळी बाबा घरी आले. सर्वांची जेवणं झाल्यानंतर शमी पटकन बाबांना म्हणाली. “बाबा,
कडूला नेहमीच नाक मुरडते,
तिखट लागताच जाम ओरडते,
साऱ्या चवी तिलाच कळतात,
कोणाचे चोचले, पुरवले जातात ?”
बाबा म्हणाले, “आता हे काय मध्येच.”
“बाबा याचं उत्तर सांगा.”
.बाबा लगेच म्हणाले, “कळलं कळलं. ‘ओळखा कोण?’ चा खेळ ना हा? शमू, तुझ्या कोड्याचं उत्तर सांगू ?
एकच बहीण आहे बत्तीस भावात,
भाऊ जेऊ घालतात, ‘जीभ’ राहते थाटात..
बरोबर आहे ना उत्तर ...‘जीभ’? नाहीतरी आपल्या शमूची जीभ खूप चुरूचुरू बोलत असते घरात. म्हणूनच की काय तिने जीभेवरचं कोडं टाकलं मला.”
यावर शमी सोडून सगळेच खळखळून हसले. तोंडाचा चंबू करून, नाक फुगवून शमूबाई मात्र बसल्या रुसून. आई म्हणाली, “आता शमूला हसवण्यासाठी मी एक नवीन कोडं घालते.”
कोडं म्हटल्याबरोबर शमीची कळी खुलली. कान टवकारून सशासारखी ती आईपुढे येऊन बसली. बाळूही सरसावून बसला. आणि आता पुन्हा एकदा ‘ओळखा कोण?’च्या खेळाला रंग चढत गेला. अंगणातल्या संध्याकाळच्या रुपेरी चांदण्यांसारखा.
साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक.