

बालमैफल
सुरेश वांदिले
मालकीणबाईंची नजर चुकवून परवा मार्गारेट मनीमावशी आणि रॉबिन्सन उंदीरमामा शाहरुख खानचा मन्नत बंगला असलेल्या बँड स्टँडवर गेले. तेथील समुद्रकिनाऱ्यावरून सूर्यास्त खूपच छान दिसतो, असं रॉबिन्सनला मन्नत बंगल्यातील टॉबिन्सन या त्याच्या चुलतभावाने कधीतरी कळवलं होतं. हा मावळतीचा सूर्यास्त बघा नि मग मन्नतमध्ये येऊन गौरी वहिनीने तयार केलेल्या ‘झण्ण’ बिर्याणीवर ‘टण्ण’ ताव मारा, असा त्याचा निरोप होता. मामाने हा निरोप मावशीला सांगितला. तिच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवल. त्यामुळे ती लगेच तयार झाली.
वाहनांना चुकवत-चुकवत दोघेही बँड स्टँडवर आले. मन्नतसमोरच्या किनाऱ्यावरील दगडाच्या आडोशाला बसून सूर्यास्ताचा आनंद घेऊ लागले. गोल गोल सूर्य हळूहळू समुद्राच्या पाण्यात गडप झाला नि आकाशात चंद्र उगवला. तोही गोल दिसत होता. मामाने मग समुद्राच्या पाण्याकडे नजर वळवली, तर तेही गोलाकार असल्याचा त्याला भास झाला. मामाने मावशीला ते सांगितलं.
“मावशे ही गोलाची काय बरं भानगड असावी?”
“डिअर रॉबू, बिर्याणीचं भांडही गोलाकारच असतं?” मावशीचं सगळं लक्ष गौरी वहिनींच्या बिर्याणीकडेच लागलं होतं.
“माय मावशे, बिर्याणी कुठे जात नाही मरायला. समुद्रात बुडालेला सूर्य, आकाशात उगवलेला चंद्र नि समुद्राचं पाणी असं सगळं गोल गोल का दिसतं? हे जरा मला आधी समजावून सांग बघू.”
“कारण तुमची पृथ्वी गोल आहे.” मावशी बोलण्याच्या आधी कुणीतरी रॉबिन्सनच्या कानात पुटपुटलं.
“मावशे बाय, इथं भूताटकी हाय. कुणीतरी माझ्या कानात पुटपुटलाय, आपली पृथ्वी गोल हाय म्हणून.”
“गधड्या इथे कुणी नाही. तुला भास झाला.” रॉबिन्सनचा कान उपटत मावशी म्हणाली.
“मावशे, हा भास नाही. तर मी आहे. जरा वर बघ.” मावशीच्या कानात कुणीतरी पुटपुटलं. मावशीने लगबगीनं वर बघितलं, तर तो होता चंद्रावरचा गोलमटोल ससोबा. तोच सांगत होता, तुमची पृथ्वी गोल आहे म्हणून.
मावशी एकदम भानावर आली. पण, ससोबाच्या सांगण्यावर थोडीच विश्वास ठेवणार ती. तिने डोळे मिटून मेंदूला माहितीच्या माहाजालात पिटाळले. काही क्षणात मेंदूने तिला माहिती पुरवली. त्याने आणलेली माहिती ससोबाच्या माहितीशी मिळतीजुळती होती.
“अरे रॉब्या, आपली पृथ्वी खरोखरच गोल आहे.”
“हे त्या चंद्रावरच्या ससोबास वरून दिसलं. पण या मनुष्यप्राण्याला कसं आणि कधी कळलं असेल, हे रहस्य?”
“सुमारे २००० वर्षांपूर्वी इरॅटोस्थेनीस नावाच्या विद्वानाने दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये पडणाऱ्या सावलीच्या कोनावरून पृथ्वीचा परिघ जवळजवळ अचूक मोजला. यातून पृथ्वीचा गोल आकार त्याने पहिल्यांदा सिद्ध केला, असं समजलं जातं.”
“वाव! पण त्याआधी या मनुष्यप्राण्याची पृथ्वीबद्दलची काय समजूत होती ग?”
“राबू, या मनुष्यप्राण्यास शेकडो वर्षांपूर्वी आपली पृथ्वी सपाट आहे असंच वाटायचं.
“का बुवा?”
“कारण क्षितिजापलीकडचं माणसाला काही दिसायचं नाही ना. त्यामुळे तिथे जमीन संपते अशी त्याची समजूत होती.”
“ही समजूत खोटी कशी ठरली?”
“रॉबू, मनुष्यप्राणी समुद्रावरून प्रवास करताना विश्रांतीसाठी काही काळ किनाऱ्यावर थांबायचा. तेव्हा किनाऱ्यावरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या जहाजांचे निरीक्षण करायचा.”
“काय आढळलं या निरीक्षणात त्याला?”
“त्याला दिसलं की पृथ्वी सपाट असती तर क्षितिजापर्यंत पोहचेपर्यंत संपूर्ण जहाज दिसायला हवं होतं.”
“तसं होत नव्हतं का?”
“नाही ना. क्षितिजापलीकडे जाताना जहाजाचं बूड आधी अदृश्य व्हायचं. मग त्यावरचा भाग आणि शेवटी जहाजाची वरच्या भागातील डोलकाठी. जेव्हा जहाज क्षितिजाकडून किनाऱ्याकडे येई, तेव्हा आधी डोलकाठी, मग मधला भाग नि मग सगळं जहाज दिसू लागायचं. यावरून या जहाजावरील प्रवाशांच्या लक्षात आलं की पृथ्वी सपाट नसून गोल असली पाहिजे.”
“मग, या मनुष्यप्राण्याने त्याच्या लटपटी खटपटी स्वभावानुसार आणखी काही पुरावे गोळा केले असतील ना मावशे?”
“ये भी कोई पुछनेकी बात हुई. पृथ्वीचा आकार खरोखरच कसा आहे, या शोध घेण्यासाठी त्याने अभ्यास सुरू केला. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडून तो दिसेनासा होतो. चंद्राचा प्रवास पृथ्वीच्या सावलीतून होताना त्या सावलीची कडा कुठूनही वर्तुळाकार दिसते. म्हणजे पृथ्वी गोल असल्यानेच हे शक्य होतं, असं मनुष्यप्राण्याच्या लक्षात आलं.”
“हे कुणाच्या बरं आधी लक्षात आलं?”
“ग्रीक देशातील एक विद्वान ॲरिस्टॉटल याने हे निरीक्षण नोंदवलं. त्याचं निरीक्षण हा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो. भारतातल्या आर्यभटाने, ५ व्या शतकात, पृथ्वी गोल असून आणि स्वतःभोवती फिरते हे सांगितलं होतं.”
“भले शाब्बास!”
“शाबासकी तर द्यायलाच हवी. या मनुष्यप्राण्यातल्या पोर्तुगीजचा फर्डिनांड मॅगेलनन आणि स्पेनचा जुआन सेबॅस्टिअन एलकानो या दोन उपद्व्यापी माणसांनी चक्क पृथ्वीला प्रदक्षिणा घालून पृथ्वी गोलच असल्याचं नंतर दाखवून दिलं.”
“असं कधी केलं त्यांनी?”
“१५१९ साली हा प्रवास फर्डिनांडने सुरू केला नि १५२२ साली जुऑनने पूर्ण केला.”
“दोन्ही महाराजांचा विजय असो!”
“एवढ्यावर कुठे या मनुष्यप्राण्याचा उपद्व्याप थांबतो.”
“पुढे काही घडलं का?”
“अरे, यांच्यातील काहीजण मग आकाशात गेले. काहीजण चंद्रावर गेले. तिथून त्यांनी गोल-गोल पृथ्वी बघितली. वेगवेगळ्या वेळी पृथ्वीचे फोटो काढले. ते सगळे गोलच निघाले.”
“वंडरफूल!”
“पण रॉबू, आपली पृथ्वी एकदम चेंडूसारखी अगदीच गोल नाही, बरं का? ध्रुवांच्या बाजूला थोडी चपटी आहे. या आकाराला ‘जिऑईड’ म्हणतात.
“म्हणजे कहानीमें ट्विस्ट.”
“किंचित किंचित. पण हे थोडंसं चपटेपण आता हा मनुष्यप्राणी गोलच समजायला लागलाय नि त्यावर त्यांचं एकमतही आहे.”
“अरे वा, बहुमतापेक्षा हे परवडलं.”
“हो ना. शिवाय पृथ्वी गोलच असल्याने पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती आणि सूर्याभोवती फिरते. यामुळेच आपल्याला सूर्य मावळताना दिसतो. त्यामुळे रात्र आणि दिवस होतात. उत्तर ध्रुवाकडे गेल्यावर पोल स्टार (ध्रुव तारा) उंच दिसतो, दक्षिणेकडे गेल्यावर तो खाली जातो, यावरून पृथ्वी सपाट नसल्याचं नंतर मनुष्यप्राण्याच्या लक्षात आलं. पृथ्वी गोल असल्यामुळेच मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये सूर्योदयाची वेळ वेगवेगळी असते. पृथ्वी गोल असल्यामुळेच गुरुत्वाकर्षण सर्व दिशांना केंद्राकडे ओढतं, म्हणूनच समुद्राचं पाणी गोलाकार दिसतं.”
“गोलमाल है भई गोलमाल है, हे खणखणीतपणे सिद्ध झालं म्हणायचं.”
“रॉब्या, रॉब्या, तो खणखणीतपण खड्ड्यात घाल. मला दणदणीत भूक लागलीय. दोन मिनिटांत गौरी वहिनींनी तयार केलेली बिर्याणी भेटली नाही तर माझ्या पोटात खोल खड्डा पडेल. तोसुद्धा गोलच असतो हे ध्यानात घे. त्या गोलात बिर्याणी लगेच गेली नाही तर तू कधी त्यात गुडूप होशील हे काही मी सांगू शकत नाही.” मावशी रॉबिन्सनकडे पाहत जिभल्या चाटत म्हणाली. रॉबिन्सनच्या लक्षात मावशीचा डाव आला. त्याने घाबरून मन्नतकडे बघितले. एका खिडकीतून टॉबिन्सन त्यांना बोलवत असल्याचं त्याला दिसलं. त्याच्या जीवात जीव आला. छाती फुगवून त्याने मावशीसह मन्नतकडे प्रयाण केलं.
ज्येष्ठ बालसाहित्यिक