ती लाल- निळी जोडी

अन्वीला वर्गातल्या प्रत्येकाला काही ना काही टोपणनाव देण्याची, म्हणजेच प्रत्येकावर एक ‘लेबल’ लावण्याची भारी सवय होती...
ती लाल- निळी जोडी
Published on: 

कथा

मंगल देवदत्त परुळेकर

अन्वीला वर्गातल्या प्रत्येकाला काही ना काही टोपणनाव देण्याची, म्हणजेच प्रत्येकावर एक ‘लेबल’ लावण्याची भारी सवय होती.

कोणी जरा जास्त बोललं की ती म्हणायची- ‘बडबड्या’. कोणी सतत पुस्तकात तोंड घालून बसलं की- ‘किडा’. खेळताना थोडी जरी गडबड केली की- ‘खोडकर’. आणि एखाद्याने नकळत एखादी छोटी चूक केली, की अन्वीचं ठरलेलं असायचं- ‘हा मुलगाच असा आहे!’

तिच्या स्कूल बॅगेत एक छोटी लाल डायरी होती. ती डायरी ती कोणालाच दाखवायची नाही. तिच्या पहिल्या पानावर तिने मस्त मोठ्या अक्षरात लिहिलं होतं- ‘माझ्या क्लासमधली पब्लिक!’ खाली भलीमोठी यादी होती:

रोहन - बडबड्या.

सिया - चुगलीखोर.

वेद - खादाड.

मिहिर - आळशी.

आर्या - अभ्यासू.

आणि अगदी शेवटी, नवीन आलेल्या मुलाचं नाव होतं-

ओम - विचित्र!

ओम नुकताच त्यांच्या वर्गात आला होता. तो अगदी शांत असायचा, जास्त कोणाशी बोलायचा नाही. त्याची बॅग जुनी होती. पण त्याची सर्वात वेगळी गंमत म्हणजे, त्याचे मोजे कधीच एका रंगाचे नसायचे! एका दिवशी डाव्या पायात पिवळा तर उजव्यात निळा. दुसऱ्या दिवशी हिरवा आणि काळा!

एके दिवशी मधल्या सुट्टीत अन्वीने त्याला विचारलंच, “ए ओम, तू कधी दोन्ही पायांत एकाच रंगाचे मोजे घालत नाहीस का रे?”

ओमने डबा खाताना वर पाहिलं आणि म्हणाला, “कधी कधी घालतो ना.”

“मग आज काय झालं?”

“आज दोन्ही सारखेच सापडत होते, पण एकाने शाळेत यायला नकार दिला. मग मी या दुसऱ्याला सोबत आणलं!” ओम अगदी सहज हसत म्हणाला.

अन्वीला हसू तर आलं, पण तरी तिने घरी जाऊन डायरीत त्याच्या नावासमोर पक्कं लिहून टाकलं- ‘विचित्र!’

काही दिवसांनी गणिताचा क्लास टेस्टचा रिझल्ट आला. ओमचे मार्क्स खूप कमी आले होते. अन्वीने लगेच मनात शिक्का मारला- ‘हा ढ आहे, अभ्यासच करत नाही.’

पण गंमत म्हणजे, त्याच दिवशी सायन्सच्या पिरीयडला सरांच्या कठीण प्रश्नावर ओमने इतकं सुंदर उत्तर दिलं, की सरांनी सगळ्यांसमोर त्याच्या पाठीवर शाबासकी दिली.

अन्वी चकित झाली. तिने वहीत बदललं- ‘गणितात कच्चा, सायन्समध्ये भारी.’

पुढच्या आठवड्यात स्पोर्ट्स डेच्या प्रॅक्टिसमध्ये धावताना पुढचा लहान मुलगा तोंडावर पडला, तेव्हा ओमने स्वतःची शर्यत सोडून लगेच मागे धाव घेतली आणि त्याला प्रेमाने उठवलं.

बाहेर उभी असलेली अन्वी हे सगळं बघत होती. तिच्या डोक्यात पहिल्यांदा एक विचार चमकला- ‘आपण माणसांना एवढ्या पटकन एका शब्दात कसं काय ठरवू शकतो?’

दुसऱ्या दिवशी क्लास टीचर वर्गात आल्या आणि त्यांनी फळ्यावर एक सुंदर वाक्य लिहिलं-

‘माणूस एका शब्दात कधीच मावत नसतो!’

मॅडम हसत म्हणाल्या, “मुलांनो, एखादा मित्र होमवर्क करून आला नाही, तर आपण लगेच त्याला ‘आळशी’ म्हणतो. पण कदाचित रात्री त्याच्या घरात काही अडचण असेल? एखादी मैत्रीण वर्गात शांत बसून असेल, तर आपण तिला ‘गर्विष्ठ’ समजतो. पण कदाचित तिला नवीन मुलांशी बोलायला भीती वाटत असेल. जे आपल्याला पहिल्या नजरेत दिसतं, तेच पूर्ण सत्य नसतं.”

अन्वीने खाली मान घातली. तिला आपल्या बॅगेतल्या त्या लाल डायरीची आठवण झाली.

त्याच दिवशी दुपारी शाळा सुटताना ओमच्या दप्तरातून एक जुना, घडी घातलेला फोटो खाली पडला.

अन्वीने तो उचलून दिला. फोटोत एक छोटी, गोड हसणारी मुलगी होती.

“तुझी बहीण?” अन्वीने सहज विचारलं.

ओमने मान डोलावली, “मिताली. खूप बडबड करायची.”

“अरे वा, मग तर तुझ्या अगदी उलटी!” अन्वी हसली.

पण ओमच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात मावळलं. त्याचे डोळे पाणावले. “ती आता नाहीये अन्वी. मागच्या वर्षी खूप आजारी पडली आणि...” ओमचा आवाज अडखळला.

तो सावरून म्हणाला, “तिला माझे असे उलटे-सुलटे मोजे बघून खूप हसायला यायचं. ती नेहमी म्हणायची- ‘दादा, सगळेजण एकाच रंगाचे मोजे घालतात, तू नेहमी असेच वेगळे घालत जा, एकदम भारी दिसतात!’ म्हणून मी शाळेत येताना असे मोजे घालतो.”

अन्वीने ओमच्या पायांकडे पाहिलं. त्या दिवशी एका पायात लाल मोजा होता आणि दुसऱ्या पायात निळा. त्या क्षणी अन्वीला ते मोजे जराही ‘विचित्र’ वाटले नाहीत. त्यात एका भावाचं बहिणीवरचं खूप गोड प्रेम लपलेलं होतं.

घरी आल्यावर अन्वीने थेट ती लाल डायरी काढली. रोहन, सिया, मिहिरच्या नावापुढील सगळी लेबल्स तिने खोडून टाकली. शेवटी ओमच्या नावापुढचं ‘विचित्र’ तर तिने रबरने पूर्ण पुसून टाकलं! त्याजागी चांगलं लिहावं का, असा विचार आला; पण थांबली. तेही एक लेबलच झालं असतं. त्याऐवजी तिने लिहिलं-

‘ओमबद्दल मला अजून खूप काही समजून घ्यायचं आहे.’

दुसऱ्या दिवशी वर्गात ओम तिच्या बाकाजवळ आला आणि म्हणाला, “अन्वी, आज माझा एक मोजा हरवलाय गं!”

“तुझा मोजा?”

“हो, तू सगळ्यांवर लेबल लावतेस ना, म्हणून म्हटलं माझ्या मोज्यावरही काही लावून ठेवलंयस की काय!” ओम डोळे मिचकावत हसला.

अन्वी मोकळेपणाने हसली, “अजिबात नाही!”

दोघांनी मिळून शोधल्यावर तो मोजा मागच्या बाकाखाली सापडला.

“मिळाला!” ओमने तो हातात घेतला.

अन्वीने हसत विचारलं, “मग आज दोन्ही पाय सारखे करणार?”

ओम मोज्याकडे बघत म्हणाला, “नाही. त्याला त्याचा दुसरा रंगीबेरंगी जोडीदार मिळेपर्यंत अशीच गंमत राहू दे!”

त्या दिवसापासून अन्वीच्या डायरीत मुलांची नावं तर राहिली, पण नावांसमोरची खोटी लेबल्स कायमची गायब झाली. कारण तिला समजलं होतं- माणसांवर लेबल लावणं सोपं असतं, पण त्या माणसाच्या मनातला खरा रंग समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागतो!

mdparulekar@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in